सुरतेच्या मोहिमेत ८ जाने. १६६४ रोजी इनायतखानाने महाराजांकडे वकील म्हणून एक मारेकरीच पाठविला , हे आपण पाहिले। महाराजांच्याकरिता मावळ्यांनी जी सुरक्षा ठेवली होती ती लक्षात घेण्यासारखी आहे. अशी व्यवस्था महाराजांच्याभोवती ठेवणं हा त्यांच्या सौंगड्यांचा अंगीभूत सहज स्वभावच बनला होता. दगा करणं हा शत्रूचा स्वभावच असतो. शत्रू फक्त संधी साधत असतो. महाराजांचं संरक्षण करणं हा मावळी डोळ्यांचा आणि हातांचा अगदी घारींसारखा स्वभावधर्मच झालेला दिसून येतो. अफझलखानाच्या भेटीच्या वेळी शामियान्यात जिवा महाला सकपाळ हा जर सावध राहिला नसता तर ? घातच. सुरतेच्या मारेकऱ्यानेही वकीलीचे नाटक करीत करीत महाराजांवर एकदम अचानक झडप घातली. जर जवळचे मावळे सावध नसते तर ? घातच. पुढे आग्ऱ्याच्या कैदेतही याच मावळ्यांचा अबोल पहारा महाराजांभोवती होता. पुढे जालन्याच्या स्वारीतच (इ. १६७९ ) महाराजांच्या अंगात फणफणून ज्वर चढला. त्यावेळी केसरीसिंह आणि मोहकमसिंह हे अचानक मराठ्यांवर हल्ला करावयास आले. अशा आजारपणात महाराजांचं रक्षण करणं , त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणं अवघड होतं. बहिजीर् नाईकाने महाराजांना आपल्या पाठीवर घेऊन पट्टा नावाच्या किल्ल्यावर सुखरूप पोहोचवलं. महाराजांची ही सिक्युरिटी भोवतीच्या सौंगड्यांनी उत्कृष्ट सांभाळली. त्यात उत्तम नोकरी करणे या गोष्टीपेक्षा कडव्या निष्ठेने राजा राखणे हाच भाग जास्त दिसून येतो. वास्तविक ‘ महाराजांचा दरबार तो सर्वांस सहज ‘ असा लौकीक होता. म्हणजे महाराजांना कोणीही भेटू शकत असे. पण याचा अर्थ भोंगळ बेसावधपणा असा नव्हता.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती तरी थोर व्यक्ती घातपाताने मारल्या गेल्या। कोणाकोणाचा मृत्यू संशयास्पद घडला. उदाहरणार्थ डॉ. श्यामाप्रसाद मुखजीर् , लाल बहादूर शास्त्री , महात्मा गांधी , इंदिराजी , राजीव गांधी , जनरल अरुणकुमार वैद्य , पं. दिनदयाळजी या थोरांच्या मृत्युचे दु:ख आपणास आहे. जगाच्या पाठीवर असे प्रकार घडतच आले आहेत. त्याबाबतीत जास्तीतजास्त दक्षता घेऊन सुरक्षाव्यवस्था ठेवणे एवढेच आवश्यक आहे , असे म्हणता येते.
पण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जी सिक्युरिटी त्यांच्या खाश्या मित्रांनी ठेवली ती निश्चितच उद्बोधक आहे. महाराज अंगात वेळप्रसंगी चिलखत घालीत असत. कधी पोलादी चिलखत , कधी कापडी चिलखत. त्याला बख्तर असा शब्द आहे. पण त्यांचं सर्वात मोठं चिलखत आणि अभेद्य शिरस्त्राण म्हणजे त्यांचे निधड्या छातीचे मावळे. या मावळ्यांनीच ही हृदयातील ठेव प्राणापलिकडे जपली.
मराठ्यांच्या पुढील इतिहासात घातपाताचे प्रसंग अनेक आहेत। सेनापती संताजी घोरपडे , सेनाधुरंधर संताजी भोसले अमरावतीकर , नारायणराव पेशवे , जयाप्पा शिंदे , वकील महादेव भट हिंगणे , वकील धर्मराव तमाजी गलगलीकर इत्यादी राजकारणी व्यक्तींचे खून पडले. त्यामुळे राजकीय उलथापालथीही झाल्या. त्याचा अभ्यास केला तर या सिक्युरिटीचे महत्त्व लक्षात येते. सिक्युरिटी हा थट्टेचा , विनोदाचा विषय नाही. ती अत्यंत गरजेची गोष्ट आहे. समर्थांनी तर असे म्हटले आहे की , महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी आपला जीव धोक्यात घालणे हे योग्य नाही. ‘ धुरेने युद्धासी जाणे , ही तो नव्हे राजकारणे. ‘ स्वत:ची अतिशय दक्षता घेणे म्हणजे भेकडपणा असा अर्थ कुणी लावू नये.
पेशवाईत गारद्यांनी नारायणरावष्श्ा पेशव्यांवर खुनी हल्ला केला। ऐन शनिवारवाड्यातच पेशवा मारला गेला. पण त्यांच्याआधी सदाशिवराव भाऊ पेशवा , नानासाहेब पेशवा , माधवराव पेशवा यांच्यावरही मारेकऱ्यांनी अचानक खुनी हल्ले केले होते हे सरदारांना माहित नव्हते का ? राजघराण्यांना तर ही भीती नेहमीच असते. शनिवारवाड्यात एका पेशव्याचाच खून झाला , तसाच कोल्हापुरात राजवाड्यात प्रत्यक्ष एका छत्रपती महाराजांचाच खून झाला. हे ऐतिहासिक सत्य आहे. यातून योग्य तो बोध घेणं आवश्यक आहे. राजकीय खून केवळ हत्यारांनेच केले गेले असे नाही , तर खाण्यापिण्याच्या पदार्थातूनही केले गेले आहेत.
चाणक्याच्या काळात खून करण्याचा एक विलक्षणच प्रकार ‘ मुदाराक्षस ‘ या नाटकांत , विशाखदत्त या नाटककाराने नमूद केला आहे. तो प्रकार म्हणजे ‘ विषकन्या ‘.
आजच्या काळातील एड्सपेक्षाही या विषकन्येचा प्रयोग भयंकर आहे. अशा विषकन्येशी शारीरिक संबंध ज्याचा येईल , तो मरणारच. म्हणूनच त्या स्त्रीला विषकन्या म्हणत.
एकूण खून पाडण्यातही खूप व्हरायटी आहे. ती भयंकर असली तरी मनोरंजक आहे. पण राजकीय आणि सामाजिक जबाबदारी ज्यांच्या शिरावर आली आहे , त्यांनी राष्ट्राच्या आणि समाजाच्या हिताकरीता स्वत:ची सुरक्षितता ठेवणं हे अत्यंत मोलाचे काम आहे. टॉप सिक्युरिटी , झेड सिक्युरिटी , स्वयंसिक्युरिटी.
कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराज छत्रपतींना इंग्रजांनी वेडे ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. त्या कैदेत छत्रपती महाराजांना इंग्रज अधिकाऱ्याने अतिशय वाईट रितीने ठार मारले. इथे महाराज अगतिकच होते. पण स्वामी श्रद्धानंदासारख्या संन्याशाचा खून झाला , तो संरक्षक दक्षता न घेतल्यामुळे. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजे भोसले घराण्यांत अनेक घातपाती प्रकार झाले , तो सिक्युरिटी न ठेवल्यामुळेच शत्रूंनी डाव साधले. शिवछत्रपती हे एकच असे नेते होते की , ते शत्रूच्या झडपेत कधीच सापडले नाहीत.

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel