स. १६७० हे वर्ष स्वराज्याला
रणधुमाळीचे गेले. पुढचे ही वर्ष तसेच जाणार होते. एकाच वेळी दोन आघाड्या न उघडण्याचे महाराजांचे धोरण होते. पण दोन शत्रूंनी जर स्वराज्यावरती वेगवेगळ्या आघाड्यांवर चाल केली , तर लढावेच लागणार ना! जंजिऱ्याचा सिद्दी आकाराने लांडग्याएवढा होता. पण समुदामुळे त्याचे बळ हत्तीएवढे होते. जंजिऱ्याचे सिद्दी एकूण तीन. सिद्दी संबूळ , खैरत आणि कासिम. या तिघांचाही एकमेकांवर अभेद्य विश्वास होता. त्यांची एकी पोलादी होती. त्यांच्यावर त्यांच्या सैन्याचा असाच विश्वास आणि अशीच निष्ठा होती. त्यांची महत्त्वाकांक्षा समुद आणि कोकणपट्टी आपल्या सत्तेत ठेवण्याची होती. महाराजांना हे तीन सिद्दी म्हणजे असाध्य दुखणे झाले होते. औरंगजेब तर कायमचाच खवळलेला होता. पोर्तुगीज संधी शोधत होते. यावेळी जंजिरेकरांचे भावी चढाईचे डाव ओळखून महाराजांनी जंजिऱ्याविरुद्ध आपणच मोहिम निश्चित केली. महाराज मोठ्या ईषेर्ने आपल्या कोकणी सरदारांना म्हणाले , ‘ खुद्द जंजिऱ्यावरच आपले निशाण लागले पाहिजे. जो कोणी निशाण लावील त्याला एक मण सोने बक्षीस! ‘

हे बक्षीस ईषेर्करता होतं. एक मण सोनं म्हणजे आजचे ३४५६ ग्रॅम्स , म्हणजे महाराजांनी ठरविलेले हे शाबासकीचे सोने भरगच्च होते पण अवास्तव नव्हते. महाराज रायगडावरून लष्कर घेऊन उतरले. रायगडापासून सुमारे १२ – १३ किलोमीटरवर महाराज थांबले. मोहिमेआधीच्या काही योजना पूर्ण करण्याचा त्यांचा विचार असावा. रात्रीचा मुक्काम पडला. ही रात्र होळी पौणिर्मेची होती.

याचवेळी राजपुरीच्या किल्ल्यात शिमग्याची होळी पेटली होती. कोकणचे जवान होळी भोवती खेळत होते , नाचत होते. गाणी गात होते. राजपुरीच्या तटाबुरुजांवर गस्त नेहमीप्रमाणेच कडक होती.

या पौणिर्मेच्याच दिवशी जंजिऱ्याच्या सिद्दी खैरत आणि सिद्दी कासिम या दोघांनी एक विलक्षण डाव योजला. मराठ्यांच्या ताब्यात असलेली राजपुरी जिंकून घ्यायचीच असा तो डाव होता. त्याकरता त्यांनी राजपुरीच्या उत्तर दरवाज्यावर खैरत सिद्दीने सैन्यानिशी हल्ला चढवायचा आणि राजपुरीच्या नैऋत्य दिशेने , म्हणजे पश्चिम आणि दक्षिण या दिशांच्या साधारणत: मध्यबाजूने सिद्दी कासिमने सैन्यानिशी शिड्यांवरून तटावर चढायचे अन् किल्ल्यात घुसायचे असे ठरविले. राजपुरीचा कोट हा काहीसा उंचट टेकडीवर होता. जंजिऱ्याच्या किल्ल्याच्या पूवेर्स समुद आणि किनाऱ्यावर हा राजपुरीचा कोट होता. थोडक्यात म्हणजे मुरुडच्या किनाऱ्यावर राजपुरीचा किल्ला. किल्ल्याला पश्चिमेस समुद अन् समुद अवघ्या सहा किमीवर जंजिरा.

अंधार पडल्यावर खैरतने सुमारे पाचशे सिद्दी सैनिक होडग्यांतून आणि सिद्दी कासिमने सुमारे तेवढेच सैनिक होडग्यांतून राजपुरीच्या रोखाने जाण्याकरता काढले. एकूण सिद्दी सैन्य किती होते हे माहीत नाही. पण अंदाजे एवढे असावे.

समुदातून खैरतची टोळी बहुदा लांबचा वळसा घेऊन दबत दबत होडीतून उतरून राजपुरीच्या उत्तर दरवाजाच्या रोखाने सरकू लागली. त्याचप्रमाणे सिद्दी कासिमने ही राजपुरीच्या पिछाडीच्या म्हणजे नैऋत्तेच्या तटावर दबत दबत चाल सुरू केली. राजपुरीवर उत्तर आणि दक्षिण बाजूने सिद्दींचे सैन्य सरकू लागले. किल्ल्यातील मराठे होळीचा खेळ खेळण्यात दंग झाले होते.

राजपुरीच्या तटांवरच्या पहारेकऱ्यांनाही या येणाऱ्या दोन्ही बाजूच्या हल्ल्यांची कल्पना आली नाही. सिद्दी खैरतने उत्तरेकडून चाल केली. कासिमनेही ठरल्याप्रमाणे पिछाडीकडून चाल केली.

होळीभोवती गाण्यानाचण्यात दंग असलेल्या मराठी सैनिकांना आधी उत्तरेच्या दरवाज्याच्याबाजूने येत असलेल्या हल्ल्याची चाहूल लागली आणि त्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याकरता अगदी स्वाभाविकपणे उत्तरेकडे किल्ल्यातले मराठे धावत सुटले. पिछाडीकडूनही असा आणखी एक हल्ला येत आहे याचे त्यांना भान राहिले नाही. त्यांचे सर्व लक्ष आणि बळ उत्तरेकडे धावले. गोळाबारी सुरू झाली.

पिछाडीकडून सिद्दी कासिमने शिड्यांवरून चढावयास सुरुवात केली. त्या बाजूला सिद्द्यांना प्रतिकार करण्यासाठी मराठे सैनिक अल्पसंख्येने होते. त्यामुळे कासिमने सैन्यानिशी झपाट्याने तटावर चढून किल्ल्यात प्रवेश मिळविला. झटापट सुरूच झाली. उत्तरेकडूनही सिद्दींचा मारा चालू झाला होता.

किल्ल्यातील मराठ्यांचे दारूगोळ्यांचे कोठार दक्षिणेचे बाजूस होते. त्या कोठारातून दारूगोळा काढून वापरण्यासाठी मराठे त्वरा करू लागले. सिद्दी खैरतचे लोकही मोठ्या जिद्दीने शिड्या लावून उत्तरेकडून तटावर चढू लागले. होळीप्रमाणेच लढाई धडाडून पेटली.

एवढ्यांत कसे घडले कोण जाणे! पण दक्षिण बाजूस असलेल्या दारूगोळ्याच्या कोठारावर ठिणगी पडली आणि एका क्षणात प्रचंड स्फोट होऊन मराठ्यांचा सारा दारूगोळा कोठारासकट उडाला. धूर उसळला. काहीच दिसेना. अनेक मराठे आणि कोठाराजवळ पोहोचलेले कासिमचे काही सैनिक चिंधड्या उडून खलास झाले. कासिम जिवंत होता. त्याने मोठमोठ्याने ओरडून आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी युद्धघोषणा सुरू केल्या. उत्तरेकडीलही सिद्दी खैरतचा हल्ला यशस्वी झाला. खैरत किल्ल्यात घुसला. भयंकर रणकंदन सुरू झाले होते. दारूगोळ्याचा भडका उडून मराठ्यांचे सारे बळ संपले होते. सिद्दीचा एल्गार फत्ते झाला होता. राजपुरी खैरत आणि कासिम यांनी काबीज केली. भगवा झेंडा उडाला. सिद्दीचे निशाण लागले. त्यांचे नगारे उडू लागले. दांडा-राजपुरी सिद्दींच्या कब्जात गेली.

आता समुद किनाऱ्यावरचा राजपुरीचा किल्लाच हातातून गेल्यावर खुद्द जंजिऱ्याच्या किल्ल्यावर मोहीम कशी करणार ? हल्ला करायला तळच उरला नाही. हा प्रकार दि. १० फेब्रुवारी १६७१ या दिवशी घडला. महाराज या दिवशी रायगडपासून एका मजलेवर तळ ठोकून राहिले होते.
-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel