आतां आपण शेतकर्यांचे हल्लींचे शेतस्थितीकडे वळू, आमचे महादयाळू इंग्रजी सरकारचा अम्मल या सोंबळया देशांत झाल्यादिवसापासून त्यांनीं येथील धष्टपुष्ट गाया कोंवळयाकाच्या वांसरासहित वोंहतुकीचे खांदकरी बैलास यज्ञविधि केल्याशिवाय मारून, मुसलमान, मांग, महार वगैरे आचार्यांस बरोबर घेऊन खाऊं लागल्यावरून, शेतकर्याजवळ कष्टाच्या उपयोगि पडण्याजोग्या मजबून बैलांचें बेणें कमी कमी होत गेलें. तशांत पर्जन्याची अनवृष्टि झाल्यावरून पडलेल्या दुष्काळांत चारापाण्यावांचून लक्षावधि बैलांचा सरसकटीनें खूप होऊन त्यांचें वाटोळें झालें. दुसरें असेंकीं, शेतकर्याजवळ उरलेल्या खल्लड बैलास फारेस्टखात्याच्या अनिवार त्नासामुळें व गायरानांच्या कमताईमुळें पोटभर चारावैरण मिळेनाशी होऊन त्यांची ( जनावरांची ) संतति दिवसेंदिवस अतिक्षीण होत चालल्यावरून त्यांच्यांत हमेशा लाळीच्या सांथी येऊन, त्या रोगानें दरवर्षी शेतकर्यांचे हजारों बैल मरूं लागल्यानें कित्येक शेतकर्यांचे गोठयांतील दावणीचे खुंटे उपटले.पुढें शेतकर्यांजवळ पहिल्यासारखीं मनमुराद जनावरें शिल्लक नसल्यामुळें त्यांच्या बागायतीची वेळच्या वेळीं उस्तवारी होऊन त्यांस पोटभर खतपाणी मिळेनासें झाल्याबरोबर बागायती जमिनींतील फूल कमी झाल्यामुळें हल्लीं बागाईतांत पूर्वीप्रमाणें पीक होत. नाहीं शिवाय आमच्या सरकारनें धूर्त ब्राह्यण कामगारांस हातीं धरून त्यांच्या मदतीनें दर तीस वर्षांनीं अज्ञानी भेकड शेतकर्यांच्या शेतीचा पैमाष करून त्यांजवर मन मानेल तसे शेतसारे वाढवूं लागल्यानें शेतकर्यांच्या हिम्मत खचून त्यांच्यानें त्यांच्या शेताची मशागत होईना, यास्तव कोटयावधि शेतकर्यांस पोटभर भाकर व अंगभर वस्त्न मिळेनासें झालें. यावरून शेतकरी जसेजसे शक्तिहीन होऊं लागले तसतशा त्यांच्यांत महामारीच्या आजाराच्या सांथी येऊं लागल्यामुळें दरवर्षी हजारों शेतकरी मरूं लागले. तशांत दुष्काळाच्या अमलांत अन्नावांचून लक्षावधि शेतकर्यांचा खूप होऊन यमपुरीस गेले व कित्येकांच्या दाराला जरी काठया लागल्या, तरी एकंदरीनें त्यांची पहिल्यापेक्षां खानेसुमारी जास्त वाढल्यामुळें. त्या मानानें पुनः पुन्हा त्याच शेतांच्या लागवडी होऊन जमिनीस विसांवा बिलकुल मिळेनासा झाला, यावरून जिराइत शेतें पिकामागें पिकें देऊन देऊन थकलीं, शिवाय दरवर्षी हजारों खंडी धान्य, कापूस, कातडीं व लोंकर परमुळखीं जात असून मुंबईसारख्य़ा बकाली म्युनिसीपालटींतील गोर्या इंजिनीयर व डॉक्टर कामगारांच्या गैरमाहितीमुळें, अथवा त्यांच्या आडदांडापणाच्या शैलीमुळें लक्षावधी खंडी खतांचें सत्व समुद्रांत वायां दवडल्यानें शेतांतील सत्व नाहींसें होऊन आतां एकंदर सर्व शेतें पडकळीस आलीं आहेत. अहो, हे विलायती गोरे इंजिनीयर गोर्या डॉक्टरांचे मिलाफानें, आपल्या देशांतील कारागीर लोकांच्या सामानसुमानांचा येथें खूप व्हावा, या इराद्यानें आपल्या पोटावर इंगळ ओढण्याकरितां अशा नानातर्हेच्या युक्त्या ( स्किमा ) आमलांत आणून बेसमज रयतेचें बेलगाची द्रव्या उधळून, येथील कित्येक हाताखालच्या काळया कामगारांकडून त्या त्या इमारतीस आपलीम नांवें देऊन मोकळे होतात. नंतर त्या इमारतीसहित रयतेचें उद्यां कां वाटोळें होईनां. त्यांच्या तुंबडया भरून लौकिक झाला, म्हणजे गंगेस घोडे नहाले. त्यांतून एखादे वर्षी पाऊस न पडल्यामुळें मुळींचे शेतांनीम पिकें होत नाहींत. कधीं कधीं बैल पुरते नसल्यामुळें कित्येकांच्या पेरणीचा वाफ बरोबर न साधतां पिकास धक्का बसतो. कधीं कधीं बीं विकत घेण्यापुरते पैसे सावकारांनीं वेळेस न दिल्यामुळें, अथवा मागाहुन उधार आणलेलें जुनें बीं पेरल्यामुळें कित्येकांचे पिकास धक्का बसतो. अशा नानाप्रकारच्या मुलतानी व अस्मानी अरिष्टांमुळें शेतांनीं पीक न झाल्यास, शेतकर्यांपैकीं एकटादुकटा शेतकरी, ब्राह्यण सरकारी कामगारांचे घरीं एकांतीं त्यास पिकापान्याची सविस्तर हकिकत कळविण्याकरितां गेला कीं,कोणी कामगार नुकताच स्नान करून अंगावर भस्म फासून पुढें पाटावर शालिग्रास मांडून अगरबत्तीच्या सुवासांत लपट होऊन त्याची पूजा करीत बसला आहे व कोणी भलती एखादी मळकट पोथी हातांत घेऊन वाचीत बसला आहे व कोणी नांवाला गोमुखींत हात घालून गच्च डोळे झांकून जपाच्या निमित्यानें बावनखणीकडेस ध्यान लावीत आहे. इतक्यांत बाहेर ओसरीवर शेतकर्याचे पायाचा आवाज त्यांचे कानीं पडल्यास डोळे न उघडतां सोवळा कामगार त्यास विचारतो कीं " तू कोण आहेस ?" शे.--"रावसाहेब मी शेतकरी आहे." का० "येथें देवपूजेंत तुझें काय काम आहे ? कांहीं भाजीपाला आणला असल्यास घरांत मुलाबाळांस स्पर्श न करितां यजमानीजवळ देऊन चालता हो. दुपारीम कचेरींत येऊन लेखी अर्ज तुझे नांवाचा कर, म्हणजे तुझें काय म्हणणें आहे, तें सर्व साहेबांस समक्ष जाऊन सांगेन. आतां जा कसा." पुढें शेतकर्यानें तसेंच मागले पायीं लागोलग राईतील कलेक्टरसाहेबांचे तंवूचे बाहेरले बाजूस जाऊस बुटलेर पट्टेवाले व जमादारसाहेबांस मुजरे करून तंबूचे दारापुढें लांब उभा राहून पहातो.तों कोणी साहेब पायाखालीं जमिनीवर काश्मिरी गालिचाची बिछायत, अंगावर सालरजंगासारख मोंगलाई पेहराव घालून खुर्चीआसनावर बसून लवेंडरच्या सुवासामध्यें आपल्या खाण्यापिण्याचे नादांत गुंग, कोणी कोचावर उताणा पडून पुस्तकांतील गुलाबी वर्णन वाचण्यामध्यें निसंग असल्यामुळें तेथील चपराशी त्यांस ( शेतकर्यास ) तेथून धुडकावून लावितात. तेव्हां शेतकर्यांस आपलीं गार्हाणीं सांगितल्याशिवाय घरीं मुकाटयानें जावे लागते. कावरून गोरे कामगारांच्या रीतिभाती, मिजाज व ताजीमतवाजा व काळे कामगाराची दौलत, विद्या,अधिकार, उंचवर्णाची शेखी व सोंवळेचाव, याच्या धुंदींत असणार्या उभयतां कामगारांच्या घरांतील बेपरवा बायकापोरांशीं अज्ञानी दुबळया शेतकर्यांच्या बायकामुलांचें दळणवळण नसल्यामुळें शेतकर्यांच्या वास्तविक अडचणी गोर्या वाकाळया परजातींतील सरकारी कामगारांच्या कानावर घालण्यास मार्गच नाहीं. कारण या उभयतां सरकारीं कामगारांचें सर्वच निराळें आणि असे परकी कामगार शूद्र शेतकर्यांच्या शेताची पहाणी करून त्यास सूट देणार ! पहाणी करतेवेळीं कधीं कधीं गोरे कामगार शिकार करून थकल्यामुळें तंबूंत सडकून झोंपा मारितात. आणि सोंवळें कामगार त्या गांवांतील निर्दय कुलकर्ण्य़ाच्या व अक्षरशून्य भितर्या पाटलाच्या मदतीनें गांवांतील त्याचे दोनचर दारूबाज गांवगुंड सोबती घेऊन पहाणी व्हावयाची व तत्संबंधी सर्व कागदपत्न पाहून सूत देणारे म्हटलें म्हणजे, समुद्राचे पलिकडचे गोरे कामगार ! इतकाही अट्टाहास करून शेतकर्यांस वेळच्या वेळीं सूट नच मिळाल्यास त्यानें मारवाडयापासून कर्ज काढून पट्टी न वारावी तर, का त्यानें चोंर्यामार्या करून पट्टी वरावी ! किंवा कसें ? असो, परंतु अज्ञानी शेतकरी कर्जवाम काढून चावडी भरण्यास चालले कीं, त्यांच्यापुढें वाटेंत बहुतेक अक्षरशून्य ठोंबे, भटांचा थाट करून आडवे उभे राहून फक्त " यजमान तुमचें कल्याण असो " असें म्हणून त्यांनपासुन कांहीं ना कांहीं पैसे उपटतात, त्यांतून वेळीं वक्तशीर पाऊस पडून थोडेंबहुत पीक रकमेस आल्यास आमच्या जहामर्द सरकारच्या भागूबाई गोर्या कामगारांनीं अज्ञानी भोळया शेतकर्यांजवळून बंदुकी-बरच्या हिसकावून घतलेल्या. त्यांच्या कित्येक पिकांचा रात्नीं डुकरें येऊन नाश करितात व बाकी उरलेल्या पिकांवर ब्राह्यण, मारवाडी, वगैरे सावकार लिंगायती व गुजराथी अडते आणि इतर जातींतील दलाल दीडीवाले नजर ठेवून त्यास ओरबडून खातात, इतकेंच नव्हे, परंतु अडत्याचे स्वयंपाकी गुजराथी ब्राह्यण, शेतकर्यापासून दर पल्ल्यामागें शेर शेर गूळ ओरबडूं लागले आहेत. असो, शेवटीं बाजार करून एकटा दुकटा शेतकरी. परत वेशीच्या दारांत आला कीं, गावांतील पोलीसपाटालासहीत एकदोन गांवगुंड दारुबाज लच्चांस थोडी थोडी दारू न पाजल्यास थोडयाच दिवसांत चावडीपुढें त्याची कुंदी निघालीच, असे समजा. काय हो हे आताचें ज्ञानसंपन्न धर्मराज्य ! परंतु या धर्म्राज्यांत कर्मनिष्ठ ब्राह्यण कामगारांच्या कर्तबगारीने काठीला सोनें बांधून रामेश्र्वरापासून अटकेपावतों फिरण्यास कांहीं हरकत नव्हती. परंतु सांप्रत लक्ष्मी आपल्या ज्ञान व वस्त्नहीन झालेल्या शेतकर्यांच्या घरांत पोटभर भाकर व अंगभर वस्त्न मिळेना, तेव्हां कंटाळून उघड दिवसा आपल्या समुद्र पित्याचे घरीं गेली व समुद्राचे पलीकडील तिच्या इंग्रज सख्या बांधवांनी तिच्या मर्जीप्रमाणें आळस टाकून उद्योगधंद्याचा पाठलाग करून, आपल्या घरांतील अबालवृद्ध स्त्रीजातीस बरोबरोचा मान देऊन त्यांचा इतामाम नीट ठेवूं लागल्यामुळें, ति ( लक्ष्मी ) त्यांची बंदी बटिक झाल्यावरून, ते आपल्या हस्तगत झालेल्या शूद्र शेतकर्यांपासून मन मानेल तसे द्रव्य गोळा करून, त्यांजबरोबर वरकांति गोड गोड बोलतात खरे, परंतु त्यांस मनापासून विद्या देण्याकरिता चुकवाचुकव करितात. याचें मुख्य कारण हेंच असावें कीं शेतकरी विद्वान झाल्याबरोबर वरकांति गोड गोड बोलतात खरे, परंतु त्यांस मनापासुन विद्या देण्या देण्याकरिता चुकवाचुकव करितात. याचें मुख्य कारण हेंच असावें कीं शेतकरी विद्वान झाल्याबरोबर ते आपल्या खांद्यावर आसूड टाकून लक्ष्मीस पुढें घालून आपल्या घरीं आणून नांदावयास लावण्याकरितां कधीं मागेपुढें पहाणार नाहींत, या भयास्तव ते शेतकर्यांस विद्वास करींत नाहींत कारण तसें घडून आल्यास त्या सर्वास दोम दोम अमेरिकेंत जाऊन तेथे रात्नंदिवस कष्ट करून आपली पोटें भरावीं लागतील. व शेतकर्यांचीं लक्ष्मी जर आजपावेतों आपल्या माहेरीं गप्प बसली नसती, तर भट ब्राह्यणांनी इतकें सोंवळें माजविलें असतें कीं, यांनीं आपल्या जन्म देणार्या मातापित्याससुद्धां अंमळ दूर हो ! आम्हीं आतां सोवळें नेसलों आहोंत, आम्हांला शिवूं नका, तुमची आम्हांवर साव्लिदेखील पडूं देऊं नका, म्हणून म्हणण्यास चुकले नसते. तेव्हां या भूदेव भटांनीं अज्ञानी शूद्र शेतकर्यांची काय दुर्दशा उडविली असती, त्याचें अनुमानसुद्धां करितां येत नाहीं. परंतु मी खात्नीनें सांगतो कीं, यांनीं तर मांगमहारांस जिवंतच नव्या इमारतीच्या पायांनी दगडचुन्यांत चिणून काढिलें असतें. आतां मांगामहारांनीं खिस्ती होऊन आपली सुधांरणा करून मनुष्यपदास पावावें तर, तेथील कित्येख काळे भत विद्वान खिस्ती, रात्नंदिवस गोर्या मिशनरींच्या कानीं लागून्ते या अनाथांची डाळ शीजूं देत नाहींत. कारण तेथेंही उंच वर्णांतील झालेले खिस्ती अनेक प्रकारचे भेदाभेद ठेवितात. असें पहाण्यांत आलें आहे. इतकेंच नव्हे परंतु आतांशीं कित्येक विद्वान भतब्राह्यण काखेंत सोंवळींभांडीं मारून इंग्लंडास जाऊं लागले आहेत. तेथें, हे प्रतापी जाऊन शेतकर्यांच्या घरांतील लक्ष्मीच्या नादांत लंपट होऊन सदा सर्वकाळ विजयी लक्ष्मीच्या झोकांत असल्यामुळें कोणाची परवा न करणारे इंग्रज लोकांस, मुक्या शूद्रादि अतिशूद्रांविषय़ीं काय काय लांडयालबाडया सांगून त्यांच्या समजुतींत काय काय फरक पाडून त्यांचा सरकारी कामगारांकडून कसकसा सत्यानास करितील. याविषयीं आमच्या. हल्लींच्या बापुडया गव्हरनर जनरल साहेबांच्या सुद्धां तर्क करवणार नाहींत. कारण आमचे अट्टल खटपटी माजी गव्हरनर टेंपलसाहेबांचे कारकीर्दीत कालच्या दुष्काळांत तलावकनाल वगैरे ठिकाणीं पोटें आवळून कष्ट करणार्या शेतकर्यांवर भट ब्राह्यण कारभारी असल्यामुळें, शेतकर्यांचा भटकामगारांनीं इतका बंदोबस्त ठेविला होता कीं, भेकड सिद्धी लोकांच्या मुलाबाळांस चोरून अमेरिकेंत विकण्याकरितां नेतेवेळीं त्यांची भयंकर स्थिती यांहून फार बरी होती, असें तुमच्या खात्नीस आणून देण्यापुरतें येथें सर्व लिहूं गेल्यास त्या सर्वांचा आसुडाच्या सवाईनें दुसरा एक स्वतंत्न ग्रंथच होईल. यास्त्व पुढें एखादे वेळीं मला फावल्यास त्याविषयीं पहातां येईल. परंतु हल्लीं. हिंदुस्थानविषयीं लंडनांत रात्नंदिवस बडबड करण्यापेक्षां में. फासेटसाहेबांनीं मे. ग्ल्याडस्टनसाहेबांसारख्या डोळसास कसेंही करून आपल्याबरोबर घेऊन येथें आल्याबरोबर. त्या उभयतांनीं एकदोन आठवडे महारामांगांच्या झोपडींत राहून त्यांची हल्लींची स्थिती स्वतः आपल्या डोळ्यांनीं पाहिल्याबरोबर ते पुनः इंग्लंडांत बडबड करण्याकरितां परत न जातां परभारां अमेरिकेंत पळून न गेल्यास, भटब्राह्यणांच्या पोरासोरांनीं या माझ्या लेखावर पाहिजेल तशा कोटया करून आपल्या वर्तमानपत्नांसह मासिक पुस्तकांनीं छापून बेलाशक आपलीं पोटें भरावींत. सारांश एकंदर सर्व माळी, कुळबी, धनगर वगैरे शेतकर्यांजवळ ईश्र्वराकडून आलेलें म्हणण्यालायक कुराण, बायबलासारिखें पुस्तक नसल्यामुळें त्यांच्यांतील महाप्रतापी भोसले, शिंदे, होळकर, गायकवाड वगैरे राजेरजवाडे शेतकर्यांचीं बहुतेक मुलें, गायीचे बाप, ज्यांस आर्यभटांच्या आडकाठीमुळें संस्कृत रुपावलिसुद्धां धड वाचतां येत नाहीं. आम्हीं मानव प्राणी आहोंत व आमचे वास्तविक अधिकार काय काय आहेत, याविषयीं एकंदर सर्व शेतकर्यांस मुळींच कांहीं समजत नाहीं. तसें जर नाहीं म्हणावें, तर शेतकर्यांनीं आपुल्या स्वजाति, आर्यमानवांच्या मलीन पायांचीं तीर्थे प्राशन करण्याची वहिवाट चालू ठेविली असती काय ? ब्राह्यणांच्या सांगण्यावरून त्यांच्या पूर्वजांनीं उपस्थित केलेल्या या दगड धातूंच्या मूर्ति, गाया, सर्प्व तुळशींच्या झाडांची शेतकर्यांनीं पूजा करून त्यांस देवाप्रमाणें मानलें असतें काय ? आर्यबाह्यणांनीं आपले मंतलब साधण्याकरितां संमूळ ज्ञानहीन करुन ठेविल्यामुळें त्यांच्यांत सारासार विचार करण्याची ताकद नसल्यामुळें, ते भुताखेतांवर भरोसा ठेवून मन मानेलं त्या वीरांची वारी अंगांत घुमवून, पोरासोरांसह आपल्या अंगावरील साधणी ( उतारे ) टाकून आपलें द्रव्या खराब करितात. त्यांचा औषध उपचारांवर भरोसानसल्यामुळें ते लुच्चड देवऋषींचे नादीं लागून आपल्या जिवास मुकतात. असो, याविषय़ी, पुढें एखादे वेळां पाहतां येईल. अशा चोंहोकडून सर्वोपरी नाडल्यामुळें स्त्त्वहीन झालेले अज्ञानी शेतकर्यांत लहानपणीं लग्नें करण्याची वहिवात असल्यामुळें, प्रथर एकंदर सर्व शेतकर्यांचे भडिमारापुढें एकटादुकटा टिकाव धरीत नसे. परंतु आतांचे इंग्रजी अंमलांतील त्यांचे नातूपणतू इतके तेजहीन झाले आहेत कीं, त्यांस गांवातील धगडया मुरळयासुद्धां भीक घालीत नाहींत व दुसरें असें कीं, त्यांच्यांत लहानपणीं लग्नें केल्यामुळें, लग्नें केल्यानंतर त्यांचीं मुलें वयांत आल्याबरोबर त्यांस रंगरूप. चालचलणूक, प्रकृती, स्वभान वगैरे गुणावगुण एकमेकांस न आवडल्यामूळें परस्परांत वितुष्ट पडून, कित्येक उनाड शेतकर्यांच्या छाकटया मुलांनीं आपल्या निरपराधी स्त्रियांचा त्याग केल्यामुळें त्या बापुडया आपल्या आईबापांचे घरीं आयुष्याचे दिवस काढीत आहेत व बाकी उरलेल्या निराश्रित बिचान्या हाळयापाळया करून आपला गुजारा करितां करितां यमसदनास जातात. शेतकर्यांचे आईबाप त्यांच्या संमतीशिवाय त्यांचीं लहानपणीं लग्नें करून देतात. यामुळें त्यांस लग्नाच्या बायको केल्यास ते कदाचित न्यायदृष्टींनें अपराधी ठरतील. असे माझ्यानें सांगवत नाहीं, तथापि त्यांनीं एकामागें तरी काय ? माझ्या मतें त्यांनीं पांचवी पाटाची बायको करावी. म्हणजे त्यांच्या मढयापुढें गाडगीं धरण्याच्या चातून त्यांचीं मुलें मुक्त होतील. त्यांतून कुणब्यांतील कित्येक शेतकरी ज्यांस ट, फ करून व्यंकटेशस्त्नोत्न, तुळशीआख्यान व रुक्मिणी स्वयंवर वाचतां आलें कीं, त्यांनीं दोन दोन, तीन तीन पाटांच्या बायका केल्यानंतर गांव पाटिलक्या करितां करितां गांवांतील धूर्व ब्राह्यणांचे नादीं लागून आज यांच्या खोटया खतांतावर साक्षी घालितात, उद्यां त्यांच्या खोटया पावत्यांवर साक्षी घालून गांवांतील एकंदर सर्व गरीबगुरिबांस त्नास देऊन त्यांजपासून मन मानेल तसें आडवून द्रव्य उपटतात. माळयांतील शेतकर्यांस ट, फ, कां होईना, वाचण्याचे नांवानें बाटोळें गरगरीत पूज्य. परंतु त्यांस भराड, गोंधळ, चितरकथा व कीर्तनें ऐकतां ऐकतां थोडेसे अभंग, चुटके व दोहरे तोंडपाठ झाले कीं, ते चौकोनी चिरे बन्ले, म्हणजे त्यांच्यापुढें विद्वान, पंडित व घोडयावर बसून गोळी निशाण मारणारे काय माल ! त्यांनीं एखादा अभंगाचा तुकडा अथवा दोहरा फेकला कीं, भल्या भल्या जाडया विद्वानांचे मोहरे फिरविण्यापुरता मनांत घमंडीचा भास झाला कीं, त्यांनीं लग्नाच्या बायकोच्या उरावर एकएक, दोनदोन पाटाच्या बायका ठणकावल्याच. त्यांच्या हाळीपाळीच्या जिवावर हांतांच्या बोटांत लहाननमोठया रुप्याच्या अंगठया, उजव्या कानांत मोत्यांच्या बाळया, सखलादी तांबडया टोप्या, बसवयस खालीं लहान लहान तरटांचे तुकडे, त्यावर पुढले बाजूला नवारीच्या काळया मिचकूट चंच्या, पलिकडे चिटकुल्या पितळेच्या घाणेरडया पिकदाण्या, त्यांत त्यांच्या आग्रहावरून विडा खाऊन थुंकू लागल्याबरोबर ओकारी येते. शेजारीं तरटावर एक दोन गांजा मळूं लागणार्या दाटी बळकटी करून बसलेल्या भांग्यासोबत्याबरोबर मन मानेल तशा, राजा विक्र्माच्या पोकळ गोष्टी सांगताम सांगतां आपण आपल्यासच टोपाजी मोर्याचे पूत हणगोजीराव म्हणवून घेणारे कारभारी बनतात, ज्यांच्या बायकांवर या कारभार्यांच्या जेवणाच्या फेरपाळया आल्या असतील, त्या बापुडया आपल्या हाळयापाळयांच्या मिळकतींतून या ऐदी कारभार्यांस पान, तंबाकू पुरवून वेळच्या वेळीं जेवूं घालितात. दुपारीं रगडून झॊंपा घेतल्यानतंर घराबाहेर पडतांचे दोन्ही पाय फांकून सोनारासरखीं पुढें उराडीं काढून चवडयावर चालतांना दोन्ही दोन्ही अंगवर डूलून बोळक्या तोंडवरील भुरक्या मिशीवर ताव देणारे दोन बायकांचे कारभारी, माळयांच्या आळोआळींनीं फिरतां फिरतां तेथील एकदोन तुकडेमोडू आप्तांस सामील करून गांवांतील अल्लड तरूना त्यांच्या पंचायती करितां करितां बहुतेकांच्या सोयर्याधायर्यांत तुटी पडून, बहुतेकांच्या कानांत सुंठी फुंकून कित्येकांच्या सुनाबाळींची मायमाहेरें वर्ज करवितात, शेवटीं हे पराक्रमी कारभारी गरीबगुरिबांस धमक्या देऊन त्यांजपासून दारूपाण्यापुरते पैसे घेऊन संध्याकाळीं घरीं जातांच बायकांच्या पाटयांतील उरल्यासुरल्या सडक्यासुडक्या फलफळांवर ताव देऊन, त्यांचे स्वयंपाक आटपेपावेतों तेथेंच त्यांच्याशीं लाडीगोडी लाऊन इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून टपत बसतात. गांवांतील लग्नाम्त हे रिकामटेकडे, तुकडे मोडून गांवातील दिवसाच्या तेलच्यावर धाड घालण्याकरितां त्याच्या मूळ्मातीस जातात. अशाप्रकारचे अक्षरशून्य मुजोर अधस कारभारी शेतकर्यांमध्यें पुढरी असल्यास त्या अज्ञानी शेतकर्यांची व त्यांच्या शेतांची सुधारणा कधीं व कशी होणार बरें ! असो, आजपावेतों मी काय़ जी माहिती मिळविली आहे,त्यांपैकी नमुन्याकरितां सदरची थोडीशी हकिकत आपल्यापुढें आणिली आहे,तिचा आपण स्वतः शोध करून पहाल, तेव्हां तुमची खात्नी होईल कीं, शूद्र शेतकर्यांवर हल्लीं मोठा खुदाई गहजव गुजरला आहे व ही माहिती तरी फारच थोडी आहे, तथापि आमचे उद्योगी सरकानें आपल्या गोर्या ग्याझेटियरकडून काळया भट मामलेदारांमार्फत आजपावेतों शेतकर्याविषयीं जी काय माहिती मिळविलेले आहे, तिच्याशीं कांहीं मेळ मिळेल असे माझ्यानें म्हणवत नाहीं. कारण एकंदर सर्व सरकारी खात्यांपैकीं एकसुद्धां खातें सांपडणार नाहीं कीं, ज्यामध्यें भट पडले नाहींत. या सर्व अनिवार दुःखांचा पाया आजपर्यत हजारों वर्षांपासून ब्राह्यणांनीं शूद्र शेतकर्यास विद्या देण्यानी बंदी केली हा होय. शेतकर्यांनीं विद्या शिकूं नये म्हणून पुराणिक व कथाडया भटांनीं त्यांच्या मनावर इतकी छाप बसविली आहे कीं, शेतकर्यांस आपलीं मुलें विद्वान करण्यामध्यें मोठें पापा वाटतें. त्यांतून हल्लीं त्यांची अतिशय लाचारी असल्यामुळें ते आपल्या मुलांस विद्या शिकवू शकत नाहींत, याचा अनुभव सर्वांस आलाच आहे. यास्तव आमचे अष्टपैलू धार्मिक सरकार ज्या मानानें शेतकर्यापासून नानाप्रकारचे कर, पट्टया, लोकलफंड वगैरे बाबी गोळा करितें. त्याचप्रमाणें त्यांनीं प्रथम एकंदर सर्व खेडयांपाडयांतील सरकारी मराठी व इंग्लिश शाळा बंद करून शेतकर्यांवर थोडीशी इमानेंइतबारें मेहरनजर करून शेतकर्यांपैकींच शिक्षक तयार करण्याकरितां दरएक तालुक्यानें लोकलफंडापैकीम रकमा खर्ची घालून, शेतकर्यांच्या मुलांस अन्नवस्त्ने, पुस्तकें, वगैरे पुरवून त्यांच्या मुलांकरिता बोर्डिग शाळा कराव्यात व त्या शाळांमध्यें त्या मुलापैकीं शाळागुरु तयार केल्यानंतर फक्त त्यांच्या शाळांनीं शूद्र शेतकर्यांनीं आपलीं मुलें अमुक वर्षांचे वयाचीं होईतों पावतों अभ्यास करण्याकरितां पाठवावींत, म्हणून कायदा केल्याशिवाय शेतकर्यांचे मुलांस, थोडेसें कां होईना, परंतु खरें ज्ञान झाल्यावांचून त्यांच्या मनावरील कृत्निमी ब्राह्यणांनीं उमटविलेला ठसा फिक्का पडावयाचा नाहीं. आणि तसें केल्याविना शेतकरी शुद्धीवर येणेंच नाहींत, परंतु आमच्या इदर थापडी तिदर थापडी करणार्या सरकारनें, पल्लोगणती ब्राह्यण कामगारांतील प्रोफेसर व डिरेक्टर शाळाखत्यांत खोगीरभतीला घालून एकंदर सर्व लोकलफंड जरी खर्ची घातला. तथापि त्यांजपासून शेतकर्यांचे मुलांस वास्तविक विद्या मिळणें नाहीं, कारण शेतकर्यांचे शेतीं कुंपणाकरितां महारांनीं लावलेल्या कांटया वार्यानें जातात, हीं किती तरी भाडयाचीं तट्टें, संध्याकाळ झाली कीं, धर्मशाळेपुढें गप्प उभीं रहावयाचीं ! हें आमच्या सरकारच्या कानांत हळून सांगून या प्रसंगीं आजचा विषय पुरा करितों.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.