पूरग्रस्त केरळला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने शंभर डाॅक्टरांची पथके तीन स्तरांत विभागली गेली. त्यातल्या पतनमतिथाच्या पथकाबराेबर जाण्याची मला संधी मिळाली. वल्लभ, अरंदमुळा, चेंगानूर तालुका, पेरूमला, अलेप्पी, कुटनाड हा सगळा सखल भाग अाहे. या सगळ्या भागांत दाेन लाखांपेक्षा जास्त लाेकांची गर्दी विविध शेल्टर कॅम्पमध्ये बघायला मिळाली. प्रत्येक शेल्टर कॅम्पमध्ये दहा ते पंधरा हजार नागरिक हाेते. अाैषधे येत अाहेत, जेवण मिळेल, कपडे मिळत अाहेत. हे सर्व अाणखी पाच ते सहा दिवस सुरू राहील. पण नंतर काय हाेणार, या भीतीने केरळवासी धास्तावल्याचे आम्हाला दिसले.
अरंदमुळा कॅम्पमध्ये गेलाे असताना तेथे श्रीदेवी सीजे या २५ वर्षांच्या तरुणीची मन हेलावून टाकणारी कहाणी ऐकली. बँक कर्मचारी असलेल्या या मुलीचे चार वर्षांपूर्वी हृदयाचे अाॅपरेशन झाले हाेते. तिला २८ अाॅगस्टला त्रिवेंद्रममधील श्रीचित्रादेवी हाॅस्पिटलमध्ये तपासणीसाठी जायचे हाेते. बेघर झाल्यामुळे तिची कागदपत्रे पाण्यात वाहून गेली हाेती. तिच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. फक्त केसपेपर हाेता. तिची ५४ वर्षांची अाई पामेला जया पाणावलेल्या डोळ्यांनी आम्हाला म्हणाली, माझ्या मुलीचे अायुष्य टांगणीला लागले अाहे. आम्हाला यातून काेण वाचवणार काहीच कळत नाही. मुंबई-भांंडुपचे रहिवासी असलेले अनुराधा जाॅर्ज अाणि सुरेश जाॅर्ज याचे वयस्कर अाई-वडील वल्लभ तिरुमल गावात राहतात. वडील सैन्य दलात हाेते. पूर अाल्यावर अाई-वडील पहिल्या मजल्यावर गेले. त्यांना बचाव पथकाने बाहेर काढले. त्या वेळी त्यांच्यासाेबत एक बॅग हाेती. या बॅगेत सैन्यात मिळालेली पदके, पासबुक, महत्त्वाचे दस्तएेवज, ७५ हजार रुपयांची रक्कम अशी मिळकत हाेती. अाजीने बाेटीने जाताना बॅग साेबत ठेवली हाेती. पण मदतीला आलेल्या लाेकांनी तुमची बॅग महत्त्वाची की जीव महत्त्वाचा, असे म्हणत त्यांची बॅग फेकून दिली. त्यात त्यांची सगळी पुंजी गेली. याच गावात महाराष्ट्रातल्या विटा गावचे भरत साळुंखे नावाच्या साेने व्यापारी असलेल्या मराठी कुटुंबाचे दाेन माळ्यांचे घर अाहे. पुराचे पाणी चहुबाजूंनी वाढू लागल्यावर ते पहिल्या मजल्यावर सुरक्षित ठिकाणी गेले. तेथेही पाणी अाल्यावर ते दुसऱ्या मजल्यावर गेले. पण पाणी तेथेही जाऊन पाेहोचल्याने अखेर दुसऱ्या मजल्यावरून त्यांना रेस्क्यू बाेटीने शेल्टर कॅम्पमध्ये न्यावे लागले. पाच ते सहा दिवसांनी ते घरी परतले. त्यांची माेटार पाण्याखाली गेली हाेती. घरातल्या सर्व खाेल्यांमध्ये चिखल साठला हाेता. येथील बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात गटाराचे अाणि संडासाचे पाणी मिसळ्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष माेठ्या प्रमाणावर निर्माण झाले अाहे. चेंगानूरमध्ये गेल्यावर जाणवले की लाेकांची भूक अाता वेगळी अाहे. अाता लाेक अापल्या घरात येऊ लागले अाहेत, पण घर साफ करण्यासाठी कामगारच मिळत नसल्याने माेठी अडचण निर्माण झाली अाहे. घरी कसे जायचे अाणि ते पुन्हा कसे उभारायचे, याचीच चिंता प्रत्येकाला सतावताना दिसते अाहे. अशाच वैद्यकीय मदतीला आलेली डॉक्टरांची पथके खऱ्या अर्थाने आशेची बेटं होऊन केरळला आत्मविश्वास देण्याचे काम करताना दिसत आहेत.
- संताेष अांधळे
Santosh Andhale
santoshreporter@icloud.com
(लेखक mymedicalmantra.com या वेबपोर्टलचे संस्थापक आहेत.)