'बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष' नामक मराठी पुस्तक हेमा सानेंनी लिहिले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामधील साधेपणा, स्पष्टता व सर्वव्यापीपणा हा जगात औत्सुक्य आणि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे. आज एकविसाव्या शतकातही अनेक अंगांनी त्याचा वेध घेतला जात आहे. हे पुस्तक बुद्धचरित्र व परंपरांचा वेध घेत बोधिवृक्षाचा बुद्धाच्या आयुष्याशी संबंध व संदर्भ जोडते.
सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध यांच्या चरित्रात वृक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याचे लक्षात येते. ज्या वृक्षाखाली ध्यान करताना बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तो अश्वत्थ (पिंपळ) म्हणजेच सिद्धार्थचा ज्ञानवृक्ष बोधिवृक्ष हे बहुतेकांना माहित असते; पण छोटा सिद्धार्थ सर्वप्रथम जम्बूवृक्षाखाली ध्यानस्थ झाला.
दोन शालवृक्षांच्या मध्यावर त्याचे महापरिनिर्वाण झाले, अशी माहिती वनस्पतीशास्त्रज्ञ हेमा साने यांनी या पुस्तकामधून दिली आहे. बुद्धचरित्र, बुद्धपर्व भारतातील धर्म, बुद्धाचा धर्म, बुद्ध होणे म्हणजे काय?, भिक्षू होणे म्हणजे काय?, बुद्ध समाजाचा तारणहार कसा आहे, बौद्ध वाड्मय यांचा परिचय पुस्तकातील पहिल्या भागात करून दिला आहेत.
दुसऱ्या भागात सिद्धार्थ गौतमपूर्वीची बुद्धांची परंपरा, त्या प्रत्येक बुद्धांचा ज्ञानवृक्ष यांची माहिती आहे. तन्हकर बुद्धाचा बोधिवृक्ष सप्तपर्णी, मेधंकर आणि पळस, सरणंकरचा पाटला आणि पाडल वृक्ष, दीपंकर आणि पिम्पर्णी, कौंडण्यचा मोई, मंगल, सुमन, रेवत, शोभित आणि नागचाफा अशा बुद्धांशी संबंधित विविध वृक्षांची माहिती यात दिली आहे. सिद्धार्थ गौतमाशी संबंधित जांभूळ, पिंपळ, अशोक, कदंब या झाडांची ओळखही लेखिकेने करून दिली आहे.