अशाप्रकारचा स्पृहणीय दिनक्रम या महापुरुषाचा चालला होता. ते दुपारीं पुष्कळ वेळां सर्वांच्या मागून जेवावयास जात. एकतर त्यांचा आहार दांडगा असे व दुसरे शांतपणे जेवण होई. ते दूध शेळीचे पीत असत. क्रिकेट व टेनिस यांस त्यांनी कधी स्पर्शही केला नाही. आपलें शरीर मोकळया हवेंत जितकें अधिक ठेवतां येइल तेवढें ठेवण्याची ते खबरदारी घेत. सूर्यप्रकाश व मोकळी शुध्द मुबलक हवा ही शरीरास जितकी मिळतील तितकीं थोडीच. अशा व्यायाम पध्दतीनें राजवाडे यांनी आपली प्रकृति निकोप व सुदृढ करून घेतली व मरेपर्यंत कधी म्हणून कधींच आजारी पडले नाहीत. ही शरीराची जोपासना चालू असतां त्यांनी बुध्दि व मन यांची जोपासना पण एकनिष्ठपणें चालविली. १८८४-९० पर्यंत आलटून पालटून अनेक विषय त्यांनी चाळले. कोणता विषय घ्यावा हें ठरेना. गणितशास्त्र, वनस्पतिशास्त्र, मानसशास्त्र वगैरे निरनिराळया शाखांत त्यांनी हात घातला व सर्वाची चाचणी करुन ते सोडले. शेवटी इतिहास हा विषय त्यांनी घ्यावयाचें ठरविलें व त्या दृष्टीने ते वाचूं लागले. जरी इतिहास हा विषय घेण्याचें ठरलें तरी अवांतर वाचनाचा नाद जो लागला तो कमी झाला नव्हता. ते कॉलेजमध्यें इतिहास हा विषय घेतलेले एकमेव विद्यार्थी होते. त्यांना कॉलेजमध्ये प्रोफेसरांच्या तासांस गेलें नाही तरी चालेल अशी परवानगी देण्यांत आली होती. बी.ए.च्या परीक्षेंत पास होण्यासाठी 'हिंदुस्थानाचा व महाराष्ट्राचा इतिहास मॅट्रिकच्यावेळी जेवढा मी शिकलो होतों तेवढा' बस होता असे राजवाडे यांनी लिहिलें आहे. यामुळे त्यांस इतर वाचन भरपूर करावयास फिकीर वाटली नाही. 'इतिहास, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राजनीतिशास्त्र, तर्कज्ञान, तर्कशास्त्र व मानसशास्त्र यावरील प्राचीन व अर्वाचीन, अस्सल व भाषान्तरित बरेच ग्रंथ मी मननपूर्वक वाचले. शिवाय वनस्पतिशास्त्र व फारशी भाषा कामापुरती मी शिकलों. कोशाच्या व व्याकरणाच्या साहाय्यानें एखादा फ्रेंचग्रंथहि मी वाचीत असें. प्लेटोचें सुराज्य (रिपब्लिक) ह्याचवेळी मी सबंध मराठीत उतरलें' असें आपले अध्ययनवृत्त त्यांनी लिहून ठेविले आहे. त्यांच्या दांडग्या व्यासंगास, प्रखर प्रज्ञेस शांतविणारें महाविद्यालय हिंदुस्थानांत नव्हतें. ते मोठया खेदानें लिहितात 'खरें म्हटलें असतां, ज्ञानार्जनामध्यें ज्यांचें सर्व आयुष्य गेलें, विद्येची मर्यादा वाढविण्यांत ज्यांनी तपेंच्या तपें घालविली व सर्व शास्त्रांत अपूर्व शोध करून मानवजातीला ज्यांनी अक्षय ऋणी करुन ठेविलें, अशा गुरुवर्यांनी चालावलेली एखादी पाठशाळा त्यावेळी असावयास पाहिजे होती. म्हणजे तेथे १०।२० वर्षे राहून वरील सिध्दांताच्या अनुरोधानें म्हणजे विद्या केवळ ज्ञानार्जनाकरितां शिकावयाची या सिध्दांताच्या अनुरोधानें-विद्यार्जनाची माझी हौस, अधिकारी गुरुंच्या देखरेखीखाली मी पुरवून घेतली असती. परंतु दुर्दैव कीं अशी पाठशाळा व असे गुरु मला त्यावेळी मिळाले नाहीत.' ४५ वर्षांपूर्वी जी रडकथा राजवाडे यांनी गायिली तीच आजही प्रत्यक्ष आहे. एम्.ए.झाला की झाला आचार्य. प्रोफेसर ही पदवी इतकी सोपी आहे कां ? कॉलेजमध्यें शिकविणारे कांही प्रोफेसर जें पुस्तक शिकवावयाचें त्याची पानेंही वर्गांत फाडतात., इतकी शिकविण्याबद्दल त्यांची आस्था. मग त्या त्या ज्ञानप्रांतांतील ज्ञान आत्मसात् करून, त्याच्या मर्यादा वाढवूं पाहणारे व वाढविणारे किती असतील हें मनाशीच ठरवावें. सर्व एकंदरीने खेळखंडोबा झालेला आहे. ज्ञानाची टर चालली आहे. तपेंच्या तपें तीव्रतेनें अध्ययन केल्याविना गाढें पांडित्य कसें संपादन करिता येणार ? परंतु आमच्याकडे ज्ञान म्हणजे परसांतली भाजी झाली आहे.