आपल्या कल्पनेचा नीट पुरस्कार केला जात नाही. याचें त्यांस वाईट वाटलें. एक दिवस रात्री पांढरी घोंगडी पांघरुन व ढोंपरापर्यंत लहानशी धाबळी नेसलेले असे राजवाडे सरदार तात्यासाहेब मेहेंदळे यांचेकडे आले व म्हणाले 'हें इतिहासाचें काम आतां मरतें; तेव्हां तुम्हीस त्यास कांही द्रव्य खर्चतां का व कांही मेहनत करतां का ?' त्यादिवशी कांही चर्चा झाली. खरे, पारसनीस, भावे, देव वगैरे संशोधन चालवीत होते. त्यावेळेस पुण्यास राजकारण व सामाजिक सुधारणा यांमुळें पक्षोपपक्षांची बजबजपुरी माजली होती. यामुळें या पंथहीन कामांत कोणी लक्ष देईना. शेवटी या सर्व दिरंगाईस राजवाडे कंटाळले व ते मेहेंदळे यांस म्हणाले 'आज आपण दोघां मिळूनच सभा स्थापन झाल्याचें जाहीर करूं या. आपल्या दोघांचा एक विचार होण्यास इतके दिवस लागले तर सर्वांचा एकसूत्री विचार होण्यास किती काळ लागावा ?' गणेश व्यंकटेश जोशी, गणपतराव जोशी, मेहेंदळे, राजवाडे, व नातू अशी पहिल्या वेळची, दिवशीची सभासद मंडळी. गुरुपुष्य नक्षत्र योग असा पवित्र दिवस पाहून मंडळ स्थापन झालें. त्या दिवशी 'कर्तरित्रय' हा निबंध राजवाडे यांनी वाचला. मंडळ स्थापन झालें. सभासदही वाढूं लागले व मंडळाचें काम जोरानें सुरु झालें. शके १८३५ मध्यें प्रथम संमेलन झालें व त्यांत महत्वाचे ठराव पास करण्यांत आले. यावेळचें अध्यक्षस्थान प्रसिध्द इतिहास संशोधक व प्रकाशक रा.ब.काशिनाथ नारायण साने यांस देण्यांत आलें होतें. त्यांनी त्या काळपर्यंत झालेल्या सर्व संशोधनाचा आढावा घेतला व 'झालेलें काम विस्कळित झालें; आतां सुसंघटित काम करणें या मंडळामार्फत होईल तें स्पृहणीय आहे' म्हणून सांगितलें.
या सभेंत रा. देव यांनी वर्गणी जमविण्यासंबंधीचा ठराव मांडला. संशोधकास द्रव्यसाहाय्य करण्यासाठी हें द्रव्य विनियोगांत आणावयाचें होतें. या ठरावावर राजवाडे यांनी पुढील भाषण केलें. रा.कीर्तने यांची बखरीवरील टीका प्रसिध्द झाल्यावर विविध ज्ञानविस्तारांतून दोन बखरी प्रसिध्द झाल्या. त्यानंतर आपले सन्माननीय अध्यक्ष यांनी कोणापासूनही कसल्याहि मदतीची अपेक्षा न करितां ४०।४२ बखरी छापिल्या. त्यानंतर मिरजेचे रा.खरे आले. त्यांनी आपलें घरदार विकून पटवर्धनी दप्तर छापण्याचा स्तुत्य उद्योग सुरु केला. रा. ब. पारसनीस हे आपला संसार करून हें कार्य करीत आहेत. मीहि माझ्या मित्रांच्या मदतीनें वर्षादोनवर्षांनी एखादा खंड काढितों. परंतु हे सर्व प्रयत्न सर्वांशी तुटक झाले व या कार्यांत आम्हांस त्यावेळी प्रसिध्द असलेल्या अशा कोणाहि मोठया मनुष्याचें अगर संस्थानिकाचें अगर इतर कोणाचें साहाय्य झालें नाही. आम्हां प्रत्येकास कागदपत्र हुडकून काढण्यापासून तों पुस्तकें विकून पैसे वसूल करीपर्यंतच्या सर्व विवंचना कराव्या लागल्या आहेत. यामुळे वेळाचा किती तरी अपव्यय होतो व प्रगति तर अति मंदगतीनें होते. तेव्हां आपला झाला परंतु आपणांपाठीमागून जे गृहस्थ हें कार्य करण्यास प्रवृत्त होतील त्यांच्या कालांचा अपव्यय होऊन आयुष्य फुकट जाऊं नये व कार्य तर त्वरित व्हावें अशासाठी काय योजना निर्माण करावी या विवंचनेंत मी असतां माझी व मेहेंदळे यांची गांठ पडली, व चमत्कार असा की, त्यांनीच होऊन मला विचारिलें की, संघटित स्वरुपाचें काम करण्यासारखी एखादी संस्था निर्माण करितां येईल का ? वस्तुत: हें इतिहासाचें काम पूर्वीच्या इतिहासप्रसिध्द लोकांच्या वंशजांचें आहे. हें एक प्रकारचें पितृकार्य आहे; व तें करण्यास त्यांच्यांतीलच एक मनुष्य तयार झाल्याचें पाहून मला आनंद झाला. अशा रीतीनें आम्हां उभयतांच्या विचारानें व आपले पहिले अध्यक्ष रा.ब.गणपतराव जोशी व आपले सध्यांचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या प्रोत्साहनानें सदरहू संस्था स्थापन झाली.