पेशावरचा परिचय– मुंबईहून पेशावर पंधराशें पंचेचाळीस मैल (जी. आय. पी. मार्गे) आहे. बी. बी. सी. आय.ने पंचाण्णव मैल जवळ पडते. तेथे जाण्यास सोईच्या अशा गाड्या दोन्हीही रेल्वेच्या आहेत. सर्वात अधिक सोईची जाणारी गाडी बी. बी. सी. आय्.ची फ्रंटियर मेल असल्याने मी. त्याच गाडीने आलो. सुमारे चव्वेचाळीस तासांत हा प्रवास झाला आणि पेशावरला येतांच पासपोर्ट अधिका-याकडे जाऊन माझ्या ‘ रहदारी 'वर शिक्का मारण्याविषयी विनंती केली. पण सरहद्दीवरील गडबडीमुळे तिकडे जाण्याची कोणासच परवानगी देतां येत नाही असे सांगण्यांत आले. काबूलचा रस्ता जो अडला गेला तो अफगाण हद्दीतलाच आहे. खेबर घाटापुढे डाका म्हणून अफगाणिस्तानांतलें एक गांव आहे. त्यानंतर जलालाबाद हे दुसरे शहर. आणि नंतर काबूल. अशा मार्गाने मोटारी जातात. सध्या जी गडबड चालली आहे, ती डाका व जलाला बाद यांच्यामध्ये असलेल्या भागांत आहे. सरहद्दीवरील प्रांतांत आफ्रिदी, वजिरी, महशुदी, बलुची इत्यादि अनेक रानटी जातींचे लोक आहेत. त्या सर्वांत ‘शिनवरी' म्हणून जी जात आहे ती विशेष नाठाळ आहे. त्यांच्यावर सत्ता कोणाचीच नाही. म्हणजे ते कोणालाच मानीत नाहीत आणि स्वत:पैकी कोणाला तरी मुख्य मानून त्याच्याच तंत्राने चालण्यासाठी लागणारी विचारशक्ति त्यांना नाही. थोडक्यांत सांगावयाचें तर प्रत्येकजण अगदी राजाप्रमाणे स्वतंत्र, नव्हे निस्तंत्र, आहे ! त्यांचा प्रांत अफगाणाधिपतीच्या सत्तेखाली मोडत असला तरी त्याच्यावर हुकमत गाजविणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही. राजा हा त्यांचा केवल शब्दपति' होय असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. लूट, मारहाण, चोरी हे तर त्यांचे वडिलोपार्जित धंदे