गाडी शिटी फुंकत निघाली .मोहनन शबनम गळ्यात अडकवत फलाट सोडत स्टेशनातून बाहेर पडला. बाहेर पडताच पुढे चालणाऱ्या साठीतल्या थोराड बाबास थांबवत, "बाबा चक्करबर्डी जायचंय,रस्ता सांगाल का?" विचारलं.
"चल सोबत मी पण तिकडनंच जातोय" म्हणत बाबानं रस्त्यानं काही अंतर चालत शेतातल्या बांधावरून जाणारी पायवाट पकडली.मोहनला गावापर्यंत सोबत मिळाली म्हणून हायसं वाटलं.निदान आता रस्ता विचार विचार तरी होणार नाही.
"कुठुन आलास पोरा?"
"बाबा अकोल्याहुन!" मोहन उत्तरला.
"हं!" म्हणत बाबा मुकाट्यानं चालू लागला.कदाचित गाव परिचीत नसावं वा ऐकलं नसावं म्हणून बाबानं मौन धारण केलं.
साडेतीन चारचा टाईम.मृग चांगलाच बरसून गेला असावा.पेरणी झालेल्या शेतातून इवले इवले ज्वारी,मका, बाजरीचे पोपटी कोंब बाहेर निघत कौतिकानं सृष्टीची नवलाई न्याहाळत होते. काही ठिकाणी अजुनही पेरणी , लावणी सुरूच होती.तिफन हाकणारा लहऱ्या घेत मस्त तिफनीच्या तालावर कळक हवेत फिरवत सूर लावत होता.आकाशात पावशा,व्हलार,सायंका सुर मारत होत्या. बांधावरील पायवाटेनं मागच्या वर्षीची सुकलेली हरळी गाठीजवळ टवका फोडत होती.मध्येच लोण्यागत मऊ शेतात अनेक जातीचे रंगबेरंगी किटक वर येत धावपळ करत होते.बाबानं धरलेली पायवाट नदीत उतरली.मोहननं हातानं पॅन्ट वर करत नदीच्या पाण्यात पाय टाकला.नदीचं पाणी अजुनही गढूळच होतं.नदी ओलांडत बाबानं काठ धरत डोंगराकडं चढण चढू लागला. गुजरातमधील अहवा - डांग सिमेवरील भव्य डोंगर छाताडावर आल्यागत दिसू लागले.सपाटी जाऊन वळणा वळणाचा चढाव लागला.तशी खोलगट भागात महू, अंजन, शिसव, साग, साल,कवठ, आंबा, कळकीचं बेट अधून मधून नजरेस पडू लागलं.आश्रमातल्या कोंडलेल्या वातावरणाची सवय असलेला मोहन त्या दृश्यानं सुखावू लागला.
पुढे दोन फाटे फुटताच बाबानं अंगुलीनिर्देश करत टेकडीपल्याडची समोरची वस्ती दाखवत दुसरा फाटा पकडत निघून गेला. मोहन दाखवल्या वाटेनं समोर दिसणाऱ्या वस्तीकडं निघाला.वळण ओलांडताच समोर दाट झाडीत सपाटी दिसली.तो झाडीत घुसताच त्याच्याच वयाची तरूणी लाकडाची भलीमोठी मोळी उभी करत डोक्यावर घेण्यासाठी डोक्याची आट लावत प्रयत्न करत होती. पण तिच्याकडंनं मोळी डोक्यावर घेतली जातच नव्हती.तोच समोर मोहन दिसताच तिच्या हातातल्या मोळीचा तोल बिघडत मोळी आडवी झाली.मोहनचं अस्तित्व तिला अडचणीचं ठरलं असावं. घारे डोळे, कपाळावर -गालावर वाऱ्यानं भुरभुरणाऱ्या लटा, कपाळावर घर्मबिंदू, त्यात वरकडी म्हणजे भिरभिरणारी व पाहणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेणारी भेदक नजर.क्षणीक नजरानजर होताच ठाव घेणाऱ्या भेदक नजरेनं मोहनची नजर खाली गेली.ती हातातली कुऱ्हाड संतापानं खाली फेकत कमरेभोवतीची ओढणी घट्ट करत मोळी पुन्हा उभी करत डोक्यावर घेऊ लागली.पण मोहनला हात लावण्यास सांगितलं नाही. मोहन न बोलता जवळ जात मोळीस हात लावून डोक्यावर चढवत पुढे निघाला. तिनं तशाच अवस्थेत तोल सांभाळत खाली बसत कुऱ्हाड हातात घेत उठली व मोहनच्या मागोमाग वस्तीकडं येऊ लागली.
वाडी लागली. समोरच शाळा दिसत होती तोच दडदडदड करत पाऊस कोसळायला सुरुवात झाली. मोहन थोड्यासाठी भिजला. समोरून गुरुजीनं पाऊस आता थांबणार नाही हा अंदाज पाहून टणटणटण घंटा बडवताच वीसेक पोरं गलका करत एकदम घराकडं पडत्या पावसात पाणी उडवत ओलं होत पळाली.गुरूजी 'असेल कुणीतरी वस्तीत पाहुणा म्हणून येणारा' मनात म्हणत मोहनची हजेरी दुर्लक्षित करत सायकल काढत निघू लागले. तोच मोहन नमस्कार करत " मी ..मी मोहन अनोरकर! हजर व्हायला आलोय!"चाचरत म्हणाला.
धोतराचा सोंगा आवरत एक पाय पायंडलवर व दुसरा उचलून सायकल धकवण्याच्या बेतात असणाऱ्या गाजरे गुरूजीनं कचकन ब्रेक मारत विचीत्र नजरेनं मोहन कडं कटाक्ष टाकत " आधीच सांगायचं ना मग! निघून गेल्यावर सांगणार होते का?"
पण अचानक समोर येत सायकल काढणाऱ्या गुरुजीवर मोहनच लक्षच उशीरा गेलं होतं. तो खरं तर सभोवतालचं वातावरण, पाऊस व जाणारी मुलंच पाहत होता.
गाजरे गुरूजीनं सायकल माघारी पलटवत भिंतीला टेकवली.
" धर्मूबाबा चहा टाकायला लावा हो दोन कप!" जोरानं बाजुच्या गल्लीतील घराकडं पाहत आरोळी मारली. गुरुजीनं मोहनला मध्ये बोलवत खुर्चीवर बसायला लावलं पण मोहन ओला असल्याचं लक्षात येताच मागून टाॅवेल आणून देत अंग पुसायला लावलं.मोहननं अंग पुसल्यावर सोबत आणलेल्या आदेशाची प्रत दिली व खुर्चीवर बसला.गुरुजीनं त्यास हजर करत रुजू रिपोर्ट लिहीला. त्यास मस्टरवर सही करायला लावत त्याचं अभिनंदनही केलं.तोच एक साठी ओलांडलेला म्हातारा हाफण हाफतच चहा घेऊन आला.बहुतेक त्यास दमा असावा.
चहा घेत गाजरे गुरूजीनं स्वत:ची ओळख करून देत मोहनची चौकशी केली.
" मी अकोल्याचा! " एवढंच जुजबी सांगत मोहन विषय टाळत चहा घोटू लागला.आज सकाळचं त्यानं काहीच खाल्लं नव्हतं.चहा घेताच त्याला तरतरी आली.
" धर्मू बाबा! हे नविन गुरूजी! शाळेत रूजू झालेत.आता मी पण आज उशीर झाल्यानं गावाला जात नाही म्हणून दोघांचं जेवणांचं बघा." सांगत गाजरे गुरूजीनं खिशातून पैसे काढत त्या म्हताऱ्याकडं दिले.मग मोहनकडं वळत "मोहन गुरूजी, हे धरमबाबा! निवृत्त झालेत एखाद वर्षांपूर्वी.
आश्रमशाळेत शिपाई होते.जवळच घर आहे त्यांचं.मी एक दिवसाआड इथंच मुक्काम ठोकतो.मुक्काम असला की तेच सारी सोय करतात.आपण आपल्या परीनं व्यवहारानुसार त्यांना मोबदला द्यावा.त्यांनाही मदत व आपली ही सोय. बरं तुमचं काय? तुम्ही इथंच राहणार की कुठून ये -जा करणार उद्यापासून?" गाजरे गुरुजीनं विचारलं.
" नाही गुरुजी,मी लांबचा.इथं दुसरीकडं कुठनं येणार!इथंच राहीन.पण इथं सोय करून दिलीत तर बरं होईल" मोहननं हात जोडत आर्त स्वरात विनवलं.
अनुभवी व मायाळू गाजरे गुरुजीनं ओळखलं. पोरसवदा विशीतलं पोरगं, नविनच घराबाहेर पडलंय म्हणून घाबरलंय.याला धीर द्यावाच लागेल.
" धरमबाबा आजपासून यांचाही डबा तयार करायचाय!" गाजरे गुरुजीनं जाणाऱ्या बाबास हुकूम सोडला.
" पण गुरूजी...माझ्याकडं तूर्तास थोडेच पैसे आहेत.बाकी नंतर दिलेत तर चालतील ना?" मोहनचा चेहरा एकदम पडलेला होता.
" पोरा धर्मूबाबास महिन्याचा मोबदला मी देईन तू घाबरू नकोस.तुझा महिन्यानंतर पगार झाल्यावर मला दे!"
हे ऐकताच आदेश हाती पडूनही आश्रम सोडल्यापासून मोहनला जी चिंता खात होती ती चुटकीसरशी सुटल्याचं पाहताच त्याला आनंदानं हायसं वाटलं. तो हात जोडून गाजरे गुरूजीकडं पाहत आभार मानू लागला.
" पोरा, नविन नोकरीला लागल्यावर प्रत्येकास अडचणी येतात.आम्ही दिवस भोगलेत.पण त्या वेळी आम्हास जशी कुणी तरी मदत केली होती तेच आम्ही आता करतोय.त्यात काय एवढं."
पण मोहनच्या दृष्टीनं अन्नाची एका महिन्याची सोय होणं ही खूप मोठी बाब होती.
शाळेचे अंगण पेरणी करून आलेल्या औताच्या बैलांनी भरायला सुरुवात झाली. सर्व पटांगणात खुंटेच खुंटे.बैलं, म्हशी ,गाई एकेक करत बांधल्या जाऊ लागल्या.साठवलेलं गव्हाचं कुटार,मक्याच्या कडबाची कुट्टी ढालं भरून भरून येऊ लागली.पटांगणात गोठा की गोठ्यात पटांगण ओळखू येईना.रात्री जेवण आलं. गाजरे गुरुजीसोबत मोहन बसला.तर वाढणाऱ्या मुलीकडं लक्ष जाताच तेच भेदक डोळे मोहन पाहू लागला व भेदक नजर मोहनचा वेध घेत हा तोच ज्यान आपण न सांगता आगाऊपणा दाखवत मोळी चढवली !म्हणून नजर खोल जाऊ लागली.मोहननं नजरेचा पिच्छा सोडत खालमानेनं जेवण आटोपलं.
रात्री शाळेच्या ओट्यावर गुरांना पुन्हा चारा टाकत एक एक माणूस येऊन बसू लागला.तंबाखू चोळत आज किती पेरलं, माझी पेरणी झाली, सांधायची गरज नाही ,रोप चासणीला लागलं,अशा गप्पा ठोकू लागलेत.काहींनी मिणमिणत्या लाईटच्या उजेडात पत्यांचा डाव मांडला.आश्रमात असल्या वातावरणाची सवय नसलेल्या मोहनला अनबक वाटू लागलं.व त्याच्या मनातील शाळेच्या स्वप्नास तडा जाऊ लागला.
मोहनने एक-दोन महिने साऱ्या गावाचं निरीक्षण केलं, सोबत शाळेच्या वेळे व्यतिरिक्त प्रत्येक पालकाला घरी, शेतात भेटत पोरांना शाळेची गोडी लागेल या बाबत मार्गदर्शन करू लागला.त्याच्या अडीअडचणी जाणून घेऊ लागला. दाखल पोरांना नियमित शाळेत येण्याची सवय लावू लागला व शाळेबाहेरील पोरांना शाळेत दाखल करू लागला. पोरांचा पट पन्नासावर नेला.बहुतेक पालक पोरांना पहिलीपासूनच जवळच्या आश्रमशाळेत टाकत.त्यामुळे मराठी शाळेत दाखल करण्याकडं ओढा कमी होता.कारण मराठी शाळेत टाकलं की पाचवी नंतर आश्रमात पट फुल या सबबीनं पाचवीत प्रवेश घेत नसत म्हणून पालक एकदा पहिलीत दाखल केलं की दहावी पर्यंत पाहणं नाही म्हणून आश्रमशाळेतच दाखल करत.फक्त ज्यांना अजूनही शिक्षणाचं महत्व नव्हतं अशा पालकांचीच राहिलेली मुलं गोळा करत मराठी शाळेत दाखल होतं.पण मोहननं सारी वस्ती दूर दूरवर फिरत पोरांना शाळेत दाखल व नियमित केलं.
वस्तीतील बहुतेक लोकं सकाळीच रेल्वेनं सुरत, ब्यारा, बारडोलीला कंपनीत, साखर कारखान्यात वा कपडा मार्केटला कामाला जात.ते रात्री नऊलाच वस्तीत परतत.वस्तीत राहिलेले म्हातारे, स्त्रिया मुलं मग गुरं फिरवणं, लाकडाच्या मोळ्या आणणं, वन उत्पादनं गोळा करणं असली कामं करत. तर त्या सोबत गहू, मका ,खिरा ,भुईमुगाची शेती करत. गावाच्या दक्षिणेला अहवा -डांगमधील सातमाळ्याच्या उंचच उंच उपरांगा.त्यातून उगम पावणाऱ्या तीन नद्या चक्करबर्डीच्या दक्षिणेस वरच्या अंगाला एकत्र येत. तेथेच एक छोटंसं धरण बांधून खालच्या पाच सात गावांना हिवाळा ,उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळे.त्या पाण्यावर ही लोकं डोंगर उतारावर सपाटी करून छोटे छोटे तुकडे (प्लाॅट )करून पिकं घेत.हिवाळ्यात गहू, हरबरा व उन्हाळ्यात मका ,भुईमूग, व खिरा पिकवत रेल्वेत फेरीवाल्यांना मका ,खिरा, शेंगा पुरवत. मग फेरीवाले रेल्वेत मका भाजून, शेंगा भाजून -वाफवून विकत.
मोहननं पगार झाल्या वर पगाराचे पाच भाग करत एक भाग आश्रमाकडं अनोरकर काकाजीकडं पाठवला.एक भाग स्वत:च्या जेवण खानपान व वरकड खर्चासाठी काढला.दोन भाग भविष्यासाठी बचत तर उर्वरीत एक भाग शालेय गरजा साठी खर्च करायचं ठरववलं. हे नियोजन त्यानं कायमसाठीच करून घेतलं. शालेय कामासाठी काढलेले पैसे शैक्ष.साहित्य आणणं, पोरांना खाऊ आणणं, शालेय सजावट व शाळेसाठी रोपं आणणे अशा कामासाठी दर महिन्याला खर्च होऊ लागले.गावात ओळख ,पालकांशी संपर्क होताच त्यानं महत्वाचं काम हाती घेतलं ते म्हणजे पटागणांतील गुरांचा व सुन्या लोकांचा बंदोबस्त करण्याचं. पटांगणात गाई- म्हशी सतत बांधलेल्या व रात्री त्यात बैलांची भर पडे.रिकामे लोक तर सुटीच्या दिवशी दिवसासुद्धा पत्त्याचा डाव रंगवत. मोहननं अशा लोकांशी वाईट होण्यापेक्षा सबुरीनं व वेगळ्या पद्धतीनं घेतलं. तो गाजरे गुरुजींना शाळेत थांबवत पोरांना घेत एखाद्या विद्यार्थ्याच्या जवळच्या शेतात झाडाखाली वर्ग भरवू लागला. निसर्गाच्या सान्निध्यात निरीक्षण , कृती, उपक्रमाद्वारे शिक्षण देऊ लागला. पण त्यासाठी दररोज वेगवेगळ्या विद्यार्थ्याच्या मळ्याची निवड करू लागला.येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी व पालकांनी विचारलं की " शाळेतल्या गोठ्यात वर्ग भरवण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात बरं!निदान पोरांना गाई गुरं,शेणामुताचा वास तरी येत नाही"अशा मार्मिकपणे सांगू लागला. मग पालकच म्हणत" गुरूजी त्यांचा बंदोबस्त करा हो!"
" मुलं तुमची,गाव तुमचा! गुरं तुमची!तुम्हीच करा बंदोबस्त!" मोहन त्यांनाच सुस्तवारीनं समजावू लागला. रानात भरवली जाणारी शाळेची बाब लवकरच पालकांनी सरपंचाकडं नेली.सरपंचानंही पाच सहा महिन्यातील शाळेची बदलती स्थिती पाहिलीच होती.एक नविन पोरसवदा मास्तर एवढ्या लांब येऊन काही तरी चांगलं करण्याची उमेद ठेवत असेल तर आपण त्याला साथ दिलीच पाहिजे.
सरपंच दुसऱ्या दिवशी चार पाच इतर जाणत्या लोकांना घेऊन शाळेत आला. सरपंचानं गुरूजीकडं गुरांचा व रिकामटेकड्या लोकांबाबत विषय काढत " साऱ्यांना आजच गुरं इथनं सोडायला लावूयात" सांगितलं.
पण मोहननं ओळखलं. तवा गरम असल्यावर किरकोळ कामापेक्षा जास्तीचच काम उरकवून घेऊया.
" बरं मी काय म्हणतो दादासाहेब! आपण लोकांना सांगणार, लोक नाराज होतील आपल्यावर.नाहक आपण दोषी होणार.त्यापेक्षा एखाद्या निधीतून शाळेला कंपाऊंडच केलं तर बंदिस्त झाल्यावर कुलूप लावलं की आपोआप गुरं बाहेर जातील."
सरपंचाला हे पटलं.कारण गुरं बांधणारे बरेच जण भावकीतलेच असल्यानं त्यांची नाराजी पत्करण्यापेक्षा कंपाऊंड केलं तर सुंठीवाचून खोकला जाणार.
सरपंचानं सोबत आणलेल्या लोकांकडे पाहिलं.
" मास्तरांच म्हणणं तर सोळा आणे सही आहे!" त्यांनीही रूकार भरला.
सरपंचानं एकास ग्रामपंचायतीत पिटाळत ग्रामसेवकास बोलावलं. व लगेच "कुठल्याही निधीतून, कसं ही करा ,हवं तर इतर कामांना कात्री लावा पण आठ दिवसात शाळेच्या कंपाऊंडचं काम सुरू करा" बजावलं. पण मास्तर पोरसवदा असला तरी पाहुण्याच्या काठीनं साप मारून त्याच काठीनं घरचं जाळं काढणाराही दिसतो हे मनोमन सरपंचाना कळून चुकलं.
आठ दिवसांत कंपाऊंडचं काम सुरू झालं.काम होताच बऱ्याच लोकांनी आपोआप म्हशी ,बैलं,गुरं बाहेर नेत आपापली जागा शोधत खुंटे गाडले.पण तरीही काही दोन तीन महाभाग असे राहिलेच की त्यांनी वालकंपाऊंडच्या मधल्या बाजुस आपली जनावरं बांधणं सुरूच ठेवलं.मोहननं त्यावरही उपाय तयारच ठेवला होता. त्यांनं कंपाऊंड च्या भिंतीला लागून आतील बाजुस दोन तीन फुट चौफेर जागा खोदली.सरपंचांच्या सहकार्यानं नर्सरीतून फुलझाडं व इतर रोपं आणली.मोहननं सरपंचाला विश्वासात घेत वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम ठेवला.गाजरे गुरूजीनं सरपंचासोबत तालुक्याला जात अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं. वृक्षारोपण अधिकाऱ्यामार्फत होणार होतं.पण त्यात ज्यांची जनावरं बांधण सुरू होतं, त्या जागेवर त्यांच्या हातूनच वृक्षारोपण करून घेण्याचं गुरुजीनं आधीच ठरवत त्यांना 'तुमच्या हस्ते वृक्षारोपण करायचंय'असं कळवलंही.. कार्यक्रम ,आलेली गर्दी पाहून व आपल्या हस्ते झाडं लावली जाणार व आपली गुरं जर तिथंच बांधलेली दिसली तर? यानं त्यांना मेल्याहून मेल्यागत झालं. म्हणून कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच त्यांनी आपली जनावरं कुणी न सांगताच व कुणाच्या लक्षात येणार नाही अशी हालवलीत.सरपंचाला त्याही स्थितीत मोहन गुरुजीच्या छद्मी चालीचं हसू आलं. आज मोहन गुरुजीच्या शाळेतील गोठा कायमस्वरुपी कुणाशी न भांडता कायमचा हलला व जातांना शाळेस कंपाऊंड ही करून गेला.
मोहन आता शाळेच्या वेळेव्यतिरिक्त बागकामातच राबू लागला.त्यांनं आवाराच्या भिंतीला लागून फुलझाडं , वेली, व ठराविक अंतरा अंतराने इतर झाडे लावली होती. ती आता गुडघा, कमर करत करत डोक्यापार होऊ लागली.गेटजवळ व व्हरांड्याच्या कोरीजवळ ही त्यानं गारवेल, बोगनवेल, मोगरा, जाई-जुई लावत वेली वर चढवल्या .कमानी केल्या शाळा हिरवीगार झाली.मग आश्रमातील आपली ओळखीची काही चित्रकार मुलं तो घेऊन आला.त्यांना साहित्य देताच पाच सहा दिवसात पोरांनी शाळा सुंदर रंगवली.चित्रे ,तक्ते, नकाशे यांनी शाळा बोलू लागली. दिड- दोन वर्षाच्या मेहनतीनं व खर्चानं मोहन गुरूजीनं शाळा नावारूपाला आणली.
वासुदेव पाटील....