मोहना टवकीत परतायला महिना होत नाही तोच तिच्या कानावर धक्कादायक बातमी आलीच.सहा एकर सारं शेत दत्ताजी सौंदणकरानं विकत घेत ताबा बसवल्याची.ऐन पावसाळ्यात उभ्या पिकावर व्यवहार राबत्यात सहसा होतच नाही.पण झालं होतं तसंच.
ती आली त्या दिवसापासून पार्ट्या, पत्ते, धुळ्यास जाऊन क्लबमध्ये पत्ते खेळणं, नाशिक- मुंबईस जाणं,नुसती रेलचेल चालू होती.गावाहून आल्यावर मध्यंतरी तिनं एके दिवशी त्याबाबत सकाळी सकाळीच विषय छेडत अडवलं ही होतं.पण संपतरावानं ओली बाळंणतीण असुनही तिला मजबूत चोपलं. ती दिवसभर रडत बसली. " घरात रहायंच तर मुकाट्यानं रहायंच नी मुकाट्यानं गिळत पडायचं.नसत्या चौकशा, टांग अडवणं बंद.मी काय करावं नी काय करू नये असले फुकटचे सल्ले मला नको!समजलं.लाथा बुक्क्यांनी तोंड सुजल्यावर तिला बिचारीला शहाणपण सुचलं व तिनं ठरवलं की आजपासून याच्या भानगडीत पडायचं नाही.नेमका त्याच वेळी ढोलू साडूकडं आला असेल तो तिथं टपकला.याच्या समोर प्रदर्शन नको म्हणून ती आटोपतं घेत पोरीला उचलत रडतच घरात जात दिवस भर झोपून राहिली होती.सध्याकाळी लाईट गेली.सासुनं दिवा लावला. मोहना इच्छा नसतांना उठली. तोंडावर पाणी मारत स्वयंपाकाला लागली.
" या कागदावर फुल्या आहेत तिथं सही कर! शेतासाठी लागणार आहेत!" संपतराव संतापातच बोलले.
पिठाचे हात धुत तिनं साडीला पुसत न वाचताच भरभर सह्या करून दिल्या. याची शेती उद्या विकत असेल तर आज का विकेना !यांनाच यांच भलं कळत नाही तर आपल्याला काय करायचं.चांगलं सांगणं यांना पटत नसेल तर का उगीच सांगुन मार खावा.
पण त्यानंतर आज ते घडलंच.
शेत गेलं हे कळताच ती दोन दिवस जेवलीच नाही.पोटात अन्नच नसल्यानं छोट्या पोरीसाठी दूधच उतरेना ती रडू लागली.म्हणून सासुनं शेजारणीस समजून सांगायला बोलवलं.
"मोहिनी! (सासरी मोहना नाव बदलत मोहिनी झालं)हे केव्हाना केव्हा घडणारच होतं. तू का उगाच जिवाला जाळून घेतेस. निदान छोट्या मुलीचा विचार कर.उठ नी दोन घास खाऊन घे!" मोहिनी उठली.दोन घास जबरीनं घशात ढकलत पोरीला पाजत रडू लागली. शेजारणीनंच तिला जाता जाता विचारलं. " मोहिनी पण तुझं माहेरचं घर तू का विकलं गं यांचं ऐकून! अडीअडचणीला जायला राहू द्यायला हवं होतं!"
"ताई मी कशाला विकू !गज्जन काकास द्यायचंय ते!" मोहिनीनं तिला नकार दिला.
" मोहिनी संपतनं ते केव्हाच विकलंय.नी तशी तूच सही दिल्याचं कळलंय मला!"
हे ऐकताच मोहिनीची पायाखालची माती सरकली.तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला व ती आणखीनच रडू लागली.
आपण चालणाऱ्या चैनीबाबत छेडलं तेव्हा आपणास मारलं त्याच दिवशी ढोल्या होता.व रात्री शेताच्या कागदाच्या नावानं दिव्याच्या उजेडात सह्या घेतल्या व आपणही सकाळच्या तमाशाने न वाचताच सह्या केल्या.म्हणजे गज्जन काकांना देणार होतो ते घरही गेलं.ती आक्रंदली.त्या रात्री शेजारीण निघून गेल्यावर ही तिला झोप लागलीच नाही.
दुसऱ्या दिवशी संपतराव जेवतांना ती रडून संतापानं विचारू लागली.
" माझ्या बाबाची अखेरची निशाणी विकून काय मिळालं तुम्हाला!निदान ते तर सोडायचं होतं! त्या गज्जन काकास मी शब्द दिला होता घर देण्याबाबत!"
मोहिनी गेलं ते गेलं! माझ्या बारा एकराचा नंबर गेला तरी डोळ्यातून टिपूस नाही काढला मी .नी तू एवढ्याशा खोपटाचं काय घेऊन बसलीस!नी राहिलंय ही असतं तरी त्या घरात रहायला तुझा गज्जन काका कुठं राहिला! तो पंधरा दिवसांपूर्वीच गेला!"
संपत अडखळत बरळला.
"गज्जन काका गेला? खोटं! साफ खोटं.! तसं असतं तर मला राधाक्कानं कळवलंच असतं!"
मोहना धक्क्यानं अविश्वासानं विचारू लागली.
" बरोबर...!अगदी बरोबर...!तुझ्या राधाक्कानं ढोलूला फोन करायला लावला होता. व आला ही होता.पण असल्या कुत्र्याच्या मौतीनं मरणाऱ्यांसाठी आपल्या सारख्या खानदानी लोकांनी का म्हणून जायचं!म्हणून मीच तुला नाही सांगितलं"
मोहिनी साडीचा बोळा तोंडाला लावत आकांत करू लागली.
तिला गज्जन काका गेला व आपण गेलो नाही! ज्यानं आपल्या आई-बाबास कोणतंही रक्ताचं नातं नसतांना पाणी दिलं, सुतक धरलं.नी त्यांच्या मरणासही आपण जाऊ नये !यानं ती संतापली.
" अहो काय मिळवलंत तुम्ही हे एवढ्या दिवस झाकून! कुठं फेडाल ही पापं!"
" अय माझी पापं नको मोजू.आधी तुझा तो काकाला काय गरज होती एका भिकारड्या मास्तराची बदली झाली नी हे न सहन झाल्यानं रेल्वेत उडी मारायची!असले छप्पन मास्तर गावात जात येत राहतात!मग त्यांच्यासाठी काय जीव द्यावा का माणसांनं? म्हणून नाही गेली तेच भलं नी जाऊ ही नको! नी गेलीस तर माझ्या घरात पाय ठेवायचा नाही."
आक्रोश! आक्रोश! नी ऊर फुटेस्तोवर आकांत ! पुढचे पंधरा दिवस तिला काहीच सुधरलं नाही.
दिवस जात होते. श्रुती मोठी होत होती.पण घरातली लक्ष्मी झरझर पावलांनी बाहेर जात होती.शेत विकून आलेली रक्कम खाणं पिणं व पत्ते यात बरबाद झाली. मोहिनीनं श्रुती मोठी होताच दुसऱ्याकडं शेतात कामास जायला सुरवात करून दिली.तिला कामाची लहानपणापासुन च सवय असल्यानं घरापेक्षा तिला कामातच आनंद वाटे.सासुला ती कामास गेली की नातीला दिवसभर सांभाळणं जड जाई पण घरात आता काहीच दिसत नसल्यानं ती मोहिनीस हो पण नाही वा नाही पण म्हणू शकत नव्हती.
संपतरावास आता सारी जमीन विकली गेल्यावर विकण्यासारखं काहीच नसल्यानं दत्ता सौंदणकरांनं पैशाचं नाव काढताच हाकलून लावलं.तो त्यास घोर अपमान वाटला.
"शेठ! या संपतनं तुम्हास बारा एकराचा नंबर दिलाय विसरलात का?"
" संप्या बारा एकराचा नंबर. तू फुकट माझ्या नावावर चढवला का?"
" शेठ संपतराव म्हणा! तोंड सांभाळा!"
" राव! अरे तुला लागले तेव्हा, रात्री अपरात्री पैसे पुरवलेत मी!फुकट नाही शेत घेतलं मी! नी 'संपतराव' म्हणा? राव तेच असतात जे स्व:चं रक्त शिंपून मनगटाच्या ताकदीनं साम्राज्य उभारतात.तुला संसार उभा करता आला नाही .बापाची इस्टेट मुताऱ्यात घालवली!नी संपतराव म्हणा!चल उतर पायरी.काही असेल विकायला तरच यायचं !" दत्ता सौंदणकरानं संपतला लायकी दाखवत हाकललं.
त्या दिवसापासून मग घरातली तांब्या पितळाची एकेक भांडी रात्रीच्या अंधारात कमी होऊ लागली. व दोन तीन दिवस संपतरावांची गुजराण होऊ लागली. संसार तर मोहिनी मजुरी करत चालवू लागली.
अशातच मित्रासोबत गाडी घेऊन क्लबमध्ये पत्ते खेळतांना आधीच्या सवयीप्रमाणं ब्लाईंडमध्ये मोठी चाल चालता चालता खाली झाला. शेवट उठून चालायला लागला.खाली मान."संपत बस्स का! असं मधूनच पाठ दाखवत जाणं ....! " आधीचा पिळ गेलाच नव्हता, सुंभ जळाला तरी! मित्रांनी त्यात भर घातली.बाहेर उभ्या गाडीचा सौदा झाला. नी अर्ध्या तासात खाल मानेनं किल्ली देत संपतराव बस स्टॅण्डवर रात्रभर पडत राज्य परिवहनच्या बसने सकाळी टवकीत परतला. दोन दिवस घरातून निघालाच नाही.
दिवस जातच होते.जाणाऱ्या दिवसाबरोबर संपतरावाची राहणी बदलत होती, पण जुन्या सवयी मात्र कशीही तडजोड करत टिकवण्यासाठी तो धडपड करत होता. पैसे होते, खायला - प्यायला मिळत होतं ,तेव्हा सकाळीच आठ दहा मित्र येऊन संपतरावांना उठवत होते.संपतराव दात घासत, अंघोळ करत तो पर्यंत टुगी लावून लाळ गाळत बसुन राहत.मात्र संपत आता बोलवायला पाठवे तरी येईनात.मग संपतच त्यांच्या घरी जाऊ लागला.तर काही दिवसांनी तरीही ते याला टाळू लागले.संपत त्यांच्याकढून पन्नास शंभर मागू लागला तर काहीही कारण सांगत याच्या तोंडाला पाने पुसू लागली. त्यांच्या जागी तेही बरोबरच होते.प्रत्येक गावात असली बेरकी आठ दहा खोंडं असतातच .त्यांचं काम ज्याची चलती त्याच्यामागं फिरावं खुशामत करावी व त्याच्या जिवावर मजा मारावी.तो खाली झाला की त्याला डच्च्यू देत वा प्रसंगी त्यालाच राबून घ्यावं नी मग दुसरं गबर गिऱ्हाईक पकडावं.आता संपत त्याच संक्रमण स्थितीतून जात होता.त्याला दोन आघाड्यावर लढावं लागत होतं.एक म्हणजे स्वाभिमानास ठेच व दुसरं आपली व्यसनं भागवणं.
गावात सटाण्याकडंचा संग्राम म्हणून एका व्यापाऱ्यानं टवकीत दुकान टाकलं.दोन तीन माणसं ठेवत तो तगडा तरूण मस्त व्यवसाय करू लागला. पैसा आधीच खोऱ्यानं होता व खोऱ्यानं कमवू ही लागला. मग रात्री मस्त पार्ट्या, पत्ते रंगू लागले,बिअर,
व्हिस्कीच्या बाटल्या फुटू लागल्या. त्याचं वैशिष्ट्य होतं दिवस भर धंदा म्हणजे धंदाच सांभाळायचा इतर सारं बंद.मग रात्री ऐश.
संपतरावामागं फिरणारी टाळकी हल्ली याच्यामागंच फिरू लागली.दिवसा याच्या दुकानात किरकोळ मदत करायची नी मग रात्री याच्याकडून खायचं प्यायचं.
मित्रांसोबत संपतही त्यांच्याकडं जायला लागला.
मोहिनी आपलं आपलं दिवसभर मजूरी करत राबत होती.सासु मथा ही घरातली चैन गेल्यानं व वयानं थकली होती. तिचा स्वभाव त्यामुळं आपोआप नरम झाला.श्रुती दोन वर्षाची झाली. मोहिनी तरी परोपरीनं संपतरावास वेळ व मूड पाहून समजवतच होती. कारण आपण मजुरीला गेलो की घरी पिद्दड येऊन मटन मच्छी करतात,हे तिला समजलं होतं. तिला या साऱ्यांची चीड वाटे.तिला आपल्या घरात कुणी पिऊन येणारा, वा सुना दुसरा नको वाटे.पिणाऱ्यांच्या नजरा केव्हा बिघडतील याचा नेम नसतो.
"पिण्यासाठी ,खाण्यासाठी असलं कुणामागं फिरणं बंद करा. घरात पार्ट्या, पिणाऱ्यांना आणणं बंद करा.त्यापेक्षा जे जमेल ते काम बघा.हवंतर गाडी येतेय तर ड्रायव्हरकी करा!" ती वारंवार विनवे.
संग्रामशेठ दुकानाबाहेर उभा होता.मजुर बाया शेतात जात होत्या.संग्रामच्या नजरेत एक भेदक नजर तरळली. त्या दिवसापासून तो मजूराच्या जाण्या येण्याच्या वेळा सांभाळत दुकानाबाहेर थांबू लागला. चार पाच दिवस तोच खेळ.
" गणा!"
"काय शेठ?" दुकानावर येऊन बसलेला संपतरावाच्या टोळक्यातला गणा विचारता झाला.
" समोर बघ."
" त्यात काय बघायचं!मजुरीला जाणाऱ्या बाया आहेत त्या!"
"लेका उगाच पुड्या नको गुंडवू,ते मलाही समजतं!फक्त मध्ये चालणारी ती कोण!"
गणानं पुन्हा जवळ जवळ येणाऱ्या घोळक्याकडं पाहीलं
"ती का! ती आपली मोहिनी वहिनी!संपतची कारभारीण!का क्काय झालंय?"
"असं व्हय! संपतरावाची मालकीण का! काही नाही सहज आपलं माहीत असावं म्हणून विचारतोय.
त्या दिवसापासून संग्रामला लळाच लागला.मोहिनी घरापासून गाव निघे पर्यंत आपली खाली मान घालत निघून जाई.तिला कोण काय करतंय वा काय पाहतंय याची खबरबात नव्हती.
संपतरावानं मोहिनीच्या सांगण्यावरून ड्रायव्हर लाईनीत पडायचं ठरवलं .पण गाडी घेऊन ड्रायव्हर ठेवत धंदा करायचं ठरवलं. तरी प्रश्न पैशाचा होताच.दत्त्ता सौंदणकर आपणास उभं करणार नाही हे त्याला ठाऊक होतं. संग्रामशेठ त्याला नजरे समोर दिसू लागला. पण अजुन पुरती ओळख नाही मग विचारायचं कसं? काही दिवस थांबून आधी ओळख तर करू मग पाहू ,असं ठरवत त्यानं संग्राम कडं बैठक वाढवली.
" गणा आज दुपारीच मस्त काही तरी बनवा रे!" संग्राम म्हणताच गणासह सारेच उडाले.
कारण संग्रामशेठ दिवसा धंदा म्हणजे धंदाच करतात.मग आज स्वत: हून पार्टीचं कसं सांगताय?
" अरे असं काय पाहताय.दिवसा दुकानात नसलं तरी इतर ठिकाणी करू या पार्टी! त्यात काय एवढं!"
सिग्नल मिळताच गणानं लगेच संपतरावाच्या घरीच मस्त करू या की!" सांगितलं.
संग्रामला तेच हवं होतं. तो लगेच तयार झाला तर संपतरावास हरकतीचा प्रश्नच नव्हता. मग दोन दिवसा आड दिवसा पार्ट्या होऊ लागल्या.मोहिनी ला आधी कळालंच नाही.
संपतला गाडी घेण्यासाठी डाऊन पेमेंट म्हणून दिड लाख रूपये ही संग्रामने दिले. पण बॅंकेची प्रोसेज करता करताच सोबतच्या मित्रासोबत नाशिक धुळ्याला जात क्लबमध्ये जिंकलो तर तेवढीच गाडीला मदत या स्वार्थासाठी म्हणा वा व्यसन, लाख रूपये संपतरावानं उडवून टाकले.ना डाऊन पेमेंट, ना गाडी.डोक्यावर मात्र संग्रामचं कर्ज. मग त्यानं आणखी प्लॅन बदलवत बॅंकेचं लोन घेत नवी गाडी घेण्यापेक्षा संग्रामशेठकडंनच आणखी रक्कम घेत जुनीच गाडी घेऊया!
काही दिवसांनी घरातला पसारा सासुनं कितीही साफ केला तरी दिवसा काहीतरी शिजलंय याची मोहिनीला शंका आलीच व तिने छडा लावला.तर आणखी पार्ट्या सुरू झाल्याचं तिला कळलं.त्याबाबत तिनं संपतरावास जाब विचारला.
त्यानं संग्रामशेठ कडंनं कर्ज घेऊन गाडी घेऊया व गाडीनं भाडं कमवत हफ्त्यानं कर्ज फेडण्याचं तिला सांगितलं.
तिचा पारा चढला.तिनं त्याला खडसावत सपशेल मना केलं.
"अगं या वेळेस मी कर्ज भल्यासाठी घेतोय! उदमात करण्यासाठी थोडं घेतोय?"
" ते काही नाही .समजा धंदा नाहीच चालला तर कर्ज कसं फेडणार? त्यापेक्षा कुठलंही कर्ज न घेता, भांडवल न गुंतवता, भले दोन पैसे कमी पण दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हरकी करा! ते नाही जमत तर दुसरं काही काम करा!आणि ते पण जमत नसेल तर भले घरी आराम करा. मी मजुरी करत घर सांभाळीण पण हात जोड़ते आता कर्जाचं नाव काढू नका!" ती रडायला लागली.
त्यानं तिला समजवत नाही घेणार कर्ज.पण रडू नको.करतो काही तरी काम हवं तर! सांगत शांत केलं.
" अहो आधी तुम्ही कर्ज काढलं तेव्हा काही तरी होतं पण आता कशानं फेडणार!"
त्याला समजलं ,याचा मोहिनीस आनंद झाला. त्यानं तिला हळूच कवेत घेत शांत झोपी गेले.श्रुती आता तीन वर्षाची होत आल्यानं सासुप्रमाणं तिलाही काळजी व हूरहूर वाटायला लागलीच होती.
मोहिनीनं नकार दिला म्हणून संपत आठ दिवस गाडीबाबत हालचालच केली नाही.पण संग्राम शांत बसेना.लाख तर गेले.पन्नास पडलेले.संपतलाही प्रश्न पडला.त्यातच मित्रांनी संग्राम शेठला विनवणी करत आणखी कर्ज द्यायला लावत संपतरावाला जुनी गाडी घ्यायला प्रेरीत केलंच. संपतराव व मित्र फिरत चार लाखाला गाडी ठरवली पन्नास बयाणा देऊन आले.संग्रामकडून आणखी साडेतीन लाख मागू लागताच संग्राम भाव खाऊ लागला.
" संपत आधीच दिड दिलेत नी आणखी साडेतीन ?हरकत नाही जबान दिली तर देईनच.पण पाच लाख नुसते विश्वासावर कसे देऊ. काही तरी ....? म्हणजे सोनं, शेत, घर? "
'घर' शब्द ऐकला नी बस्स संपतराव निश्चींत झाला. त्यांनं घर तारण देत करार केला.
मोहिनीला घराचं काही कळलंच नाही.तरी संग्राम व त्याच्या जागी कोणी का देत असेना पण फुकटही कर्ज नको म्हणणाऱ्या मोहिनीला गाडी घेतल्याचं कळताच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
पण तिला समजावत " तू घाबरू नको .मी स्वत: राबत यू मोठे हफ्ते ठेवत कर्ज फेडीन" सांगितलं.पण तरी मोहिनीनं दोन तीन दिवस अन्नच सोडलं.गाडी आली दोन तीन दिवस तो स्वत: गाडीवर जात खेपा करू लागला.पण मोहिनीस भरवसा वाटेचना. कर्जानं तिच्या काळजात धस्स होऊ लागलं.
गाडीला आठ दहा दिवस होताच एक दिवस संग्रामनं संपतरावांना बोलवलं.
" काय संपत गाडीचा मालक झाला, पैसे कमवतोय तर आम्हाला विसरलासच!"
"नाही शेठ कसा विसरेन तुम्हास!"
" मग गाडीची काही पार्टी वैगेरे होऊ द्या! "
" पार्टी तुम्ही सांगाल तेव्हा.त्यात काय एवढं!"
" मग ठरवा!नी हो पार्टी तुज्या घरीच ठेव."
" चालेल! पण घरी पेक्षा बाहेर ठेवू ना!?" संपतरावास मोहिनी आठवली व ते का कू करू लागले.
" जाऊ द्या मग नको.बाहेर काय आम्ही दररोज खातोच एरवी!"
" नाही शेठ तसं नाही. करतो घरीच व्यवस्था करतो!" संपतराव तयार झाला.
घरी येत त्या रात्री मोहिनीस त्यानं उद्या पार्टीचं सांगताच ती तापलीच.
तिनं सपशेल तिकडं कुठं ही करा ,पण मी घरी करूच देणार नाही."
तो काकुळतीला येत फक्त या वेळेसच.शेवटचीच पार्टी मग मी कधीच सांगणार नाही हवं तर! कारण संग्रामशेठनं मदत केलीय म्हणून.
" करायची तर दिवसा मी कामावर गेले की करा हवी तर!" मोहिनीनं तोडगा काढला.
"पण दिवसा विनाकारण गाडी उभी राहिल गं! धंदा बुडेल!" संपतराव असं म्हणताच तिनं त्रागा करतच कशीबशी संमती दिली.
दुसऱ्या दिवशी संपतरावानं मटण व दारू आणली. कामावरून येताच मोहीनीनं भाकऱ्या थापल्या. आठ नऊ वाजता गणा संग्रामशेठ व आणखी तीन चार जण आले. अंगणात पिणं सुरू झालं. गप्पा मारत चिवड्या सोबत ग्लास खाली होऊ लागले.मटण शिजताच संपतनं गणास घरात पाठवत पिस चखण्यास आणले. मोहिनीनं स्वयंपाक आवरला ताट वाढायला घेतले.सासु मथा नातीस मागच्या दारी झोपवत होती.
चुलीत मोठं लाकुड फोडायला वेळच नसल्यानं तसच घातलं होतं ते ढणढणत होतं भाजी मस्त गदक फोडत होती.
दारू साऱ्यांना चढलीय पाहताच संग्राम हळूच संपतला विचारू लागला.
" संपत कर्ज देतांना घर तारण घेतलंय मी.पण घर पाहिलंच नाही मी!"
संपतरावास वाटलं खरचं एखादा दुसरा राहिला असता तर आधी चार वेळा येऊन घर पाहिलं असतं.
" " खरय संपतराव.शेठ किती मोठ्या मनाचा! राजा माणुस! मित्रावर फुल विश्वास!"
" मी कुठं नाही म्हणतोय!"
" संपत तसं नाही .विश्वास आहे पण आलोच आहे तर घर तरी दाखव मध्ये!" संग्राम अंधारात ओठांवर जीभ फिरवू लागला.
संपतला वाटलं आपण मध्ये गेलो व संपतनं काही घराबाबत विषय काढला तर मोहिनीस घर तारण ठेवल्याचं कळेल, मग? घोळच.
तरी त्यानं " पाहून या" म्हणत आपण न जाता संग्रामला होकार दिला.
संग्राम घरात निघाला.मोहिनी ताटात भाकऱ्या मोडून ठेवत,कांदे, मीठ, लिंबूच लावत होती.भाजी ढणढणत्या चुलीवर रटरट आवाज करत शिजत होती.संग्राम स्वयंपाक घरात घुसला.बाहेर सारी ग्लास रिचवत बरळत होती.पायाचा आवाज ऐकताच संपतराव आलेय समजून
" अहो झालंय सारं, उरकवा पटकन" म्हणत मागे वळली. तो पावेतो संग्रामनं मोहिनीचा हात धरला. निमीषात मोहिनीनं नजरेतली व स्पर्शातली दुर्गंधी ओळखली. नी अस्वलाला फाडता फाडता राहिलेली वाघीण चवताळली.तिनं ओळखलं सावंताच्या मळ्यातलं अस्वलासारखंच हातावर पायावर ओरखडे उमटवायला व तोंडाचा वेध घ्यायला अस्वल चाल करून येतंय. तिनं चूल जवळ केली.तिला पलिता आठवला.चुलीतलं ढणढणतं, धडाडतं लाकुड हातात आलं.
" पुढं आलास तर लाकुडच घालीन"
अस्वलं हसलं , चवताळत पुढं सरकू लागलं.तिनं सर्रकन जळतं लाकुड भिरकावलं.अस्वलाच्या छाती पोटावर चटके बसले.तो विव्हळत पुन्हा चाल करत " गपगुमानं ऐक, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत,बेघरच करीन."
पेटत्या लाकडाला रोखुन धरत
" कुत्र्या! अस्वलाला फाडणारी मी तुला घाबरीन का? बऱ्या बोल्यानं निघ नाहीतर इथंच लाकडानं जाळीन"
अस्वल चवताळलं व चाल करून झडप घालून लाकुड हिसकावत दूर भिंतीवर फेकलं. तोच तिनं खाली पडलेलं डवनं उचलत पातेल्यात बुडवत भाजीनं भरलं . नी अंगावरच फेकलं. संग्राम झुकला तरी एका गालावर गरमा गरम उकळती भाजी पडताच तो जिवाच्या आकांतानं ओरडू लागला. तोच भिंतीकडं पडलेल लाकुड उचलत तिनं त्याच्या अंगावर टाकलं नी संग्रामचा जळफळाट व कुत्र्यासारखं विव्हळणं सुरू झालं.टल्ली झालेले बाहेरचे धडपळत, चाचपडत आत आले. गणानं संग्रामवर पाणी ओतत बाहेर आणलं. "काय झालं !काय झालं!" जो तो विचारू लागला.
" काही नाही शेठचा पाय अंगारवर पडला व तोल जाऊन डवन्यातली भाजी त्याच्या गालावर उडाली वाटतं" मोहीनी डोळ्यातून अंगार फुलवत बोलली.पण टल्ली झालेल्या साऱ्या बेवड्यांना खरच वाटलं.साऱ्यांनी उचलत त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आधी घरी नेलं. मोहिनी नं गणाला थांबवत पातेलं व भाकरीची चळत त्याच्या कडं देत " हे न्या व त्याला चारा व तुम्ही पण चरा!"
रागानं फणकारली.
गाल व छातीचा भाग जळाला होता तरी संग्रामनं तोंडातून मोहिनीनं जाळलं असा एक शब्द क़ाढला नाही. आणि तो तसा भुकणार नाही म्हणूनच आपल्या इज्जतीवर शिंतोडे उडू नयेत म्हणूनच तिनं रागावर नियंत्रण ठेवत लाकडावर पाय पडत भाजीत तोल गेल्याचा बनाव केला होता.
पण सारे निघून गेले व ती रात्रभर आक्रोश करत राहिली.
मोहन! अस्वलानं झडप घालून जखमी केल्यावर तू धावून येत मला बचावलं होतं! पण आज या अस्वलानं लुटलं असतं तर कोण आलं असतं सावरायला?
ती अंधारात आक्रोश मांडू लागली.
वासुदेव पाटील