दिवाळी सत्रानंतर शाळा उघडली.मोहन गुरूजी दोन दिवस आधीच खर्डीत येत जुन्या गुरुजींच्या मदतीनं खोली पाहून आपलं जुजबी गरजेपुरतंचं सामान टाकलं. शाळेची आदल्या दिवशीच साफसफाई करून घेतली. नमुना नंबर काढत सुटीत बनवून आणलेल्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर नावं टाकण्याचं व शिक्के मारण्याचं काम करून घेतलं.

दहा वाजता शाळा उघडण्यासाठी मोहन गुरूजी सोबतच्या गुरूजीसोबत शाळेत आले. शाळेच्या आवाराच्या फाटकाजवळचं वयोवृद्ध बाबा (धनाबापू) गोटा केलेल्या लहान श्लोकाचा हात धरून उभे होते.एक दोन टारगट लहान पोरं बाबाचा व श्लोकाचा डोळा चुकवून टकलीवर उलट्या बोटानं टपली वाजवत खिदळत होते. त्यानं श्लोक आपल्या डोक्यावर हात ठेवत रडू लागला. त्याच्या डोक्यावर नुकतेच केस येत होते. धनाबापू मारणाऱ्या पोरांना विनवत " बाबांनो माझ्या निष्पाप नातवास नियतीनं एवढं मारल्यावर

आणखी वरून तुम्ही का छळताय त्याला!" म्हणाला . धना बापुनं आपल्या खिशातून रूमाल काढत श्लोकच्या डोक्यास बांधला.आल्या आल्या मोहन गुरूजींचं त्या रडणाऱ्या पोरांकडं लक्ष जाताच त्यांनी लगेच ओळखलं. त्यांच्या काळजावर तप्त सुरी फिरवल्यागत चर्र झालं. त्यांनी त्या पोरास जवळ बोलावलं श्लोक आधी घाबरू लागला. मोहन गुरूजींनं एका मोठ्या मुलास दुकानावर पाठवत बिस्कीटचा पुडा मागवत त्याला दिला.

पोरांनी साफसफाई करत परिपाठ सुरू झाला. नित्य अध्यापनाचं काम सुरू झालं. विद्यार्थ्यांना घरून पासपोर्ट फोटो आणावयाच्या सुचना दिल्या. मधल्या सुट्टीत पोरांना खिचडी वाटप झाली. मोहन गुरूजी मध्ये फिरता फिरता श्लोकच्या आसपास फिरत होते.तोच त्यानं खिचडी घेतलेला ताट उचलत घराकडं पळ काढला. त्याला आवळा तोडायला गेलेली श्रुतीनं आजीला खिचडी आणत खाऊ घालायला सांगितलं होतं.तो घरी येताच आजीला ताटातल्या खिचडीचा घास भरवू लागला व दुसरा घास स्वत: ही खाऊ लागला. आजी खाटेवर झोपून झोपून कोवळ्या हाताचे जबाबदारीचे कवड खात होती. त्यानं आजीला भरवत स्वत: ही खाल्लं व ताट धुऊन ठेवलं. मग त्यानं वर फडताळावर ठेवलेली आईची जुनी सुटकेस कोठीवर उभं राहत काढली. ती उघडून तो त्याचे फोटो शोधू लागला.त्या सुटकेस मध्ये आईची एक साडी त्याला दिसली.त्यानं साडी नाकाला लावत वास घेतला.त्याला आई कामावरून परत आल्यावर मांडीवर घेई त्यावेळच्या तिच्याअंगाला येणाऱ्या वासाची जाणीव झाली.त्यात ठेवलेल्या कागदात त्याला त्याच्या आईचा एक कागद मिळाला.त्याच्या आईचं जाॅब कार्ड होतं ते मागच्या वर्षी काढलेलं. ते काय हे त्यास कळालं नाही पण त्यावरील आपल्या आईचा फोटो पाहताच तो घळाघळा रडू लागला.किती तरी वेळ तो घरात एकटाच रडत राहिला.शाळेची घंटा वाजली नी तो भानावर आला. त्यानं तो फोटो खिशात ठेवला‌ व आपला फोटो शोधून काढत शाळेकडं आला. वर्गात शिक्षक पोरांनी आणलेले फोटो ओळखपत्रावर डकवत होते.त्यानंही टेबलाजवळ जात आपला फोटो दिला. गुरुजींनी तो डकवून त्यावर शिक्का मारत त्याचं ओळखपत्र त्याच्या गळ्यात घातलं.

संध्याकाळी आवळे तोडून घरी आलेल्या श्रुतीस त्यानं ओळखपत्र दाखवलं. ते पाहून ती ही वेगळ्याच विश्वात गुंगली. आई राहिली असती तर आज मी ही श्लोकसोबतच शाळेत गेली असती व मलाही ओळखपत्र मिळालंच असतं. एका झटक्यात तिचं बालपण हिरावून घेत नियतीनं तिला पोक्त बनवलं होतं. ती उठली व भाकरी थापायला लागली.चुलीतल्या धुरात तिच्या नयनातील आसवे कुणाला दिसण्याचा प्रश्नच नव्हता.

श्लोक दररोज शाळेत जाऊ लागला. आठ दिवसात मोहन गुरुजी दररोज त्याच्या जवळ कसल्या ना कसल्या तरी निमीत्ताने जात व कधी गोळ्या तर कधी बिस्कीट देत.आपुलकीनं मायेनं पाठीवर हात फिरवत. विना माय बापाचं लेकरू काय असतं व त्याच्या वेदना काय असतात हे त्यांनी भोगलं असल्यानं आठ दिवसातच त्याला मायेनं जवळ केलं. श्लोक आधी जवळ जायला बिचके.पण मायेची ओल बालकं लगेच ओळखतातच.त्यात श्लोक तर माया, प्रेमासाठी आसुसलेला.त्याची भिती कमी होऊ लागली.तो बोलत नसला तरी आता गुरुजीनं काही वस्तू दिली की तो मुकाट्यानं घेऊ लागला. मधल्या सुटीत ताट घेऊन घरी पळू लागला.

मधल्या सुटीत सहावीच्या वर्गशिक्षकानं गप्पात श्रुती आठं दिवसात शाळेत आली नाही व बहुतेक आता शाळा सोडेलच वाटतं ,अशी शंका उपस्थीत केली. मोहन गुरुजी काहीच बोलले नाही. त्यांनी एक वेळ या पोरांच्या घरीच जाऊन पोरांचं घर तरी बघू .घरी कुणीतरी असेल ,निदान पहिल्या दिवशी आलेला बाबा त्याची तरी भेट घेऊन पोरीस शाळेत आणता आलं तर पाहू,असं त्यांनी पक्कं ठरवलं. पण ती पाळीच आली नाही.

दुसऱ्या दिवशी श्रुतीच शाळेत आली .कारणही तसंच होतं.

धनाबापूनं फकिराशेठला 'पोरांना दत्तक देता आलं तर पहा!' सांगितलं होतं. फकिराशेठनं धनाबापूस सकाळीच फोन करत

" औरंगाबादहून एक जोडपं येतंय.त्यांना दोन्ही मुलं दाखवा. मुलगा वा मुलगी एक दत्तक घेतीलच ते.बाकी कायदेशीर बाबीची पूर्तता मग करूच" सांगितलं.फोन वरून बोलतांना श्रुतीनं ऐकलं.श्लोकनं ही ऐकलं श्रुतीस फकीराशेठचं नाही पण धनाबापूंचं बोलणं थोडं थोडं समजलं.काही तरी घडेल याची तिला कल्पना आली. आपण कामावर निघून गेलो नी मागेच श्लोक ला घेऊन गेले तर.....? ती घाबरली. तिला रडू येऊ लागलं. तिनं त्यामुळं कामावर जायचं टाळलं.धनाबापूही तिला आज घरीच रहायला सांगणार होते.

श्रुतीनं श्लोकला शाळेतही एकटं जाऊ दिलं नाही.श्लोक समवेत दफ्तर घेत ती ही शाळेत आली. तिला पाहताच वर्गशिक्षकानं तिच्याकडंनं फोटो घेत तिचं ओळखपत्र बनवण्यासाठी आॅफिसात गेले. मोहन गुरुजींना त्यांनी श्रुती दाखवत ही तीच मुलगी श्लोकची बहिण...आज आलीय शाळेत, सांगितलं.श्रुतीला पाहताच मोहन गुरुजींना एकदम जोराचा धक्का बसत घाम फुटला.तेच घारे डोळे, तशीच नाकाची व चेहऱ्याची ठेवण.अगदी मोहनाचं.गुरुजी एक तप मागे गेले.त्यांना मोळी धरलेली मोहना आठवली. पण छे! मोहनाचा काय संबंध? ती कुठं टवकीत दिलेली .... एकाच चेहरापट्टीची असू शकतात माणसं. त्यांनी विचार झटकला.

"बाळा नाव काय तुझं?" मोहन गुरूजीनं ममतेनं विचारलं.

" श्रुती"

" आईचं नाव?"

गुरुजी कानात प्राण गोळा करत ऐकू लागले.

" मोहिनी" खाल मानेनं श्रुती उदासपणे उत्तरली.

मोहन गुरुजीस जी एक अंधुकशी आशा होती ती फोल ठरली. पण तरी फक्त आकारविल्हे फरक. मोहनाचा या गावाशी काडीमात्राचाही संबंध नाही. त्यांची खात्री पटली.मनात ते मोहन वरच संताप करू लागले .हल्ली तुला मोहनाचाच भास होतो हे चांगलं नाही. ते मनातल्या मनात त्रागा करू लागले.

दुपारी चार चाकी गाडी धनाबापूस घरून घेत शाळेत आली. फाटकात गाडी उभी करत एक मोहन गुरूजीच्याच वयाचं जोडपं खाली उतरलं. पोरं नुकताच वरणभात खाऊन बाहेर खेळत होती.

धनाबापूनं दुसरीच्या वर्गातून श्लोकला आणत त्यांना दाखवलं. बस्स! श्लोक बिचकला व तो त्यांच्या हाताला जोराचा हिसका देत श्रुतीकडं रडतच पळाला.श्रुतीला घट्ट बिलगत जोरजोरानं रडत 'आक्के!मी जाणार नाही', 'मी जाणार नाही' ओरडू लागला. पोरं त्याच्या भोवती गलका करत गोळा झाली. सर्व शिक्षकांना कळेना काय प्रकार आहे? त्यांनी मुलांना वर्गात बसवत धनाबापूस विचारलं.

"हे औरंगाबाद हून आलेत. त्यांना श्लोक व श्रुतीस पहायचंय.दत्तक घेणार आहेत ते एकास" धनाबापूनं उतरल्या तोंडानं उदासपणे सांगितलं.गुरुजींनी त्या साऱ्यांना आॅफिसात बोलावलं. मग एका शिक्षीकेनं श्रुतीस व श्लोकला समजावत आॅफिसात आणलं. पोरं रडत व थरथरत येण्यास मनाई करत होती.

जोडपं बसुन पोराकडं पाहू‌ लागलं.

बाईनं डोळ्यानंच पोराकडं खुण करत श्लोकला दत्तक घेण्याबाबत नवऱ्यास सुचवू लागली. तिनं पर्समधून मोठमोठी‌ चाॅकलेट काढून श्लोकला देत बोलवू लागली.

" आक्के!,आक्के! मी सांगितलं ना तुला. मी नाही जाणार!"

त्याचा ह्रदय फाडणारा आकांत साऱ्यांना कळत होता. पण एकही शिक्षक बोलत नव्हता.कारण धना बापूचं ही बरोबरच होतं.त्यांच्यानंतर या पोरांचं कोण पाहणारं होतं? आजी मरणाला टेकलेली.म्हणून दत्तक देत ते यांची सोय लावू पाहत होते.तर मुलांना आई गेल्यावर बहिणीस भावाला व भाऊस बहिणीला सोडून जायचं नव्हतं.पाषाण ह्रदयाला ही हेलावणारा व चीर पाडणारा प्रसंग होता. श्रुती श्लोकला घट्ट धरत खाली मान घालून रडत होती.

धनाबापूनं कोंडी फोडत विनवलं.

" ताई दोघा पोरांना घेतलं तर बरं होईल. सोबत राहिली तर ते येतील पण ! नी सुखानं राहतील पण!"

" नाही. दोघी नकोय आम्हाला! मुलीला घेऊन काय करू आम्ही! फक्त मुलगाच हवाय!" बाईंन सरळसोट व्यवहारीक उत्तर दिलं. त्यात दोन जिवाच्या होणाऱ्या ताटातुटीचं ना दु:ख होतं, ना संवेदना. मोहन आतून कळवळला. तो ही असल्या बाजाराला कितीदा उभा राहिला होता बालपणी आश्रमात.नंतर अनोरकर काकानीच नाव देत तो प्रकार थांबवतांना संस्थेसोबत त्यांचे वाद ही झाले होते. ते दिवस त्याला आठवले व मस्तकात सणक गेली. यांना आताच येथून काढावं असं त्यांच्या मनात आलं.

त्या बाईनं धनाबापूस

" बाबा! आम्ही गाडीत थांबतो.मुलाला लवकर घेऊन या.लगेच निघायचंय आम्हाला उशीर होतोय" सांगत ते गाडीकडं निघाले.

धनाबापुला अंधुकशी आशा होती की मुलबाळ नसलेली माणसं पोरांना पाहून पाझरतील व दोघांना घेतील. तो पाझर ओलावा दिसलाच नाही.पण नाईलाज होता. एकाची का सोय होईना. एक नंतर पाहू.असं ठरवत तो कठोर झाला व श्लोकला धरून गाडीकडं नेण्यासाठी उठला.पोरानं पाहिलं धनाबाबा आता आपल्याला धरतोय.त्यानं श्रुतीस सोडलं व सरळ मोहन गुरूजीच्याच पायाला लागत मागे तोंड लपवत रडू लागला. गुरुजीचं काळीज पेटलं, मुठी आवळल्या गेल्या.तोच धनाबापू श्लोकला येण्यासाठी पुढे सरसावला.

"बाबा !पोराला हात लावू नका, नाही म्हणतोय ना तो!" गुरूजी पेटलेला ज्वालामुखी उरात दडपत ठामपणे उद्गारले. सारे शिक्षक ते पाहून अवाक झाले.

" पण मास्तर अशानं त्याचे नंतर हाल होतील!कोण वागवेन या पाखरांना?"

" बाबा! जो चोच देतो तोच दाणा व मायेची ऊब पण देतोय! होईल सारं सुरळीत"

तेवढ्यात म्हातारा पोरास अजुन घेऊन येत नाही पाहून गाडीतला माणूस आला व धनाबापूस "काय करायचं लवकर उरकवा!" म्हणत घाई करू लागला.

" हात जोडतो आपणास! पोरं घाबरलीत!असलं नाजुक कामं अशी तडकाफडकी होत नसतात! एकतर आईच्या मरणाच्या आघातानं कोवळी मनं होरपळत आहेत तर त्यांना अलग करून आणखी भर घालू नका! सबुरीनं घ्या!" मोहन गुरूजी कळवळले.

" बाबा, परत गेलो तर आम्ही परत येणार नाहीत,आम्हास भरपूर आश्रम तयार आहेत पोरं दत्तक द्यायला ! पहा तुम्ही?" तो माणूस मोहन गुरूजीकडं लक्ष न देता धनाबापुस म्हणाला.

धनाबापू विव्हळतच काय करायचं याचा विचार करू लागले.

" चला निघा आपण नाही येणार पोरं" मोहन गुरूजींचा आवाज किंचीत वाढला.पण त्यात त्रिभुवनाचं वादळ घोंगावतंय असंच साऱ्यांना प्रतीत होऊ लागलं व तो माणूस संतापानं निघून गेला.

" बाबा मी पाहतो पोरांचं काय करायचं ते! ते माझ्यावर सोपवा.पण तूर्तास पोरांना असलं काही करून डागण्या देऊ नका!"

" पण गुरूजी माझ्या गोवऱ्या मसणाच्या वाटेवर जाऊ पाहत असतांना त्या आधी त्यांची सोय करावी लागेलच ना!"

" मी आहे ना! सांगितलं ना! " मोहन गुरूजींचं मायेचं व निर्धाराचं बोलणं ऐकून धनाबाबास धीर आला व ते गुरूजीच्या पायास लागू लागले. तोच मोहन गुरूजी दूर सरकत " बाबा हे काय करता आहात? मी लहान आहे ,माझा पाया कशाला पडतायेत?" नाकारू लागले.धनाबापू दूर सरकत आसवं पुसत श्लोकला बोलवू लागले. गाडी गेल्याचं पाहताच मोहन गुरूजीस घट्ट बिलगत लपलेला श्लोक धनाबापूकडं सरकला. तोच ....तोच... मोहन गुरूजीचं लक्ष श्लोकच्या गळ्यात घातलेल्या ओळखपत्रावर गेलं .ओळखपत्र गळ्यातच उलटं झालेलं होतं. व त्याच्या मागच्या बाजूस दिसणारा फोटो पाहताच मोहन गुरूजीला फोटो ओळखीचा वाटला नी त्यांनी श्लोकला थांबवत गळ्यातलं ओळखपत्र घेत विस्फारल्या डोळ्यांनी फोटो पाहू लागले. त्यांना जोराचा झटका बसला. धरणीकंपापेक्षाही मोठा! आजुबाजुला सारे शिक्षक आहेत याचं सारं भान विसरत ते बेभान होत विचारू लागले" हा फोटो.....को. कोण...?...या पोराकडं कसा...? धनाबापू उठत गुरूजीच्या हातातील ओळखपत्रावरील फोटो पाहू लागले.

" गुरूजी हीच पोरांची आई मोहिनी... आहे" . श्लोकनं ओळखपत्र मिळाल्यावर दोन चार दिवसानंतर आपल्याकडील जाॅबकार्डवरील आईचा फोटो श्रुतीस कापावयाला लावत प्लास्टीक पाऊचमधील ओळखपत्राच्या मागील बाजुस डकवला होता. तेच ओळखपत्र उलटे झाल्यानं मोहन गुरूजीस तो दिसला होता.

" पोरांची आई?... मोहिनी......?

बाबा पोरांचं मामाचं गाव चक्करबर्डी ना?" मोहननं अधिरतेनं विचारलं.

" होय गुरूजी. तुम्हास कसं ठाऊक?"

मोहन गुरुजीनं ' होय ' हा शब्द ऐकताच त्यांच्या साऱ्या संवेदना गारठल्या. आपल्या धमन्यातलं रक्त बर्फ होत जागच्या जागी थांबतंय .,यानं मोहन गुरुजीनं थरथरत भिंतीचा आधार घेतला .ते ढासळू लागले. अवचित आलेल्या वादळानं कधीकाळी मोहरलेला आंब्याचा मोहर गळत त्याला बहर येणंच थांबलंय ! तरी आंबा शितल छाया देत हिरव्या पानांनी नटलेला.नी असं झाड विजेच्या आगीठ्याच्या प्रपातानं क्षणात उभं उभं जळावं तसाच मोहन 'पोराची आई' ऐकून जळू लागला. त्यानं त्या ही स्थितीत श्रुती व श्लोकला गच्च मिठीत घेत गदागदा हालत, ढसाढसा रडत हंबर फोडला. त्यांच्या आसवांच्या महापुरात घाबरलेली पोरं कावरीबावरी होत न्हाऊ लागली.

मोहना........!

मोहना........!

मोहना........!

गुरुजीनं साऱ्यांचे प्रश्नांकित चेहरे पाहिले पण त्यांना काही सांगता येणं त्यांना शक्यच नव्हतं. साऱ्यांना

'नंतर सारं सांगतो ' इतकंच त्रोटक सांगत ते खोलीवर निघाले. गावातनं खोलीवर जातांना त्यांना काहीच सुध राहिली नाही. त्यांना दिवाळीच्या सुटी आधीचा दिवस आठवला.हजर व्हायला आले होते ते, तो! खोलीवर येत त्यांनी दार बंद केलं नी टाहो फोडला.

" मोहना का?, मोहना खरच तुला तोंड दाखवावंसं वाटलं नाही का गं?" मी गावात येऊन शाळेजवळून तुझा ट्रक गेला.मी किती करंटा गं? नाही पाहू शकलो तुला.त्या संध्याकाळी तुझा शीर नसलेला देह गावात येत असावा नी मी शाळा सोडत धुळ्याला रवाना? व्वा रे नियतीचा बनाव! दुसऱ्या दिवशी तुझ्या अखेरच्या वारीत पायी चालणारा वारकरी होऊनही तू तोंड दाखवलं नाहीस! तुझ्या पायरीशी येऊनही दर्शनाची आस तशीच‌ राहिली? हे अनंता बा ! विठ्ठला का रे हा फेरा! " मोहन गुरुजी भिंतीला धरून धरून आक्रोश करत दावा मांडू लागले.

" मोहना ! तुझ्या प्रेताजवळ येऊन तुझ्या बोटातल्या अंगठीची सुनी जागा पाहूनही मला किंचीतही शंका न यावी की त्यात ही तुझाच बनाव?"

आताच ही वारी संपवून वैकुंठाला यावंसं वाटतंय गं!!!?

.

.

पण

.

पण तुझी चिमणी पाखरं...?

का त्या साठीच तू मला या गावात बोलावलंय?

तुझा नाथ नाही तर निदान त्यांचा नाथ होण्यासाठी...? बोल मोहना! बोल ना गं? काही तरी बोल?"

किती तरी वेळपर्यंत नुसता आकांत, आक्रोश नी टाहो......

मोहनला चक्करबर्डीतली धर्मुबाबाच्या तेराव्यानंतरची रात्र आठवली.

" गज्जनकाका समजवा याला! नाही तर यापुढे मी माझं तोंड ही दाखवणार नाही याला!" शाळेत मोहना बोलत होती.

तिनं तिच म्हणनं खरं केलं.बारा वर्षच काय पण मरणानंतरही जवळ असुनही तोंड दिसू दिलं नाही.

आता मात्र मोहनला त्याचं म्हणनं खरं करण्यासाठी जगावंच लागणार होतं......
.
दुसऱ्या दिवशी सोबत शिक्षकाला घेत ते मोहना राहत असलेल्या गोडावून वर गेले.

त्यांना पाहताच धनाबापू धावत पळत आला. त्यानं अंगणात खाट टाकली.

पण मोहन गुरूजी तिच्यावर न बसता थेट घरात जात श्लोक व श्रुतीस पाहू लागले. श्रुतीत त्यांना आता स्पष्ट मोहना दिसू लागली.त्यांनी दोन्ही पोरांना गळ्याशी लावलं.त्यात काल जी माया होती त्याच्या कित्येक पट जास्त आज माया व कसक होती.त्या पोरात त्यांना संपतराव कुठे दिसेचना.फक्त मोहना... मोहनाच.

त्यांनी म्हातारीकडं जात म्हातारीस बसतं केलं व चक्करबर्डीची ओळख देण्याचा प्रयत्न केला.पण म्हातारीला शुद्धच नसल्यानं तिनं फक्त हातातल्या स्पर्शाचा ओलावा जाणला. मोहन मोहनाचा मोडका संसार पाहू लागले. त्यास असंख्य वेदना होऊ लागल्या.

घरातल्या कोपऱ्यात देव्हाऱ्यात पोरांनी आपल्या बापाचा -संपतरावाचा फोटो ठेवला होता.व बाजुला लक्ष्मीचा ही फोटो होता.नी पाहता पाहता मोहन चपापला .देव्हाऱ्यात त्याला आपल्या कोऱ्या सातबाऱ्यावरील मिळकत दिसली.श्रुतीनं आईची अंगठी आईनंतर देव्हाऱ्यात ठेवली होती. ती दिसताच मोहन गुरुजीचा पुन्हा बांध फुटला. एवढ्या हाल अपेष्टा सहन करूनही मोहनानं आपण दिलेली अंगठी जपून ठेवली. आपण तिनं पांघरवलेल्या शालीसारखीच.त्यांनी देव्हाऱ्याजवळ जात ती अंगठी उचलली. तोच थंड शहारा त्यांच्या अंगावर उठला. देव्हाऱ्यातील दिव्याच्या प्रकाशातील वलयात त्यांना मेघात दिसणाऱ्या चेहऱ्यासारखाच मोहनाचा चेहरा दिसू लागला.......

मोहन गुरूजीनं म्हातारी , धनाबापू व त्यांची पत्नी तिघांना आश्रमातील दवाखान्यात भरती करत उपचार केले व वृद्धाश्रमात सोय केली.पण म्हातारी काही दिवसातच गेली.

सहा महिन्यातच त्यांनी राजीनामा देत दोन्ही पोरांना घेत अकोला गाठलं. अनोरकर काकाजींचा सारा कारभार ते पाहू लागले. श्रुती शिकली. श्लोक शिकला. श्रुतीला एम.बी.बी.एस. करत आश्रमातल्या दवाखान्यातच लावलं. तिला नवरा पण डाॅक्टरच मिळाला.

श्लोक प्राध्यापक झालाय. श्रुती व श्लोक म्हाताऱ्या मोहन गुरूजींची काळजी घेतात.कुणी विचारलंच " हे कोण?" तर ना मामा, ना बाबा, ना काका! म्हणतात फक्त " गुरुजी".

इतर कुठल्याच नात्यात मोहन गुरुजीस त्यांनी अडकवलं नाही.ना मोहन गुरुजींनी ही.

मोहन गुरुजींनी अजुनही शाल व अंगठी सांभाळूनच ठेवलीय!.......

(कथा काल्पनिक, पात्र, स्थळं काल्पनिक)

वासुदेव पाटील

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel