( भक्तिविलास )

यद्विद्यते क्षितितलेऽस्तु शुभाशुभं तत्
विद्युत्कणेन घटितं त्विति दृश्यतेऽन्ते
एव वरावरमतानि लसन्तु कामं
ध्येयं त्वमेव शशिशेखर मानवानाम् ॥१॥
आज्ञा गुरो जाहलि आपुली मला
म्हणोनि हा भार सहर्ष घेतला
आतां जरी द्याल न सत्कृपाबल
तरी न मातें उचलेन पाउल ॥२॥
भगवंतानें एक्या रातीं
श्रीयमुनेच्या तीरावरतीं
येतां मंजुल वेणू अपुली
अमृतयुक्तशा अधरीं धरिली ॥३॥
मुळींच होती रम्य वेळ ती
चंद्रवैभवा आली भरती
निर्मल होती सरिता - गगनें
बुद्धि - हृदय जणुं गुरुबोधानें ॥४॥
कुमुदें भरलीं पूर्ण मरंदें
वायु सुमांच्या मंद सुगंधें
सुधाधवल वरसते चंद्रिका
पाखडला कापूर जसा कां ॥५॥
रातराणिचा सुगंध मादक
दरवळुनी करि मन पर्युत्सुक
मालकंस रागीं स्वर वीची
किरणें जणुं निर्मिती शशीचीं ॥६॥
सदनें कीं बनलीं स्फटिकाचीं
पानीं झाली जडण हिर्‍यांची
भुवन सर्वही त्या शुभ वेळें
प्रशांत मंगल उज्ज्वल झालें ॥७॥
मनमोहन तो तशांत मुरली मंजुल नादें भरवी
अपूर्व कांहीं असे मधुरता शब्दां अवसर नुरवी ॥८॥
योगामाजीं सकलहि सिद्धी
घरीं उषेच्या वर्ण - समृद्धी
हिमालयीं सौंदर्य महीचें
मिळे तसें वेणूंत ध्वनीचें ॥९॥
विसें सखीसह खातां अभिनव
राजहंस जो करिती कलरव
आम्र मोहरें येतां डवरुन
कोमलसें जें कोकिल - कूजन ॥१०॥
अरुण जईं विंझणा पालवी
मर्मरता जी तईं मोहवी
कर जेव्हां ओढिती शशीचे
भणित रम्य जें जललहरींचें ॥११॥
मेघनिनादीं गभीरता जी
वर्षे कूजत जे वनराजी
प्रभातसंध्याराग - मोहिता
भ्रमरांची जी गोड आर्तता ॥१२॥
या सर्वहि मधुशब्दगणांची एकवटे मृदु गोडी
परी हरीच्या वेणुरवासी तुलना करितां थोडी ॥१३॥
जरी महोत्सव संगीताचा
रत्नभूवरी होइल साचा
जेथ कुशलते सुधाचंदनीं
सडा शिंपिला सुरांगनांनीं ॥१४॥
चंद्रकराच्या तारा केल्या
कमलाच्या कोषास जोडिल्या
कल्पतरूंच्या सुम - नालाचे
वीणेला या पडदे साचे ॥१५॥
इंद्रधनूचा दंड मनोहर
वाद्य असे हें मदन रची जर
वाजवील हें शारदा जरी
लक्ष्मी गातां पद्य सुस्वरीं ॥१६॥
पारिजात - सुमनीं पडलेलें
दंव ते घेउन नूपूर घडले
रती नाचतां झुमकाविल ते
ताल धरिल जर साम - ऋचाते ॥१७॥
अशा दिव्य संगीत - भोजनें श्रवण तृप्त जर असला
भाग्यें कोणी तरी कल्पना लव येईल तयाला ॥१८॥
मुरलीच्या मधुमधुर निनादें
कुंजकुंज डुलती आनंदें
कालिंदीचें उचंबळे जल
तटास येतां प्रभुपद कोमल ॥१९॥
कुंजवनांतिल फुलें विकसलीं
श्रवणोत्सुक जणुं झाल्या वेली
शांततेंत संगीत मिळालें
जडही तेणें चेतन झालें ॥२०॥
निज - सदनीं गोपीं त्या समयीं
निमग्न होत्या अपुल्या कार्यीं
वाढित कोणी, निजवी बाळा
एक सारवी पाकगृहाला ॥२१॥
दुजी शांतवी मन सासूचें
कुणी पाय चेपीत पतीचे
अन्य गुरांची सोय लाविती
कुणी सखीसह खेळत होती ॥२२॥
वनमालीची मुरली मोहक तोंच येतसे कानीं
काम करांतुन अपाप सुटलें तटस्थ झाल्या रमणी ॥२३॥
सकल इंद्रियांची जी शक्ती
कानांमाजीं एकवटे ती
देहावरती रोम ठाकले
भान कशाचें चित्ता नुरलें ॥२४॥
चंद्रकरानें सागर - लहरी
कमलाच्या मृदुगंधें भ्रमरी
कुंजवना त्यापरी गोपिका
कर्षित झाल्या मृगी जशा कां ॥२५॥
आप्तांनीं बहु विरोध केला
कोण परी मोजील तयाला
चित एकदां जडल्यावरते
त्यास रोधणें अशक्य असतें ॥२६॥
भानरहित धांवती कामिनी
केश लोळती स्वैर सुटोनी
विसर जया पडला देहाचा
बघे कोण मग पदर नि ओचा ॥२७॥
चित्त जयाचें संसारांतुन ईश्वर - चरणीं जडलें
नित्य शुद्ध तो, भल्याबुर्‍याचें काम तयासी सरलें ॥२८॥
विषयाचें सुख नित भोगावें
लोकांनीं मज भले म्हणावें
अशी असतसे ज्या आसक्ती
तेच चालरीती बघताती ॥२९॥
उत्कट होतां परी भावना
बंध तया एकही उरेना
तुडुंबलें जल जरी तळ्यातें
ढासळुनी तट मुक्त पळे तें ॥३०॥
पृथ्वीचें भडकतांच अंतर
सहज बापुडे होती भूधर
प्रबल भावना असल्यावांचुन
उत्कट सुख भोगतांच येत न ॥३१॥
निज हृदयाचें निधान शोधित
गोपी आल्या कुंजवनाप्रत
भिरभिर बघती चहूं दिशांसी
चित्तचोर सांवळ्या हरिसी ॥३२॥
कदंब वृक्षातळीं शेवटीं आढळला वनमाळी
मुरलीच्या वादनीं जयाची मूर्ती तन्मय झाली ॥३३॥
वेड मनाला लावी साची
अशी मनोहर मूर्त हरीची
चरण - कमल शोभती देहुडे
प्रभा नखांची पडे चहुंकडे ॥३४॥
सोन्याचे पदिं घुंगुरवाळे
वर पीताम्बर जरी झळाळे
रत्नखचित माजेस मेखळा
मेघावर जणुं चमके चपला ॥३५॥
खूण उरावर वत्सपदाची
गळ्यांत माळा रानफुलांची
प्राजक्तीच्या मृदुलफुलांचे
देठ तसे ते ओठ हरीचे ॥३६॥
कर्णीं मकराकार कुंडलें
किरण तयांचे गालीं खुलले
कुटिल केस भालीं भुरभुरती
मोरपिसें वर सुरेख डुलतीं ॥३७॥
सुंदरपण ये सौंदर्यासी मधुर होत लावण्य
मोहकताची मोहित झाली उपमा नुरली अन्य ॥३८॥
मुकुंद देहासवें तुला जी
असें न कांहीं विश्वामाजीं
उपमानें जीं होतीं कांहीं
दूषविली तीं स्मर - कवितांही ॥३९॥
कुरूप ठरुं कीं या भीतीनें
देह आपुला त्यजिला मदनें
सौंदर्याची जी अधिदेवी
लाजुन तीही पदीं वसावी ॥४०॥
चिन्ह कस्तुरी असे कपाळीं
कमलनयन तो हांसत गालीं
लबाडनेत्रीं पाही तिकडे
सौंदर्याची खाणी उघडे ॥४१॥
फिरती वेणूवरी अंगुली
नादांचीं मधु वलयें रवलीं
कमल - पाकळ्या होतां चंचल
जललहरी जणुं उठती कोमल ॥४२॥
दृष्टी पडतां श्याम रूप तें गोकुलवासी रमणी
मेघ - दर्शनें नीपलतासम फुलल्या आनंदानी ॥४३॥
सुखें रंगले कान नि डोळे
इतर परी कां विषण्ण झाले
गोपवधूंना सुचे न कांहीं
निश्चल झाल्या भानच नाहीं ॥४४॥
अशी विवशता पाहुन त्यांची
हंसे मधुर ती मूर्त हरीची
वदे बांसरी कटीस खोंचित
“ स्वस्ति असो गे तुमचें स्वागत ॥४५॥
प्रिय तुमचें मी काय करावें
गुज हृदयींचें सकल कथावें
गोपींनों, या अपरात्रीला
कांगे सगळ्या येथें आलां ॥४६॥
कथा कशानें तुमची वृत्ती
भांबावुन गेली या रीतीं
असे कुशल ना सर्व व्रजाचें ”
वदे लाघवी मंजुल वाचें ॥४७॥
“ कां त्यजिली गे पतिची सेवा घरचीं कामें तेवीं
निशेस फिरणें स्त्रियांस अनुचित रीत नसे कां ठावी ॥४८॥
निबिड घोर हें येथिल कानन
वेळ कधीं कां येते सांगुन
फार न झाली रात्र जोंवरी
तोंच परत जा निजा - मंदिरीं ॥४९॥
पुत्र, पती, बंधूम मातादिक
असतिल कीं सदनीं विरहोत्सुक
चिंता पडली असेल त्यांसी
साध्वींनों, जा निज सदनासी ” ॥५०॥
असें ऐकतां वचन वाकडें
दुःखित झालें चित्त बापुडें
रुसल्या कांहीं रडूं लागती
रागानें कोणी थरथरती ॥५१॥
“ शठा, निष्ठुरा, मेघश्यामा,
कारण कां पुसतोसी आम्हां
कृती आपुली आठव ना तूं
तीच असे या सकला हेतू ॥५२॥
निज कृत्याच्या परिणामांचे दोष लाविती अन्या
कसें म्हणावें सुज्ञ तयासी सांग तूंच बुधमन्या ॥५३॥
पुरुष हिंडतो रानोमाळा
ज्यास असे कीं चकवा झाला
मृगमद - मोहित मृगी धांवती
यांत काय त्या दोषी असती ॥५४॥
नाचति सूत्राधीन बाहुल्या
कधीं काय त्या स्वतंत्र झाल्या
तसें मोहना, अमुचें वर्तन
मुळींच नव्हतें अमुच्या स्वाधिन ॥५५॥
तुझी बासरी येतां कानीं
काम करांतुन पडे गळोनी
प्राण तुजकडे सख्या, ओढले
शरीर त्यांचेमागुन आलें ॥५६॥
तूंच आणिलें खेंचुन येथें
अतां बोलसी, ‘ जा गेहातें ’
काय दयेचा असे उन्हाळा
तुझिया हृदयीं हे गोपाळा ॥५७॥
चित्तासी तुजवांचुन देवा, ओढ कशाची नुरली
तूंच लोटितां दूर जिवाची आस समूळहि सरली ॥५८॥
जीवन रक्षित चार कुडांतिल
नकोच आम्हां, रुचतें वादळ
असे असो सुख निवांत गेहीं
वेड लावितें निबिडा राई ॥५९॥
वर्षे मधु पीयूष कधीं विष
घेउन संगमविरहाचें मिष
मोहक, मादक उत्कटता ही
आगळेंच सुख हृदया देई ॥६०॥
सदाचार वा रीतीभाती
स्त्रीपुरुषां जे धर्म धरीती
भेट तुझी होतांच तयांचें
काय उरतसें कारण साचें ॥६१॥
नदी न वाहे मिळतां सागर
कडबा होतें पीक खळ्यावर
यान निरथक गांवीं येतां
रीतीभाती तशाच आतां ॥६२॥
घालितोस तूं भय आम्हांसी
नवल काय याहून महीसी
पानझडीचा धाक वसंते
लक्ष्मी सांगे दरिद्र येतें ॥६३॥
भूत झपाटिल वदती शंकर
हेमगर्भ कां फिरवी घरघर
जवळीं असतां तूं भय - नाशन
काय करिल रे आम्हां कानन ॥६४॥
तव चरणांच्या पुढें सांवळ्या मरणहि थरथर कांपे
चंद्राच्या सुखशीतल किरणीं देह कधीं कां तापे ॥६५॥
तव भेटी ना होत जोंवरीं
तोंवर रमते मन संसारीं
श्रीखंडानें भरतां वाटी
कुणी झुरे कां पिठल्यासाठीं ॥६६॥
सखे सोयरे यांची चिंता
कशास आतां अमुचे चित्ता
पद्म न जों पूजी चरणांतें
तों शैवल चिखलासह नातें ॥६७॥
अतां कुणाच्या अम्ही नव्हेती
दंव जैसें ना लागत हातीं
पिता, पुत्र, मात,अ पति, बंधू
शुष्क जाहला मृगजलसिंधू ॥६८॥
मणी जसे सूत्रांत ओवले
तुझ्यात तेवी सर्व मावले
तुज टाकुन मग कां घननीळा
पृथक्पणें भजणें इतराला ॥६९॥
देउनियां अवतणें जेवणा बोलावुनी आणावें
एक घांसही गिळण्या आधीं क्षुधिता कां उठवावें ॥७०॥
सोडुनिया सर्वहि धर्मासी
आलों शरण तुझ्या चरणांसी
अतां हरी ना करी उपेक्षा
घाल एवढी सखया, भिक्षा ॥७१॥
जे जे कोणी अनन्य चित्तीं
नित्य तुझीया स्मरणा करिती
म्हणति सर्वदा सुलभ तयां तूं
अम्हां टाळिसी कवण्या हेतूं ॥७२॥
पान, फुल वा पाणी नुसतें
तुला अर्पिता प्रसन्न करितें
पदीं वाहिलें निज देहाही
तरी कसा द्रव त्जशीं नाहीं ॥७३॥
सजलघनासम छवी तुझी ही
नयनें मुख निर्मित कमलांहीं
कर हे कोमल जणूं बिसांचे
हृदय तेवढें काय शिलेचें ! ॥७४॥
या विषयी का असेल शंका खराच निष्ठुर हृदयीं
हाडवैर अबलांसह याचें; छळण्या जन्मा येईं ॥७५॥
असो कुणी ती पत्नी माता
बघे न मागें करण्या घाता
कुलटा साध्वी भेद न पाहे
द्वेष स्त्रियांचा भरला हृदयीं ॥७६॥
श्रुती आदरें गाती महती
संन्यासीही भावें नमिती
पूजनीय ती जननी यानें
ठार मारिली निज परशूनें ॥७७॥
राजसुखासी लोटुन पाठीं
वनी कष्टली जी यासाठीं
अग्निदिव्यही केलें असतां
मातिस मिळवी पत्नी सीता ॥७८॥
आहे कां गे वृन्दा ठावी
असे बापुडी सुशील साध्वी
लेशहि नव्हतां अपराधाचा
छळुन घेतला जीव तियेचा ॥७९॥
शुर्पणखा, ताटका, पूतन, किती करावी गणती
कींव आमुची येइल कोठुन याच्या निर्दय चित्तीं ॥८०॥
हिंस्र पशू जीवांना छळती
तळमळतां ते हर्षित होती
चवथ्या अवतारींची वृत्ति
आज प्नः बघ उसळे वरतीं ॥८१॥
केलीं नाना व्रतें तुझ्यास्तव
तरी कशी नाहीं तुज कींव
जलावेगळी जणुं मासोळी
तशी जिवाची तडफड झाली ॥८२॥
प्राण विसाव्या, हे यदुनाथा
अंत नको रे पाहूं आता. ”
शब्दच सरले गहिंवरला उर
लोळण घेती प्रभुचरणांवर ॥८३॥
वर्ष पदांवर होई साचा
प्रेमळ निर्मळ नयनाश्रूंचा
पवित्र म्हणुनी पदजा गंगा
समर्था झाली भवभयगंगा ॥८४॥
प्रभुवरणावर लोळण घेतां शोकाकुल त्या व्रजरमणी
निशिगंधाच्या कळाय़ कोवळ्या दिसती पडल्या जणुं गळुनी
जोगीमधल्या करूणरासाच्या व्याकुळ ताना वा गमती
भासतात कीं वियोगिनीच्या विलापती विव्हल पंक्ती ॥८५॥
पाहुन त्यांची अनन्यवृत्ती
मेघनीळ तो द्रवला चित्तीं
मधुपणानें हंसला कान्हा
जीवन लाभे गोपवधूंना ॥८६॥
वदे लाघवी, “ उठा, चला, गे
मन तुमचें कळलें या रागें
चला खेळुं या रास मनोहर
रोष नका गे करूं अम्हांवर ” ॥८७॥
एकेकीच्या करा धरोनी
बळेंच उठवी रथांगपाणी
नृत्य मांडिलें अभिनव तेथें
व्रज - ललनांसह त्या व्रजनाथें ॥८८॥
वाजवीत मधु वेणू आपली
उभा देहुडा श्रीवनमाळी
स्त्रिया नाचती हरिभंवतालीं
छंदाभंवतीं जणुं बहु चाली ॥८९॥
प्रसन्नताही हर्षित ऐसें झालें गोपवधूंसी
मनासारिखें घडल्यावर कां सीमा आनंदासी ॥९०॥
हरी ठेवुनी मग मुरलीला
करी तयासह बहुविधलीला
कधीं हुंबरी कधीं हमामा
खुलवी झुलवी गाउन रामा ॥९१॥
टिपर्‍यातरत्याकिमपिनिराळ्या
झिम्मा खेळे पिटुनी टाळ्या
पिंगा, करकोपर, रणघोडा
जीव वधूंचा झाला वेडा ॥९२॥
कुणा कटीसी लपेटुनी कर
आलिंगन दे प्रेमें निर्भर
टिपित कुणाचें स्मितनिजओठीं
भासवीत जणुं करि गुजगोष्टि ॥९३॥
पदर कुणाचा ओढुन कान्हा
गुंतवुनी दे तरुशाखांना
खट्याळ हांसे अडखळताती
कुणा नाचवी घेउन हातीं ॥९४॥
गुंफुन बाहुंत कोमल बाहू गुंजत गुज कुजासी
मंजुल वाचें रमवी अंतर उधळी सुमपुंजासी ॥९५॥
प्रेमळतेच्या वर्षामाजीं
गोपी न्हाल्या जणुं वनराजी
भक्तिरसाच्या सुधा सागरीं
व्रजांगना त्या झाल्या शफरी ॥९६॥
हाय ! परी ही छाया कसली
धवल चांदण्यामधें उदेली
गोपवधूंची प्रसन्न उज्ज्वल
दृष्टि कशानें झाली चंचल ॥९७॥
तनु कापत कां हरि - सहवासीं
सांवरिती अचलहि पदरासी
कां नत होती बघतां नयनें
चाप रोखिले त्यावर मदनें ॥९८॥
गढुळ जाहलें कामें मानस
जसें मिठानें नासें पायस
कसें हरीसी अतां रुचावें
मलिन, नासलें, कुणास भावें ॥९९॥
धरुन राधिकासंग जाहला गुप्त तदा श्रीरंग
भंग करुन रंगांत इतर त्या असतां रासीं दंग ॥१००॥
हाय परंतू राधाहृदयीं
मद कामांची होत चढाई
शुनें बनविलें जयें मुनींना
काम जिंकिला जाई कवणां ॥१०१॥
तिला वाटलें मम रूपासी
लोलुप हा सोडी इतरांसी
नमविन आतां हवा तसा मी
बैल वेसणी म्हणजे कामी ॥१०२॥
वदे, “ श्याम मी थकलें कोमल
उचलेना बघ एकहि पाउल
उचलुन घे रे खांद्यावरती
तरिच खरी मजवरची प्रीती ॥१०३॥
वश होइल तो कसा स्त्रियांतें
इंद्रिय ज्या चाळवूं न शकतें
‘ बरें, ’ वदे हांसुन हृषिकेशी
उंचावर चढवीत तियेसी ॥१०४॥
स्कंधीं तेथुन बसूं पाहते तोंच लपे गोविं
व्हावें लागे फजित जरी कां कामें झाला अंध ॥१०५॥
कृष्ण लोपतां सावध गोपी
विरह तयांच्या चित्ता कापी
व्याकुळ पुसती परस्परांना
“ तुवां पाहिला का गे कान्हा ” ॥१०६॥
कुंजलतांसी यमुनातीरीं
शोधित फिरती कृष्णमुरारी
चिह्नें पाहुन हरिचरणांसह
“ भाग्यवतीची कोण तरी अह ॥१०७॥
दिसत न राधा, तीच असावी ”
वदती सर्वहि, “ धन्य म्हणावी
अम्हीं दवडिलें भाग्य, अरेरे
दूषवुनी मन काम - विकारें ॥१०८॥
मन राधेचें पवित्र उज्ज्वल
शिवूं न धजले तया प्रती मल
प्रेम तिचें निष्काम राहिलें
म्हणुन हरीनें हृदयीं धरिलें ॥१०९॥
क्षणिक सुखासी लंपट होउन घात आपुला केला
हाय हाय, हे नंदा नंदना, धांव अतां हांकेला ” ॥११०॥
रुदन परी राधेचें ऐकुन
नवल करी चित्तीं गोपीजन
“ काय अगे फसविलें तुलाही ? ”
“ दोष तयाचा अल्पहि नाहीं ॥१११॥
मीच मातलें. ” वदे राधिका
“ ओळखिलें ना जगन्नायका
मलिन कुटिल लव होतां अंतर
दूर होतसे मग परमेश्वर ॥११२॥
हरीस निर्मळ हृदयें रुचती
वश होईं तो शुद्धप्रीतीं
भक्ति हवी त्या अव्यभिचारी
हें न परी कुणि घेत विचारीं ॥११३॥
दीनोद्धारा, हे सुकुमारा,
पदनतपावन, खलसंहारा,
अघमलनाशक, कुंजविहारी,
शोक - सागरामधुनी तारी ॥११४॥
धाय मोकलुन रडती गोपी, ‘ माधव, हरि, गोविंदा ’
वृक्षलता कवटाळुनि वदती, “ दावा गे सुखकंदा ॥११५॥
बलानुजा स्मरतां तुज चित्तीं
महापातकी उद्धरताती
त्याहुन अमुचें पाप भयंकर
गणुन दया कां येत न तिळभर ॥११६॥
बहुत संकटें आलीं गेलीं
कुशल अम्ही तव छत्राखालीं
वाचविलें यापरि माराया
समयीं त्या कां वद यदुराया ॥११७॥
नंद पिता तव म्हणुन तयासी
पाताळांतुन सोडविलेसी
दुजेपणानें लोटुन देसी
मरणाच्या खाईंत अम्हांसी ॥११८॥
भाजुन काढी हा विरहानल
दावानल तो कितितरि शीतल ॥
कालियविष एकदांच नाशी
हें नव मरणें प्रतिक्षणासी ॥११९॥
क्षमा करी रे कुंजविहारी, अंत न अमुचा पाही
चुकलों त्याचा दंड पावलों, आतां पदरीं घेई ॥१२०॥
लक्ष्मीमोहुन करिते साची
ज्यावर कुरवंडी प्राणांची
मनमोहन तें स्मित तव दावी
आस एवढी तरि पुरवावी ॥१२१॥
तव वचनांतुन सुधेस पाझर
खुळेशशांका म्हणति सुधाकर
प्रभा तयाची दाहक होते
चक्रवाह हा प्रमाण यातें ॥१२२॥
मृदु कमलाहुन तव पद कोमल
जिथुन उगम पावे गंगाजल
हृदयीं या अंगार लागला
पद ठेउन त्या निवव दयाळा ॥१२३॥
‘ कृष्ण कृष्ण ’ म्हणतां व्रजगोपी
समरस झाल्या हरिस्वरूपीं
कुणी कृष्ण मानुनी स्वताला
तशाच करिती बहुविध लीला ॥१२४॥
कुणी जाहल्या नंद - यशोदा
रोधि एक गिरि बनुन पयोदा
गोप, वांसरेम, असुर, सर्प, बक
होउन करिती लीला - नाटक ॥१२५॥
प्रेमरसीं यापरी तयांची वृत्ती तन्मय झाली
श्यामल यमुना नयनीं बघतां पुन्हां स्मरे वनमाली ॥१२६॥
“ अजुन निर्दया येत न कींव
नकोच आतां असला जीव
कृपा तूं तरी कर गे यमुने
भावापाशीं अम्हां झणी ने ॥१२७॥
जगच्चालका, हे परमेशा,
पुरो आमुची अंतिम आशा
विहार करि जेथें व्रजनंदन
चरणतळींचे कर धूलीकण ” ॥१२८॥
धुळींत पडल्या दीन गोपिका
देठ तुटोनी जणुं सुम कलिका
करुण - रवें रडती व्रजनारी
दावानलहत जेवी कुररी ॥१२९॥
शोक - विह्वला गोपी जाणुन
निर्मल - नीलशरीर दयाघन
मधें प्रगटला गोपवधूंचे
कुमुदवनीं जणुं बिंब शशीचे ॥१३०॥
स्मित हास्यानें श्रीकृष्णाचे सचेत झाल्या गोपी
सिंधु उसळला आनंदाचा तुलना त्या न कदापी ॥१३१॥
पाउस पडुनी जातां जेवीं
उन्हें कोवळ्या सृष्टि हंसावी
हास्य तसें तें श्रीकृष्णाचें
मानस खुलवी व्रजललनांचें ॥१३२॥
गोपींचें स्फुरलें प्रेमानें
अंग अंग तंव चैतन्यानें
तनु - पुष्पें वाहिलीं पदांवर
खिळले डोळे मुख - कमलावर ॥१३३॥
हरि - चरणांचें चुंबन घेती
कुणि ते धरिती हृदयावरती
रानफूल उधळून हरीवर
झाल्या कोणी भजनीं तत्पर ॥१३४॥
रुसवा दावुन कोणी म्हणती
“ श्याम, किती तव निष्ठुर वृत्ती ”
वदत हांसुनी मग वनमाळी
“ इथेंच होतों तुमच्या जवळी ॥१३५॥
तुम्हीं टाकिलें मज बघण्याचें
पटल घेउनी कुवासनेचें
दिसलों नच केवळ या हेतू
धुक्यांत जैशा लपती वस्तू ॥१३६॥
शुद्धबिंब हें प्रेम - रवीचें धुकें वितळवी सारे
सुदैव तुमचा विकलों आहे विकल्प ना घ्या दुसरें ” ॥१३७॥
सुधा - मधुर हें ऐकुन भाषण
देहभान विसरे गोपी - गण
समावली नच जाई चित्तीं
कामविहीना प्रेमळ भक्ती ॥१३८॥
विश्व सकलही हरिमय झालें
आपणही उरलों न निराळे
अशी जाहली स्थिती तयांची
धन्य योग्यता सद्भक्तीची ॥१३९॥
भेद न उरला द्वैताद्वैतीं
एकच झाली भक्ति अभक्ति
गिळिली वृत्ति स्वरूपतेंने
ऐक्य वितळिलें प्रेममुशीनें ॥१४०॥
जननी, भगिनी, पत्नी, कन्या
वहिनी, वा ललिता सखि अन्या
विशेष यांच्या प्रेमामधला
अनन्यतेसह जरी मिळाला ॥१४१॥
वरी दिव्यता तपस्विनीची
चढली उत्सुकता विरहाची
तरीच गोपींच्या प्रेमासी
येइल तुलना करावयासी ॥१४२॥
हेंहि खरें नच सत्य पाहतां प्रेम असें गोपींचें
गोपीप्रेमासमची बुधहो, वर्णवे न तें वाचें ॥१४३॥
प्रेमरसाच्या महासागरीं
कृष्णचंद्र जणु खुलवी लहरी
रास महा तो सर्वां भुलवी
कालहि विसरे गति स्वभावी ॥१४४॥
नभांत तारा खिळल्या ठायीं
मृग चंद्राचे मोहित तेही
सहस्रनेत्रीं बघती साची
रासक्रीडा भगवंताची ॥१४५॥
ज्याचें दर्शनहि प्रयास करुनी लाभे न योग्यांप्रती
झाले कुंठित वेद, सांख्य चिडले, मीमांसका ना गती,
वेदान्ती भ्रमले, कणाद दमले, ऐसें परब्रह्म तें
उल्हासे यमुनातटावर इथें गोपीसवें खेळतें ॥१४६॥

श्रीकृष्णकथामृत महाकाव्यांतील ‘ भक्तिविलास ’ नांवाचा सातवा सर्ग समाप्त

लेखनकाल :-
पौष, शके १८६९

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel