( रुक्मिणीपरिणय )
यस्माद्धि शास्त्रसरितामुगमो बभूव
यत् स्वाश्रय तनुभृतां भय - विह्वलानाम्
तापातनोदनिपुणं परमव्ययं तत्
दिव्यं महेश्वरपदाब्जमहं नमामि ॥१॥
ज्यांनी सुंदरमंदिरा उभविले गीर्वाणवाणीस्तव
ज्यांचे वाङ्मय नित्य नूतन असे गोडी उणी ना लव
जे का कौस्तुभ शारदाहृदयिंचे त्या कालिदासांदिकां
प्रेमें वंदन अर्पितो लववुनी अत्यादरें मस्तकां ॥२॥
तेजस्वी सुकुमार मनोहर
रूप पाहता उपजे आदर
मूर्त जणूं का सात्विक भक्ति
अशी शुभांगी विहरत होती ॥३॥
प्रेमदवनी रमणीय आपुल्या
वन नच ते सुरवधू लाजल्या
अनघदर्शनें त्या युवतीचे
रूप घेतले म्हणुन लतांचे ॥४॥
सुडौल आंबा बकुल अशोक
परिजात नव - सुवर्ण - चंपक
कुंदमोगरा जुई शेवंती
नाजुकशी ती फुले मालती ॥५॥
तरुवेलींचे संमेलन तें
भास उपजवी रसिक - मनातें
काय उत्सवी वसंत - कालीं
युव - युवतीं ही खेळुं मिळाली ॥६॥
त्रिभुवनांतही नसेल इतुकें सुंदर उपवन कोठें
सहाय्य घेउन मधुचें मदनें स्वयेंचि रचिलें वाटे ॥७॥
उंच उंच ते तरू सुरूचे
जणू काय घडले पाचूचे
भूषविती त्या प्रेमदवनाला
ध्येयें उन्नत जशीं नराला ॥८॥
भ्रमर घालिती मोहुन रूंजा
बघतां असल्या श्यामल कुजा
नृत्य करावें वाटत मोरा
निज सुंदर पसरून पिसारा ॥९॥
पिक सारस मैनांचें कूजन
तरु विंझण ते द्विरेफगुंजन
परिसुनिया भ्रम पडे मनाला
उपवन कीं ही गायन - शाला ॥१०॥
नानाकृति कारंजा भवतीं
इंद्र - धनुष्यें बागडताती
गमे रंग इथलेच वसंतें
हरिले पुष्पां रंगविण्यातें ॥११॥
दहा पाकळ्यांच्या कमलासम जें स्फटिकांनीं रचिलें
मधें एक कासार जयासी जल न चांदणें भरलें ॥१२॥
विमल असें की सज्जनमानस
वः शिशुचें हें हास्य निरागस
तेज तरळतें वधू लोचनीं
तेंच होत कीं येथिल पाणी ॥१३॥
निळीं मनोहर तांबुसपिवळीं
पांघरलीं जणु वसनें कमळीं
शीतलशय्येवर लहरींचे
खेळ चालले मोहक त्यांचे ॥१४॥
बिसतंतूंची गोडी चाखित
राजहंसगण सलील पोहत
कमळें सुंदर बहुविध रंगीं
बिंबित होती तदीय अंगीं ॥१५॥
शोभा मग ती दिसे निराळी
कोंदणांत जणु रत्नें जडलीं
अतिरमणीया अशी वाटिका
उतरे नंदनवन भूलोका ॥१६॥
प्रमदवना स्वामिनी असे जी
तीस वर्णण्या शक्ति न माझी
जिच्या पदतलीं व्हाया पावन
फुले चौफुली होती उडुगण ॥१७॥
शिशुहास्यापरि भाव तियेचा
सहज मनोहर निर्मळ साचा
शील शुद्ध की धवल जयासम
अनन्यदूषित शिखरींचें हिम ॥१८॥
कुंजलतासी करेत हितगुज कुरवाळीत सुमांना
वसंतशोभेसम देवी ती विहरत सुमनोद्याना ॥१९॥
वगळून गेली मजसी पुढती
धरुनी पदरा तरुं आडविती
गोंजरिते त्या हासुन देवी
कोड मुलांचे पुरवित जेवीं ॥२०॥
मंद सुगंधी मृदुल फुलें तीं
उधळी तिजवरती प्राजक्ती
चंद्रकलेवर लाख चांदणी
जशी वर्षते प्रेमळ रजनी ॥२१॥
फिरून उपवनीं विसावण्याला
पुष्करणीवर ती ये बाला
स्फटिक पायरी तिचे पदतलीं
माणिकमणि निर्मितशी दिसली ॥२२॥
होता पावन तन्मुखदर्शन
कुमुदां लाभे दिनींहि विकसन
काल असे विपरीत जरीही
सत्संगें भय वितळून जाई ॥२३॥
जननी बघतां वत्सल बाळें
तसे हंस तिज समीप आले
शिर कुणी ठेवी अंकावरती
माना घासित फिरती भवतीं ॥२४॥
कुरवाळुन त्या प्रेमभरेसी
देई मौक्तिककवल मुखासी
ठेवितसे जणु सकल चराचर
मातेसम तिज विषयीं आदर ॥२५॥
उभय करी टेकून हनुवटी विचार कसला चित्तीं
करीत असतां तिचा सखीजन हासत जमला भवतीं ॥२६॥
वदे एक लडीवाळपणें तिज
काय चिंतिसी सांग तरी गुज
धुकें विरळ पसरले उषेवर
तशी छटा तव मुखीं खरोखर ॥२७॥
इतकीं बाई खुळी कशी तूं
वदे दुजी हा उघडा हेतू
लग्नावांचुन युवतीचित्ता
असेल कसली दुसरी चिंता ॥२८॥
‘ खरेंच गे तव, अन्य म्हणाली
राजसुताही उपवर झाली
महाराज भीष्मकही तत्पर
शोधण्यांत हिज साजेसा वर ॥२९॥
अनेक राजे धरुनी आशा
दूत धाडिती विदर्भदेशा
समय जाणते चतुर भाषणी
तया जवळ निज चित्र देउनी ॥३०॥
चित्र दावुनी प्रतिदूतानें निजनृप महती गावी
आणि यातची सतत गुंतले महाराज नी देवी ॥३१॥
‘ मघांपासुनी मनांत येतें
तोच उचित या नृप - तनयेतें
वदत कुणीं, यद्दर्शन मजसी
घडलें होतें मधुनगरीसी ॥३२॥
कसे करूं गे तदीयवर्णन
नयन मुके जिव्हेस न लोचन
ओवाळुन शतसहस्र मदना
नखाचीहि त्या दृष्ट निघेना ॥३३॥
सिंहासम गंभीर चालणें
स्मित शुभ झळके प्रसन्नतेनें
गजशुंडा जणुं दीर्घभुजा त्या
बळकट तरि मृदु वाटत होत्या ॥३४॥
वानावा किति अद्भुत विक्रम
म्हणती धरिला गिरी फुलासम
बाळपणीं मारिली पूतना
उद्धरिले यमलार्जुन यांना ॥३५॥
मदोन्नत्त हत्तीसह केलें युद्ध पाहिलें नयनीं
मगधपतीसी अनेक वेळां लोळविलें निजचरणीं ॥३६॥
त्रिभुवन कांपे कंसा थरथर
त्यास दाविलें क्षणांत यमपुर
शौर्य असें हें असुनी देहीं
मधुरपणासी उणीव नाहीं ॥३७॥
इंदीवरतनु पळही दिसतां
हृदयावर मग उरे न सत्ता
वेडे होती जन त्यासाठीं
कृपा जयावर करिते दृष्टी ॥३८॥
प्रेमसागरीचे कल्लोळ
तसे तयाचे मंजुळ - बोल
श्रवणीं पडले ते तरि गमतें
कान चाखिती अमृतरसातें ॥३९॥
लाजवीतसे बुद्धि निधीला
बृहस्पती जणु यापुन शिकला
राजकारणी किती चातुरी
रामराज्य जाहली मधुपरी ॥४०॥
यदुवंशाचा मुकुटमणी तो वासूदेव कंसारी
त्याहुन हीतें योग्य पती ना शोधुन पृथिवी सारी ॥४१॥
सत्य सांगते सखे रुक्मिणी
हरीच वर तूं पाणिग्रहणीं
श्रीविष्णूच्या हृदीं रुळावे
हेंच कौस्तुभा शोभत बरवें ॥४२॥
स्त्रियांत दुसरी नसे तुझ्यासम
तसाच आहे हरि पुरुषोत्तम
समसमास कीं संगम व्हावा
आस लागली ही मम जीवा ॥४३॥
तपें करोनी शत जन्मासी
मिळेल होण्या तदीय दासी
तरी भाग्य तें थोर म्हणावें
एक मुखें मी कितितरि गावें ॥४४॥
ही बघ त्याची छाबी चिमुकली
मम पतिनें जी कुशल रेखिली
दिली भीमकीच्या तइं हातीं
सुवर्णपदकांकित मूर्ती ती ॥४५॥
चिंतित होते चित्त जयासी अबोधपूर्वस्मरणें
तीच गोडहुर्हूर जणूं का रेखियलीच विधीनें ॥४६॥
नयन नीळ कमळासम विकसित
खिळले चित्रीं लवति न किंचित
नृपकन्येसी तदा वाटलें
हृदय काय प्रतिबिंबित झालें ॥४७॥
कुंडलिनी योगांत उठावी
ज्ञानवृत्ति आत्म्यांत मुरावी
भक्त धरावा हृदयीं ईशें
शुभेस त्या सुख गमलें तैसें ॥४८॥
रोम ठाकले देहावरती
आनंदाश्रू नयनीं स्रवती
स्फुरण पावती सकलशुभांगे
सख्या परस्पर हसती अंगे ॥४९॥
हृदय मुकें नित कुलकन्याचें
असें सख्यांनी जाणुन साचें
वृत्त भीष्मका निवेदिले तें
झाला अतिशय मोद तयातें ॥५०॥
वृद्ध जाहलों प्रियबाळांनों मंद आमुची दृष्टि
धन्य तुम्ही स्थळ दाखविलें हें केली मज सुखवृष्टी ॥५१॥
यदुभूषण हा मिळे जावई
असेल कां इतुकी पुण्याई
अपुला आपण यत्न करावा
येइल यश जरि रुचेल देवा ॥५२॥
ज्येष्ठसुता परि नच ते पटलें
तयें कोपुनी पितया म्हटलें
वा ! वा ! इतुका करुन विचार
हाच योजिला काय तरी वर ॥५३॥
वृद्धपणीं निज - बुद्धी चळते
म्हणती जन तें खरेच दिसतें
तुम्हा अन्यथा पटला नसता
कपट - पटू हा गवळी ताता ॥५४॥
राजे आपण चतुःसमुद्री
राज्यहीन तो असे दरिद्री
अशास निज तनया देण्याहुन
फार बरें द्या कूपीं ढकलुन ॥५५॥
मूर्खपणाचें सुतभाषण तें परिसूनि भीष्मक राजा
म्हणे मनीं हा कसा निघाला दिवटा मुलगा माझा ॥५६॥
खुळ्या सारखे करी न रुक्मी
पूर्ण विचारें बोलतसे मी
नच पिकले मम केस उन्हानें
विचार कर तूं शांत मनानें ॥५७॥
शौर्य धैर्य मति बघतां सद्गुण
श्रीकृष्णासी तुळेल कवण
शक्ति जया शत नृप निर्माया
राज्यहीन तो म्हणणें वाया ॥५८॥
रुक्मिणीसही तोच हवा वर
तीही दिसते मूर्ख पुरेपुर
काय तिला कळतें पोरीला
गर्वे ताठुन रुक्मि म्हणाला ॥५९॥
पाहें या तरि तुमची बुद्धि
म्हणुनी इतुकी दिधली संधी
अतां न आपण यांत पडावें
मान आपुले राखुन घ्यावें ॥६०॥
दमघोषाचा पुत्र सुलक्षण चेदि देशचा राज
धीर धीर शिशुपालचि होइल समजा शालक माझा ॥६१॥
आड येवुनी वृथाच मातें
हांसें करुनी न घ्या जनातें
वदुन असें त्या सुताधमाने
भीमकास घातिली बंधनें ॥६२॥
घेउन हातीं सकलहि सूत्रें
निजमित्रासी धाडीत पत्रें
वक्रदंत पौंड्रक शाल्वासी
ससैन्य यावें या लग्नासी ॥६३॥
सन्मानानें करी निमंत्रण
वरदेवा शिशुपाला लागुन
तदा तया मतिमंदा वाटे
स्वर्ग राहिला दोनच बोटें ॥६४॥
शृंगाराया मग कुंडिनपुर
रुक्मी आज्ञा करीत सत्वर
निमुट बापुडे लोक राबती
काय चालतें सत्तेपुढतीं ॥६५॥
वृद्धपणें हतबल झालेला भीमकराजा चित्तीं
व्याकुळ झाला मार्ग दिसेना वदे सुतेसी अंतीं ॥६६॥
प्रिय कन्ये गे भाग्यवती तूं
म्हणुन जडे तव हरिवर हेतू
संमत मजसी निवड तुझी ही
काय करूं परि समर्थ नाहीं ॥६७॥
वृद्धपणीं पुत्राचे आधिन
बाळे सहजाचि होतें जीवन
यांतुन काढी वाट तूं गे
चतुर मुली तुज कथणें नलगे ॥६८॥
देतो आशीर्वाद तुला मी
ईश पाठ राखिल या कामीं
प्रताप आहे तदीय अद्भुत
सिद्धी जाइल तुझा मनोरथ ॥६९॥
निजाग्रजें उन्मत्त - पणानें
अवगणिलें तातास हटानें
ऐकुन झाली व्यथा हृदाला
गोंधळुनी ती जात सुशीला ॥७०॥
कुलरबामिनी माय अंबिके रक्षी मज या समयीं
शरण पदा मी अनन्यभावें मार्ग दाखवी देवी ॥७१॥
हृदयनाथ यदुवंश - विभूषण
रक्षक दुसरा नसेच याविण
तया निरोपूं भाव हृदीचा
कुणी पाठवुन विश्वाचा ॥७२॥
असें मनीं चिंतून सुशीला
बाही सत्वर सुदेवजीला
चरण धुवोनी अर्घ्य समर्पुन
केलें त्याचें सादर पूजन ॥७३॥
वंदन करूनी नम्रपणानें
वदत तयासी नतवदनानें
विप्रवरा मी अनाथ आजी
एक कार्य मम कराल कां जी ॥७४॥
कोमल आहे हृदय आपुलें
विनवाया म्हणुनी मी धजलें
द्वारकेस जाउन मजसाठीं
वळवा श्यामल हरि जगजेठी ॥७५॥
हृदय वाहिलें हरिचरणीं मी तरि मज शिशुपालातें
देण्या सजला ज्येष्ठभ्राता जरि न रुचे पितया तें ॥७६॥
म्हणुन सुदेवा असें करावें
कीं हरिनें मज घेउन जावें
ना तरि माझें समाप्त जीवन
काय कथूं तरि तुम्हास याहुन ॥७७॥
परोपकारी ब्रीद आपुलें
सदया यास्तव याचन केलें
द्विजवर्या मी शरणं तुम्हासी
तारा अथवा मारा मजसी ॥७८॥
वेद निपुण तो सुदेव चित्तीं
हर्षित झाला परिसुन विनती
काकुळती कां इतुकी दीए
यांत धन्यता मला स्वभावीं ॥७९॥
याच निमित्तें जगदीशाचें
दर्शन मजसी घडावयाचें
संशय कसला न धरी आतां
तुझ्या करींच्या परि दे लिखिता ॥८०॥
अल्पहि जरि लिहिलीस अक्षरें श्रीकृष्णास तरी तीं
अर्थबहुल रमणीय जणूं का महाकवीची रीती ॥८१॥
असूं अम्ही विद्वान तरीही
तव वचनाची सरी न येई
भव्य अशा वटवृक्षावरती
मधुर सुवासी फुलें न फुलती ॥८२॥
लिही त्वरेनें वेळ करी ना
आजच आहे मुहूर्त गमना
आग्रह केला बहुत सखींनीं
कशीतरी मग धजे शालिनी ॥८३॥
रत्नशलाका घेउन हातीं
धवल रे श मी प ट्टा व र तीं
जणू प्रेममय केशररंगी
हेत हृदींचे लिही शुभांगी ॥८४॥
हृदय दुजें तें लिखित घेउनी
सुदेव ये द्वारकापट्टणीं
करीत हरि सानंद स्वागत
बहु उपचारें पूजी त्याप्रत ॥८५॥
निरिच्छ विद्यावंत दयाळू शांत तपोधनराशी
असे द्विजोत्तम आपण आलां कृतार्थ करण्या मजसी ॥८६॥
भवत्पदरजें पावन झालें
सदन न नुसतें पट्टण सगळें
सेवा सांगुन मज भूदेवा
उपकृत हा नत दास करावा ॥८७॥
हरि वचनें त्या द्विज गहिंवरला
नावरती नयनाश्रु तयाला
तुलाच शोभे हरि हें कौतुक
सन्मार्गाचा तूं उपदेशक ॥८८॥
नेत जसा द्विज नलसंदेशा
तसेंच मातें समज परेशा
विदर्भ नृप नंदिनी रूक्मिणी
पाठवीत मजसी तव चरणीं ॥८९॥
त्वरा करावी रक्षाया तिज हेंच मागणें माझें
वाट पाहते ती तव घे हें पत्र तुला दिधलें जें ॥९०॥
गोल टपोरें सुरेख अक्षर
उत्सुकतेनें बघे परात्पर
हृच्छुक्तींतिल भाव मौक्तिका
प्रेमगुणीं गुंफिलें जणूं का ॥९१॥
ऐकोनियां भुवनसुंदर सद्गुणातें
कानीं शिरून हरिती सकल श्रमातें
सौंदर्य जें बघुनि सार्थक लोचनांसी
माझें जडे हृदय नाथ ! भवत्पदासी ॥९२॥
विद्याधिकार - कुलशील सुरूपताहीं
साजेलशी तुज जगांत कुणीच नाहीं
जाणीव ही असुन देव कुलीन कन्या
तूंतेंच इच्छित पती म्हणुने अनन्या ॥९३॥
चित्तें वरून तुज मी तव होत जाया
घे धांव सत्वर अतां मज वांचवाया
घालील धाड शिशुपाल कळे न केव्हां
कोल्हा स्वभाग पळवी रुचते न सिंहा ? ॥९४॥
केलीं व्रतें नियमही धरिले विशेषीं
पूजीयले सतत देव गुरुद्विजासी
ना लाविले कधिच विन्मुख याचकातें
तें पुण्य उद्यत करो तुज यावयातें ॥९५॥
आले ससैन्य मगधेश विदूरथादि
रक्षावया परिणयातुर भूप चेदि
सर्वां तयास निज बाहु पराक्रमानें
दंडून ने मजसि राक्षसपद्धतीनें ॥९६॥
आली समीप बहु लग्नतिथी मदीय
आतां विलंब करण्या उरली न सोय
मी योजना तुज कशी सुचवूं शकेन
झालें भयेकरून या मतिहीन दीन ॥९७॥
इच्छा जरी न पुरली मम पद्मनाभ
देईन जीव सहसा हसडून जीभ
घेऊन जन्म शत उग्रतपें तुझे तें
पावन पाय शिवही नमितो जयातें ॥९८॥
भावभरित ती प्रेमळ भाषा
रिझवी डुलवी श्रीजगदीशा
अर्थगर्भ थोडक्यांत सुंदर
लिही तोच कीं चतुर खरोखर ॥९९॥
अभिनव कोमल भाव उदेले परमेशाच्या हृदयीं
बहरा येई आम्रतरू जणु ऋतुराजाच्या उदयीं ॥१००॥
विविध छटा तरळती मुखावर
श्री हरीच्या शंकला विप्रवर
परि प्रभूचा दक्षिण नयन
स्फुरुन तयाचें शांतवीत मन ॥१०१॥
अनिंदितेच्या मृदु हृदयातें
अवमानावे गमे कुणातें
फुलें जरी चरणास वाहिलीं
म्हणुन कुणी का पदीं तुडविलीं ॥१०२॥
वदे प्रगट तो सुदेव सज्जन
मौन कशाचें समजूं लक्षण
स्थानीं सप्तम नृपकन्येचे
फल देतिल ना ग्रह उच्चीचे ॥१०३॥
प्रसंग खालीं बघावयाचा
मज विप्रास न येवो साचा
छे छे नाहीं तसें सुदेवा
उपाय चिंतित काय करावा ॥१०४॥
नृप कन्या येईल जरी का नगराच्या बाहेरी
तरी सुलभ मग कार्य घडे हें बोलत नतकैवारी ॥१०५॥
सहजी येइल संधी तैसी
विप्र निवेदन करी हरीसी
लग्नापूर्वी कुलदेवीची
ओटी भरणें रीत वधूची ॥१०६॥
नृपधानी पासुन तें दूर
वनांत आहे देवी मंदिर
कार्य म्हणा हें तडीस गेलें
श्रीकृष्णानें हासुन म्हटलें ॥१०७॥
उठा उठीं रथ सिद्ध जहाला
चपल विजेसम अश्व जयाला
मेघपुष्प सुग्रीव बलाहक
शैब्य असे शुभ जोडी दारुक ॥१०८॥
सुदेव - विप्रासवें मुरारी
चढे रथीं नरवीर केसरी
पवनगतीनें धावे स्यंदन
ठरति न त्यावर विस्मित लोचन ॥१०९॥
एकटाच हरि जात हराया वैदर्भी नृप - कन्या
कळतां हे रेवतीपतीही निघे घेउनी सैन्या ॥११०॥
झाली इकडे एकच घाई
गुढ्या तोरणा गणती नाही
सोनसळी रेशमी वितानीं
अमरपुरीसम ती नृपधानी ॥१११॥
मंगल वाद्यें वाजति नाना
बार - योषिता करिति तनाना
शाल्व - जरासुत - दमघोषादि
ताठुन गेली खलजनमांदि ॥११२॥
घटी बघावी उत्सुकतेनें
हर्षित हृदयीं शिशुपालानें
परी रुक्मिणी व्याकुळ होई
पळपळ बुडतो विपदा डोहीं ॥११३॥
धीर द्यावया बघती तिजशी
सख्या स्वयें ज्या मनीं उदासी
तों दारीं ये अवगुंठित रथ
चढे वधू ती भग्नमनोरथ ॥११४॥
निघती मागुन शुभा पुरंध्री घेउन मंगलपात्रें
सुसज्ज सैनिक रक्षण करण्या पाजळुनी निजशस्त्रें ॥११५॥
वाद्य गणांच्या घनझंकारी
मिरवणूक ये अशी मंदिरीं
खणा नारळीं भरतां ओटी
येत उमाळा दाटुनी पोटीं ॥११६॥
जगदंबे कुलदेवि भवानी
हिमगिरिनंदिनि शिवे मृडानी
मोकलिसी कां बये अशी मज
भेटिव गे प्रिय सखा अधोक्षज ॥११७॥
प्रिय तुजशी जो पिनाकपाणी
पती मिळविला तोच तपानीं
याच कारणें विवाहकाला
वंदनीय तूं नवरमुलीला ॥११८॥
अंबे व्रजजननाथ हरिविना
धजो न दुसरा पाणिग्रहणां
वरा मजसी दे असा ना तरी
प्राण न नांदो क्षणहि शरीरीं ॥११९॥
गिरिजाचरणीं भाल ठेविलें न्हाणित नयन जलांनीं
शिरीं वर्षिलीं फुलें वाहिलीं करि कीं कृपा मृडानी ॥१२०॥
नमुनी उठतां बघे सुदेवा
मूर्त जसा शुभ कौल मिळावा
स्मितमुख त्याचे जणु अरुणासम
तिच्या हृदींचा वितळविला तम ॥१२१॥
वेळेवर बघ आलों देवी
दीनाची या स्मृति ठेवावी
पुनः कशाचें तव शुभदर्शन
गिरिजेसी कर शुभे प्रदक्षिण ॥१२२॥
उजवे घाली सती रुक्मिणी
उत्सुक धडधडत्या हृदयानीं
करें लपेटुन तोंच कटीसी
रथांत ओढी हरी तियेसी ॥१२३॥
पाहुन नयनीं ती श्रीमूर्ति
मान ठेविली स्कंधावरती
झाला गंगा - सागर - संगम
कीर्तीनें जणु वरिला विक्रम ॥१२४॥
सदाचार सन्नीति मधूसह गोडी कनकाकांती
जीव शिवाची भेट जाहली ज्ञानीं समरस भक्ति ॥१२५॥
सुधा घेउनी गरुडभरारी
तशी त्वरा तइं करी मुरारी
नयनाचें नच लवलें पातें
तंव घटनाही होउन जाते ॥१२६॥
गडबड गोंधळ धांव ओरडा
करी मागुनी मग जन वेडा
मुक्ता हरिली कलहंसानें
काक काव करि कंठरवाने ॥१२७॥
शिव्या मोजितां सैन्या ओठीं
रुक्मी धांवत हरिचे पाठीं
चिडुन तरस वा जसा ससाणा
पार जाहला परि यदुराणा ॥१२८॥
द्यूत मांस मदिरा मदिराक्षी
यांत दंग असती वरपक्षी
वृत्त कळे हे नसे कल्पना
शस्त्रहि धड गवसे न तयांना ॥१२९॥
कसें तरी सावरून निघती मगधादिक वेगेसी
परी हलधरें मधेच गाठुन धूळ चारिली त्यासी ॥१३०॥
उंच सखल पथ फार अरूंद
रथगति मंदावीत मुकुंद
कोमलेस या त्रास न व्हावा
सुममंचक ही जिला रुतावा ॥१३१॥
तंव जवळी ये खवळुन रुक्मी
थांब चोरट्या बघ आलों मी
लोळवीन तुज रणांगणासी
तरी दाखविन मुख नगरीसी ॥१३२॥
उचल शस्त्र चल बघूं शौर्य तव
हांसत चढवीं चाप रमाधव
सहन न झाले शर रुक्मीसी
कवच तुटोनी पडे महीसी ॥१३३॥
धनु हातांतिल भंगुन गेलें
तुरग - ध्वज सारथी - निमाले
खंडित झाली लोह गदाही
परि मद कांहीं शमला नाहीं ॥१३४॥
पाश - बद्ध त्या करून हरीनें शस्त्र शिरावर धरिले
परि बघतां ते भीमककन्या हृदय दया कळवळलें ॥१३५॥
वदे करुण कर धरुन गोमटी
जीवदान द्या या मजसाठीं
कसाहि असला तरी सहोदर
हा आहे मम हे प्राणेश्वर ॥१३६॥
प्रियजन विनती होतन विफला
देत हरी सोडून तयाला
परत जावया वदन न उरलें
विदर्भयुवकें नव पुर रचिलें ॥१३७॥
सवें घेउनी विदर्भकन्या
द्वारवतीसी ये हरि धन्या
जनहर्श न तइं मावत गगनीं
औक्षण केलें सुवासिनींनीं ॥१३८॥
गुढ्यापताका रम्य तोरणें
धनुषाकृति उभविली पथानें
अपूर्व शोभा नगरीला ये
घरोघरीं जणु मंगल कार्यें ॥१३९॥
सुरांगना गंधर्व अश्वमुख भगवंताच्या सेवे
आले नर्तन गीतवादना श्रुतिसुख किमु वर्णावे ॥१४०॥
प्रसन्नता आनंद मूर्त कीं
तशी गमत वसुदेव देवकी
बोलविलें मग त्यानीं सादर
विप्र जाणते सात्त्विक तत्पर ॥१४१॥
मंत्रपूत आचरलीं हवनें
दिलीं बहुत कांचनगोदानें
वेदविदांनी मंगलवाचन
केलें, वधुवरशुभसुखचिंतुन ॥१४२॥
श्रीहरि भगवान् पुरुष परात्पर
प्रकृति मूळची रमा खरोखर
ज्या उभयांच्या सत्ते - वरतीं
इंद्र वरुण रवि विश्वें जगती ॥१४३॥
लोकसंग्रहा तरी प्रभूनें
स्तविलें देवा वेदविधीनें
हविल्या सादर अनलीं लाजा
सप्तपदीनें वरिली भाजा ॥१४४॥
दाखविला ध्रुव निशि मुनिवेष्टित
म्हणे असें मन राहो अचळित
तरी लाभतें सुख संसारीं
प्रिये आण हें सदा विचारीं ॥१४५॥
भगवंतासह वैदर्भीचा विधिवत् विवाह झाला
हर्षित झाली सृष्टी; वर्षत वरुनी स्वर्ग सुमाला ॥१४६॥
असामान्य गुणवंत अधीची
उपमा अन्यां होत जयांची
कसें करूं मग त्यांचे वर्णन
विनम्र भावें चरणी वंदन ॥१४७॥
वरातिच्या शुभमंगलवेळीं
वैभव शोभा शिगेस गेली
चौचौहातीं रम्य तोरणें
उभारिलीं बहुमोल पुरीनें ॥१४८॥
हर्ष - सागरा भरती आली
तसे शोभती जन ते कालीं
फुलें उधळीलीं जाती अविरत
फेस जणूं कां तिथला उसळत ॥१४९॥
सुंदरपण वर - यात्रेचें तें
कवणा ध्यानीं येतच नव्हतें
मोहक भूषा वा ललनांची
शुद्ध न कोणा निरखायाची ॥१५०॥
वाद्य गणांच ध्वनि मग मंजुळ
लक्ष कुणाचें वेधुन घेइल
श्रीवर सस्मित नयनें बघतां
मुकेन मी त्या, भय हें चित्ता ॥१५१॥
असामान्य ते युगुल घेतसे वेधुन इंद्रियवृत्ती
मजचि विषय हा परम सुखाचा ज्ञानेंद्रियगण म्हणती ॥१५२॥
करुन निजहृदाची पेटिका ग्रामवासी
जपुन बहु मुदानें ठेविती श्रीहरीसी
पुढुन जरि निघोनी दूर गेली वरात
तरि दिसत पुढारी लोक ना हालतात ॥१५३॥
‘ रुक्मिणी - परिणय ’ नांवाचा दहावा सर्ग संपूर्ण
लेखनकाल :-
वैशाख शके १८७०