( श्रीवसुदेव - बंधन )
सृष्ट्वाऽखिलं विश्वमिदं विचित्रं
स्थूलञ्च सूक्ष्मञ्च चराचरञ्च
तथापि नित्यं निरूपाधिको यः
तस्मै महेशाय नमोऽस्तु शश्वत् ॥१॥
अचिंत्य परतत्त्व दे करून वासनेचा क्षय
प्रसाद तव सद्गुरो निवटितो भवाचें भय
म्हणून तुमच्या पुढें दिसत दीन चिंतामणी
तुम्हां शरण मी भवच्चरण मस्तकीं घेउनी ॥२॥
परम सुंदरा मथुरा नगरी
वसली होती यमुना - तीरीं
श्यामलशा ललनेच्या जणुं कां
बसे कडेवर मुग्ध बालिका ॥३॥
निळ्या नभीं चमकती विशेष
तेथ गृहांचे सुवर्ण - कळस
सूचविती जणुं विलास - केली
संपत्ती कळसास पोचली
मधु - दैत्यासह त्याचें मधुवन ॥४॥
दाशरथी शत्रुघ्नें मर्दुन
त्या स्थानीं ही पुराणकालीं
अभिनव ऐशी पुरी वसविली ॥५॥
पापी मधुवन नष्ट जहालें
पापबीज परि नसें जळालें
होतें जणुं तें दडुनी भूगत
अनुकूला कालास अपेक्षित ॥६॥
भोजकुलींचा कंस दुर्मती कालें होता राजा
दुष्कृति - फल - युत - वृक्ष उगवले कोंब फुटुन त्या बीजा ॥७॥
दिसावया इतरांहुन सुंदर
गांजाचें जरि पीक खरोखर
उत्पन्नहि ये विपुल तयांतुन
परि आदरिती तया न सज्जन ॥८॥
तसेंच मथुरा - नगर सुशोभित
विलास - संपत्तीनें मंडित
सोडून गेले दूर संतजन
निज - धर्माचें करण्या रक्षण ॥९॥
कारण तेथें शील सतींचें
यज्ञ मुनींचे धन दुबळ्यांचें
एक क्षणही नसे सुरक्षित
पटकीच्या साथींतिल जीवित ॥१०॥
भूप कंस धनरूप बळानें
युक्त तसाची चातुर्यानें
वर्णूं कां परि सर्पगुणांतें
विसरुनि त्याच्या भयद विषाते ॥११॥
श्वशुराचें घेऊन सहाय्य द्रोह करुन जनकासी
नृप झाला, त्या नको पुरावा अधमाधम म्हणण्यासी ॥१२॥
होती भगिनी या कंसासी
नांव देवकीं असें जियेसी
सरळ - हृदय ही कुटिल तदंतर
लक्ष्मीसी जणु शंख सहोदर ॥१३॥
चारुहास्य सुंदर मुखमंडल
मनोज्ञ कान्ती वाणी मंजुळ
सुंदरता शुचिता सात्विकता
घेउन तिज जणुं रचित विधाता ॥१४॥
सागर भरला असें जलानें
ही स्वाभाविक वात्सल्यानें
कारुण्यानें सदैव पूर्ण
हृदय तिचे जेवीं रामायण ॥१५॥
मयूर शुक सारिका गृहींचे
क्रीडापाडस वा हरिणींचें
व्याकुळ तिज वाटतां बंधनीं
सवेंच त्यांना देत सोडुनी ॥१६॥
सुम खडितां ये रस, बघतां तें
वाटे अश्रू लता ढाळिते
अहा तिचें प्रिय अपत्य हरिलें
जननीचें ना हृदय जाणिलें ॥१७॥
म्हणुन विहरतां उद्यानांतुन तिनें सुमा चुंबावें
कुरवाळावें वत्सल परि कर तोडाया न धजावे ॥१८॥
देवकिच्या हळव्या हृदयाची
कंस करी नित थट्टा साची
तिच्या पुढें टोची पक्ष्यातें
हसत वसे चीची करितां ते ॥१९॥
कळ्या उमलत्या चुरगाळाव्या
निष्ठुर हंसुनी वर उधळाव्या
वदन झाकुनी रडे देवकी
दुजें काय तरि करिल वराकी ॥२०॥
दुष्ट नरांचे सहजहि वर्तन
उपजविते कीं व्यथा विलक्षण
निवडुंगाची लव ही जेवीं
स्पर्शे केवळ बहुपरि शिणवी ॥२१॥
उपवर झाली जयीं देवकी विकसित कलिका जैशीं
वृष्णि - कुलींच्या वसुदेवातें नेमियलें वर तिजसी ॥२२॥
विवाह झाला बहु थाटानें
कंस लक्ष घाली जातीनें
उणें तेथ मग पडें कशाचें
प्रगटे वैभव सर्व कलांचें ॥२३॥
वरातिच्या वर शुभ समयासी
पूरच आला संपत्तीसी
भव्य मनोहर हेमरथावर
आरोहण करिती ते वधुवर ॥२४॥
मिळवुन बहुविध पुष्पें रत्नें
शोभविलें त्या रथास यत्नें
फुलें चमकती रत्न सुगंधित
झालें जनुं कां गुण संक्रामित ॥२५॥
अश्व दहा सुंदर तेजाळ
सुलक्षणी वर्णानें धवल
सजवुनि त्या जोडिले रथांतें
दशग्रंथ जणुं वेदार्थातें ॥२६॥
स्वयें कंस होऊन सारथी प्रग्रह घेई हातीं
अविवेकाधिन झाल्या जणुं कां दशेंद्रियांच्या वृत्ती ॥२७॥
मिरवणूक चालली पथानें
रचिली ज्यावर रम्य तोरणें
सोनसळी रेशमी पटासी
पसरुनिया झांकिलें जयासी ॥२८॥
गर्जे सर्वापुढें धडधडा
हत्तीवरती थोर चौघडा
मागुन वाजे मंजुल सनई
सती पतिस जणुं उत्तर देई ॥२९॥
मृदंग झांजा शिंग तुतारी
प्रगटविती आपुली चातुरी
बंदी करिती जयजयकारा
भेदितसें तो गर्ज अंबरा ॥३०॥
दासी त्या मागून चालल्या
विविध भूषणांनीं ज्या नटल्या
आंदण वस्तू शिरीं घेउनी
स्तबक फुलांचे जसे लतांनीं ॥३१॥
गणिकांच्या गानास साथ दे नूपुर झंकारुनियां
हाव भाव मधु कटाक्ष खुलवी नृत्याच्या सौंदर्या ॥३२॥
दोहीं कडुनी होई साचा
दांपत्यावर वर्ष सुमांचा
फुलें न हीं शब्द कीं स्तुतीचे
कुतुकें जे निघती जन - वनाचें ॥३३॥
रत्नदीप घेउन निज हातीं
सुवासिनी रथ अनुसरताती
त्यामागें कुलललना - मेळा
वस्त्रांभरणांनीं नटलेला ॥३४॥
मध्येच कोणी चढुन रथातें
वधुच्या मुंडवळ्या सांवरितें
उभयांच्या शेल्यांची ग्रंथी
आहे कां सुटली तें बघती ॥३५॥
रथास मार्गी हिसका बसतां
अंग तयें अंगास लागतां
लज्जारुण मुख होत वधूचें
स्मित ओठावर येत वराचे ॥३६॥
दलांतुनी कमलांचे केसर सुमसंभारीं तेवीं
प्रपद पतीचे दिसे, विलोकी तेच शालिनी देवी ॥३७॥
सर्व नगर पाहतें कौतुकीं
रथावरीं वसुदेव - देवकी
चंद्रासह रोहिणी शोभली
नभीं जशीं नक्षत्र - मंडळीं ॥३८॥
शांत रसासह अथवा कविता
उत्प्रेक्षा - रूपकें मंडिता
विराग उज्वल भक्तीश वा
मुनि - हृदयीं शोभून दिसावा ॥३९॥
कुठें वाद्य वाजतां पथानें
काय त्यजुन धावती त्वरेनें
अशा स्त्रिया ही वरात मोहक
बघावयासी कशा न उत्सुक ॥४०॥
त्वरितगती गांठुन वातायन
रमणी बघती शोभा निरखुन
कोणी वानित वधूवरांतें
वाजंत्रीच्या कुणी सुरांतें ॥४१॥
एक वदे ही परस्परांसीं
योग्य किती गे मधुरूपासीं
अज राजासी इंदुमती ती
निषधपतीनें जणुं दमयंती ॥४२॥
खरेंच तव जन्मलीं जणूं हीं परस्परास्तव तेवीं
परी न बाई ईशकृपें यां तशीं संकटें यावीं ॥४३॥
अवलोकी कुणि वेश - भूषणां
स्वतः सवें करितां तत्तुलना
दिपुन वैभवें कंसा स्तविती
किति ही भगिनी वरती प्रीती ॥४४॥
वरवर बघणारास गमावें
प्रेम देवकीवरी असावें
प्रयत्न कंसाचे परि होते
वैभव अपुलें मिरवायां तें ॥४५॥
वरात ऐशी आनंदानें
मिरवत होती राजपथानें
तों आकाशीं शब्द उमटले
हर्ष - गिरीवर वज्र कोसळें ॥४६॥
पति - सदना ज्या देवकीस तूं मिरवित कंसा नेसी
तिचा आठवा गर्भ पुढें तुज नेइल यमलोकासीं ॥४७॥
पिकें बहरलेल्या शेतावर
अवचित पडलें कीं हिंव दुर्धर
मोहर दरवळला अंब्याचा
वर्षें वर पाउस गारांचा ॥४८॥
शिखर मंदिरीं जव चढलें न
तोंच आदळे वीज कडाडुन
तसेंच केलें नभोगिरेनें
क्षणांत सारें उदासवाणें ॥४९॥
भगिनीवर कंसाची प्रीती
भोळ्या लोकां वाटत होती
क्रूर हृदय परि अजुन तयाचें
पुरतें नव्हतें दिसलें साचें ॥५०॥
प्रकाश असतां मंद काननीं
रत्न तेवढें येत दिसोनी
तों तळपावी वीज अंबरी
प्रकटे काळा नाग विषारी ॥५१॥
लांबुन वाघाच्या डोळ्यासी
भ्रमें दिवा मानिती प्रवासी
परी कळोनी येत शेवटीं
गृहदीप न मृत्यूची दिवटी ॥५२॥
घोर शब्द ऐकतां नभाचे
रूप खरें प्रगटे कंसाचें
स्वतःवरी बेततां येउनी
प्रेम खलांचें टिके कोठुनी ॥५३॥
क्रूर भयंकर मुद्रा झाली खदिरांगार जणुं डोळे
रुधिर येई तों अधर चाविले करकर खाउन दांत खलें
खङ्ग उपसुनी रक्त पिपासू रथाखालतीं घेत उडी
प्रगटत मूर्त कृतांत जणूं का प्रलयाची येतांच घडी ॥५४॥
ससाण्यापरी घालुन झेप
धरि भगिनीचा केशकलाप
ओदुन पाडी तिजसी क्रूर
लोकांच्या अश्रूसह भूवर ॥५५॥
फुटलें कंकण तुटल्या माळा
धूळ माखली सर्वांगाला
भावि सुखाच्या सर्व कल्पना
विसकटल्या सह वस्त्र भूषणां ॥५६॥
आनंदामधिं रमली होती
नवपरिणत ती मुग्धा युवती
क्षणांत परि सारें पालटलें
अमृत इच्छितां गरळ उसळलें ॥५७॥
पळभर तिज कांहींच कळेना बधिर इंद्रियें सारीं
निमिषार्धें मग होत घाबरी मरण बघून समोरी ॥५८॥
घाम सुटे थरथरे देवकी
कोमल हृदयीं भरली धडकी
विवर्ण झाली शब्द फुटेना
जल तरळें भय - चंचल नयनां ॥५९॥
किति तरि जमले जन मिरवाया
धजे न एकहि पुढती व्हायां
पुतळे जणुं सारे दगडांचे
घोर संकटीं कोण कुणाचें ॥६०॥
शांत न बसवे वसुदेवाला
तो धैर्यानें पुढती झाला
संकटभीता साह्य करावें
थोरासी सहज हें स्वभावें ॥६१॥
ती तर त्यांत नवोढा पत्नी
भाग रक्षिणें नाना यत्नीं
अग्निसाक्ष तद्भार शिरावर
घ्यावी केवीं मग माघार ॥६२॥
धीर दिला तिज वसुदेवानें बघुनी प्रेमळ नयनें
बोलत कंसा मंजुलवाचा कर धरुनी धैर्यानें ॥६३॥
“ कंसा थोर तुझें महिमान
भोज कुला तूं शिरो भूषण
शूर रणीं ना कुणी तुझ्या सम
कां करिशी मग अनुचित कर्म ॥६४॥
आपण फलवेली लावावी
कालें ती पुष्पोन्मुख व्हावी
किडकें एखादें येइल फळ
गृहित धरुन कुणि छेदी वेल ? ॥६५॥
वरातिची ही मंगल वेला
थाट येथिंच तुवांच केला
नववधु या समयीं अधिदेवी
तिलाच कां पायीं तुडवावी ॥६६॥
स्त्री हत्या मोठीं सर्वांहुन
भगिनी ही धाकुटी तयांतुन
कन्येसम लाडकी असावी
तिलाच कांरे वध्य गणावी ॥६७॥
धरुनी जो तूं हेतु मनासी
हिला वधाया उद्यत होसी
मारुन हिजसी साधे तो कां
कोण अमर वद या भूलोकां ॥६८॥
बली धनी विद्वान असेना मरण न चुकलें कवणा
म्हणुन यशासी डाग न लागों हेंच धरावें स्वमना ॥६९॥
शक्य असुनही इच्छापूर्ती
संत न दुष्कर्मे आचरिती
प्रयत्नेंहि जें अशक्य घडणें
यास्तव कां मग पापाचरणें ॥७०॥
सूज्ञा, म्हणुनी विनवित तूंतें
जीवदान दे मम भार्येतें
दीनपणें तुजकडे बघे कीं
प्रिय भगिनी ही तुझी देवकी ” ॥७१॥
भाषण परि तें सर्वहि विफल
घड्यावरी पालथ्या जसें जल
बीं पडलें जाउन खडकावर
कसे फुटावें तयास अंकुर ॥७२॥
वाळवंट कां सुपीक झालें
कितिही जरि त्यासी नांगरिलें
सुसरीच्या पाठीसी मार्दव
ये कां भिजुनी जलें सदैव ॥७३॥
दुष्ट - वर्तनीं पालट तेवीं
सौम्य भाषणें पडेल केवीं
नवल हेंच ऐकून घेतलें
इतुका वेळ तयानें सगळें ॥७४॥
दूर ढकलुनी वसुदेवातें क्रोधें शस्त्र उगारी
बघवेल न तें म्हणुनी झांकी डोळे नगरी सारी ॥७५॥
देवकिची अंतिम किंकाळी
परि नच कोणा ऐकूं आली
ध्वनी नवाची सुखवी कर्ण
“ श्रीनारायण जय नारायण ” ॥७६॥
नारदास बगतांच पुढारीं
क्रोधासह असि कंस आवरी
शांतवी न हृदयास कुणाचे
पवित्र दर्शन सत्पुरूषांचें ॥७७॥
श्रीकृष्णाची भावी माता
देवकीस त्या कंसें वधितां
विलंब घडतां भगवज्जन्मा
म्हणुन नारदें घेतले श्रमा ॥७८॥
स्वीकारून सर्वंचें वंदन
करिती कंसासी स्मितभाषण
“ मांडिलेंस हें काय भूपते ?
शस्त्र तुझें ना व्यर्थ कोपतें ” ॥७९॥
कंस वदे “ आठवा गर्भ मज वधिल हिचा नभ सांगे
म्हणुन हिला मारून विषपादपमूळच छेदित वेगें ॥८०॥
“ छे छे, कंसा हिला वधोनी
मुनिवर म्हणती तुझीच हानी
पुनः कुठें ही येइल जन्मा
ठाव तुला लागेल कसा मा ॥८१॥
युक्ती तुजसी कथितो यास्तव
हिला बंधनीं पतिसह ठेव
अपत्य जेंजें होइल यांतें
टाक तत्क्षणीं चिरडुन त्यातें ॥८२॥
सवेच पटलें तें कंसाला
मूर्ख भाळतो भुलावणीला
वदे दुष्ट तो वसुदेवाप्रत
“ काय संधि हा तुम्हांस संमत ” ॥८३॥
वसुदेवहि गांगरला क्षणभर
परि संमती देई नंतर
पुरुष करी दूरचा विचार
स्त्रीस न बहुधा इतुका धीर ॥८४॥
“ होईल वा नच मूल अम्हांसी, ” “ म्हणत कुणीं सांगावें,
जगेल होतां, निश्चय नाहीं, कां पुढचें टाकावें ” ॥८५॥
परी देवकी वदें स्फुंदुनी
“ सुखें टाक मम कंठ चिरोनी, ”
अपत्य - वघ कल्पनेमधेंही
स्त्री हृदयासी साहत नाहीं ॥८६॥
बंधन त्या करण्या आज्ञापुन
कंस चालता झाला तेथुन
घट्ट धरोनी नारदचरण
रडे देवकी आक्रदून ॥८७॥
माते, न धरी मम पायांतें
वंदनीय गे तूंच अम्हांतें
पूर्णब्रह्म परेश परात्पर
उदरीं तुझिया अवतरणार ॥८८॥
प्रसंगाकडे पाहुन निष्ठुर
वदलों त्याची मला क्षमा कर
असें कसें तरि लव शांतवुनी
अंतर्हितं झाले नारदमुनि ॥८९॥
कंसाज्ञेनें दंपतीस त्या नेलें कारागारीं
भयाण भिंती जेथ रक्षिती निज - वैभव अंधारीं ॥९०॥
आकाशासह पृथ्वी जेवीं
गाढ तमीं दर्शे बुडवावी
आनंदासह अथवा आशा
दुर्दैवानें करणें विवशा ॥९१॥
सत्यासह वा सरला वाणी
स्वार्थे जणुं ठेवणें कोंडुनी
वसुदेवासह तशी देवकी
बंदी केली कंस सेवकीं ॥९२॥
ज्यांनीं उपभोगणें विशेष
राजमंदिरांतले विलास
उदास जीवित जगती तेची
विचित्र - करणी कीं दैवाची ॥९३॥
धीराचे ते परि दोघेही
त्रासिक कोणी झाले नाहीं
मधुर - वर्तनें परस्परांना
सुखवित करिती कालक्रमणा ॥९४॥
जाती दिवसामागुन राती मासहि कांहीं सरले
गर्भवती जाहली देवकी वासुदेवें पाहियलें ॥९५॥
फिकटपण ये वदना किंचित
शोभे जणुं कां कमल - रजोहत
मंदगती जाहली मंदतर
अलस लोचनीं दिसे मनोहर ॥९६॥
प्रिय पत्नी ती प्रथम - गर्भिणी
आनंदे नच कोण पाहुनी
वसुदेवाच्या परि हृदयांत
वचन दिलेलें सलत सदोदित ॥९७॥
पुरे दिवस भरतां गर्भासी
शुभानना दे जन्म सुतासी
कीर्तिमंत हें नांव तयाचें
लोकीं विश्रुत झालें साचें ॥९८॥
जन्मा आधीं प्राण देउनी
ज्यानें रक्षियली निज जननी
प्रसिद्ध होण्या त्याचें नाम
नाम - करण - विधिचें ना काम ॥९९॥
पाहुन मूर्ती मृदुल चिमुकली भान विसरली देवी
अपत्य - जन्मापरी स्त्रियांतें दुजें न कांहीं भुलवी ॥१००॥
चिंती परि वसुदेव मनातें
अतां उचलणें अवश्य यातें
सुतासवें जों अधिक रमेल
वियोग तों दुःसह होईल ॥१०१॥
दाबुन कष्टें व्यथा हृदांतिल
थोपवून अश्रूंचे ओघळ
निज भार्येच्या अंगावरुनी
मूल तयें घेतलें उचलुनी ॥१०२॥
पतिमुख दिसतां उदासवाणें
सर्वहि मग जाणिलें तियेनें
हंबरडा फोडून भूतळीं
नवप्रसूता ती कोसळली ॥१०३॥
बांध फुटे वसुदेव - हृदाचा
पूर आवरेना अश्रूंचा
परी प्रसंगीं वज्राहुनही
सज्जन होती कठोर हृदयीं ॥१०४॥
जड पद टाकी पुढें मूर्च्छिता भार्या ओलांडुन ती
कंसासन्मुख नीट येउनी बालक ठेवी पुढतीं ॥१०५॥
शून्यरवें वसुदेव बोलला
“ बालक हा नव जात आणिला
याचें वाटेल तें करावें,
शब्द पाळिला निज, वसुदेवें ” ॥१०६॥
बालक तें पाहतां निरागस
हात चिमुकले मुद्रा लोभस
मूठ आपुली चोखित पडलें
कंस - मनीं वात्सल्य उपजलें ॥१०७॥
वसुदेवासी देई उत्तर
“ मी न समजतां तितुका निष्ठुर
हा न्या इतरहि सुखें वाढवा
आणुन द्या मज परी आठवा ” ॥१०८॥
चुंबुन कंसें मृदुल कपोला
बालक दिधला वसुदेवाला
परि हा खलहृदयांतिल गंहिवर
जल टिकतें कां तत्प शिलेवर ? ॥१०९॥
कंस विचारा करी मानसीं
“ सोडुन देणें उचित न यासी
गांठ असे ही शठ देवांतें
उलटे सुलटे मोजितील ते ” ॥११०॥
वेगें धाडुन निज दूतासी
ओढित आणी वसुदेवासी
आपटिले तें मूल शिलेवर
कोमल काया केली चूर ॥१११॥
शोकाकुल वसुदेव कसा तरि झाला परतुन येता
कंस करांतुन सुटेल सुत हा विश्वासचि त्या नव्हता ॥११२॥
अशींच कांहीं वर्षे गेली
सहा मुलें वसुदेवा झालीं
परि उपजत तद्विनाश होय
व्यसनी पुरुषाचे जणुं निश्चय ॥११३॥
दुःखाचे हे कठोर घाले
उभयांनीं त्या कसे साहिले
ठाउक सगळें त्यांचें त्यांना
काय कल्पना सामान्यांना ॥११४॥
इकडे शेषा म्हणे रमावर
घेणें अतां मज अवतार
तूं तर माझा बंधू सखया
येशिल ना मम साह्य कराया ॥११५॥
शेष करी यावरी उत्तरा
“ पुरे तुझी संगती श्रीधरा
गेल्या वेळीं तुजसह आलों
कनिष्ठ म्हणुनी सदा कष्टलों ॥११६॥
एक अटीवर येतों बंधू वडिल तुझा मी व्हावें
आज्ञेनें मम वागावें तूं, ” केलें स्मित तइं देवें ॥११७॥
मान्य तुझें हें म्हणणें मजसी
जा ये देवकिच्या उदरासी
उपजतांच कीं मरण तिथें ” तर
शेष म्हणें, “ माझें रक्षण कर ” ॥११८॥
कंसापुन त्या लपवायातें
सातव्याच महिन्यांत तयातें
देवकिच्या गर्भांतुन नेलें
उदरीं रोहिणिच्या स्थापियलें ॥११९॥
हीही वसुदेवाची पत्नी
आश्रयार्थ नंदाच्या सदनीं
झालें गर्भाचें आकर्षण
म्हणुन सुता म्हणती संकर्षण ॥१२०॥
कंस म्हणे, “ मम दर्प किती हा जिरती गर्भ भयानें
अतां मात्र राहिलें पाहिजे अतिशय सावधतेनें ” ॥१२१॥
अडसर घालुन कारागारा
वर बसवी जागता पहारा
करीत होतां सुचेल तें तें
परी स्वस्थता नये मनातें ॥१२२॥
सुचें किमपि ना तसें मधुरही रुचे भोजन
उरांत धडकी भरे हृदय पावतें स्पंदन
उगीच बहु ओरडा करून सेवकां कांपवी
न झोप लव ये तया सतत आठवा आठवी ॥१२३॥
‘ वसुदेव - बंधन ’ नांवाचा दुसरा सर्व समाप्त
लेखनकाल :-
वैशाख, शके १८६७