सूर्योदय झाला आणि सुवर्णकिरणांनी सह्याद्रीची शिखरें चमकू लागली. गडावर मात्र आज धावपळ रात्रीपासूनच सुरु होती. सेनापतीनी फक्त आवश्यक तेव्हादीच झोप घेतली होती. कोंढाणा सर करण्यासाठी कूच करायला फक्त १० तास बाकी होते. इतर गावांतून आणि महाराजांच्या हितचिंतकांनी पाठवलेले सैनिक गडाबाहेर जमत होते. न्याहारीची व्यवस्था करण्यासाठी सेवक आणि सेविका परिश्रम करत होत्या. शेतकर्यांनी बैलगाड्या आणि धन्य पाठविले होते ते खजिनदार ताब्यात घेत होते.

अजून पर्यंत सुमारे १००० सैनिक, ३०० घोडेस्वार आणि सुमारे २०० इतर सेवक कूच करण्यासाठी उपलब्ध झाले होते. किमान १००० आणखीन लढवय्ये जमायचे होते. लोहार आणि सुतार रात्र भर शस्त्रे आणि इतर सामुग्रीवर काम करत होते. १६ धारण अन्न उपलब्ध होते. कमी होती तर किल्ल्याच्या भिंतीना पाडू शकेल अश्या ओंडक्यांची. रात्रभर उशिरापर्यंत जागून सेनापतींनी इतर सर्व दल प्रमुखाना आपापली कामगिरी स्पष्ट केली होती. सर्व सैन्य सुरक्षित आणि जलद गतीने कोंढाणा किल्याखाली पोचावे हे सर्वांत जास्त महत्वाचे होते. वाट दुर्गम नव्हती पण बर्याच ठिकाणी दरी खोऱ्यांतून जावे लागणार होते शत्रूच्या घोडदलाने वाटेत पकडले तर मुश्किल होती. सुमारे दीड दिवसाचा प्रवास होता.

सकाळी ७ वाजता महाराज सेनापतींच्या कार्यालयांत उपस्थित झाले. आज महाराजांनी आपल्या योगाभ्यास सुर्योदयापुर्वीच केला होता आणि तसेच ते सेनापतीना भेटण्या साठी आले होते. बरोबर खंडोजी होते. सेनापती मल्हारना ३० वर्षांचा अनुभव होता पण खंडोजी सारखा माणूस त्यांनी बघितला नव्हता. दिसायला खंडोजी कुरूप होते, पाठीवर कुबड कधीही चांगली वस्त्रे परिधान केलेले किंवा पायांत पादत्राणे घालून फिरताना सेनापतींनी त्यांना पहिले नव्हते. उलट स्मशानातील वेताळा प्रमाणे ते सतत भटकत असत आणि वेळी अवेळी कुठेही उपस्थित होत असत. सेवक लोकांत कुजबुज होती कि खान्डोजीना कर्णपिशाच्च वश आहे. आज खंडोजी महराजां बरोबर कार्यालयांत आले आहेत तर काही तरी बातमी घेवून आले असतील अशी सेनापतींची अपेक्षा होती पण, महाराज किंवा खान्डोजीनी काहीही नवीन माहिती दिली नाही.

"सेनापती तयारी कशी आहे? " महाराजांनी विचारले.

"३००० पैकी एकूण १८०० सैनीक सध्या उपस्थित झाले आहेत, अंबेखुर्द मध्ये ४०० सैनिक आणखीन भेटतील. बाजी आणि कनोजी १००० सैनिक घेवून संध्याकाळी वेल्हे गावांत भेटतील. शस्त्रे, दाणापाणी, घोड्यांचा चारा इत्यादीची जबाबदारी कासीम व्यवस्थित पार पडत आहे." सेनापती बोलत होते.

समोर मेज वर रयतेचा नकाशा ठेवला होता आणि सेनापतींनी विविध ठोकळे ठेवले होते. लाल रंगाचे ठोकळे किल्ले दर्शवत होते तर भगव्या रंगाचे ठोकळे महाराजांची सेना. महाराज मेज्ला निरखून बघत होते.

"वाटेवर काही दगा झाला तर की व्यवस्था आहे ? " महाराजांनी विचारले.

"एकूण सहा तुकड्या ४ वेगळ्या वाटेनी कोंढाण्या कडे कूच करतील. सर्व घोडेस्वार सहा गटांत विभागून दिलेले आहेत आणि दर प्रहराला ते अपली तुकडी बदलतील. कुठल्याही तुकडी वर हल्ला झाला तर हे स्वार इतर तुकडी कडून मदत मागवू शकतील. मध्यल्या तुकडी मध्ये आपण असाल आणि सर्व दाणापाणी आपल्या तुकडीबरोबर प्रवास करील. वाटेंत गस्त घालण्यासाठी मी आधीच स्वार पाठविले आहेत. " सेनापतींनी माहिती दिली.

"युसुफ पोष ला आमच्या सैन्याची माहिती मिळताच तो सुद्धा आमच्या मागावर येईल. त्याच्या घोडदळाळा  सामोरे जाण्याची आमची तयारी असायला हवी. महाराजांनी सांगितले.

"बिजापूर इथून ५०० मैल दूर आहे, त्याचे सैन्य बाहेर निघाले तरी त्याला इथे पोचायला किमान ६ दिवस लागतील. आमच्या कडे ३ दिवस कोंढाणा काबीज करायला आहेत. आमच्या सैन्यात फक्त ६०० सैनिकांनाच उघड मैदानात अश्वरोही सैन्याचा सामना करण्याचे ज्ञान आहे. पण त्याचा सुद्धा उपयोग करण्याची वेळ येयील अशी आशा नाही." सेनापतीना हि गोष्ट सालत होतीच. अश्वोरही सैनिक जास्त वेगांत जावू शकतात आणि जर पायदळाला योग्य ते प्रशिक्षण नसेल तर त्यांचा धुव्वा उडतो. मल्हार सेनापतींनी अशी अनेक युद्धें बघितली होती.

"कुठलाही धोका पत्करायची माझी तयारी नाही सेनापती आणि वेळ सुद्धा नाही. तुमच्या अनुभवावर विश्वास आहे पण आपण युसुफ ला कमी लेखण्याची गलती करू नका" महाराजांनी खन्डोजीकडे पहिले पण खंडोजीच्या चेहेर्यावर काहीही भाव नव्हते. सेनापतीना काय बोलावे हे सुचत नव्हते पण महाराजाना उत्तर अपेक्षित सुद्धा नव्हते.

"खूप काम असेल तुम्हाला आम्ही सध्या तुमची राजा घेतो दुपारी जेवण झाल्यानंतर भेटू" असे म्हणून महाराज ज्या वेगाने आले होते त्याच वेगाने निघाले.

सेनापती टाळी वाजवून रक्षकाला बोलावले. रक्षकाने आंत प्रवेश केला.

"सोमनाथ ला शोध आणि त्याला मी बोलावले आहे असे सांग." रक्षक पळत सोमनाथला शोधण्यासाठी गेला.

सेनापतींनी पत्रे लिहायला घेतली, वाटचाल करत असताना पत्रे लिहायची वेळ भेटतेच असे नाही त्यामुळे मदत मागण्यासाठी, दाणापाणी विकत घेण्यासाठी इत्यादी कुठल्याही परिस्थितीला गरज पडेल अशी पत्रें आधीच लिहून ठेवायची सेनापतीना सवय होती. योग्य वेळी फक्त मुद्रा उठवून ती ते पाठवून देत असत.

त्याशिवाय अनेक सैनिकांच्या तुकड्या त्यांनी विविध मोहिमेवर पाठवल्या होत्या त्या सर्वाना परत बोलावणे सुद्धा पाठवणे महत्वाचे होते. त्याने ते काम रात्र भर लागून केले होते पण अजून सुद्धा आणखीन ८ आज्ञा पत्रे पाठविणे बाकी होते. औषधे आणि वैद्य अजून सुद्धा मनाप्रमाणे भेटले नव्हते. युद्धांत जखमी लोकांना मलम पट्टी करणे काही वैद्यांनाच जमते आणि असा फक्त एक वैद्य सध्या महाराजांच्या सेवेत होता.

सोमनाथ काही वेळाने आंत आला आणि त्याने झुकून सेनापतीना प्रणाम केला. रात्रभर तो कदाचित घोड्यावरून फिरत असावा असे वाटत होते. त्याचे कपडे धुळीने माखले होते. "काम झाले ? " सेनापतींनी विचारले.

"होय, एकूण ९० लोकांना शोधून ताब्यात घेतले आहे." सोमनाथने उत्तर दिले.

तोरणा गडाच्या आजू बाजूच्या परिसरातील सर्व संशयास्पद लोकांना आणि चोरांना अटक करण्याची आज्ञा सेनापतींनी दिली होती. कारण एकदा का फौज किल्ल्या बेहर पडली कि फक्त २०० सैनिक गडावर राहिले असते आणि अश्या परिस्थितींत हे चोर अंत येवून दगा फटका करू शकतात असा मल्हार सेनापतींचा अनुभव होता. उलट किल्ल्यावर हल्ला झाला तर हे अटक केलेले लोक ऐन वेळी सैनिक म्हणून सुद्धा वापरले जावू शकतात. दुर्ग प्रमुखाला सेनापतींनी तशी सूचना दिली होती.

"शाब्बास. आता आणखीन एक महत्वाचे काम तुला करायचे आहे. कासीमला सांगून किमान ५० लोकांना खोदकाम करण्यसाठी लागतील अशी सामुग्री बरोबर घे. वाटेवर युसुफने हल्ला केला तर तयार राहावे असा महाराजांचा आदेश आहे. तुला मी प्रशिक्षण दिले आहे. संध्याकाळ होई पर्यंत ५० सेवकांना चर खोदण्याचे प्रशिक्षण दे. हल्ला झालाच तर आम्ही चौरस रचनेतून त्यांचा सामना करू. पुढील सूचना मी नंतर दल प्रमुखांच्या सभेत देईन. " सेनापतींनी भरभर आदेश दिले.

सोमनाथने मान हलवून होकार दिला. रात्र भर फिरून तो थकला होता पण हे काम करणे आवश्यक होते.

….

सूर्यास्त होण्यास आणखीन तासाभराचा अवकाश होता. महाराज चिलखत घालून आपल्या कक्षातून बाहेर आले. उत्तर बुरुजावरून तुतारी वाजली. सर्व सेवक आपली कामे टाकून मैदानांत आले. दुर्गप्रमुखाने हांक दिली आणि सेवकांनी किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघडला.

महाराज पायऱ्या उतरत खाली आले. कमरेला तलवार आणि कट्यार होती. हातांत चामड्याचे मोजे होते बाजूला सेनापती मल्हार आणि राजपुरोहित भट्ट होते. नेहमीपेक्षा महाराज जास्तच तेजस्वी दिसत होते. आज गळ्यांत मोत्यांची मला वगैरे नव्हती पण काळ्या रंगाचे विशेष कवच महाराजांनी परिधान केले होते. छातीवर वर्तुळाकार धातूची तबकडी आणि त्यावर जरीपटका आणि सिंहाचे चिन्ह होते खाली लिहिले होते "स्वयं एव मृगेन्द्रता". मैदानात मध्यवर्ती पोचतांच महाराज थांबले आजूबाजूला सर्व सैनिक, सेवक सेविका इत्यादी स्तब्ध होवून बघत होत्या. आई साहेब आपल्या सेविकां सह महाराजांच्या बाजूला येवून उभ्या राहिल्या. भट्टानि इशारा करताच एक शिष्य थाळी घेवून पुढे आला, आईसाहेबांनी महाराजांच्या भव्य कपाळावर रक्तचंदनाचा तिलक लावला आणि महाराजांनी नमस्कार करतांच "विजयी भव" असा आशीर्वाद दिला.

महाराजांनी दुर्गप्रमुख नारोजीला बोलावले हाती एक पत्र ठेवले. "मी परत न आल्यास आई साहेबांच्या हातांत हिंदवी स्वराज्य असेल आणि मी परत येई पर्यंत संपूर्ण किल्ला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जीवाचे मोल देवून पार पडावी" महाराजांनी नारोजीला सांगितले. कुठल्याही युद्धाच्या आधी मृत्युपत्र लिहावे असा महाराजांचा सर्वांनाच आदेश होता. मोठी मोठी घराणी वारसदाराच्या भांडणासाठी नष्ट होतात. आपल्या सापेक्षामध्ये असल्या फुटकळ गोष्टींचा व्यत्यय यायला नको म्हणून महाराजांनी असा नियम काडला होता.

अश्वप्रमुख गोमुख महाराजांची काळीभोर घोडी संध्या घेवून आला. महाराज घोड्यावर चढले. इतर मंडळी, सेनापती सुद्धा बाजूला असलेल्या आपापल्या घोड्यांवर चढले आणि महाराजांची स्वारी कोंढाण्या कडे कूच करती झाली. काल पासून तुफाना प्रमाणे वाटणारा किल्ला अचानक स्मशानाप्रमाणे शांत झाला, काही मोजकेच सेवक आणि सैनिक मागे राहिले. आई साहेब पूर्व बुरुजावरून महाराजांच्या सैन्याकडे बघत राहिल्या.

एका बाजूला सूर्य अस्तास जात होता आणि दुसर्या बाजूला कदाचित एक नवीन सूर्य उदय होत होता. कोंढाणा जिंकला तर मराठ्यांची सत्ता मजबूत होणार होती, इतर हिंदू किल्लेदार आदिलशाहला सोडून हिंदवी स्वराज्याला मिळण्याची शक्यता होती. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे महाराज ज्यांना इतर लोक माथेफिरू हिंदू युवक समजतात त्यांच्या डोळ्यांत हा विजय झणझणीत अंजन घालणार होता. आईसाहेबांनी फारच मोठा धोका पत्करला होता. महाराजांनी युद्ध करू नये असेच त्याचे मत होते. सेनापती मल्हारशी त्यांनी वार्तालाप केला होता, ३ दिवसांत कोंढाणा सर करणे फारच मुश्किल होते आणि युसुफ पोष ने जर मदत पाठवली तर जिंकणे अशक्य होते. अग्निशिखा हि आई साहेबांची चाल होती पण ती कितपर्यंत चालेल हे सांगणे मुश्किल होते.

सर्वांत महत्वाचे म्हणजे असल्या कार्याला महाराजांनी मान्यता दिली नसती. न्यायप्रियता, स्त्रीदाक्षिण्य आणि धर्माचरण हि कुठल्याही राजाचे खरे शस्त्र असते हि त्यांचीच शिकवण होती पण कपट, राजकारण हे सुद्धा यशस्वी राजाचे चिलखत असते हे अजून महाराजांना मान्य नव्हते. आईसाहेबांचा आदर्श म्हणजे श्रीकृष्ण होता पण महाराजांचा आदर्श होता मर्यादापुरुषोत्तम राम. पण सत्य परिस्थिती महाकाव्या प्रमाणे नसते आणि तो तर अजून लहान आहे. कितीच प्रखर बुद्धिमत्ता दाखवली तरी शेवटी ओझे त्याच्या खांद्याच्या मानाने फारच जड आहे अश्या भावनेने मातृहृदयाने हा कुटील डाव मांडला होता.

पेटत्या मशाली नजरेआड झाल्या नंतर आईसाहेब परत फिरून आपल्या शयन कक्षांत गेल्या.
…..
रात्र भर महाराजांचे सैन्य वाटचाल करत होते. सोमनाथ आणि कासीम आपल्या घोड्यां वरून वाटचाल करत होते. सेनापती मल्हारनी सोमनाथवर सेवक मंडळींची सुरक्षा सोपवली होती, बैलगाड्यातून लोहार, सुतार, बल्लव इत्यादी मंडळी वाट चाल करत होती. सोमनाथच्या चर्येवर गांभीर्य होते. चिंतेत असताना सोमनाथला आपले तळवे खाजवायची सवय होती. "झोप येत आहे का ?" कासीम ने तणाव हलका करण्यासाठी त्याला प्रश्न केला. कदाचित सोमनाथला आपली हि जबाबदारी शुल्लक वाटत असावी असे मनात कासीमला वाटत होते. सोमनाथ ला लहान पणापासूनच सरदार व्हायचे होते हे कासीम ला ठावूक होते.

"झोप नाही पण चिंता आहे." सोमनाथने सांगितले . "कदाचित सेनापतींनी हि माहिती सर्वांना दिली नसेल पण अपेक्षा आहे कि कोंढाणा सर होण्याआधी युसुफ चे घोडदळ आम्हाला भिडेल. तसे घडले तर सारेच फासे उलटे पडतील. कोंढाणा चा वेढा ३ दिवसांत संपला पाहिजे म्हणजे आम्हाला किल्यांत आश्रय घ्यायला मिळेल."

"आणि ३ दिवसांत किल्ला सर होवू शकत नाही असे तुला वाटते ? " कासीम ने विचारले.

"फार मुश्किल आहे. चढाई कश्या प्रकारची असेल ह्याची माहिती अजून सेनापतींनी दिली नाही. " सोमनाथ सांगत होता आणि आपल्या डाव्या अंगठ्याने  आपला उजवा टाळत खाजवत होता. कासीम ने आणखीन प्रश्न केले नाही.

रात्रीचा प्रवास काहीही विघ्न न येता पार पडला.  सकाळी प्रातःविधी  आटपून सर्व सैनिक तुकड्या योजने प्रमाणे वाटचाल करत्या झाल्या. झोप नसल्याने सैनिक आणि घोडे थकले होते पण पुढचा पडाव नेरी नदी किनारी होता. दुपारचे भोजन सुद्धा सोमनाथने घाई घाईनेच केले. संध्याकाळी ७ वाजता सोमनाथ आणि त्याची तुकडी नदीकिनारी पोचली दूरवरून महाराजांचे आणि इतर सैन्याचे तंबू दिसत होते. सोमनाथच्या तुकडीत सेवक असल्याने त्याची वाटचाल सर्वांत कमी वेगाने होत होती. कोंढाणा इथून फक्त ६ तासांच्या वाटचालीवर होता. पण त्यासाठी घोडे आणि सैनिकांनी विश्रांती घेणे आवश्यक होते. नेरी नदीचा किनारा पडाव टाकण्यासाठी त्यादृष्टीने मोक्याचा जागा होता.

दूरवरून एक दूत घोड्यावरून येताना सोमनाथला दिसला. "महाराज आणि इतर सरदार सेनापतींच्या तंबूत आपलीच वाट पाहत आहेत" दूताने संदेश दिला. महाराज सोमनाथ ची वाट पाहताहेत ? सोमनाथने मनात विचार केला. युद्धांत त्याचा वाट फारच कमी असणार होता त्यामुळे कुणीही त्याची जास्त वाट बघणे शक्यच नव्हते.

सर्व सरदार महाराजांच्या तंबूत हजार होते. जिवबा, शंभू प्रताप, म्हात्रे, आणि इतर दोन सरदार उपस्थितीत होते. सोमनाथ चा अंदाज बरोबर होता. सेनापतींच्या तंबूत आधीच खलबते सुरु झाली होती आणि कुणीही सोमनाथ ची वाट  बघत नव्हते.

सेनापती मल्हारनी आपली योजना स्पष्ट केली. हेर प्रमुख खन्डोजीचे काही हेर आधीच किल्ल्यांत पोचले होते. रात्रीच त्यांनी किल्ल्याच्या दारूगोल्याला आग लावली होती आणि बर्यापैकी दारुगोळा बरबाद केला होता त्याशिवाय अश्वशाळेतील पाण्यात गुंगेची औषधी टाकून अश्वांना युद्धासाठी किमान एक दिवसां साठी निकामी केले होते.

किल्ला भेदण्याचे दोन मुख्य प्रकार असतात, एक आधी एक छोटी तुकडी गुप्त रूपाने किल्यावर जावून हाहाकर माजवून इतर सैन्याला आंत येण्यास मदत करते तर दुसर्या प्रकारांत प्रचंड मोठे लष्कर किल्ल्याचे दरवाजे तोडून जबरदस्तीने प्रवेश करते. कोंढाणा दोन्ही प्रकाराने जिंकणे अवघड होते. सेनापतींची योजना होती की आधी किल्याला वेढा टाकून सर्व रसद तोडून टाकायची. सहा पैकी ४ तुकड्या ह्या साठी चारी बाजूनी तैनात होणार होत्या. महाराजांची पंचवी तुकडी सर्वांत मोठी होती ती प्रमुख दरवाजा तोडून आंत घुसणार होती.

सोमनाथची तुकडी ज्यांत मुख्यत्वे सेवक होते त्यांचे काम आजू बाजूचे वृक्ष तोडून दरवाजे आणि किल्ल्याच्या भिंतीना भगदाड पाडण्यासाठी ओंडके तयार करणे होते. एकूण ४० तिरंदाज किल्यावरुन वेध घेणाऱ्या सैनिकांना लक्ष्य करणार होते. सेनापती मल्हार नी ताळी वाजविली आणि तंबू बाहेरून एक व्यक्ती आंत आली. त्या व्यक्तीच्या प्रवेशाने तंबूतील सारे सरदार थोडे अस्वस्थ झाले आहेत हे सोमनाथच्या लक्षांत आल्या वाचून रहिले नाही.

हि व्यक्ती फारच वृद्ध वाटत होती. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होताच पण डोळ्यांत काजळ भरलेले असल्याने एकाद्या भयानक मुखवट्या प्रमाणे त्याचा चेहरा वाटत होता. तपकिरी रंगाचा एक ओघळ झोगा त्याने परिधान केला होता. वयाच्या मानाने शरीर चपळ वाटत होते. त्या व्यक्तीने आपल्या झग्याच्या खिशांत हात घातला आणि एक छोटीशी कुपी बाहेर काढली.

"सैनिकहो, हे आमचे नवीन शस्त्र आहे. ह्या कुपीत एक विशेष रसायन आहे जे लाकडावर टाकून आग लावली असता एक विशेष प्रकारचा धूर निघतो. ह्या धुराचा कला थर धुराच्या संपर्कांत येणार्या प्रत्येक वस्तूवर बसतो, तसेच हा थर पूर्ण पाने ज्वालाग्राही असतो. संपूर्ण कोंढाणा किल्याच्या चारी दिशांना आम्ही आग लावणार आहोत. ह्या मुळे किल्यावरुन कुणालाही आमच्यावर वेध घेत येणे शक्य होणार नाही. " सेनापती मल्हार बोलत होते आणि त्याच वेळी ह्या वृद्ध व्यक्तीने एका लाकडी पट्टीला रसायनात बुडवून आग लावली होती. आगीतून येणारा धूर साधारण वाटत होता. पण तो धूर त्या म्हातार्याच्या हातातील एका ताम्रपटला स्पर्श करून काळा भोर करत होता.

काही वेळाने म्हातार्याने एक मेणबत्ती त्या धुराजवळ नेली मात्र आणि संपूर्ण ताम्रपटावर आग भडकून उठली काही सरदार काही पावले मागे सुद्धा गेले. आगीचे लोक चितेवरून भादाकावे त्याप्रमाणे किमान काही क्षण ताम्रापटातून आग येत होती पण तो पट पकडलेल्या म्हातार्याच्या हाताला मात्र कदाचित काहीही वेदना झाल्या नसाव्यात कारण होत अजिबात हलला नव्हता. आपले प्रात्यक्षिक झाल्यानंतर ज्या प्रमाणे तो माणूस आंत आला होता त्याच गंभीर चर्येने बाहेर गेला.

मल्हारनी सर्व सरदारांच्या चेहेर्यां कडे निरखून पहिले. महाराज सेनापतींच्या बाजूला निर्विकार चेहऱ्याने उभे होते.
"हे काय चेटूक आहे ? " शंभूप्रतापनी विचारले.

"ह्यांत काहीही चेटूक नाही, हे एक फार जुने शास्त्र आहे, काळाच्या ओघांत गडप झाले होते. सध्या फक्त १ सहस्त्र तोळेच ह्या रसायनाचे उपलब्ध आहेत आणि ते सर्व आम्ही ह्या युद्धांत वापरणार आहोत." सेनापतींनी माहिती दिली.

"सोमनाथ “ सेनापतींनी सोमनाथ कडे बघितले. "किल्ल्याच्या मुख्य द्वारावर आग लावायचे काम तुला पार पडायचे आहे. आमची सैन्य पाहिजे ते संरक्षण तुझ्या सेवकांना देयील पण फक्त १ सहस्त्र तोळेच रसायन उपलब्ध असल्याने इथे काहीही चुकीस अजिबात थारा नाही.” "मी दिलेली कामगिरी पार पाडेन सेनापती जी " सोमनाथ ने वाकून हुकुम स्वीकार केला. 

"त्या शिवाय आग लावून झाल्यावर तत्काळ माघार घेवून मी काल सांगितलेली योजना पार पाडायची आहे. त्यासाठी जे सेवक आहेत ते जिवंत राहणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आखणी कर. " सेनापतींनी पुन्हा आठवण करून दिली.

सेनापतींनी सोमनाथवर आणखीन काहीतरी जबाबदारी दिली आहे हे इतर सरदाराना लक्षांत येवून त्यांनी सर्वांनी आपल्या नजर सोमनाथ कडे वळवल्या. शंभू प्रतापांनी आपले डोळे बारीक करून आपल्या दाढीवरून हाथ फिरविला. सर्वांच्या नजरा आपल्याकडे आहेत हे पाहून सोमनाथ जरा चिंतीत झाला पण त्याने आपल्या चेहेर्यावर काहीही भाव येवू दिले नाही.


सेनापती पुढे काही बोलणार इतक्यांत महाराजांचा अंगरक्षक आत दाखील झाला त्याच्या चेहेर्यावरून काही तरी महत्वाचे सांगायचे आहे हे स्पष्ट होते. "काय बात आहे दाजी ? सर्व कुशल आहे ना ? " महाराजांनी प्रश्न केला.

"महाराज, अचानक पणे प्रवेश केल्याबद्दल क्षमा असावी, पण कोंढाणा किल्यावरुन एक दूत आलाय. आपली तत्काळ भेट घेवू इच्छित आहे." दाजीचे शब्द ऐकून तंबूतील प्रत्येक व्यक्ती आश्चर्य चकित झाल्यावाचून राहिला नाही. सेनापतींनी महाराजां कडे पाहिले. सेनापतींनी आपल्या सेवकांना इशारा केला आणि त्यांनी तत्काळ समोरील मेजावर एक पंधरा कपडा पसरला.

महाराजांच्या आज्ञेवरून दूत आंत आला. अंग काठीने फारच कृश वाटत होता. सैनिक नसावा पण पट्टीचा अश्वरोही असावा हे त्याच्या पेहेरावावरून वाटत होते.

दूताने वाकून महाराजांना प्रणाम केला. "कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार सिद्धी अंबर जे आदिलशाहीच्या नावाने किल्याचे सरंक्षण करत आहेत त्यांच्या तर्फे मी इथे आलो आहे. किल्लेदारांनी आपल्या साठी संदेश पाठविला आहे कि कोंढाणा किल्ला आपल्या हाती देण्यास ते तयार आहेत, बदल्यांत किल्यातील सर्व व्यक्तींना अभय द्यावे आणि आदिलशाहीचे जे राजदूत सध्या किल्ल्यांत उपस्थित आहेत त्यांना सही सलामत बिजापुरास पाठवायला परवानगी मिळावी अशी माफक मागणी त्यांनी केली आहे"

दूताचे कथन ऐकून सर्व सरदार एकमेकांत कुजबुजू लागले. सेनापतींनी प्रश्न केला "सिद्धी अंबर? आमच्या माहिती प्रमाणे चान्द्रोबा कासकर सध्या किल्ल्याचा किल्लेदार आहे."

दूत थोडासा विचलित झाला पण आपल्याला सावरून त्याने पुढे महिती दिली "चंद्रोबा कासकर ह्यांचे काल निधन झाले, ते कड्यावरून खाली पडले, त्यांच्या हुकुमा प्रमाणे त्यांचे उपकिल्लेदार सिद्धी कासकर हे सध्या किल्लेदार बनले आहेत".

"आणि किल्ला असा सहजी आमच्या हाती देण्यास हा सिद्धी अंबर एवढ्या लवकर राजी झाला? "  महाराजांनी विचारले.

दूताने पुन्हा हात जोडून "होय महाराज" एवढेच शब्द तोंडातून बाहेर काढले. "आणखी काही ? " सेनापतींनी दूतास विचारले.

"आपल्याला मान्य असेल तर किल्लेदार शरणागतीची पत्रे घेवून आपल्याला उद्या सकाळीच किल्ला बाहेर भेटतील. " दूताने माहिती दिली.

"दुताला सध्या सरंक्षण देवून एक तंबूत ठेवा. उद्या सकाळी आम्ही पुन्हा त्याच्याशी बोलू. " सेनापतींनी आदेश दिला आणि दोन सैनिक दुताला घेवून बाहेर गेले. दूतांना अटक करणे हा प्रघात नव्हता त्यामुळे बेड्या वगैरे न ठोकता त्यांना अश्या प्रकारे नजरेखाली ठेवण्याचा प्रघात होता.

"हे आश्चर्य जनक आहे, ह्यात काही दगा फटका असण्याचाच संभाव जास्त आहे " सरदार जिवबा बोलले.

"किल्ले दाराला जर लोभ असता तर अश्या प्रकारे दूत त्याने पाठविला नसता" शंभू प्रताप् नी पुन्हा आपली दाढी कुरवाळत प्रतिपादन केले.

"बरोबर आहे, योजनेत काहीही बदल करण्याची आवश्यकता नाही. उद्या जर खरोखरच उघड मैदानात सिद्धी  अंबर शरणपत्र घेवून आला तरच आम्ही आत जावू. पण कुठे तरी पाणी मुरते आहे ह्यांत शंका नाही" सेनापतींनी महाराजांना सांगितले.

"ठीक आहे सेनापती मल्हार, काही अधिक माहिती असली तर ती खंडोजीच्या हेरानच असेल आणि अजून पर्यंत तरी त्यांचा पत्ता नाही" महाराजांनी सांगितले.

सर्व सरदार आपापल्या तंबूकडे निघाले.

सोमनाथ सुद्धा अर्धवट झोपेतच आपल्या तुकडी कडे गेला. अश्या प्रकारे किल्ला जिंकू हे त्याला मुश्किल वाटत होते. एका बाजूला उगांच लढायची चिंता गेली आणि कोंढाणा हाती आला हि ख़ुशी होतीच पण त्याच वेळी आपल्याला काही पराक्रम दाखवायची संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही म्हणून वाईटही वाटले.

"कोन्धाण्यावरून दूत आला होता म्हणे ? " कासीम ने आपल्या मित्राला पाहतांच विचारले. "होय, पण काही विशेष माहिती नाही," सोमनाथने सांगितले. "पण उद्या सकाळी वृक्ष तोडून त्यांना आग लावणे आणि नंतर चार खोदणे हि दोन महत्वाची कामे आहेत, त्यासाठी अवजारे तयार ठेव. धूर जास्त येईलअश्या प्रकारची झाडे तोडायची आहेत."

कासिमला आपल्या मित्राच्या शब्दांत नेहमीची आपुलकी जाणवली नाही पण एक सरदाराचा हुकुम ऐकू आला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel