भवानी तलवारीचे रहस्य भाग ६ 

दरबार ए खास मध्ये आदिलशाह आपल्या स्थानावर बसले दरबाराचे काम काज सुरु झाले. सर्वांच्या नजरा युसुफवर होत्या. आदिलशाह आपल्या तर्जनीतील अंगठी फिरवत होते. चिस्ती फकीर शहाच्या उजव्या हाताला उभा होता. शहाने शांतता भंग करत युसुफ ला प्रश्न केला, "एवढे मोठे सैन्य असून काय फायदा ? त्याने एक माणूस न गमावता कोंढाणा काबीज केला. आता तो मुघलांशी हात मिळवील."

"तो कावेबाज आहे हे आम्हाला ठावूक आहे हुजूर पण आमचे सैन्य अजून दूर आहे. ५० हजारांची फौज घेवून मी स्वतः पश्चिमेस निघत आहे, ह्यावेळी मराठ्यांचे पूर्ण कंबरडे मोडून टाकेन आणि त्या पोरट्या महाराजाचे छाटलेले शीर सर्व मुलुखांत फिरवून आणेन. बाख्तीयारची सेना कोन्धाण्याला वेढा टाकून आहे, त्या किल्यांतून कुणालाही बाहेर पडणे मुश्किल आहे. अहमद खानाला मी राजगडची मोहीम अर्धवट टाकून बख्तियारला जावून मिळण्यास सांगितले आहे, ५००० घोडेस्वार कोंढाणा परिसरांत परिसरांत तो पर्यंत राहतील जो पर्यंत मी स्वतः ५० हजारांचे सैन्य घेवून तिथे पोचेन. माझा भावू अब्दुल ५००० सैनिक घेवून कोंढाण्या कडे गेलाय, तो किल्ला मिळविण्यासाठी तेव्हडे सैन्य पुरेसे आहे. " युसुफने आपली योजना स्पष्ट केली.

"हुजूर माफ करा पण शाही खजिन्यात एवढी मोठी मोहीम हाती घेण्या इतका पैसा नाही आहे. किमान दोन महिने तरी हे सैन्य बिजापुर् पासून दूर राहील, दाणा पाणी आजूबाजूच्या गावांतून विकत घ्यावे लागेल धारण किमान ३ रुपयावर असेल. किमान दीड लक्ष ते ३ लक्ष रुपये फक्त रसद मिळविण्य साठी लागतील. सध्या शाही खजिना फक्त ५ लक्ष रुपये देवू शकतो त्यांत सैन्याची पगार, हत्यारे आणि रसद सर्व भागवणे अशक्य आहे. " शाही खजिनदार सादिक भीत भीत बोलले.

"खजीन दार तुम्ही आहात. पैसा उभा करणे तुमचे काम आहे. युसुफ ? मोहीम फत्ते करण्यासाठी किती रुपयांची गरज आहे ? " शहाने विचारले  "१२ लक्ष. " युसुफने सादिक चा चेहेरा न्याहाळत उत्तर दिले.

सादिक चा चेहेरा पडला होता. "हुजूर १२ लक्ष रुपये पाहिजे असतील तर फिरंगी व्यापाऱ्या कढून उधार घेणे हाच एक उपाय सध्या नजरेत आहे. "

"जे करावे लागेल ते सर्व करा पण युसुफ कडून काहीही तक्रार येत कामा नये" शहाने आदेश दिला.

युद्धास तोंड फुटले होते आणि आदिलशाहीची संपूर्ण टाकत मराठी साम्राज्याला पाळण्यातच नष्ट करण्यासाठी ऐकवटत होती. मराठ्यांनी फक्त दगा नाही केला होता तर किल्लेदाराच्या कुटुंबाला आपल्या निशाण्यावर आणले होते. हि गोष्ट पत्र रूपाने सर्व किल्लेदारानं पाठविण्याचे आदेश युसुफने दिले. मराठे आपल्या फायद्यासाठी निष्पाप मुलांचे अपहरण करत आहेत हि गोष्ट सगळीकडे पोचवावी आणि लोकांच्या मनात हाय नवीन बंडखोरा बद्दल काही आदर असेलच तर तो नष्ट व्हावा आणि इतरांनी सवड व्हावे हा त्याचा उद्धेश होता.

कोंढाणा जर जिंकला असेल तरी ह्या प्रकारे छळ कपट करणे हे विचारी आणि महत्वाकांक्षी राजाचे लक्षण युसुफला वाटले नाही. काफिर लोकांच्या प्रथा आणि परंपरेचा त्याच्या सारख्या मुसलमानाला तिटकारा वाटत असला तरी हे पराक्रमी लोक असल्या थराला जात नाहीत हाच त्याचा अनुभव होता.
….

युसुफने आधीच पत्रें पाठवली होती. कोंढाणा हातचा गेल्याने सर्वच समीकरणे बदलली होती. युद्धांत शत्रूला हरवणे सोपे आहे पण जो शत्रू युद्ध न करता जिंकतो त्यापासून फारच सावधान असले पाहिजे. बिजापुरांत ५० हजारांचे सैन्य दाखील होण्यास किमान सहा दिवस लागणार होते. सर्व दिशांतून बिजापुरास प्रामाणिक असलेले सरदार दाखील होणार होते त्याच वेळी कोण प्रामाणिक आहे आणि कोण नाही ह्याची सुद्धा पारख होणार होती.

घरात शिरलेल्या उंदराला वेळीच मारले नाही तर त्यांची संख्या फोफावते. त्यामुळे आदिलशाहीची सर्व शक्ती पणाला लावून हि बंडखोरी मोडणे युसुफला आवश्यक वाटत होते. शाह ला ते मान्य होते पण शाह चिस्ती फकिराच्या भविष्यवाणी मुळे जास्त चिंतीत आहे असे युसुफला वाटत होते. चिस्ती फाकीराची जादू त्याने स्वतः बघितली होती. लहान पणी युसुफ तलवारबाजी शिकत असताना त्याच्या उस्ताद ने एक धडा दिला होता. "स्त्रीची ताकत तिच्या सौंदर्यात, वीराची टाकत त्याच्या तलवारीत आणि राजाची ताकत त्याच्या बुद्धीत असते. ह्या पैकी कुठलीही गोष्ट कधीही दुसर्या कडून उधार घेता कामा नये. " शहाने आपली बुद्धी फाकीराकडून उधार घेतली आहे आणि ह्याचा परिणाम चांगला होणे शक्यच नाही. पण फकिराचा प्रभाव पाहता युसुफ ने आपला विचार अद्याप कुणालाही सांगितला नव्हता अब्दुल सोडून आणि कोणी त्याला विश्वासू वाटत नव्हता.

१६ सरदारांनी बिजापुरात येण्याची तयारी दाखवली होती, किमान २० सरदारकडून अजून पत्रे यायची होती. पश्चिम बिजापुरातील सर्व लोहार तोफा आणि आयुधे बनवण्याच्या कामात मग्न झाले होते दिवस रात्र काम चालू असणार होते. युसुफला झोप लागणे मुश्किल होते. युसूफच्या कक्षाखाली शस्त्रागार होते त्याच्या बाजूला जंदी लोहाराची कार्यशाळा, तेथे रात्रभर घणाचे घाव गरम धातूवर पडत असत.

बिजापूर शहरांत युसुफचे कोणीच विश्वासू नव्हते. अब्दुल तोरणा किल्ल्याकडे गेला होता. बाकीच्या सरदारांत जहागीर आणि हनुमंतराव हेच कदाचित थोडे जवळचे होते. सध्या शहर भर सारी धावपळ करण्याचे काम त्यांच्यावर युसुफने सोपवले होते. युसुफ ला आपली सर्व बुद्धी आता मोहिमेवर लावायची होती. दरबार ए खास मध्ये शाह स्वतः आणि युसुफ वगळता कुणालाही युद्धाची गरज वाटत नव्हती. सर्वानीच थोडा निराशेचा सूर लावला होता. हि निराशा इतर सरकारी लोकां पर्यंत पोचली तर युद्धाच्या तयारीला अनेक विघ्ने येणार होती. दरबारात शहजदा सिकंदर उपस्थित नव्हता हे युसुफला खटकले होते. एकूणच दरबारातील सर्व मंडळी त्याला आदिलशाही सारख्या प्रचंड साम्राज्याला चालविण्यासाठी नालायक वाटत होती. ह्या लोकांच्या उदासीनते मुळेच कदाचित शहा च्या मनावर चीस्तीचा पगडा बसला असेल अस अविचार युसुफने केला.

"मी आंत येवू का ? " दारावर थाप पडली आणि युसूफची तंद्री भंग झाली. दारावर शहजादा सिकंदर होता. "शहजादे" युसुफ ने उठून सिकंदरला सलाम केला.

"त्याची काही गरज नाही युसुफ" सिकंदर ने आंत येवून संपूर्ण कक्षावर नजर टाकली. "आपण बोलावले असते तर मी स्वतः आलो असतो, शहजादे " युसुफने नम्रता पूर्वक आपल्या पेक्षां किमान १५ वर्षे लहान असलेल्या सिकंदराला सांगितले. सिकंदर २३ वर्षांचा होता, युसुफला त्याच्या विषयी काहीच माहिती नव्हती. खरे तर ह्या वयात बहुतेक युवराज के तर कुणी बाई च्या नदी लागले असतात किंवा घोड्यावर बसून युद्धे खेळत असतात पण सिकंदर दोन्ही प्रकारात विशेष रस दाखवेल असे वाटत नव्हते.

"चिस्ती साहेबांचा अपमान केला म्हणून अब्बुनी मला दरबारात यायला मना केली आहे. मला माहिती आली कि नवीन सेनापती चिस्ती साहेबांवर माझ्या प्रमाणेच विश्वास ठेवत नाही. म्हणून मी भेटायला आलो." सिकंदर ने असं ग्रहण न करतच युसुफ कडे रोखून बघत सांगितले. युसुफने आपला चेहरा निर्विकार ठेवला.

"माझी तलवार आणि माझे रक्त आदिलशहाचे गुलाम आहे शहजादे, अल्लाह आणि शाह सोडून मी कुणावरही विश्वास ठेवत नाही" युसुफने प्रत्येक शब्द मोजून वापरला होता.

सिकंदरने काही पावले युसुफ च्या दिशेने टाकली. हळू आवाजांत तो कुजबुजला  "मी आज शहजादा आहे तर उद्याचा शहा.  चिस्ती फकीर सार्या आदिलशाही साठी संकट आहे. फकिराला युद्धावर जायची खुमखुमी आहे, त्याला आपण बरोबर नेले आणि गायब केले तर मी हे उपकार लक्षांत ठेवीन आणि भविष्यांत त्याची परतफेड करेन." सिकांदारने आपल ओठ दाताखाली दुमडून ठेवला होता आणि युसुफ च्या उत्तराची तो अपेक्षा करत होता.

"माफ करा हुजूर पण त्या फकिराला मी आपल्या बरोबर नेणे शक्य नाही आणि निर्दोष, निशस्त्र माणसाला अश्या प्रकारे ठार मारणे हे शूराला शोभत नाही. आपण जे बोलत आहात तो कदाचित राजद्रोह आहे. आपण तो विंसरा आणि मीही आपण असे काही सांगितले आहे हे विसरून जाईन" युसुफने स्पष्ट शब्दांत सिकंदराला सांगितले. सिकंदरचे बोल ऐकून युसुफ थोडा अस्वस्थ झाला होता. चिस्ती फकीर त्याला आवडत नव्हता पण ह्या प्रकारचा राजद्रोह सुद्धा युसुफला किळसवाणा वाटत होता.

शहजादा उठून बाहेर गेला, दाराजवळ जाताना त्याने मग वळून बघितले आणि हलकेच स्मित हास्य केले. "आपली निष्ठा वाखाणण्या जोगी आहे पण त्या निष्ठेपायी आपण आपला जीव नाही गमावला म्हणजे मिळवली" आणि शहजादा जसा आला होता त्याच वेगाने नाहीसा झाला.

युसुफ थोड्या खिन्नतेनेच आपल्या असणा वर बसला. सारी आदिलशाही बाहेरून कितीही शक्तिशाली वाटत असली तरी आतून पोखरली जात होती. सिकंदर सारखा युवराज, राजा होण्यास लायक वाटत नव्हता. सारे वझीर नालायक होते आणि शहा कुणा फकिराच्या नादा खाली होता. एका प्रकारे फाकीराची भाविश्वनी खरीच होत होती.

युसुफ आपले लक्ष आणखी कुठल्या विषयांत घालणार इतक्यांत एक सेवक दाखील झाला. त्याच्या चेहेर्यावरील भाव बघून युसुफ आणखीन चिंतीत झाला. "काय आहे ?" त्याने विचारले.

"हुजूर, बाहेर चिस्ती फकीर एका लहान मुलाला घेवून आले आहेत. मुलगा फारच भेदरलेला वाटत आहे." सेवकाने माहितीत दिली.

"आंत पाठव दोघांना" युसुफने नाईलाजानेच परवानगी दिली.

फकीर बरोबर एक १०-१२ वर्षांच्या मुलाला घेवून हजर झाला. मुलगा काफिर वाटत होता. शरीर कृश होते आणि एकदम पांढरा फटक पडला होता. जणू काही चालते फिरते प्रेतच वाटत होता. "आज की नवीन खेळ आणला आहे फकीर साहेब ? " युसुफने विचारले.

"बेटा नशिबाचा खेळ आहे, माझ्या एका बंद्याला हा पोरगा दूर प्रांतात बेशुद्ध सापडला. आधी सैतानाने किंवा कुठल्या जिन्नने पछाडलेला असेल असे वाटत होते पण शेवटी लक्षांत आले कि ह्या पोराने काही तर भयंकर पहिले आहे. जो खेळ आम्ही मांडला आहे त्याचा शेवट ह्याच्या शब्दांत आहे."

फकिराचे बोलणे झाले तरी युसुफ ने काहीही अविर्भाव दाखवले नाहीत. युसूफच्या इशार्यावर सेवकाने मुलाला पाणी आणि अन्न दिले, मुलाने काही कान पोटांत टाके सुद्धा.

बराच वेळ फकीर आणि युसुफ मुलाकडे बोलत राहिले. त्याच्या भेदरलेल्या शब्दांतून चित्र उभे राहत होते. मुलगा रत्नागिरीतील होता. सापडला अथणी गावांत होता. दिलावर खान आणि त्याची तुकडी रत्नागिरीत पोचली तेव्हा एका मनसबदाराच्या वाड्यावर थांबणार होती, त्या मनसबदाराचा हा मुलगा होता. तर म्हणे एका रात्री एक काफिर ब्राह्मण घरी हाजीर झाला, त्याने वडिलांना काहीतरी माहिती दिली म्हणून ह्याचे वडील तत्काळ काही माणसे घेवून बाहेर पडले. तर म्हणे कुणी तरी डाकू चा पाठलाग करण्याचा त्यांचा इरादा होता. त्यापैकी कुणीही परत आले नसल्याने ह्या मुलाने दिलावर खानाला वाटेत भेटून मदत करण्याची विनंती केली. दलावर खानाला ह्याने वाट दाखवून आजू बाजूचे सर्व रान पायदळी तुडवले शेवटी एका देवराईत काही झटापटीचा आवाज आला म्हणून सर्व सैन्यासह दिलावर आणि हा मुलगा आंत गेले.

मुलगा पुढे काय सागतोय हे युसुफला लक्षांत येत नव्हते पण कुणीतरी दिलावर आणि त्याच्या संपूर्ण सैन्याचा पूर्ण खातमा केला हे लक्षांत आले. ज्याने कोणी हे केले त्याने ह्या मुलाला पाहून सुद्धा त्याला मारण्याचे कष्ट घेतले नाही हे युसुफला थोडे विचित्र वाटले पण, दिलावर ने त्याला आपली मुद्रा दिली होती ते साक्ष होती.

"त्या सैन्य कडे काही झेंडे होते का ? त्यांच्या कपड्यांचा रंग काय होता ? " युसुफने विचारले.

"त्यांच्या अंगावर चिंध्या होता, हातात फारच मोठी पण जुनी तलवार होती. काही लोकांना हाथ नव्हते तर काहींचे पाय तुटलेले होते, एकाला…. " मुलगा घाबरत घाबरत सांगत होता. त्याने आवंढा गिळून आपले वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, " एकाला डोके नव्हते … तरी सुद्धा त्याची तालावर फिरत होती".

युसुफचे मन थोडे साशंक झाले, भर युद्धांत मोठ्या मोठ्या वीरांना वेड लागते, ह्या पोराने फारच कोवळ्या वयांत फार काही पहिले असेल म्हणून मुलगा काही बाही बरळत आहे असे युसुफला वाटले. त्याने मुलाला सेवका बरोबर बाहेर पाठवले.

"पाहिलस युसुफ ? मुलावर काळ्या शक्तीचा प्रभाव आहे, सैतानी शक्ती आहे ती."

"हा मराठ्यांचा डाव सुद्धा असू शकतो फकीर साहेब" युसुफ ने आपल्या मनातील गोष्ट सांगितली.

"नाही. संदेश आलाय कि तीन मराठ्यांचे लोक त्या काफिर बुताच्या जंगलांत गेले होते, पण दोघे जण मारले गेले तर एकत्याला पकडून मराठ्यांनीच मारून टाकले".

"आपल्याले हे संदेश कुठून भेटतात ?  हेरगिरी तर अहमदच्या हाताखाली आहे ना ? मला हि माहिती कशी नाही ? " युसुफने थोड्या जरबेनेच विचारले.

"माझे माणूस सर्वत्र आहेत सेनापती, अहमद फक्त माणूस आहे, मला संदेश अल्लाह कडून येतात". फकीर बोलता झाला. युसुफने उत्तर दिले नाही.

फकीर अलविदा न घेताच निघून गेला. दिलावर खान मारला गेला आहे आणि तो सुद्धा कुठल्या तरी निनावी शत्रूकडून हि फारच मोठी खबर होती. संकटे चारी बाजूने होती पण हे नवीन होते. हि माहिती शहाला उद्या सकाळी द्यावी असा विचार करून युसुफ झोपी गेला पण त्या मुलाचे शब्द त्याच्या कानात वाजत राहिले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel