(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)  

ऑक्सिजन सिलिंडर दोन तास पुरेल एवढाच आहे तू दीड तासातच वर ये म्हणून संजनाने सांगितले .

तू काळजी करू नको मी वेळेवर परत येतो असे सांगून राजीवने पाण्यात बुडी मारली .

तो पाण्यात खोल खोल चालला होता .ती विहीर कित्येक मीटर खोल होती .आणि म्हणूनच तिला तळ नाही ती पाताळापर्यंत आहे असे सर्वजण म्हणत असत.नेहमी आपण आड आणि विहीर  या दोहोला विहीर  हाच शब्द वापरतो.परंतु त्यात फरक आहे.विहीर चौकोनी असते आणि आड हा वर्तुळाकार असतो .विहीर मातीच्या दबावामुळे ढासळू शकते .आडाचे चिरे अशा प्रकारे बसविलेले असतात की पाठीमागून मातीचा कितीही दबाव आला तरी आड ढासळू शकत नाही .त्याला मजबुती जास्त असते .

खजिना विहीर हा आड होता. वर्तुळाकार होता.त्याचा व्यास वीस मीटर होता .एखाद्या लहानश्या तळ्याप्रमाणेच तो आड होता.त्याला  स्वयंभू मजबूत झरे होते.त्यामुळेच त्याचे पाणी कधीही आटत नसे .त्याची खोलीही कित्येक मीटर होती .त्याच्या मध्यभागी एक लहानशी खोली बांधलेली होती .  उन्हाळ्यात राजा त्या खोलीचा वापर  उन्हाळ्यापासून त्रास होऊ नये यासाठी बहुधा  करीत असावा.हल्ली त्या खोलीत पॉवर पंप बसविलेले होते .

काही क्षणात राजीव तळाला पोचला .तळांमध्ये पुष्कळ चिखल व कितीतरी वस्तू पडलेल्या होत्या .प्रचंड खोलीमुळे तिथपर्यंत जाऊन कुणी तो गाळ उपसू शकला नव्हता.राजीवला त्या गाळात आपण फसू की काय अशीही भीती वाटत होती.त्यामुळे तळात न चालता तो तरंगत फिरत होता .त्याने संपूर्ण विहिरीला एक चक्कर मारली .मधून मधून तो कुठे फट आहे किंवा काय ते पाहत होता.सर्वत्र हिरवट पिवळी शेवाळ  जमलेली होती .त्यावरून हात निसटत होता.पाणवेली वाढल्या होत्या .गाळात किंवा पानवेलीत किंवा आणखी कशात तरी कुठेही न फसता पाहणी करायची होती.राजीवने कपाळावरील टॉर्च चालू केला होता .टॉर्चच्या प्रकाशात त्याला सर्व काही स्वच्छ दिसत होते.

एका ठिकाणी त्याला वेलींच्या जंजाळात फट आहे असे वाटले.त्याच्या जवळील हत्याराने त्याने त्या वेली कापल्या .त्याला तिथे साधारण एक मीटर बाय दोन मीटरची व खोली दोन मीटर असलेली मोठी गुहा आढळून आली .आत गेल्यावर त्याला तिथे मोठा खजिना सापडला .गुहेत गेल्यावर दोन्ही बाजूला कोरून त्यात दोन रांजण ठेवलेले होते.त्यात शिवकालीन सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या होत्या .त्या हंड्यांवर पक्के झाकण ठेवलेले होते.झाकण बाजूला करण्यासाठी एक कळ ठेवलेली होती.कळ विशिष्ट प्रकारे दाबली की झाकण बाजूला होत असे.ते रांजण, ती विशिष्ट प्रकारे दाबली जाणारी कळ, वगैरे शोधीपर्यंत खूपच वेळ गेला होता. त्या जुन्या शेकडो वर्षांपूर्वीच्या काळात हा खजिना तेथे कसा लपविला ते त्या लोकांनाच माहित.

त्यातील मूठभर मोहरा काढून राजीवने खिशात घातल्या .त्या गुहेतून तो सहीसलामत बाहेर आला आणि नंतर पाण्यावर आला .काठावर संजना व संजीव त्याची चातकाप्रमाणे वाट पाहात होते .एवढे सर्व होईपर्यंत दीड तास निघून गेला होता .जेमतेम दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजन सिलिंडरमध्ये होता .राजीव कसलेला डायव्हर असल्यामुळे त्याचे त्याच्या हातावरील घड्याळाकडे लक्ष होतेच.

वर आल्यावर त्याने त्याची डायव्हिंगची सर्व सामुग्री एका  नेहमीच्या पिशवीत ठेविली.दोघानाही त्याने खाली काय काय पाहिले ते सर्व सांगितले .व शेवटी खिशातून मोहरा काढून त्या संजीवला दाखविल्या. पाण्यामध्ये कित्येक शतके असल्यामुळे त्या मोहरांचे तेज खूपच कमी झाले होते.त्याच्यावर क्षारांचे किटण चढले होते.घासून पुसून स्वच्छ केल्यावर त्या मोहोरा चकाकू लागल्या.

त्या मोहरांचे आता काय करायचे असा प्रश्न होता.गरज पडेल तशी हळूहळू मोहरा काढून त्या बाजारात विकून श्रीमंत व्हायचे असा एक मार्ग होता .सर्व मोहरा एकदम वर काढणे धोक्याचे होते .वारंवार पाण्यात जाऊन त्या काढणेही धोक्याचे होते .विहिरीवर काही ना काही कारणाने लोकांचा सतत राबता असे.असे सापडलेले धन सरकारचे असते. म्हणजेच सर्व समाजाचे असते. राजाने मिळवलेले धन  त्या वेळच्या लोकांकडूनच मिळविलेले असते.तेव्हा समाजाचे धन पुन्हा समाजाकडेच जाणे न्याय्य होय.

राजीव व संजीव एका वकिलाला घेऊन कलेक्टरला जाऊन भेटले.जरी विहीर खासगी असली तरी ते धन सरकारचे यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले.विहिरीवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला .शासकीय अधिकारी व कसलेले डायव्हर आले .

दोन्ही रांजणातील सर्व मोहरा वर काढण्यात आल्या.त्या सर्वांचे मूल्य दहा कोटी रुपये भरले.

त्यातील दहा टक्के म्हणजे एक कोटी रुपये संजीवच्या वडिलांना मिळाले .

संजीवच्या वडिलांनी हे सर्व राजीवमुळे मिळाले तेव्हा त्याचे आभार तर मानलेच पण त्याला दहा टक्के म्हणजे दहा लाख रुपये दिले .त्याला संजनाची प्राप्ती ही दस लाखाहून मोलाची होती .

संजीवची बहीण संजना हिच्याशी राजीवचा विवाह संपन्न झाला .दोघेही परस्परांना  कॉलेजपासून ओळखत होती.त्यांच्यामध्ये मैत्रीही चांगली होती .दोघेही एकमेकांना पसंत होती .राजीव संजीव कडे येण्याचे आणखी एक कारण संजना हेही होते.

सोन्यासारखा जावई मिळाला. 

सोन्यासारखी पत्नी मिळाली. 

साक्षात सोने मिळाले.यामुळे सर्वच खूष होते .

*खजिना विहीर नुसती नावाची खजिना विहीर न ठरता खरोखरच खजिन्याची विहीर ठरली .

मुबलक पाणी,त्याचा सर्वांना पुरवठा, 

उन्हाळ्यामध्ये टँकर्स भरभरून सर्वत्र वाहतूक, 

प्रत्येक टँकरमागे काही विशिष्ट रक्कम, 

यामुळे विहीर सतत धनलाभ म्हणजेच सुवर्णलाभ करून देणारी होतीच.

* त्यात त्या विहिरीने प्रत्यक्ष सुवर्ण लाभ करून दिला.*

(समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel