किती वर्षे लोटली माहित नाही.जणू काही युगे लोटली आहेत असे वाटत आहे . आसपासच्या टेकड्यांकडे पाहिले म्हणजे मला त्यांचा हेवा वाटतो.माझ्या समोर समुद्र आहे .बाकी तिन्ही बाजूला लहान मोठ्या अनेक टेकड्या आहेत .या सर्व टेकडय़ा हिरव्यागार आहेत .
कुठे उतारावर पायऱ्या पायऱ्या मुद्दाम निर्माण करून त्यावर निरनिराळया प्रकारची शेती केलेली आहे .वरी नागली भात अशी निरनिराळी पिके त्यावर दर वर्षी घेतली जातात.
या डाव्या बाजूच्या टेकडीवर हपूस कलमांची झाडे लावलेली आहेत .त्याची शान काय विचारावी .इतर सर्व टेकड्यांकडे तो गर्वाने व तुच्छतेने पाहात असतो .सर्व वर्षभर त्याची मिजास असते .कधी पालवीमुळे तो हिरवागार दिसत असतो .कधी आलेल्या मोहरा मुळे तो मोहरलेला दिसतो .मोहराचा सुवास टेकडीवरून वाऱ्याबरोबर सर्वत्र दरवळत असतो .मग त्यातून कैऱ्या बाहेर येतात. आंबे तयार व्हायला लागल्यावर पोपट आणि इतर अनेक पक्षी पिक्या आंब्यांच्या शोधात येतात .त्यांचा किलबिलाट चाललेला असतो .आंबे तयार व्हायला लागले की वानरांची टोळी ही हमखास येते .खाणे कमी नासधूस फार असा त्यांचा खाक्या असतो .बाग मोठी असल्यामुळे राखणीसाठी कायमचे चार गडी हंगामात ठेवलेले असतात .रिकामे डबे वाजवून, फटाके उडवून ,बंदुकीचे बार काढून वानरांना पळविण्यात येते.वेळप्रसंगी एखादा वानर ठारही मारला जातो.
नंतर आंबे काढण्यासाठी गड्यांची लगबग सुरू होते . त्या टेकडीवर एक वळणावळणांचा रस्ता वरपासून पायथ्यापर्यंत आलेला आहे .काढलेल्या आंब्यांची टेम्पोमधून वाहतूक त्या रस्त्याने केली जाते .दोन महिने आंबे संपेपर्यंत त्या टेकडीवर वानर, निरनिराळ्या प्रकारचे पक्षी,मोटारी गडी माणसे यांची सतत लगबग सुरू असते .दिवस रात्र टेकडी गजबजलेली असते जागृत असते प्रकाशमान असते.पावसामध्ये खतपाणी घालण्यासाठी बांधबंदिस्ती करण्यासाठी माणसांची ये जा सुरू असते . या टेकडी सारखी भाग्यवान टेकडी मी पाहिली नाही.या भाग्यवान टेकडीच्या मागेही मला अनेक टेकडय़ांवर उतारावर हापूस अंब्यांची कलमे दिसत आहेत .कमी जास्त प्रमाणात त्याही टेकड्या भाग्यवान आहेत .
काही टेकडय़ांवर काजूची झाडे आहेत .काहींवर ती सहज उगवलेली आहेत तर काहींवर त्यांची जाणीवपूर्वक लागवड केलेली आहे. कोवळे काजू, जून काजू, त्यांच्या बिया काढून त्यातील गर विकले जातात. निर्यात केले जातात.त्यांना प्रचंड मागणी आहे .त्यांना उत्कृष्ट दर मिळतो .काजूची झाडे असलेल्या टेकडय़ांवरही रस्ते खेळवलेले आहेत .त्यांचेही भाग्य काही कमी नाही .
काही टेकड्यांवर निरनिराळ्या प्रकारच्या जंगली झाडांची राई आहे .त्यामुळे त्या टेकड्या नेहमीच हिरव्यागार दिसतात .यामध्ये रानडुकरे बिबट्या वाघ तरस अशी जंगली जनावरे आहेत .त्यांची शान काही वेगळीच .
काही टेकड्यांवर केवळ गवत उगवलेले आहे .त्यावरील हिरवा चारा खाण्यासाठी गुरे येत असतात .टेकडीवरील हिरवा चारा आणि त्यासाठी त्यावर आलेली निरनिराळ्या प्रकारची गुरे व त्यांना सांभाळणारे जांगळी(गुराखी) हे दृश्य मनोरम दिसते .चारा जून झाल्यावर तो कापण्यासाठी विळे घेऊन गडी माणसे येतात.चारा कापतात,भारे बांधतात आणि ते भारे वाहून नेले जातात, ते दृश्य मनोरम दिसते.
काही टेकड्या करवंदे तोरणे अश्या निरनिराळ्या प्रकारच्या फळांच्या रानटी झुडपानी आच्छादलेली आहेत .
एकूण काय माझ्या आसपास डाव्या बाजूला उजव्याबाजूला मागे सर्वत्र काही ना काही हालचाल माणसांची ये जा गुरांची ये जा होत असते .पाळीव जंगली प्राणी फिरत असतात .गुरे चरत असतात. वाघ तरस डरकाळ्या फोडीत असतात .पक्षी कूजन करित असतात .घरटी बांधतात.वानर या झाडावरून त्या झाडावर उडय़ा मारीत असतात .
प्रत्येक टेकडीचे काही ना काही महत्त्व आहे .प्रत्येकाची काही ना काही शान आहे . प्रत्येकाचा काही ना काही उपयोग आहे .प्रत्येकावर काही ना काही उगवत आहे ,वाढत आहे, पोसत आहे .प्रत्येक सुफल सुजल सस्यश्यामल आहे .
हे सर्व पाहात असताना मला माझ्या अवस्थेबद्दल दुःख होते.माझी अवस्था अशी केव्हा झाली मला आठवत नाही .अशी अवस्था माझी केव्हां झाली ,कां झाली,ते मला अंधुकसे आठवते.परंतू नीटसे स्मरत नाही. माझ्यावर गवत उगवत नाही .जंगली झाडे नाहीत .जंगली किंवा पाळीव प्राणी कधीही माझ्या अंगाखांद्यावर बागडले नाहीत .कुणीही माझ्यावर काजूची हापूस आंब्यांची बाग करण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही .गुरे पक्षी वानर जंगली जनावरे मोठी माणसे लहान मुले सर्व मला वळसा मारून जातात .मला ती एवढी का घाबरतात कळत नाही .त्यांना मी काय खाणार आहे ?
मलाही माझ्या अंगाखांद्यावर गवत असावे.झुडपे असावीत . काजूची झाडे असावीत . आंब्याची झाडे असावीत . जंगली झाडे असावीत .भात वरी नागली यांची पिके घेतली जावीत.गवत उगवावे.गुरे चरावीत . पक्षी यावेत . माणसांनी ये जा करावी .रस्ता तयार व्हावा . त्यावरून मोटारी फिराव्यात असे वाटते .
पण मला सर्व टाळतात. माझ्याकडे कुणी फिरकत नाही .सर्व मला घाबरतात.मी त्यांना खाईन असे बहुधा त्यांना वाटत असावे .ही माझी भीती, ही माझी दहशत, हा माझा वनवास, केव्हा संपणार आहे कुणास ठाउक.
समुद्रावरील खारा वारा माझ्या अंगावरून जातो तो मला टाळीत नाही .पाऊस माझ्या अंगावर पडतो.तो मला टाळीत नाही .पाण्याचे ओहोळ माझ्या अंगावरून वाहतात .परंतु कधीही हे ओहोळ माती वाहून नेत नाहीत .तेलकट जागेवरून पाणी सरकन निघून जावे तसे पाणी माझ्या अंगावरून घसरून जाते .माझी माती भुसभुशीत आहे .ती सकस आहे .कोणत्याही प्रकारचे पीक घेण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे .काजूची झाडे ,हापूस आंब्यांची झाडे, इतर अनेक प्रकारच्या झाडे याना आश्रय देण्याचे, मजबुती देण्याचे, पालनपोषण करण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे .माझा उपयोग केव्हा होणार आहे कुणास ठाऊक .कोण माझा उपयोग करून घेणार आहे माहित नाही .तूर्तास मी शापित आहे एवढे मात्र खरे . वर्षानुवर्षे मी जशी आहे तशी आहे. माझ्यामध्ये काहीही बदल होत नाही.या एकसुरीपणाला मी कंटाळले आहे .मी कधीच काहीच प्रसवणारी नाही का ?मी अशीच वांझ राहणार का ?माझ्या अंगाखांद्यावर मुले माणसे गुरे पक्षी कधीच बागडणार खेळणार नाहीत का?लोकांच्या मनात माझ्याबद्दल असलेली भीती कधी नष्ट होणार नाही का ?अहिल्येचा जसा रामाने उद्धार केला तसा माझा उद्धार कुणी करणार आहे का ? माझ्या नशिबात काय लिहिले आहे ?माझा वैराणपणा कधी संपणार आहे ?
*सभोवतालच्या टेकड्यांचे वैभव बघत,समुद्राचा खारा वारा अंगावर घेत ,पावसाचे पाणी अंगावर घेत ,मी माझ्या उत्कर्षाची वाट पाहात आहे .सुजलाम् सुफलाम् होण्याची वाट पाहत आहे .*
~ मधुसूदन ~
झोपलो की मला अजूनही नेहमी एक स्वप्न पडते .समुद्रकाठ त्याशेजारी एक उघडी बोडकी ज्यावर काहीही उगवलेले नाही अशी एक टेकडी, त्या टेकडीच्या भोवती अनेक टेकड्या,त्या एका टेकडीच्या भोवतालच्या सर्व टेकडय़ा हिरव्यागार, फक्त या टेकडीवर काही नाही .मी टेकडीवर बसलेला आहे समोरून समुद्राची गाज (आवाज) व भन्नाट वारा.
स्वप्न पडले की मी दचकून जागा होतो .हेच स्वप्न मला वारंवार का पडते असा विचार माझ्या मनात येतो .
माझे बालपण कोकणात गेले .आमचे घर,गाव, समुद्रकाठी आहे.लहानपणी अनेक जण कमी जास्त प्रमाणात आंब्याचा व्यवसाय करीत असताना मी बघत होतो.हापूस आंब्याच्या बागा सर्वत्र पाहात होतो .आमचीही आंब्याची चार झाडे होती. कधीतरी आपणही इतरांसारखी एखादी टेकडी घेऊन तिच्या उतारावर एक बाग तयार करावी असे मला त्यावेळी वाटत होते .
नंतर मी बी कॉम एम कॉम सी ए झालो .काही दिवस मोठ्या फर्ममध्ये काम केले. अनुभव मिळविला. नंतर स्वतःची फर्म काढली.भरपूर पैसा मिळविला. शून्यातून विश्व उभे केले.मुंबईला आता माझा मलबार हिलवर एक अलिशान फ्लॅट आहे .माझे वृद्ध आई वडील हल्ली माझ्या जवळच असतात.कुणाच्या आधाराशिवाय एकटे कोकणात राहणे आता त्यांना शक्य नाही.मुंबईत त्यांना करमत नसतानाही मी त्यांना आग्रहाने येथे आणले आहे . मला काहीही कमी नाही .कधी कधी जुने कोकणातील दिवस आठवतात .
बहुधा त्यावेळची कधीतरी स्वतःच्या मालकीची हापूस आंब्यांच्या कलमांची बाग उभी करण्याची सुप्त इच्छा,स्वप्न रूपाने प्रगट होत असावी .रिकामी उजाड टेकडी त्यात कुठे येते ते कळत नाही .
~ विश्वनाथ ~
आजच्या टपालात मधूचे पत्र पाहून मला थोडा विस्मयाचा धक्का बसला .माझ्याकडे लँडलाईन आहे .मोबाइलही आहे. जवळच टॉवरही झालेला आहे.जेव्हा गरज असेल तेव्हा किंवा आठवण झाल्यावर आम्ही एकमेकांना फोन करतो.
मधू माझा लहानपणापासूनचा लंगोटी मित्र.मधूविसूची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी असे सर्वजण लहानपणापासून म्हणत.दोघेही शाळेत बरोबर गेलो. कॉलेजमध्ये बरोबर गेलो.मी इथेच कोकणात राहिलो कारण आमची इस्टेट भरपूर होती .मी एकुलता एक असल्यामुळे ती इस्टेट मला संभाळणे क्रमप्राप्तच होते .मला त्यात आनंदही आहे .हल्ली सर्वत्र रस्ते पूल झालेले आहेत .शहर त्यामुळे जवळ आले आहे .घरी मोटार आहे .केव्हाही शहरात पटकन जाता येते .रिक्षा आहेत .मुले मोटरसायकलवर, स्कूटरवर ,शहरात कॉलेजला जातात .
मधू शहरात गेला. तिथे आणखी खूप शिकला. स्वतःच्या कर्तृत्वावर खूप मोठा झाला .मीही मुंबईला गेलो म्हणजे त्यांच्याकडे आवर्जून जातो तिथे राहतो .त्याला वेळ मिळाला तर तोही आमच्या घरी कोकणात येतो .त्याचे आई वडील इथे असताना तो वारंवार येत असे .हल्ली काका काकू मुंबईला त्याच्याकडेच रहात असल्यामुळे तो क्वचितच इकडे येतो .
मी त्याचे पत्र उघडून वाचण्याला सुरुवात केली .त्याचे पत्र पुढीलप्रमाणे होते .
प्रिय विसू,
आज रात्री मी तुला फोन करणार आहेच .त्यावेळी सविस्तर बोलणे होईलच .मला लहानपणापासून एक स्वप्न पुन्हा पुन्हा पडते .कदाचित मी त्याबद्दल तुझ्याजवळ बोललो असेन .मला एक उजाड टेकडी दिसते .त्यावर मी एकटाच बसलेला असतो.आजूबाजूच्या सर्व टेकड्या हिरव्यागार आहेत .त्यावरती काही ना काही उगवलेले आहे .काजू आंबे जंगली झाडे शेती गवत इत्यादी .मी जिथे बसलो आहे तीच टेकडी उजाड आहे .ती टेकडी मी हिरवीगार करतो असे माझे स्वप्न आहे .समोर मला समुद्र दिसतो.मी बसलेल्या टेकडीच्या तिन्ही बाजूला असंख्य टेकड्या आहेत. त्यावरती काही ना काही उगवलेले आहे.
प्रत्यक्षात ही टेकडी आहे की नाही ते मला माहीत नाही .आपल्या गावाच्या उत्तरेला व दक्षिणेला तू सर्वत्र शोध घे .मला खात्री आहे की तुला अशी टेकडी कुठे ना कुठे सापडेल .ती उजाड टेकडी कुणाच्या मालकीची आहे ते पाहा .तो ती टेकडी विकण्याला तयार आहे की नाही त्याची चौकशी कर .मला ती टेकडी विकत घ्यायची आहे .
रात्री सविस्तर फोन करीनच .
तुझा
मधू
रात्री मधूचा फोन आला .टेकडीविषयी आणि इतरही नेहमीप्रमाणे सविस्तर बोलणे झाले.
दुसऱ्या दिवसापासून मी टेकडीच्या शोधाला सुरुवात केली.
(क्रमशः)
१८/१०/२०१९©प्रभाकर पटवर्धन