(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
~३~
सुनिताला कल्पना एकदम आवडली .
तीही जगदाळेंबद्दल बरेच काही ऐकून होती.
त्यांची श्रीमंती, त्यांचा धनाढ्य खानदानी कारभार ,इत्यादी इत्यादी .जर कल्पनेप्रमाणे सफलता मिळाली तर चांगलेच घबाड हाती लागणार होते .अर्थात त्यात धोकाही होता .धोका काय सर्वत्रच आहे.रस्ता ओलांडायचा म्हटला तरी अपघाताचा धोका आहेच की कल्पना राबवून पाहायला हरकत नाही .सफलता मिळाली तर उत्तमच नाहीतर केव्हाही राजीनामा देता येईलच !
~४~
कॉन्फरन्स रूममध्ये लांबरुंद टेबलापलीकडे तारीख अठरा रोजी ठीक अकरा वाजता कॅप्टन जगदाळे मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्याच्या तयारीत बसले होते .कॅप्टन जगदाळे वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते.दिलेली वेळ पाळलीच पाहिजे. वेळच्या वेळी सर्व कामे झालीच पाहिजेत. या बाबतीत ते अतिशय काटेकोर होते .
त्यांच्याबरोबर एक सीनियर क्लार्क बसला होता.त्यांच्या सेक्रेटरीचे अकस्मात अपघातात निधन झाले होते .असलेल्या स्टाफपैकी कुणाची नेमणूक करण्याचे त्यांच्या मनात नव्हते.मुलाखतीमध्ये जर योग्य उमेदवार मिळाला नाही तर मग ते स्टाफपैकी कुणाचा तरी विचार करणार होते .
एकामागून एक मुलाखती चालल्या होत्या.कॅप्टन जगदाळेना माणसाची पारख अत्यंत उत्तम होती.त्यांचे डोळे जरी बुबुळे बाहेर आल्यासारखे वाटत होते तरी नजर भेदक होती . एखाद्या क्ष किरण यंत्राप्रमाणे ते मनुष्याची पारख करीत असत .नेमके प्रश्न व त्याची उत्तरे ते ऐकत होते.
मुलाखती संपल्या दोन चार दिवसात तुम्हाला कळवू असे सर्वांना सांगण्यात आले .पांचही उमेदवारांची माहिती कागदपत्रांसह त्याच्या पुढय़ातील फायलींमध्ये होती.दोन उमेदवार पुरुष होते तर तीन स्त्रिया होत्या. टेबलावर बोटातील अंगठीने हळूवार टक टक करीत ते त्यांच्या मन:चक्षूसमोर सर्व उमेदवार आणीत होते.पुरुषांनी विशेष प्रभाव टाकला नव्हता.त्यामुळे ते पहिल्या फेरीतच त्यांच्या मनातून बाद झाले होते.
स्त्री उमेदवारांमध्ये सुनिता व संगीता यांच्यापैकी कुणाची निवड करावी याचा विचार ते करीत होते .त्यांच्या मनाचा निश्चय होत नव्हता . विचार करता करता एकदा सुनिताचे पारडे जड होई तर दुसऱ्या वेळी संगीताचे पारडे जड होई.
सुनिता एकदा त्याना प्रामाणिक वाटे तर एकदा लबाड वाटे.
नाही म्हटले तरी सुनिताच्या सौंदर्याने, अंगभूत रुबाबाने,चटपटीत उत्तरे देण्याच्या पद्धतीने,बुद्धीचातुर्याने ,कॅप्टन जगदाळेंच्या मनात घर केले होते.
सौंदर्याचा परिणाम किती आणि तिच्या इतर गुणांचा परिणाम किती ते त्याना नक्की ठरविता येत नव्हते.
तिच्या सौंदर्याने ते घायाळ झाले होते . तिच्या वाक्चातुर्याने ते मोहित झाले होते.
शेवटी सारासार विचार करून त्यानी सुनीताची नेमणूक करण्याचे निश्चित केले.त्याप्रमाणे अपॉइंटमेंट ऑर्डर तयार करायला सांगितले. त्याचवेळी त्यांचे मन त्यांना सावधानतेचा इशारा देत होते.
~५~
सुनिताला नेमणुकीचे पत्र मिळाले .पत्र नव्याण्णव टक्के येणार याची दोघांनाही खात्री होती.सुनीता प्रत्यक्ष जाऊन कॅप्टन जगदाळेंना भेटली.पूर्वीच्या जबाबदारीतून मुक्त होऊन येथे रुजू व्हायला दहा दिवस तिने त्यांच्याकडे मागून घेतले.सदानंदच्या कंपनीचे नाव "नॉव्हेल ट्रेडर्स" असे होते .मी तिथे सेक्रेटरी म्हणून काम करते असे तिने सांगितले होते .त्याप्रमाणे उत्कृष्ट कामाचे सदानदचे सर्टिफिकेट इतर सर्टिफिकेटांबरोबर जोडले होते .
दहा दिवसांनी सुनिता जगदाळे अँड कंपनीमध्ये सेक्रेटरी म्हणून रुजू झाली .पहिल्या दिवसांपासूनच तिने कामाचा धडाका लावला .पूर्वीच्या सेक्रेटरीच्या अपघाती मृत्यूमुळे बरीच कामे तुंबली होती .तिला तिची कार्यक्षमता सिद्ध करायची होती .तिच्या सौंदर्याप्रमाणे तिच्या कामाची, चातुर्याची, बुद्धिमत्तेची, कार्यक्षमतेची, छाप जगदाळेवर पडणे त्यांची योजना पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक होते.
आपल्या कार्यसिद्धीच्या दृष्टीने कोणतीही घाई करायची नाही असे सदानंद व सुनीता यांनी ठरविले होते .सुनीता खरेच बुद्धिमान व कार्यक्षम होती .ती स्वभावाने मृदू,शांत,व प्रेमळ होती.व्यवहार व काम यामध्ये मात्र ती कठोर होती. तिने जगदाळे अँड कंपनीचा सर्व कारभार समजून घेतला एवढेच नव्हे तर आपल्या कामाने तिने त्यावर आपली छाप उठवण्यास सुरुवात केली.
~६~
दोन तीन महिन्यात जगदाळेंचे तिच्याशिवाय पानही हलत नाहीसे झाले.जगदाळेंच्या निरनिराळ्या कंपन्यांत ती कोणत्याही कामासाठी गेली की सर्वजण मॅडम आल्या मॅडम आल्या म्हणून तिला जगदाळेंच्या खालोखाल मान देत असत.
कुणाचे एखादे काम असले तर ते सुनिताच्या मार्फत नक्की होईल अशी सर्वांना खात्री होती .काम प्रथम सुनीताला सांगितले जाई.सुनीता त्या व्यक्तीचे काम जगदाळेंच्या कानावर योग्य वेळी घालीत असे .ती अशा पद्धतीने काम मांडत असे कि जगदाळे त्याला संमती देत असत.
हळूहळू जगदाळे स्वतः निर्णय घेण्याऐवजी सुनिताला तूच काय ते ठरव असे सांगू लागले.सुनीताने सहीसाठी कागदपत्र पुढ्यात ठेवले की जरासे पाहिल्यासारखे करून ते सही करीत असत .सुनिताच्या कार्यक्षमतेवर, निर्णयक्षमतेवर, सचोटीवर, प्रामाणिकपणावर, त्यांचा गाढ विश्वास बसला होता.
साहेब मॅडमवर प्रेम करतात .साहेब मॅडमशी लग्न करणार आहेत .हल्ली सर्व निर्णय मॅडम घेऊ लागल्या आहेत. अशी हलक्या आवाजात कुजबूज जगदाळेंच्या कंपन्यांतून सुरू झाली होती.जगदाळेना सुनीता केवळ सेक्रेटरी म्हणूनच नव्हे तर वेगळ्या अर्थाने आवडू लागली होती. मुलाखतीच्या दिवसांपासून तिने जी छाप जगदाळेंवर पाडली ती कमी न होता दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होती.आतापर्यंत अविवाहित राहिलेले जगदाळे तिच्याबरोबर विवाहाची स्वप्ने पाहू लागले होते.आपल्या कुरुपतेमुळे कुणी आपला स्वीकार करीत नाही याचा त्यांना अनुभव होता.ज्या मुली, ज्या स्त्रिया,त्यांच्याशी विवाह करायला तयार होत्या त्यांना केवळ त्यांचा पैसा दिसत असे.केवळ पैशासाठी त्या लग्नाला तयार असत .याची स्पष्ट जाणीव जगदाळेना होत असे.त्यामुळे गळ्यात पडणाऱ्या मुलींना ते हातभर दूरच ठेवीत असत.त्यांना ज्या मुली आवडत, पसंत असत ,त्या मुली त्यांना नकार देत असत.दोन तीन मुलींच्या बाबतीत असा अनुभव आल्यावर त्यांनी कुणाला मागणी घालण्याचे सोडून दिले होते. एकूण काय पस्तीस वर्षांच्या सर्व क्षेत्रात सफल आयुष्यात, या क्षेत्रातच ते अपयशी ठरले होते.आणि त्याचे एकमेव कारण त्यांचा कुरुपपणा हा होता.
सुनिताला जगदाळेंचा बदललेला स्वर, बदललेले चेहर्यावरील भाव, बदललेली दृष्टी,जाणवत होती .एक ना एक दिवस ते आपल्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवतील याची तिला खात्री होती.ते प्रपोझ करण्याची ती वाट पाहत होती.सदानंद व ती यांच्या योजनेचाच तो एक भाग होता.
ती तिच्या दृष्टीक्षेपातून, तिच्या बोलण्यातून, तिच्या हावभावातून, तिच्या वर्तनातून,तिची मूक संमती दर्शवीत होती.जगदाळेनाही ती संमत्ती देईल असा विश्वास वाटू लागला होता.तरीही पूर्वानुभवावरून ते विचारू की न विचारू अशा संभ्रमात होते.तिच्याकडून नकार पचवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आता उरली नव्हती.
*शेवटी एक दिवस त्यांनी या प्रश्नाची तड लावण्याचे ठरविले .*
त्याच दिवशी धीर करून सुनिताला मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगितले .*
*सुनिता हसून म्हणाली मग सांगा की.मी तर तुमची सेक्रेटरी आहे. *
*पुढे स्वर बदलून द्व्यर्थी अर्थाने ती म्हणाली तुमचे आज्ञापालन हे तर माझे कर्तव्य आहे.तुमच्या शब्दाबाहेर मी नाही .*
(क्रमशः)
११/८/२०२०©प्रभाकर पटवर्धन