(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

आपल्या वडिलांचे भांडण संपावे असे सखा व गोदा या दोघांनाही  वाटत होते .

तसे काही न झाल्यास त्यांना नाईलाजाने वडील सांगतील तिथे लग्न करावे लागले असते.

जेव्हा आपल्या शेतात किंवा घरी काम असे तेव्हा दोघेही घरी काम करीत असत .जेव्हा घरी काम नसे तेव्हा  गोदा व सखा दोघेही जिथे काम मिळेल तिथे जात असत.लावणी लावणे,गवत कापणे, तोडलेला लाकूडफाटा घरी घेऊन येणे,आंबे पिळणे,आमरस आटविणे,धुणीभांडी करणे,अश्या  प्रकारचे काम गोदा करीत असे. निरनिराळ्या हंगामात निरानराळ्या प्रकारची कामे असत.तर सखा आंबे काढणे,लाकडे तोडणे, वई(वई~वर्षांसाठी तात्पुरते काटेरी कुंपण केले जाते त्याला वई  असे म्हणतात)  करणे ,गडगा बांधणे, रस्ता तयार करणे,लाँचवर मासेमारीसाठी जाणे,मासे पकडण्यासाठी रापण टाकणे, ती ओढणे, नदीपलीकडे जाणार्‍या  लोकांसाठी होडी चालविणे इत्यादी कामांसाठी जात असे.  

सातवी झाल्यानंतर त्याने शिक्षण सोडले होते .दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती बेतास बात असल्यामुळे त्यांना इतरत्र जिथे काम मिळेल तिथे  काम करण्यासाठी जावे लागत असे.त्यामुळे दोघांची भेट अनेक वेळा अनेक ठिकाणी होत असे.अश्या भेटीतून बोलण्यातून त्यांचे प्रेम हळूहळू फुलत गेले होते.दोघांच्याही घरी त्यांच्या विवाहाची बोलणी सुरू झाली .आता याच वेळी जर आपण बोललो नाही तर मुकाट्याने वडील सांगतील तिथे लग्न करावे लागेल,हे त्यांच्या लक्षात आले.

आपल्या आयांची एकमेकांशी मैत्री आहे हे दोघांच्याही लक्षात आले होते.सामाईक कुंपणाजवळ उभे राहून दोघींनाही गप्पा मारताना त्यांनी पाहिले होते.त्यांची लग्नाअगोदरपासून मैत्री आहे. त्या एकाच गावच्या आहेत हेही त्यांना माहीत होते.त्यांना आपला विचार पटल्यास, त्यांनी मनावर घेतल्यास, कदाचित आपली इच्छा पूर्ण होऊ शकेल असा विचार  दोघांनीही केला.

त्याच दिवशी दोघांनीही आपापल्या आयांजवळ विचार सांगितला.त्यांच्या आयांच्या मनात तोच विचार अनेकदा येऊन गेला होता.आपल्या मुलांची संमती घ्यावी आणि नंतर काही करता येईल का ते पाहावे असे दोघींनीही ठरविले होते. मुलांच्या विचाराला दोघीनीही हसतहसत संमती दिली .आपल्या मैत्रिणीचा मुलगा आपला जावई व्हावा असे नर्मदाला वाटत होते. आपली मुलगी तिथे सुखात राहील, तिला सासूचा जाच होणार नाही, याची तिला खात्री होती. आपल्या मैत्रिणीची मुलगी आपली सून व्हावी असे लक्ष्मीला वाटत होते .गोदा मनापासून तिला आवडत असे.तिचे व आपले चांगले पटेल याची तिला खात्री होती 

त्याच रात्री लक्ष्मीने आपल्या नवर्‍याकडे  हा विषय काढला . नर्मदेचा विवाह गणप्याशी झाल्यामुळे परश्या वेळोवेळी त्याच्याबरोबर वाकड्यात गेला होता. ज्याच्याशी अातापर्यंत निरनिराळ्या कारणांवरून सतत भांडत आलो,ज्याचा आपण अपमान केला, त्याच्याशी सोयरीक करण्याचा  विचार मुळीच पटला नाही त्याने तो विचार उडवून लावला .लक्ष्मीने त्याच्या बायकोने एक युक्ती केली.ती म्हणाली काल रात्री माझ्या स्वप्नात देवी आली होती तिने तुझ्या मैत्रिणीची मुलगी सून म्हणून करून घे असे मला सांगितले .तसे केले नाही तर माझा कोप होईल असेही ती म्हणाली . हे एेकून परश्या विचारात पडला .गावच्या देवीवर त्याची अपार श्रद्धा होती.तशी श्रद्धा गावातील सर्वांचीच होती .त्याचबरोबर त्याला एक विचार सुखावत होता . नर्मदा आपल्याला मिळू शकली नाही परंतु तिची मुलगी आपल्या घरात सून म्हणून येत आहे याचा त्याला आनंद होत होता . त्याला थोडे सूड घेतल्यासारखे वाटत होते .गणप्या मुलीचा बाप आहे ,तो आपल्यापुढे झुकेल याचाही त्याला आनंद होत होता. सर्व दृष्टीनी त्याला याचा विचार करावा असे वाटू लागले .विशेषत: देवी कोपेल हा मुद्दा फारच सबळ होता. आपली बायको देवीच्या बाबतीत आपल्याला काही थाप मारील अशी कल्पनाही तो करू शकत नव्हता. असा विचार त्याच्या मनात स्वप्नातही येणे शक्य नव्हते. 

तो म्हणाला आपण देवीला कौल लावून पाहू .जर देवीने  हे लग्न करावे असा कौल दिला तर विचार करता येईल. गुरवाला विचारून योग्य मुहूर्त पाहून कौल घेण्याचे निश्चित करण्यात आले.लक्ष्मीने ही गोष्ट आपल्या मुलाला सांगितली .सखा तसा बेरकी होता.तो तसाच गावच्या गुरवाला भेटण्यासाठी गेला. त्याने गुरवाला सर्व परिस्थिती नीट समजून  सांगितली.जेव्हा बाबा येतील तेव्हा योग्य वेळ तू दे. कौल लग्नाच्या बाजूने पडेल असे पाहा .त्यासाठी मी तुला हवे ते देतो असे त्याने सांगितले .गुरुवाला शंभर रुपये देण्याचे ठरले.परश्या कौल घेण्यासाठी देवळात आला.  त्याच्याबरोबर अर्थातच लक्ष्मी व सखा हे दोघेही होते .सखाने एक डोळा मिचकवून गुरवाला कौल घ्यायला सांगितले.गुरवानेही डोळा मारून होय असे सांगितले .कौल लावण्यात आला. कौल लग्न व्हावे या बाजूने अर्थातच मिळाला .(काही वाचकांना कौल घेणे म्हणजे काय हे माहीत नसेल तर ते थोडक्यात स्पष्ट करतो.गुरव हा गुरुचा अपभ्रंश असावा. गावदेवीचा जो पुजारी त्याला गुरव असे म्हणतात .हे एक प्रकारचे वतन आहे आणि ते बऱ्याच वेळा वंशपरंपरेने चालते .बरेच भाऊ असल्यास ते थोरल्या भावाकडे किंवा केव्हा केव्हा विभागून आळीपाळीने सर्वांकडे तो हक्क दिला जातो . निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रथा असतात .काही वेळा पंचही कुणी गुरवकी करावी हे निश्चित करतात .

गुरव हा पूर्णपणे कौल घेणारा अधिकारी असतो.देवीला उजव्या व डाव्या बाजूला पाण्यामध्ये किंवा गंधामध्ये बुडवून फूल लावले जाते. उजव्या बाजूचे फूल पडले तर काम होणार ,डाव्या बाजूचे फूल पडले तर काम होणार नाही,असा संकेत असतो .गुरवाने फूल गंधामध्ये बुडविताना  ते अशा प्रकारे बुडविले की  उजव्या बाजूचे चटकन पडेल.हा थोडासा हातचलाखीचा प्रकार आहे.फूल गंधामध्ये जास्त बुडविल्यास ते जास्त वेळ चिकटून राहते .किंचित गंध व पाणी लागले तर लवकर सुकून खाली पडते. कोणते फूल घ्यावे, गंध कशाप्रकारे करावे, फुलाला गंध किती लावावा, देवीच्या उजव्या व  डाव्या बाजूवर कोणत्या ठिकाणी फूल चिकटवावे,फूल लावताना दाब किती द्यावा याचे एक शास्त्र असावे.  बऱ्याच वेळा गुरवाबरोबर  सेटिंगही केले जात असावे. 

कौल घेण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे  देवळात एक शिळा ठेवलेली असते.ती उचलताना जड येणे किंवा हलकी येणे यावरती काम होईल किंवा न होईल हे ठरविले जाते .

आणखीही बरेच निरनिराळे प्रकार असतील. हा काहीसा अंधश्रद्धेचा प्रकार आहे.बऱ्याच वेळा प्रामाणिकपणे कौल लावला जातो .कौलाप्रमाणे आचरण केले आणि हित झाले असेही ऐकायला मिळते.यात काही तथ्य आहे की नाही सांगता येणे कठीण आहे .परंतु खेडेगावात देवीवर अपार श्रद्धा असते .ती सांगेल त्याप्रमाणे वागणे योग्य असे समजले जाते . अर्थात शहरातही श्रद्धा कमी असते असे नाही.त्याचा अविष्कार वेगळ्या प्रकारे होत असतो.)

परश्याचा विरोध मावळला. तरीही तो म्हणाला मुलगा माझा आहे गणप्याने त्याची मुलगी मला सांगून आले पाहिजे.ते सर्व पाहण्याचे काम अर्थातच गोदाने आपल्याकडे घेतले .

गोदाने आपल्या आईच्या मार्फत बाबांकडे प्रस्ताव दिला .गणप्या मुळातच वाकड्यात गेला नव्हता.परश्या चिडला होता. परश्या वाकड्यात गेला होता .परश्या भांडण उकरून काढीत असे.गणप्या जशास तसे वागत असे.भांडणाने भांडण वाढत गेले .वैराने वैर वाढत गेले.

परश्या अनुकूल आहे असे पाहिल्यावर त्याला काही प्रश्न नव्हता . 

त्याचे आपल्या मुलीवर प्रेम होते .मुलगी जवळच राहिली तर त्यात त्याला आनंदच होता .सखाला तो  लहानपणापासून पहात होता. सखा निर्व्यसनी होता. त्याला सखा जावई म्हणून पसंत होता .

चांगला मुहूर्त पाहून गणप्याने परश्याकडे जायचे ठरविले  .नर्मदेमार्फत अगोदरच लक्ष्मीकडे तसा निरोप गेला होता.लक्ष्मीने नवऱ्याला उगीचच भांडण उकरून काढू नका असे समजाविले होते .तर तिकडे नर्मदेने तिच्या नवर्‍याला तुम्ही मुलीचे बाप आहात तेव्हा  नरमाईने घ्या असे बजावले होते .

शेवटी दिलजमाई झाली .देणे घेणे ठरले.मुहूर्त काढला. चांगल्या मुहूर्तावर लग्न झाले.

सखाने गुरवाला शंभर रुपयाऐवजी दोनशे रुपये दिले.लग्नात गुरव मानाने मिरवत होता .

सामायिक कुंपणाला आता एक दरवाजा करण्यात आला आहे .त्यातून परस्परांकडे ये जा असते .मटण, सागुती,गोडधोड, एकमेकांकडे पोचविले जाते .गण्याला गावात जायचे असल्यास तो आता बेधडक परश्याच्या शेतातून जातो.

*लक्ष्मी व नर्मदा बालपणापासूनच्या मैत्रिणी आता परस्परांकडे केव्हाही जातात .*

*दोघे वैरी, मित्र झाल्याचे पाहून गावाला अचंबा वाटतो .*

*कौल घेणे हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे असे काही जणांना कितीही वाटत असो ,परंतु त्यामुळेच शेजारी शेजारी जे वैरी होते ते आता मित्र झाले आहेत .* 

*सखा व गोदा यांच्या आनंदाला तर परिसीमा नाही. *

(समाप्त)

८/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel