( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
मीराला अगदी लहानपणापासून चित्रकलेची आवड होती .लहानपणी कोळसा घेऊन ती जमिनीवर किंवा भिंतीवर चित्रे काढीत असे .जमीन भिंत खराब केल्याबद्दल तिने अनेकदा आईचा बाबांचा ओरडा खाल्ला होता.थोडी मोठी झाल्यावर तिच्या हातात पेन्सिल आली.पेन्सिलीने भिंतींवर रेखाटलेली चित्रे पुसून टाकणे कठीण होते .बाबानी तिला कागद आणून दिले.त्यावर चित्रे हवी तेवढी काढ म्हणून सांगितले.सुरवातीला तिची चित्रे कळत नसत .हे चित्र काय आहे म्हणून तिला विचारल्यावर ती सूर्योदय, सूर्यास्त, डोंगर ,नदी ,समुद्र 'आकाशातील ढग, असे सांगत असे .सांगितल्यावर ते चित्र दिसू लागे. थोडी मोठी झाल्यावर तिची रेखाटने कळू लागली.उपजत तिला चित्रकला येत आहे हे बाबांच्या लक्षात आले .तिला त्यांनी चित्रकलेचा क्लास लावला .ड्रॉइंग कागद, निरनिराळ्या रंगांच्या पेन्सिली, वॉटर कलर्स, इत्यादी सामग्री अाणून दिली.
सर्व प्रकारची चित्रे ती काढीत असे.परंतु निसर्गचित्र व्यक्तीचित्र (पोट्रेट)यामध्ये तिला जास्त रुची होती.मनात असूनही काही कारणाने ती जेजे स्कूल ऑफ आर्टसला जाऊ शकली नाही.एकीकडे ती शिकत होती .तिने डबल पदवीही घेतली .तिने काढलेली चित्रे विकण्याचा प्रयत्न केला .कां कोण जाणे तिच्या चित्रांना विशेष ग्राहक नसत.अपेक्षित किंमत येत नसे .तिने प्रदर्शनातही भाग घेतला .तिच्या विविध चित्रांचे स्वतंत्र प्रदर्शनही भरविले.मनासारखा आर्थिक प्रतिसाद मिळत नव्हता .मिळाला नाही.वडिलांची आर्थिक स्थिती बरीच बरी होती .तिला नोकरी करण्याची गरज नव्हती .तिला वडिलांनी सांगितले होते .तुझी हौस भागवण्यासाठी जो खर्च येतो उदाहरणार्थ जलरंग तैलरंग कॅनव्हास कागद पॅलेट निसर्ग चित्रासाठी निरनिराळ्या ठिकाणी करावा लागणारा प्रवास व निवास, तो तू तुझ्या चित्रकलेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून भागविला पाहिजे . तेवढे उत्पन्न तिला नक्की मिळत होते .हातखर्चासाठी थोडे बहुत पैसेही उरत होते.एखादे निसर्गरम्य ठिकाण आहे असे कळले की ती तिथे आवर्जून जात असे.मीरा तिच्या चित्रकलेकडे आर्थिक उत्पन्न मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता आनंद निधान म्हणून पाहात असे .
शामला लहानपणापासून गायनाची आवड होती.गवयाचा पोर रडला तरी सुरांवर रडतो अशी म्हण आहे. त्याचे आई वडील गायक नसूनही त्याला गायनाची आवड होती .नुसती आवड नव्हती तर त्याचा गळाही गोड होता .लहानपणी सिनेमातून ऐकलेली गीते,रेडिओवर टीव्हीवर ऐकलेली भावगीते,चालीसकट सर्व सुरावट लक्षात ठेवून तो हुबेहूब वठवीत असे. जशी त्याला हलक्या फुलक्या सिनेगीत भावगीत यांची आवड होती . त्याचप्रमाणे क्लासिकल गायनाचीही,(अभिजात संगीताचीही) अावड होती.तो कुठचाही राग चटकन ओळखत असे .मीराच्या बाबांप्रमाणेच शामच्या बाबांनी ही त्याची जन्मजात आवड,गोड गळ्याची देणगी ओळखून त्याला गायनाची शिकवणी लावली होती.तो भजनेही सुरेख म्हणत असे .त्याला लागणारी तंबोरा तबला पेटी अशी काही वाद्ये विकत आणून दिली होती .ती थोडीबहुत वाजवण्याला तो शिकला होता .
त्याला गायनासाठी साथ पाहिजेच असा आग्रह नव्हता .पडणारा पाऊस, समुद्राच्या लाटा,वाहणारी नदी,रात्रीचे शांत वातावरण ,त्या त्या आवाजावर किंवा शांततेत त्याची गानसमाधी लागत असे.त्या त्या प्रसंगाला अनुरूप असा राग तो अाळवीत असे.किंवा केव्हा केव्हा प्रसंगाला अनुरूप असे एखादे हलके फुलके सिनेगीत भावगीत गायला सुरुवात करीत असे.मीराप्रमाणेच शामही त्याच्या कलेतून पैसा मिळवण्यास सक्षम ठरला नाही.ना त्याचे गायनाचे कार्यक्रम तिकीट लावून होत असत.ना त्याचा कुणी पार्श्वसंगीत गायनासाठी उपयोग करून घेत असे. त्याला गायनाच्या, भावगीत, चित्रगीतांच्या, कार्यक्रमासाठी बोलावणी, जरूर येत परंतु त्यातून अर्थार्जन विशेष होत नसे.
दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती.त्यांची कला केवळ आवड शौक म्हणून खपवून घेतली जात होती.परंतू असे फार दिवस चालणे शक्य नव्हते .त्यांची कला किंवा अन्य मार्ग यानी अर्थार्जन अनिवार्य होते.
कासचे पठार आपल्याला माहीत आहे.वर्षाच्या विशिष्ट हंगामात तिथे फुलणारी फुले व त्यांचा मनमोहक नजारा निदान प्रत्येकाने फोटो रूपाने पाहिलेला आहे .सह्याद्रीच्या रांगांमध्ये अशाप्रकारचा फुलोरा अनेक ठिकाणी आहे.निसर्गरम्य स्थळे अनेक आहेत.फक्त भ्रमंती करून ती शोधली पाहिजेत .
अशाच एका निसर्गरम्यस्थळी मीरा अावर्जून गेली होती.समोर हिरवेगार डोंगर, त्यामधून वाहणारी नदी,विविधरंगी फुलांचे ताटवे ,अशी निसर्गशोभा क्षितीज रेषेपर्यंत चारी दिशांना दिसत होती .अनंत हस्ते कमलावराने देता किती पाहशी दो नयनांनी ,अशी देहभान हरपणारी निसर्गशोभा होती.मीराला कागदावर काय उतरवू आणि काय उतरवू नको अशी अवस्था झाली होती .तिला या भागात निरनिराळ्या ठिकाणी फिरून अनेक भूमी चित्रे (लँडस्केप) करायची होती.जवळच्या शहरातील एका पथिक गृहात तिने आपला बाडबिस्तरा टाकला होता.तिने स्टॅंडवर कॅनव्हास ताणून बसविला होता.पॅलेटवर रंग घेतले होते .त्याची हवीतशी मिश्रणे केली होती.कॅनव्हासवर रंगांचे चार फटकारही मारले होते .
एवढ्यात लांबून काही मधुर आलाप तिच्या कानावर पडले.त्या मधुर स्वराने ती मोहित, आकर्षित,प्रभावित, भारित, झाली.निसर्गाचा नजारा पाहू ,निसर्गाचा नजारा कागदावर उतरवू,की वाऱ्याच्या लहरीवर येणारे मधुर स्वर ऐकू,की त्या स्वरांचा उगम कुठे आहे हे पाहण्यासाठी त्यांचा मागोवा घेऊ ,नक्की काय करू,ते तिला कळत नाहीसे झाले.ती संभ्रमित झाली.तिच्या बरोबरच्या मदतनीसाला लक्ष ठेव असे सांगून,मंत्रमुग्ध अवस्थेत ती स्वर्गीय स्वर येत होते त्या दिशेने चालू लागली.
थोड्याच वेळात ती स्वरांचा उगम जिथे होत होता तिथे पोचली.नदीच्या किनारी शाम डोळे मिटून गात होता.त्याचे डोळे अर्धोन्मीलित होते .तो समोरील दृश्य पाहातही होता आणि पाहतही नव्हता.त्याची भावसमाधी पाहता पाहता मीराचीही भावसमाधी लागली. सहजासनामध्ये शाम बसला होता.त्या प्रहरी उचित असा राग तो अाळवीत होता.त्याचे कुरळे केस वाऱ्यावर उडत होते .खांद्यापर्यंत वाढलेल्या त्याच्या केसांमध्ये तो एखाद्या राजकुमारासारखे दिसत होता.मध्यम उंची, विशाल भालप्रदेश, सावळा वर्ण,सरळ नासिका , बहुधा पाणीदार डोळे, अशी त्याची काही वैशिष्ट्ये मीराने चित्रकाराच्या नजरेने टिपली.त्याची गानसमाधी न मोडता ती तिथेच शेजारी हिरवळीवर त्यांचे गायन ऐकत बसली.
असा किती वेळ गेला कुणालाच कळले नाही.केव्हा तरी शामने डोळे उघडले.शामने डोळे उघडले तो त्याला समोर एक अनोळखी मुलगी बसलेली दिसली .तो येथे आला तेव्हा जवळपास कुणीही नव्हते.नंतर तो गानसमाधीत मग्न होता .त्याचवेळी ही येथे येऊन बसली असली पाहिजे. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले.
मीरा म्हणाली तुमच्या आवाजाची मी एक चाहती आहे .जवळ मी चित्र काढीत होते.वार्यावर तुमचे सूर कानावर पडले आणि सुरांचा उगम शोधत शोधत मी येथे आले .
मिश्किलपणे हसत शामने विचारले माझ्या चाहतीचे नाव मला कळेल काय!तिने आपले नाव मीरा म्हणून सांगितले .पुढे ती म्हणाली मी जवळच्या प्रतिभा पथिक गृहात थांबले आहे .हा सर्वच परिसर निसर्गरम्य आहे .मी चित्रकार आहे ."भूमी चित्रे" काढण्यासाठी मी येथे थांबली आहे.
शाम म्हणाला तुमची चित्रे तुमच्यासारखीच रेखीव आकर्षक असणार .मीही त्याच पथिक गृहात उतरलो आहे.मीही असाच एक निसर्ग वेडा आहे .निसर्गात फिरणारा मी वेडा पीर आहे.मी येथे काही दिवस राहणार आहे .तुम्हीही राहणार असालच.आता संध्याकाळ होऊ लागली आहे .तुम्हालाही पथिक गृहावर परत जायचे असेलच ?आपण बरोबरच जाउया.
तिने त्याचे नाव विचारण्याऐवजी त्याला मी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू असे विचारले.त्यावर अर्थातच शाम म्हणून त्याने सांगितले .त्यावर तिला मीरा का तो शाम, राधा का तो शाम या प्रसिद्ध गाण्याची आठवण झाली. आणि खुदकन हसू आले .
हसलात कां? असे शामने विचारताच ती सहजच असे लाजत म्हणाली.दोघेही बरोबरच हॉटेलवर परत अाली.तिथे शामचा चारच दिवस थांबण्याचा मनसुबा होता.मीराकडे पाहून त्याने आणखी काही दिवस राहण्याचे ठरविले.इथे काढलेली तिची विविध चित्रे त्याने पाहिली .तिच्या चित्रांचे फोटोही पाहिले .मनापासून तिच्या चित्रांना दाद दिली .
दोघे दऱ्याखोऱ्यात बरोबरच हिंडत असत .ती चित्र काढीत असे .हा गात असे .त्याच्या गायनाला, त्याच्या भक्तिगीतांना, भावगीतांना, ती मनापासून दाद देत असे .त्याची ध्वनिमुद्रित गीतेही त्याने तिला ऐकवली.तिच्या आग्रहावरून त्याने ती गीते तिच्या मोबाइलवर पाठविली .त्याचप्रमाणे त्याने आपल्या मोबाइलमध्ये तिची चित्रे संग्रहित करून ठेवली .
तिला चित्रांचे चांगले पैसे मिळत असावेत असा त्याचा ग्रह झाला.
जरी त्याची गीते आपण रेडिओ टीव्ही इत्यादी माध्यमांवर ऐकली नसली तरी ती माध्यमांवर येत असावीत .आपल्या लक्षात आली नसावीत असा तिचा समज झाला .त्यालाही गायनापासून मिळणारे उत्पन्न बर्यापैकी असावे असे तिला वाटले.
दोघेही आठ दहा दिवसांनी परत आपापल्या घरी आली . दोघेही एकाच शहरात राहात असली तरी प्रत्यक्ष भेटीबरोबरच व्हॉट्सअॅप फेसबुक इन्स्टाग्रॅम मोबाइल इत्यादी मार्फत परस्परांशी संवाद होत असे .
दोघेही आता ठरवून एकाच ठिकाणी जात .एकाच हॉटेलात उतरत.जोडीने बरोबरच हिंडत.ती चित्रे काढी.हा तिला चित्रे काढीत असताना तिला व ती चित्रे कशी काढते ते पाहात असे.
तो गात असे.ती ऐकत असे.पूर्वी तो केवळ स्वानंदासाठी गात असे .आता तो तिच्यासाठी गात असे .ती गीत सुचवी हा ते गाई.
एकूणच दोघांचे आकडे चांगले जुळले होते . अजून कुणीच कुणाला लग्नाबद्दल विचारले नव्हते .किंबहुना कुणी विवाहित आहे काय हेही विचारले नव्हते .परस्पर अविवाहित आहेत असे गृहीत धरून ती दोघे चालली होती .
(क्रमशः)
१६/९/२०२० © प्रभाकर पटवर्धन