(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
ज्या विकाराचा मुखवटा जो धारण करीत होता त्याचा ताबा तो विकार घेत होता.
मुखवट्यामुळे हे होत आहे याची जाणीव मुखवटा धारण करणाऱ्याला होत नव्हती.
आतापर्यंत फक्त दोन मुखवटे मामाच्या वाड्यात तळघरात नक्षीदार पेटीमध्ये जमा झाले होते .
अजून पांच मुखवटे हातगाडीवाल्याच्या हातगाडीवर सावजाची वाट पाहत होते.
उरलेले मुखवटे आणखी काय काय गोंधळ उडवणार होते, ते भविष्यकाळालाच माहीत.
३ *मद*
रागिणीताई मोटारीतून जात होत्या . त्या राज्याच्या मुख्यमंत्री त्याचप्रमाणे पक्षप्रमुख होत्या .त्यांच्या मागून कार्यकर्त्यांचा ताफा जात होता .मुख्यमंत्री असल्यामुळे सरकारी प्रोटेक्शन फोर्सही होता .ताफा आला म्हणून हातगाडीवाला जो मुखवटे विकत होता तो बाजूच्या गल्लीत गेला .रागिणीताई सर्वे सर्वा होत्या.त्यांच्याविरुद्ध कुणी काहीही बोललेले त्याना सहन होत नसे.एखाद्याने त्यांच्या हिताच्या चार गोष्टी त्यांना सांगितल्या तरी त्या त्यांना मान्य होत नसत.एवढेच नव्हे तर हा आगाऊपणा करतो म्हणून त्या त्याला दूर लोटत असत .त्यांचा अहंकार, मीपणा, औधत्य, कमालीचे होते .पक्ष संघटनेतील अनेक कार्यकर्ते त्यामुळे दुखावले गेले होते .बंड करण्यासाठी ते संधीची वाट पाहत होते .
रागिणी ताईंची मोटार गल्लीच्या जवळून जात असताना आपला हा फेरीवाला थोड्याच अंतरावर होता .हातगाडीवरील एक मुखवटा उडाला आणि रागिणीताईंच्या चेहऱ्यावर जाऊन चिपकला.त्यांना चेहऱ्यावर काहीतरी जोरात आपटले असे वाटले.चेहऱ्यावर त्यांनी चोळल्यासारखे केले. मुखवटा त्यांच्या चेहऱ्यात विरघळून गेला होता .त्यांना आपल्यात काहीतरी फरक पडत आहे असे वाटले.त्यांच्या शरीराची किंचित थरथर झाली .नंतर सर्व काही शांत झाले .मुखवट्याची मामाला माहित नसलेली ही आणखी एक खासियत होती.आपल्या प्रवृत्तीशी साध्यर्म असलेली एखादी व्यक्ती दिसली तर मुखवटा आपणहून त्या व्यक्तीच्या चेहर्यावर जाऊन चिपकत असे.ती प्रवृत्ती मुखवट्याला आकर्षून घेत असे.
रागिणी ताईंचा अहंकार जबरदस्त होता .यालाच मद असे म्हणतात .त्यामुळे हा मद मुखवटा त्यांच्या चेहऱ्यावर जावून आपणहून चिपकला.मुखवट्यांने, मद या विकाराने, रागिणी ताईंचा संपूर्ण ताबा घेतला .रागिणीताईची ही अवस्था आधीच मर्कट तशातही मद्य प्याला अशी झाली.फक्त मद्य या ऐवजी मद असे म्हटले म्हणजे झाले.
रागिणी ताईंचा हा ताफा त्यांच्या पक्षाच्या ऑफिसकडे चालला होता .आज पक्षाची महत्त्वाची बैठक होती .पक्षाच्या बैठकीत आज रागिणीताई काही वेगळ्याच वागत होत्या.त्यांचा ताबा मद, अहंकार याने घेतला होता. कुणाचीही साधी सूचनासुद्धा त्या एेकून घ्यायला तयार नव्हत्या.याचा अपमान कर. त्याचा अपमान कर.असे त्यांचे सारखे चालले होते .पक्षात नेहमीच चढाओढ स्पर्धा असते.येन केन प्रकारेण स्पर्धकाला डावलून बाजूला सारून पुढे जाण्याची प्रवृत्ती असते . आत्तापर्यंत अनेक जणांना त्यांनी दुखावले होते .पक्षावर त्यांची जबरदस्त पकड असल्यामुळे कुणीही काही बोलत नव्हते .गटबाजी अंतस्थ कारवाया चालूच होत्या .आजचे त्यांचे औधत्य , टाकून बोलणे,पक्षातील महत्त्वाच्या अनेक व्यक्तींचा अपमान करणे,ही उंटावरची शेवटची काडी ठरली.
रागिणी ताईंचा पक्षातील छुपा विरोधक आता उठून उभा राहिला .त्याने रागिणीताईं विरुद्ध अविश्वास ठराव मांडला.तो संमत झाला .पक्षात उभी फूट झाली .राज्यकर्ता पक्ष अल्पमतात गेला.सरकार कोसळले.आपणच सर्व कांही, अशा मदमस्त अवस्थेत त्या पक्ष बैठकीत आपण कसे काय बोललो,आणि एकाच वेळी अनेक जणांना कसे काय दुखविले, ते त्यांना कळेना. प्रत्यक्षात त्या बोलत नव्हत्या.त्यांच्या अंगात शिरलेला मद बोलत होता .त्याने त्यांची वाट लावली होती.
ज्या दिवशी पक्षात उभी फूट पडली त्या दिवशी रात्री रागिणीताई झोपल्यावर मुखवटा मामांच्या तळघरात आला.
४ *मोह*
नलिनीला तिला आवडणाऱ्या गोष्टींचा मोह पडत असे.तसा तो कुणालाही पडतो .परंतु प्रत्येक व्यक्ती मोह नियंत्रणात ठेवते .नलिनीचे तसे नव्हते .मोहामागे ती वाहत जात असे.त्या दिवशी रस्त्याने जात असताना तिला तो आपला गाडीवाला भेटला.लहान भावासाठी तिने एक मुखवटा विकत घेतला.आपल्या चेहर्यावर तो कसा काय दिसतो ते पाहण्याचा मोह तिला आवरला नाही. हा मोह मुखवटा होता.मुखवट्याने तिचा ताबा घेतला.मोहामुळे आपण काय करतो याचे भान तिला रहात नव्हते. .तिच्या वाटेवर सोन्या चांदीची एक मोठे दुकान होते .रस्त्याला लागून त्यांची शोरूम होती.त्या दिवशी शोरुममध्ये एक भरगच्च सोन्याचा हार प्रदर्शित केला होता .रस्त्याच्या कडेला उभी राहून ती तो हार बघत होती .तो हार घेतल्याशिवाय तिला चैन पडेना.काच अभेद्य होती.ती दुकानात शिरली .तिने तो हार दाखवण्याची विनंती केली.हार तिला दाखवण्यात आला .
तिला तो हार हवा होता. तिच्याजवळ अर्थातच पैसे नव्हते. तो हार घेऊन तिला पळून जायचे होते. तिने आसपास पाहिले .तिच्याकडे कुणाचे लक्ष नव्हते .बाहेर रखवालदार उभा होता.विक्रेत्याला तिने आणखी एक हार दाखवायला सांगितला . हार काढण्यासाठी त्याची पाठ वळताच तिने हार घेतला आणि दुकानातून बाहेर धूम ठोकली .दुकानातील माणूस तिला पकडा, तिला पकडा, म्हणून ओरडला.गुरखा रखवालदार तिच्या मागे पकडा पकडा म्हणून धावत सुटले.रस्त्यावर वाहनांची एकच गर्दी उसळली होती .गर्दीतून शिताफीने वाहनाना माणसाना चुकवत ती धावत सुटली होती.
अशा गर्दीतून सुसाट वेगाने वाकडे तिकडे पळत जात असताना जे व्हायचे ते झाले .ती एका टेम्पो खाली आली आणि चिरडली गेली .हार तिच्या हातात होता.ती मात्र हा देह सोडून गेली होती .
तिच्या मृत्यूबरोबर मोह मुखवटा बाहेर पडून आपल्या मूळ जागी गेला होता .जसा रात्री तो मूळ जागी येत असे तसा मृत्यू झाल्यावर मूळ जागी येत असे .
५ *लोभ*
वेळ सकाळची होती अजय मोटारसायकलवरून जात होता .समोरून त्याला त्याचा मित्र सुजय येताना दिसला .दोघांचेही परस्परांकडे लक्ष गेले .दोघे रस्त्याच्या कडेला गप्पा मारीत थांबले होते .दोघांच्याही गप्पा शेअर्सबद्दल चालल्या होत्या .कोणत्या शेअरचे भाव खाली येतील कोणत्या शेअरचे भाव वाढतील ,यावर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या.अजय एका विशिष्ट कंपनीचे शेअर्स गेले काही दिवस खरेदी करीत होता .त्याने त्याच्या जवळील सर्व पैसा त्यात गुंतवला होता.त्याचे भाव आणखी काही दिवस वाढत जातील असा त्याचा अंदाज होता.तरीही आज तो ते सर्व शेअर्स विकून टाकणार होता.जास्त लोभ नको असे त्याचे मत होते. शेअरचे काय सांगावे भाव घसरले तर तो डुबणार होता.भाव वाढलेले असल्यामुळे त्याला भरपूर फायदा होणार होता.तेवढ्यात त्याच्या जवळून खेळणी विक्री करणारा हातगाडीवाला गेला.हातगाडीवर फक्त तीन मुखवटे विक्रीसाठी ठेवले होते.त्याला त्यातीलच एक मुखवटा आपल्याला खुणावत आहे असे भासले.हातगाडीवाल्याकडून त्याने तो खरेदी केला.तो मुखवटा~लोभ~ होता.
सुजय त्याला म्हणाला अरे हा तू कुणासाठी विकत घेतला.अजय म्हणाला कुणासाठी असे नाही. आवडला घेतला.सुजय म्हणाला घालून तर दाखव बघूया कसा दिसतोस ते .अजयने मुखवटा चढवला .बघता बघता मुखवटा त्याच्यामध्ये विरघळून गेला .मुखवटा दिसत नाहीसा झाला .दोघेही ही काहीतरी जादू असावी असे समजून चमकले.फेरीवाल्याला हाक मारावी म्हणून ते पाहतात तो फेरीवाला दिसत नाहीसा झाला होता.दोघांनीही ती गोष्ट गंभीरपणे घेतली नाही .सुजय निघून गेला.
आता ~लोभ~ मुखवट्याने अजयचा ताबा घेतला होता . सारासार विचार करून अजय त्याने विकत घेतलेले शेअर्स विकून टाकणार होता.अती लोभ बरा नाही असे त्याने मनोमन ठरविले होते .परंतु आता त्याचा विचार बदलला .आणखी दोन चार दिवस थांबू, आणखी कर्ज काढून शेअर्स विकत घेऊ ,भरपूर नफा मिळवू ,असा विचार करून त्याने शेअर्स विकले नाहीत .
रात्री मुखवटा आपल्या जागेवर गेला .दुसऱ्या दिवशी शेअर्सचे भाव गडगडले .अजयचे दिवाळे निघाले.
लोभ मुखवट्याने त्याचे काम केले होते .
६~मत्सर~
सुनंदाचे प्रभातवर प्रेम होते.प्रभात विनितावर प्रेम करीत होता .तिघेही कॉलेजमध्ये शिकत होते .सुनंदा विनितावर जळत होती.
विनिता आपल्या मार्गातून दूर झाली तर प्रभात आपल्याला मिळेल अशी तिची समज होती.मत्सराने जळत असताना हातगाडी जवळून गेली. मत्सर मुखवटा तिला जाऊन चिपकला.काय झाले ते तिला कळले नाही .प्रभातला मिळवण्यासाठी काय वाटेल ते करावे असे तिला वाटू लागले.विनीताचा मृत्यू झाला तर आपल्याला प्रभात मिळेल अशी तिची ठाम समजूत झाली .
सुनिता व विनिता बरोबरच कॉलेजात येत जात असत.दोघीही गाडीची वाट पाहात होत्या .रेल्वे धाडधाड करीत स्टेशनमध्ये शिरली.विनीता आपल्याच विचारात मग्न होती.कदाचित तिला गाडीचा धक्का लागला असता. तिला वाचवण्याऐवजी सुनिताने एक लहानसा धक्का दिला.विनिता गाडीखाली सापडून मेली.मुखवट्याने आपले काम केले होते .आता प्रभात आपला या आनंदात सुनिता होती .सुनिताला प्रभात मिळाला नाही तो नाहीच.कारण प्रभात सुनितावर प्रेम करीत नव्हताच. एका पोलिसाने सुनिता विनिताला ढकलत असताना पाहिले होते .तिला पोलीस चौकशीला तोंड द्यावे लागले .आणखी कुणी साक्षीदार नव्हता.मी तिला वाचवत होते. त्यामध्ये ती ट्रॅकवर पडली, असे खोटे सांगून तिची सुटका झाली .ती मुळात वाईट नव्हती .जन्मभर ती पश्चातापाच्या आगीत जळत राहणार होती .
सहाही मुखवटे घातक होते .मुखवटा ज्याच्या जवळ जाई त्याचे तो कमी जास्त प्रमाणात नुकसान करीत होता.
एवढेच नव्हे तर त्याच्या जवळपासच्या लोकांवरही कमी जास्त वाईट परिणाम होत होता.
७ *अंतरंग *
गुप्तहेर प्रमुख नितीन बोस काही खरेदीसाठी पत्नीबरोबर दुकानात आले होते .त्यांनी मोटार पार्किंग लॉटमध्ये लावली होती.खरेदी संपवून परत जात असताना त्यांना आपला गाडीवाला दिसला.गाडीवर आता एकच मुखवटा उरला होता. सहज त्यांची दृष्टी त्या मुखवटय़ावर गेली. कां कोण जाणे त्याना त्या मुखवट्याबद्दल कुतूहल निर्माण झाले.त्यांनी तो विकत घेतला .त्या दिवशी सुट्टी होती.त्यानी तो न वापरल्यामुळे तो त्यांच्या बॅगेतच पडून होता .दुसऱ्या दिवशी , ऑफिसमध्ये गेल्यावर ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली.सहज चाळा म्हणून त्यांनी तो चढवला .मुखवटा त्यांच्या चेहऱ्यात विरून गेला .तेवढ्यात फोन आल्यामुळे त्यांनी फोन घेतला.फोन महत्त्वाचा असल्यामुळे ते आपण मुखवटा घातल्याचे विसरून गेले.
त्या मुखवट्यामुळे त्यांच्यात अामूलाग्र बदल झाला.त्या दिवशी ते ज्यांच्याकडे बघत त्यांचे अंतरंग त्यांना कळत असे.हे असे कां होत आहे ते त्यांना समजत नव्हते. कोण गुन्हेगार आहे,त्याने काय गुन्हा केला आहे,हे समजल्यामुळे पुरावे गोळा करणे सोपे जात होते.ते भराभर हुकुम सोडीत होते.त्यांचा दिवस फार छान गेला.गुन्हेगारांना मात्र तो दिवस वाईट गेला.
रात्री मुखवटा आपल्या मूळ जागेवर निघून गेला.
दुसऱ्या दिवशी ऑफिसवर गेल्यावर त्याना कालच्या प्रमाणे दुसऱ्याचे अंतरंग लक्षात येत
नव्हते.
काल सर्व काही स्पष्ट दिसत होते.लोकांचे अंतरंग स्पष्ट दिसत होते .काल आपण काम फार छान केले.आणि अाज पुन्हा आपण पूर्वपदावर आलो .
हे असे कां झाले ते त्यांचे त्यांना कधीच कळले नाही.
*त्यांनाच काय पण ज्यांच्यावर अनिष्ट परिणाम झाला, त्यांनाही कधी काही कळलेच नाही.*
*निरपराध व्यक्तीही यात मेल्या.*
*विनीताने असा कोणता गुन्हा केला होता की तिला सुनीताने ढकलल्यामुळे गाडीखाली सापडून मृत्यू यावा.*
*एका अर्थी नलिनीचाही हकनाक बळी गेला.*
*ज्यांच्या ज्यांच्यावर मुखवट्यांचा परिणाम झाला ते सर्व निरपराधी होते.*
*मुखवट्याच्या अंमलाखाली त्यांनी अयोग्य कृत्ये केली.*
*मुखवटे चोरीला गेल्यामुळे मामा हळहळत कां होता ते आता माझ्या लक्षातआले.*
(समाप्त)
१/८/२०२०©प्रभाकर पटवर्धन