( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

लहानपणापासूनच मी मुलींच्या बाबतीत लाजरा बुजरा आहे .मी लहानपणी दिसायला गोंडस होतो .अजूनही देखण्या  व्यक्तिमत्त्वात माझी गणना करायला हरकत नाही.गोंडस मूल कुणालाही पटकन उचलून घ्यावे असे वाटते.मुली बायका मला पटकन उचलून घेत असत. मी हमखास रडत असे. माझी आई सांगते कि ती सोडून आणखी कुणी बाईने मला घेतले की मी रडू लागत असे.तेच कुणा पुरुषाने मला उचलून घेतले तर मी हसू खेळू लागत असे. त्यामुळे मला स्त्रियांची अॅलर्जी आहे असा प्रवाद निर्माण झाला होता.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे लोक मला मी पुढे मोठेपणी संन्यास घेणार असे म्हणत असत.लहानपणी माझे टोपणनाव स्वामी म्हणून पडले होते .अजूनही कुणी कुणी मला स्वामी म्हणून हाक मारतात .

मी मोठा झालो बालवाडीत जाऊ लागलो .तिथेही माझी ही खोड टिकून होती.छोट्या छोट्या माझ्या बरोबरीच्या मित्रांमध्ये ही सहज मिसळत असे. माझ्या वयाच्या छोट्या मैत्रिणी मला आवडत नसत.छोट्या छोट्या बालवाडीतल्या मुलीना मी कुठे चिमटे काढ ,बोचकार, नाकच ओढ,पाठीत बुक्की मार, असा त्रास देत असे. अर्थात यातील काहीच मला  आठवत नाही. मोठे लोक सांगतात त्यावर विश्वास ठेवायचा !

पांचवीपासून मला थोडी थोडी आठवण आहे.आमच्या वर्गामध्ये मुली स्वतंत्र व मुले स्वतंत्र अशी बसण्याच व्यवस्था नव्हती.सर्व सरमिसळ बसत असत .आमच्या बाई किंवा शिक्षक प्रत्येकाच्या जोड्याही दर आठवड्याला बदलत असत .मुलांना व मुलींना परस्परांमध्ये मिसळण्याची एकमेकांजवळ बोलण्याची  सवय व्हावी .संकोच राहू नये .हा हेतू त्यामागे असावा .माझ्याशेजारी मुलगा असला म्हणजे मी आरामदायक  (कम्फर्टेबल) असे.कोणतीही मुलगी माझ्या शेजारी बसण्यासाठी आली तर मी अवघडलेला असे .मुली माझ्या शेजारी बसण्यासाठी उत्सुक असत. हे मला जाणवत असे. त्या माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत .माझ्याजवळ पेन्सिल,रबर, पट्टी, पेन, पुस्तक, मागत.मीच गोगलगाईसारखे स्वतःला आक्रसून घेत असे .मात्र त्या वयात मुलींना मी कधीही त्रास दिला नाही .इतर मुले मात्र कुठे शेपटा ओढ,काही तरी कागदावर लिहून पाठीवर  चिकटव,असे करीत असत.

याचा एखादा विपरीत अर्थ घेईल .परंतु तसे काहीही नाही .मला मनातून मुली आवडत .माझ्या शेजारी सुंदर मुलगी बसली तर मी जास्त खूष होत असे.मुली माझ्याशी बोलायला आल्यावर मला आतून आनंद होत असे .मी अंतर्यामी समाधानी व खूष असे. पण हे सर्व मनातल्या मनात.बोलताना मात्र माझी जीभ जड पडत असे .मला बोलताना शब्द सुचत नसत.मी मोठा होत गेलो .दहावीत गेल्यावर मी मनाने अनेक मुलींजवळ बोलत असे .गप्पा मारीत असे .त्यांच्याबरोबर सिनेमाला नाटकाला जात असे . बागेत फिरायला जात असे.मॉलमध्ये खरेदी करायला जात असे. पण हे सर्व दिवास्वप्नमनोरंजन या स्वरूपाचे असे. रात्रीही कधीकधी मुलींच्या बरोबर मी फिरत असल्याची स्वप्ने पडत.  प्रत्यक्षात मात्र एखादी  मुलगी जर माझ्याजवळ बोलायला आली तर मी कमालीचा संकोचत असे.बालपणीप्रमाणेच मला शब्द सुचत नसत.जीभ जड पडत असे.थोडक्यात "सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति" अशी माझी अवस्था होत असे.अर्जुन जसा रणांगणावर नातेवाईक समोर बघून गडबडला तसाच मीही समोर मुली बघून गडबडत असे.

कॉलेजात गेल्यावर तरी मी सुधारेन असे माझ्या मित्रांचे व घरच्यांचे मत होते.पण तिथेही मी पूर्वी सारखाच राहिलो. शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला लागल्यावरही ,आसपास अनेक मुली काम करीत असूनही ,माझ्यात  विशेष कांही फरक

पडला नाही .मुलींच्या बाबतीत मी भिडस्त संकोची असाच राहिलो.मुलींशी बोलताना मी गोंधळून जात असे.नेहमी हास्य विनोद करणारा ,अघळ पघळ गप्पा मारणारा ,आपल्या बोलण्यातून मनातील नेमका भाव मांडणारा ,ज्याला माझे मित्र शब्दप्रभू असे म्हणत तो मी, मुलींजवळ बोलताना  त त प प करीत असे. चाचरत असे.शेवटी स्वभावाला औषध नाही हेच खरे."जे गुण बाळा ते जन्म काळा" हेच खरे .हा कधी सुधारेल की नाही असा सर्वांनाच प्रश्न पडला होता.याचे लग्न कसे होणार ?झाले तरी सासुरवाडीला हा बावळट ठरणार अशी माझ्या आईला चिंता होती. बाबा म्हणत याचा संसार सुखाचा होईल.बायको बोलेल  हा फक्त ऐकेल.भांडण होण्याचा सवालच नाही !त्यावर आईचा फणकारा बघण्यासारखा असे .  

मुलींशी बोलताना उडणारी माझी धांदल भंबेरी यावरून माझ्या मित्रांमध्ये नेहमीच हास्य विनोद होत असत.  माझी चेष्टा टवाळी करणारे मित्र मात्र जेव्हा त्यांना त्यांच्या मैत्रिणीला एखादे पत्र लिहायचे असे तेव्हा माझा सहारा  घेत असत.त्यांच्या मैत्रिणीना प्रेमपत्र लिखाणाचे काम माझ्याकडे असे.मित्रांसाठी लिहिलेल्या माझ्या प्रेमपत्रामुळे मुली मित्रांवर भाळत असत.असे अनेक विवाह जुळविण्याची पुण्याई माझ्या नावावर आहे. 

मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की मला लिहिता उत्तम येते.संदेश स्वरूपात, लिखाण स्वरूपात गप्पा मारण्यात, मी माहीर आहे. तुमचे मित्र मैत्रिणी , जे परिस्थितीने दुरावले आहेत, स्मरणातून गेले आहेत,ज्यांचे काळाच्या ओघात विस्मरण झाले आहे, त्यांना कुठेही असले तरी पुन: जोडण्याचे हल्ली फेसबुक हे एक उत्कृष्ट माध्यम आहे.त्याचप्रमाणे तुम्ही आतापर्यंत मुळीच ओळखत नसलेल्या व्यक्ती, मित्र व मैत्रिणी म्हणून जोडण्याचे ते एक उत्तम माध्यम आहे .असे मित्र किंवा मैत्रिणीना कदाचित आयुष्यभर तुम्ही भेटणार नाही.तरी ते तुमचे मित्र व मैत्रिणी म्हणून असतील .यातील बरेच केवळ नावापुरते असतात परंतु काही मात्र खरेच जिवलग होऊ  शकतात.हेही तेवढेच खरे .फेसबुकच्या माध्यमातून अनेक विवाह जुळल्याचे मी पाहिले आहे.‍ 

व्हॉट्स अॅपमध्ये तुम्हाला फोननंबर लागतो. नाव नंबर इत्यादी निश्चित खात्रीलायक ओळख आवश्यक असते .फेसबुकवर तसे काही नाही .तुम्ही टोपण नावाने दुसराच एखादा फोटो अपलोड करून इतरांशी संवाद साधू शकता.अर्थात बहुतेकजण आपला खरा फोटो, खरी माहिती देत असावेत. दिलेली माहिती पाहून आपण मैत्रीची विनंती करू शकता.ती विनंती मान्य झाली तर तुमच्या गप्पा सुरू होतात. संदेश स्वरूपात तुम्ही गप्पा चॅटिंग कितीही वेळ करू शकता.एकाअर्थी अनोळखी माणसाशी आपले अंतरंग उघड करण्याचे,मोकळेपणाने गप्पा मारण्याचे ,अंतरंगात खदखदणारा एखादा विषय गप्पांच्या स्वरूपात संदेशांच्या स्वरूपात बोलून मोकळे करण्याचे एक उत्कृष्ट साधन आहे.मनात साठलेली मळमळ स्वच्छ करण्यासाठी त्याचा उपयोग होतो .फेसबुकवरील गप्पांचा मनोवैज्ञानिक परिणाम चांगला होत असतो.

नाव फोटो माहिती ही खोटी असते असे मला म्हणायचे  नाही .क्वचित असू शकते एवढेच दाखवायचे आहे .   

तर एफबीवर सर्फिंग करीत असताना मला एका मुलीचा फोटो दिसला .तिने आपले केस चेहर्‍याच्या डाव्या भागावर बरेच घेतले होते.ती मुलगी मला आवडली .तिने माझ्या हृदयात घर केले .मी तिला मैत्रीची विनंती फ्रेंड रिक्वेस्ट केली .तीही त्याच वेळी  फेसबुकवर होती .माझी रिक्वेस्ट तिने लगेच मान्य केली.जणू काही ती माझ्या फ्रेंड रिक्वेस्टची वाटच पाहात होती. आमच्या गप्पा सुरू झाल्या. नोकरी, शिक्षण, मित्र मैत्रिणी,पाहिलेले सिनेमा, पाहिलेली नाटके, केलेले प्रवास, वाचलेली पुस्तके, अश्या  विविध प्रकारच्या अनेक विषयांवर आमच्या गप्पा सुरू झाल्या .

रोज रात्री दहा वाजता मी फेसबुक उघडत असे.आम्ही दोघांनीही त्यावेळी एकमेकांना भेटण्याचे संकेत निश्चित केले होते .तीही त्यावेळी आवर्जून हजर असे.क्वचितच एक असे पण दुसरा नसे असे होत असे.विशेष  कारण असल्याशिवाय आमची गप्पा मारण्याची ही वेळ चुकत नसे.निदान आज भेटण्याला जमणार नाही एवढा संदेश तरी आम्ही टाकत असू. विशिष्ट विषयांवर गप्पा मारण्यासाठी आम्ही एकत्र येत होतो असे नाही. आज काय जेवण घेतले इथपासून  समाजकारण राजकारण दंगेधोपे आयुष्यातील पुढच्या योजना, नातेवाईक, कुठचेही विषय आम्हाला चालत असत. विषय महत्त्वाचे नसत.परस्परांचा ऑनलाइन सहवास, गप्पा, महत्वाच्या असत.

माझ्याच गावात ती रहाते अशी माझी कल्पना होती.ती तसे सांगत होती. मी ते मान्य केले होते.गावात घडणाऱ्या प्रासंगिक स्वरुपाच्या गोष्टींवरुन आमचा संवाद होत असे.त्यावरून ती बहुधा माझ्या गावात रहात असावी .

एक दिवस अशाच गप्पा मारीत असताना ती सहज बोलून गेली .

*अाज तू घातलेला शर्ट तुला फारच खुलून दिसत होता. तुला आकाशी रंग खुलून दिसतो .तुला कोणतेही माइल्ड कलर्स, मंद रंग चांगले दिसतात.*

*या तिच्या बोलण्यावरून तीही याच शहरात राहात होती एवढेच नव्हे तर ती कुठे तरी माझ्या आसपास राहत असावी .*

*किंवा मी जिथे नोकरी करतो तिथे किंवा त्याच्या जवळ कुठे तरी  नोकरी करत असावी.असा तर्क मी केला .*

(क्रमशः)

१/१०/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel