( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही सोमनाथ दर्शनासाठी गेलो होतो.त्यावेळी सोमनाथ जवळच हे अद्भुत कृष्णमंदिर आमच्या पाहण्यात आले.आमच्या मार्गदर्शकामुळेच आम्ही हे मंदिर पाहू शकलो.हे मंदिर प्रभासपट्टण पासून बरेच लांब असल्यामुळे सहसा येथे कुणी जात नाही.पर्यटक, यात्रेकरू, भाविक, या कुणालाच या मंदिराची माहिती नसते.मार्गदर्शक, टॅक्सीवाला,अशापैकी एखाद्याने या मंदिरात जाण्याचे सुचवले तरी अंतर बरेच असल्यामुळे मंदिरासारखे मंदिर असे म्हणत वेळ व पैसा खर्च करून जाण्यास सहसा कुणी तयार नसते.दैवात होते म्हणून आम्हाला असा मार्गदर्शक भेटला,आम्हाला जाण्याची श्रीकृष्णाने बुद्धी दिली व कृष्णाचे आणि कृष्ण मंदिराचे दर्शन झाले.
सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे सर्वांना माहीत आहेच.महंमद गजनवीने यावर अनेकदा स्वाऱ्या केल्या आणि मंदिराची नासधूस केली.अगणित संपत्ती लुटून नेली.या गोष्टी इतिहासाच्या पुस्तकातून सर्वाना माहीत झाल्या आहेत.आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या उद्ध्वस्त मंदिराचे पुनर्निर्माण सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले.उद्घाटनाला त्यावेळचे राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद आले होते.
सोमनाथ गुजरातमधील सौराष्ट्र विभागात समुद्रकिनारी प्रभासपट्टण तीर्थक्षेत्री आहे. वेरावळ बंदराजवळ हे तीर्थक्षेत्र व मंदिर आहे.
प्रभासपट्टण तीर्थ अनेक कारणांनी सर्वांना माहीत आहे.सोमनाथ मंदिर स्थापनेच्या अगोदर पासून हे तीर्थ होते.चंद्राला दक्षप्रजापती कडून शाप मिळाला.हा शाप कां मिळाला त्याची कहाणी थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
सोम म्हणजे चंद्र अत्यंत तेजस्वी,सुंदर परंतु शांत असे व्यक्तिमत्त्व होते.त्याची मोहिनी कोणत्याही व्यक्तीवर पडत असे.दक्ष प्रजापती हा राजा होता.त्याला सत्तावीस कन्या होत्या.त्याने त्यांचा विवाह सोम म्हणजेच चंद्र याच्याशी केला.या सत्तावीस कन्यांमध्ये रोहिणी ही अत्यंत सुंदर होती.सर्व कन्याना चंद्र समान वागणूक देईल अशी दक्ष प्रजापतीची कल्पना होती.सोम केवळ रोहिणीमध्येच रममाण होता.दक्षाच्या इतर कन्यांनी वडिलांकडे चंद्राच्या वर्तणुकीबद्दल तक्रार केली.दक्षाने चंद्राला तुला क्षय होईल असा शाप दिला.दिवसेंदिवस चंद्र कृश व निस्तेज होत गेला.चंद्र निस्तेज झाल्यामुळे वनस्पतींवर वाईट परिणाम होत होता.शापमुक्त होण्यासाठी विष्णूने चंद्राला शंकराची उपासना करण्यास सांगितले.या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने प्रभासपट्टण येथे शंकराची उपासना केली.तप केले.शंकर प्रसन्न झाले.चंद्र म्हणजे सोमला उ:शाप मिळाला.परंतु दक्ष प्रजापतीच्या शापापासून पूर्ण मुक्तता मिळाली नाही.पंधरा दिवस चंद्राचा क्षय होतो.अमावस्येला चंद्र लुप्त होतो.शुक्ल प्रतिपदेपासून पुन्हा पौर्णिमेपर्यंत तेजस्वी होत जातो.या कालखंडात तो दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस मुलींच्या प्रासादाना भेट देतो म्हणजेच सत्तावीस नक्षत्रांमध्ये फिरतो.
सोमच्या विनंतीवरून भगवान शंकर इथे राहिले.शंकराच्या मंदिराला सोमनाथ असे नाव पडले.बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे.
तीर्थस्थान म्हणून चंद्राने तपश्चर्येसाठी प्रभासपट्टण तीर्थक्षेत्र निवडले होते.येथे तीन नद्यांचा संगम म्हणजेच त्रिवेणी संगम आहे. सरस्वती कपिल व हिरन या त्या तीन नद्या होत.द्वारकेपासून याचे अंतर सुमारे दोनशे किलोमीटर आहे.यादव अनेकदा पर्वणीकाळात येथे स्नानासाठी येत असत.येथूनच श्रीकृष्ण निजधामास गेले.यादवांचा वारुणीच्या नशेमध्ये आपसात लढल्यामुळे येथेच विनाश झाला.हे सर्व आपल्याला माहीत असेलच.(श्रीकृष्णचा मुलगा सांब यादवांच्या विनाशाला कारणीभूत कसा झाला आहे याची कथा येथे विस्तारभयास्तव देत नाही.) या तीर्थक्षेत्री अनेक मंदिरे आहेत.बहुतेक मंदिरे कृष्णाची आहेत परंतु काही मंदिरे शंकराची व इतर देवदेवतांची आहेत. येथे जैन मंदिरही आहे.
आम्ही वेरावळ येथे उतरलो होतो.आमच्या हॉटेलमध्येच रमाकांत नावाचे एक मध्यमवयीन गृहस्थ आमची चौकशी करीत आले.त्यांना हॉटेल मालकानेच आमच्याकडे पाठविले होते.मार्गदर्शक म्हणून तुमच्याबरोबर मी येऊ का? अशी विनंती त्यांनी केली.यात्रेला आलेल्या लोकांना मार्गदर्शक म्हणून ते काम करीत असत.त्यांचा स्वभाव आम्हाला आवडला. त्यांच्याबद्दल आमचे मत चांगले झाले.आम्ही त्यांच्याबरोबरच सर्वत्र फिरण्याचे ठरविले.
प्रत्येक ठिकाणी ते सविस्तर वर्णन करून इतिहास पुराणकथा इत्यादी सांगत असत.अर्थात त्यातील बऱ्याच गोष्टी आम्हाला माहीत होत्या.कांही नवीन गोष्टी कळत होत्या.माहीत असलेल्या गोष्टींची उजळणी होत होती.आम्ही त्यांना हे आम्हाला माहीत आहे ते आम्हाला माहीत आहे असे करून अडविले नाही.त्याची वर्णनशैली लाजवाब होती.त्यांचे बोलणे ऐकत राहावे असे वाटत होते. त्यातून कित्येक नवीन माहितीही कळत होती. सकाळपासून दुपारपर्यंत आमची तीर्थयात्रा चालली होती.
आता सर्व यात्रा पुरी झाली म्हणून आम्ही हॉटेलवर परत येण्यास निघणार होतो.एवढ्यात रमाकांतनी आम्हाला एक विनंती केली.येथून जवळच सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर हिरण नदीच्या काठी श्रीकृष्णाचे एक अद्भुत मंदिर आहे.तुमच्याजवळ वेळ असेल आणि इच्छा असेल तर मी ते तुम्हाला दाखवतो असे ते म्हणाले.
सुमारे पन्नास किलोमीटर म्हणजे येऊन जाऊन निदान तीन तास लागणार. रस्ता चांगला असेल असे आम्ही गृहीत धरत होतो. इतक्या लांब जाऊन त्यात पाहण्यासारखे ते काय असणार? कृष्णाची अनेक मंदिरे आपण पाहिली आहेत अशी आमची आपसात चर्चा सुरू झाली.त्यावर ते गृहस्थ म्हणाले तुमची चक्कर फुकट जाणार नाही.तुमचा वेळ व पैसा फुकट जाणार नाही.याची मी तुम्हाला खात्री देतो.तिथे एवढे अद्भुत काय आहे ते आम्हाला सांगा म्हणजे आम्ही जायचे की नाही ते ठरवतो असे आम्ही म्हणालो.
त्यावर रमाकांतनी जर तुम्हाला तिथे जाऊन,मंदिर पाहून, पुरेसा आनंद मिळाला नाही तर तुम्ही मला माझे पैसे देऊ नका.त्या मंदिराबद्दलची माहिती तिथेच देणे जास्त संयुक्तिक होईल.असेही ते पुढे म्हणाले.आतापर्यंत रमाकांतबद्दल आमचा अनुभव चांगला होता.ते मंदिर खरेच दर्शनीय असणार अद्भुत असणार असा तर्क आम्ही बांधला. शेवटी आम्ही ते मंदिर पाह्यला जाण्याचे ठरविले.
हिरण नदीच्या काठाकाठाने होणारा प्रवास आनंददायी होता.कांही वेळा नदी जरी रस्त्यापासून दूर असली तरी बऱ्याचवेळा ती रस्त्याच्या जवळच होती.रस्त्याच्या एका बाजूला नदी व दुसर्या बाजूला कोकणाप्रमाणे नारळाची झाडे व शेती पाहात असताना मंदिर केव्हां आले ते कळले नाही.
मंदिर छोटेसे असले तरी त्याचे प्रांगण मोठे होते.प्रांगणामध्ये लहानमोठी शोभेची व इतर झाडे लावली होती.एक लहानसे तळेही होते.बाहेरून मंदिर प्रशस्त प्रांगण व सर्व परिसर बघून आम्हाला आमचे पैसे वसूल झाले असे वाटले.आमची सर्व थकावट दूर झाली.
अजून मंदिर उघडले नव्हते.प्रांगणात असलेल्या बाकांवर आम्ही बसलो.आमच्या पाठीमागे सूर्य पश्चिमेकडे कलला होता.समोरच मंदिर होते.मंदिराबद्दल कहाणी रमाकांत सांगू लागले.
अकराव्या शतकात राजा भोजने हे मंदिर बांधले असा उल्लेख शिलान्यासामध्ये सापडतो.मंदिराचे दोन भाग कल्पिता येतील.गाभारा व मंडप.गाभाऱ्यामध्ये सर्व शिल्पे संगमरवरी दगडातील आहेत.यमुना वाहात आहे. त्याच्याकाठी गाई चरत आहेत.एका कदंब वृक्षाखाली पारावर (चबुतऱ्यावर)बसून कृष्ण मुरली वाजवीत आहे.अशी शिल्पे आहेत.जवळजवळ हजार वर्षे झाली तरीही शिल्पे कालच तयार केल्यासारखी वाटतात.गर्भगृहाच्या बाहेरही भिंतीवर पौराणिक प्रसंगातील निरनिराळी शिल्पे आहेत.मंडपात कासव मध्यभागी आहे.बाजूला भक्तांना बसण्यासाठी भरपूर जागा आहे.गाभार्यात जाण्याची परवानगी फक्त पुजाऱ्याला आहे.पुढच्या बाजूला गज असलेला दरवाजा आहे.उरलेल्या तीन बाजूंना प्रशस्त खिडक्या आहेत.प्रत्येक खिडकीतून व पुढील दरवाजातून एकच दृश्य दिसते.शिल्पकाराची खुबी, त्याचे कसब असे आहे कि तुम्ही कुठूनही पाहिले तरी कृष्ण व गाई तुमच्याकडे पाहात आहेत असे वाटते.
म्हैसूरच्या राजवाड्यात आम्ही भिंतीवर घोड्यावर बसलेल्या सैनिकांची तैलचित्रे पाहिली होती.चित्रकाराची खुबी अशी होती की कुठूनही तुम्ही पाहिलेत; समोरून, डावीकडून, उजवीकडून, तरी सर्व सैनिक व घोडे तुमच्याकडेच पाहात आहेत असे वाटत असे.
चित्रकारांचे ते कसब पाहून आम्ही त्यावेळी आश्चर्यचकीत झालो होतो.शिल्पामध्येही तशीच शिल्पे तयार करता येतात याची आम्हाला कल्पना नव्हती.अजून तशी शिल्पे आम्ही बघितली नव्हती. मंदिरात जाऊन ती शिल्पे पाहण्यासाठी आम्ही उत्सुकतेने उठलो.तेवढ्यात रमाकांत म्हणाले अजून गोष्ट संपली नाही.मंदिरही बंद आहे.(गोष्ट ऐकताना मंदिर बंद आहे हे आम्ही विसरलोच होतो.)पुजारी एवढ्यात येतीलच.त्यांनी मंदिर उघडल्याशिवाय तुम्हाला आत जाता येणार नाही.
*या मंदिराला कडी, कोयंडा, कुलूप,अंगचे कुलूप, साखळदंड, इत्यादी कांहीही नाही.*
*फक्त दोन दरवाजे आहेत.ते दरवाजे मंत्र म्हणून पुजाऱ्याने बंद केले की कुणालाही उघडता येत नाहीत.फक्त पुजाऱ्याला उघडता येतात.*
*प्रत्येक दरवाज्याला एक गुंडी आहे.ती गुंडी धरून पुजारी मंत्र म्हणतो.त्यानंतर दरवाजा उघडतो.*
*गाभाऱ्याचा दरवाजाही तसाच बंद होतो.कडी कुलुपाशिवाय दरवाजे कुलूप लावल्यासारखे बंद असतात.*
(क्रमशः)
२७/९/२०२१©प्रभाकर पटवर्धन