(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
हनुमंत म्हणाले ठीक आहे परंतु त्यावेळी मी द्रोणागिरी पर्वत उचलून आणत असल्यामुळे विराट रूप धारण केले होते .ते रूप इतके प्रचंड होते की ते तू पाहू शकणार नाहीस.तू मूर्छित पडशील.
मी मूर्छित पडणार नाही.मी तुमचा भक्त आहे .तुमच्या कृपाप्रसादाने, तुमच्या आशीर्वादाने, मी ते सर्व सहन करू शकेन. असे मी त्यांना म्हणालो.
मला ते सर्व काही पहायचे आहे असा मी त्यांच्याशी हट्ट धरला. भक्ताच्या हट्टापुढे देव विवश असतात .भक्त परमेश्वराचा दास असतो तर त्याच्या भक्तीमुळे परमेश्वर भक्तांचा दास होतो अशी अनेक उदाहरणे इतिहासात आहेत.
मी वर्णन केलेला प्रसंग मला प्रत्यक्ष दाखविण्यासाठी त्यांना प्रथम मला लक्ष्मण जेथे मूर्छित पडले त्या जागी युद्धभूमीवर लंकेत नेणे भाग होते.नंतर मला त्यांच्याबरोबर हिमालयात नेणे भाग होते.परत समुद्र किनारी लक्ष्मण जिथे मूर्छित होता तिथे आणणे भाग होते . शेवटी मला माझ्या गावातही त्यांना सोडावे लागले असते .
एका रात्रीत काही तासात हनुमंतांनी हा हिमालयाचा प्रवास केला होता.त्यासाठी त्यांना विराट रूप धारण करावे लागले होते . हा प्रवास विलक्षण गतीने झाला होता .ती विलक्षण गती, ते जगड्व्याळ विराट रूप, तो हवेमध्ये क्षणोक्षणी पडणारा फरक, हवेतून प्रचंड गतीने जाताना लागणारा सुसाट वारा , हे सर्व मला सहन होणे अशक्य आहे याची भगवंतांना कल्पना होती .मला माझी काळजी नसली तरी हनुमंतांना माझी काळजी होती .
हा सर्व विलक्षण न भूतो भविष्यती, असा प्रवास मला सहन व्हावा म्हणून त्यांनी प्रथम माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेविला.मला माझी काया वज्रासमान झाल्याचा अनुभव मिळाला. दृष्टी अत्यंत तीक्ष्ण झाली .मला अंधारातही दूरचे स्पष्ट दिसू लागले .सुईएवढ्या लहान वस्तूही स्पष्ट दिसू लागल्या.अंगावर एखादा खडक पडला तरी मला काहीही होणार नाही, अशी अंतर्यामी खात्री पटली. एवढा दीर्घ प्रवास तोही अत्यंत जलद गतीने सहन होण्यासाठी वज्रकायेची व तीक्ष्ण दृष्टीची नितांत गरज होती.
लक्ष्मण शक्ती लागून मूर्छित पडतो येथून माझ्या प्रत्यक्ष रामायण चरित्र दर्शनाला सुरुवात झाली. रात्रीची वेळ होती .सागर किनारा होता .सागराची गाज ऐकू येत होती .प्रभू रामचंद्रांच्या वानरसेनेची छावणी दिसत होती.सर्वत्र लहान लहान राहुट्या पसरल्या होत्या .सर्वत्र पेटते पलिते उभे केलेले होते.त्यामुळे सर्व छावणी प्रकाशमान झाली होती . युद्धात जखमी झालेल्या वानर सैनिकांची देखभाल वैद्य करीत होते.
शक्ती लागून लक्ष्मण मूर्छित झाले ही बातमी सर्वत्र पसरली होती.सर्व राहुट्यांमध्ये शांतता पसरली होती .कुणालाही अन्नग्रहण करवत नव्हते.दिवसभर युद्ध करून दमलेले असतानाही कुणालाही झोप येत नव्हती .
शक्ती लागून लक्ष्मण मूर्छित पडले होते.सुग्रीव नल नील अंगद हनुमान राम सर्व चिंतीत होते.सुग्रीव सेनेतील वैद्यानी लक्ष्मणला तपासून यावर काही उपाय नाही असे सांगितले.रावणाच्या लंकेत सुषेण नावाचे एक नामांकित धन्वंतरी आहेत ,तेच काहीतरी करू शकतील असे वैद्यांनी सांगितले . सुषेण वैद्यांना आणण्याची जबाबदारी हनुमंताने स्वतःच्या शिरावर घेतली .
त्याना हनुमंत त्यांच्या घरासह घेऊन आले.सुषेण वैद्यांनी अगोदर तपासण्यास नकार दिला. मी रावणाचा वैद्य आहे.त्याच्या शत्रूला मी कसा तपासू?मी त्यावर उपचार कसा करू?ते योग्य होणार नाही .असा प्रश्न त्यांनी विचारला. असे करणे नीतीबाहय़ आहे असे त्यांचे म्हणणे होते.
शारीरिक, मानसिक, पीडा दूर करणे ही प्रत्येक वैद्याची नैतिक जबाबदारी आहे.रोग्याची जात धर्म पंथ राष्ट्रीयत्व यातील काहीही लक्षात न घेता त्याने पीडा दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तोच त्यांचा धर्म आहे .
नल, सुग्रीव ,हनुमंत, या सर्वानी वैद्य कसा असला पाहिजे? त्याची जबाबदारी कोणती ?त्याचा धर्म कोणता?याची त्यांना नम्रपणे जाणीव करून दिली.
त्यांना आपल्या वैद्य धर्माची जबाबदारीची जाणीव झाली . त्यांनी लक्ष्मणाला काळजीपूर्वक तपासले .संजीवनी नावाच्या एका वनस्पतीचा रस काढून त्याचा सूर्योदया अगोदर जर वापर केला तरच लक्ष्मण शुद्धीवर येऊ शकेल.अन्यथा कधीच नाही असे त्यांनी सांगितले .
एका कोपऱ्यात बाजूला उभा राहून मी विस्फारीत नेत्रांनी हे सर्व पाहात होतो.लंकेच्या उत्तर तीरी सागर किनारी पृथ्वीच्या विस्तारीत पटावर हे सर्व दृश्य मी पाहात होतो .माझे दैवत हनुमंतांच्या कृपेने हे सर्व दृश्य मला याची डोळी याची देहा दिसत होते.
श्रीरामानी ही वनस्पती कुठे मिळेल असे विचारले .सुषेण वैद्यानी ही वनस्पती हिमालयात द्रोणागिरी नावाचा एक पर्वत आहे.त्यावर मिळेल असे सांगितले .त्याचबरोबर पुढे असेही सांगितले की येथून, लंकेच्या उत्तरेकडील टोकाकडून हिमालयापर्यंत जाणे व वनस्पती घेऊन सूर्योदया अगोदर इथे येणे शक्य नाही . त्यामुळे तुम्ही लक्ष्मण उठेल हे आता विसरा .मला परत माझ्या घरासकट जाग्यावर पोचवून द्या असेही सांगितले.
.ही बातमी सर्व वानरसेनेत काही क्षणात पोचली.हे सर्व ऐकल्यावर सर्वत्र शोकाचे वातावरण पसरले .इतकी शांतता पसरली होती की केवळ समुद्राची गाज ऐकू येत होती .श्रीराम सुग्रीव अंगद नल नील सर्वांचे चेहरे गंभीर झाले होते.
सर्वत्र लहान मोठ्या राहुट्या पसरलेल्या होत्या .पेटते टेंभे प्रकाश ओकीत होते.समुद्राचे पाणी चमकत होते .सर्वत्र विषण्णता पसरली होती.हनुमंत पुढे झाले आणि त्यांनी धीरगंभीर स्वरात सांगितले मी ती वनस्पती घेऊन येतो.सर्वांना अत्यानंद झाला . भगवान हनुमंत मला विसरतात की काय असे मला वाटले .परंतु तसे झाले नाही.भक्त जसा कधीही भगवंताला विसरत नाही त्याप्रमाणेच भगवंतही भक्ताला कधीही विसरत नाही . हनुमंताने त्यांच्या शेल्याने मला कंबरेला बांधले .अकस्मात हनुमंताने विराट रूप घेतले . कमरेच्या शेल्याला एखाद्या बोटाएवढा दिसत असलेला मी, माझ्या प्रिय हनुमंताचे आकाशात गेलेले मुख पहात होतो.पाय दूरवर जमिनीजवळ दिसत होते .हनुमंतांनी क्षणात उड्डाण केले. हनुमंत जमिनीला समांतर होऊन हिमालयाच्या दिशेने निघाले होते.आणि त्या अद्भुत दृश्याचा मी साक्षीदार होतो .विमानातून जाताना पृथ्वीचा नजारा मी अनेकदा पाहिला होता.
हनुमंताचा वेग इतका प्रचंड होता की जर त्यांनी मला वज्र काया व तीक्ष्ण दृष्टी दिली नसती तर मी बहुधा बेशुद्धच झालो असतो .संजीवनी वनस्पतीची मलाच प्रथम गरज लागली असती.मी अनेकदा विमान प्रवास केला आहे .हनुमंताची गती विमानाच्या गतीच्या कित्येक पटींनी जास्त होती .आम्ही थोड्याच वेळात हिमालयाजवळ पोहोचलो.तिथे एक गवताने शाकारलेली झोपडी दिसत होती .शेजारीच एक साधू रामनामाचा जप करीत बसले होते .जवळच एक तलाव होता .हिमालय जवळ आला होता.थोडा श्रमपरिहार करावा असे हनुमंतांना वाटले. हनुमंत भूमीवर उतरले.त्यांनी आपले मूळ रूप धारण केले होते.
श्रमपरिहारासाठी हनुमंत त्या तलावात गेले.त्यांनी पाण्यामध्ये डुबी मारली तर आपण मरणार हे माझ्या लक्षात आले.परंतु त्यांना मी त्यांच्या कमरेला आहे याची जाणीव होती.
मांडीपर्यंत पाणी येईल एवढ्याच पाण्यात ते गेले. ओंजळीत पाणी घेऊन त्यांनी ते आपल्या अंगावर उडविले . तेवढ्या पाण्याने माझे सर्वांग ओले झाले. एवढ्यात एका मगरीने त्यांचा पाय पकडला .मगर त्याना खोल पाण्यात खेचत होती.बळकट जबड्यात त्यांचा पाय असूनही, मगर त्यांना ओढत असूनही, ते तसूभरही हलले नाहीत . त्यानी त्यांच्या बळकट हाताने मगरीचा जबडा पकडला. हां हां म्हणता ,मगरीचा जबडा धरून त्यांनी एखादा कागद फाडावा त्याप्रमाणे तिचे दोन तुकडे केले .मगर मृत झाली होती.एक सुंदर अप्सरा त्यांच्यापुढे उभी राहिली .ती शापित अप्सरा होती .तिने तो साधू प्रत्यक्षात साधू नाही, तर रावणाने पाठविलेला तो राक्षस आहे असे सांगितले व ती गुप्त झाली.
हनुमंतांनी त्या राक्षसाला पकडून त्याच्या डोक्यावर त्यांची वज्रमूठ मारली . राक्षसाच्या डोक्याचे चूर्ण झाले होते.पुन्हा विराट रूप धारण करून हिमालयाच्या दिशेने आम्ही उड्डाण केले .आम्ही द्रोणागिरी पर्वतावर पोहोचलो.कोणती वनस्पती घ्यावी ते हनुमंतांच्या लक्षात येत नव्हते.सर्वत्र अक्षरश: असंख्य वनस्पती त्या पर्वतावर होत्या.सर्व वनस्पती अदभुत प्रकाश टाकत होत्या .बहुधा त्या सर्वच वनस्पती औषधी होत्या. सर्व पर्वतावर असंख्य दिवे लावलेले आहेत आणि ते प्रकाश सोडीत आहेत असे भासत होते .काळोखातही प्रकाशाने पर्वत चमकत होता .आसपासचा परिसरही प्रकाशमान झाला होता .
हनुमंतांना सुषेण वैद्यांनी सांगितलेली संजीवनी वनस्पती कोणती ते लक्षात येत नव्हते.चुकून दुसरी वनस्पती नेली असती तर लक्ष्मणाचे प्राण संकटात पडले असते.हनुमंतांनी क्षणभर विचार केला . जास्त वेळ न दवडता हनुमंतांनी आणखी विराट रूप धारण केले.पर्वत जमिनीपासून उखडून आपल्या हातावर घेतला.आणि आकाशात उड्डाण केले.वायुगतीने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला .अयोध्येवरून जात असताना भरताला हा कुणीतरी राक्षस रामावर हल्ला करण्यासाठी जात आहे असे वाटले .त्यांनी एक बाण सोडला .भरताचा मान राखण्यासाठी हनुमंत खाली उतरले .
सत्य परिस्थिती कळल्यावर भरतानी हनुमंताची क्षमा मागितली .आम्ही पुन्हा आकाश प्रवासाला सुरुवात केली.पहाटेच्या सुमारास आम्ही सागर किनारी पोचलो .राम, सुग्रीव,नल, नील, अंगद,सर्वजण आमची आतुरतेने वाट पाहात होते.
द्रोणागिरी पर्वत आणलेला पाहून सुषेण वैद्य चकित झाले होते.वनस्पती न आणता पर्वतच का आणला असे त्यानी विचारले.संजीवनी वनस्पतीची ओळख न पटल्यामुळे मी असे केले हनुमानानी सांगितले .
द्रोणागिरी पर्वत खूप उंच होता.वनस्पतींचा प्रकाश सर्व सेनेवर पडला होता .सुषेण वैद्याना पर्वतावर चढून वनस्पती आणीपर्यंत बराच वेळ गेला असता.हनुमंतांनी पर्वता शेजारी उभे राहून सुषेण वैद्यांना उचलले.त्यांनी सांगितले त्या वनस्पतीजवळ त्यांना ठेविले.प्रथम वैद्यांनी संजीवनी वनस्पतीची प्रार्थना केली .रोगपरिहारार्थ वनस्पती वापरीत आहे तरी मला परवानगी द्यावी अशा प्रकारची ती प्रार्थना होती. वैद्यांनी संजीवनी वनस्पतींची पाने खुडून घेतली .एक मूळही घेतले. हनुमंताने सुषेण वैद्यांना उचलून त्यांच्या झोपडीत ठेवले. त्यांनी संजीवनी वनस्पतीचा रस काढून तो लक्ष्मणाला पाजला.संजीवनी वनस्पतीच्या मुळ्या हुंगण्यास दिल्या. लक्ष्मण लगेच शुद्धीवर आले .तोपर्यंत सूर्योदयाची वेळ झाली होती.पूर्वेला तांबडे फुटले होते .सर्वत्र संधिप्रकाश पसरला होता. द्रोणागिरी पर्वतावरील दिव्य वनस्पती हिमालयातील विशिष्ट वातावरणातच वाढतील,त्यांचे गुणधर्म तसेच राहतील ,यासाठी द्रोणागिरी पर्वत पुन्हा त्यांच्या मूळ जागी ठेवण्यास वैद्यराजानी हनुमंताला सांगितले.पर्वत एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागी ठेवणे हे प्रकृतीच्या विरुद्ध आहे,असे वैद्यराज म्हणाले . हनुमंताने प्रथम सुषेण वैद्यांना त्यांच्या घरासकट लंकेत पोचविले.
सुषेण वैद्यांच्या सांगण्याप्रमाणे हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलला आणि हिमालयात जाग्यावर नेऊन ठेवला.त्यांच्याबरोबर मीही गेलो होतो .परत येताना त्यांनी मला आमच्या गावांत सोडले .आणि ते गुप्त झाले.
रामायणातील जगलेला हा प्रसंग व हनुमंताबरोबर केलेला प्रवास मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.
अजून रामनवमीला दोन दिवस शिल्लक होते.दुसऱ्या दिवशी राम भजन चालू असताना मी सर्वांना निरखीत होतो .आज हनुमंतांनी वृद्धाचे रूप न घेता एका तरुणाचे रूप घेतले होते.मी त्यांना बरोबर ओळखले .भक्तिभावाने मी त्यांना दुरूनच नमस्कार केला .ओळखीचे स्मित करीत त्यांनीही मला नमस्कार केला .
*रामकथा जिथे चालू असते तिथे हनुमंत हजेरी जरूर लावतात. फक्त आपल्याला त्यांना ओळखता यायला हवे.*
त्यांना ओळखण्याची एक खूण मी सांगतो .ज्यांचे डोळे अर्धोन्मीलित असतील ,ज्यांच्या चेहऱ्यावर भक्तीभाव ओसंडून वाहत असेल,जे रामकथेशी संपूर्णपणे तादात्म्य पावले असतील,ज्यांचे शरीर एखाद्या पहिलवानासारखे सुदृढ असेल ,तरीही जे अत्यंत विनम्र दिसत असतील तेच श्री हनुमंत होय .
तुम्हाला ओळखता न आल्यास मला बोलवा मी त्यांना बरोबर ओळखीन.
*आमच्या गावच्या रामनवमीच्या उत्सवाला जरूर या .*
*तुम्हाला कुठे भेटले नाहीत तरी हनुमंत आमच्या गावात तुम्हाला नक्की भेटतील.*
*मी त्यांच्याशी तुमची नक्की भेट घडवून आणीन.*
(समाप्त)
३/५/२०२०©प्रभाकर पटवर्धन