( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग
समजावा.)
मी रत्नागिरी येथे सडय़ावर राहतो.माझी स्वतःची छोटीशी फॅक्टरी आहे.त्यातून मला पोटापुरते उत्पन्न मिळते.अर्थात पोटापुरते याची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असेल.कांही हजारांपासून काही कोटींपर्यंत ही व्याख्या लवचिक असेल.मिळते त्यात मी सुखी समाधानी आहे.माझ्या वडिलांनी अगोदरच भविष्याचा अंदाज घेऊन सडय़ावर प्लॉट घेऊन ठेवला होता.मी त्यावर बंगला बांधला आहे.माझ्या लहानपणी आम्ही गावात राहत होतो.तिथल्या फाटक हायस्कूलमध्ये माझे शिक्षण झाले.पुढील यांत्रिकी शिक्षणासाठी मी कोल्हापूरला गेलो. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी रत्नागिरीला परत आलो. रत्नागिरीला आमचा मित्रांचा एक ग्रुप होता.त्या ग्रुपमध्ये निरनिराळ्या आर्थिक स्तरातील निरनिराळ्या जातीचे सर्व मित्र होते.अजूनही आम्ही परस्परांशी संबंध ठेवून आहोत.
या मित्रातील सारंग हा माझा एक मित्र.तो कोळीवाड्यात राहतो.त्याचे स्वत:चे मच्छीमारी करण्याचे यांत्रिकी जहाज आहे. जेव्हा समुद्रात जात नाही तेव्हां भाटयाच्या खाडीत ते जहाज नांगरलेले असते.सारंग बऱ्याचवेळा स्वतः जहाजाबरोबर खोल समुद्रात मासे पागण्यासाठी जातो.जहाजावर दहा बारा खलाशी निरनिराळे काम करीत असतात.मासे पकडल्यानंतर किनाऱ्यावर येईपर्यंत केव्हां केव्हां दोन दोन तीन तीन दिवस किंवा त्याहूनही जास्त वेळ लागतो.मासे खराब होऊ नयेत म्हणून शीतकरण करण्याची,फ्रीजमध्ये ठेवण्याची व्यवस्था जहाजावरच आहे.
सारंग भेटला की तो मला समुद्रावर त्याच्याबरोबर जहाजातून येण्याचा आग्रह करीत असतो.मला समुद्राची तशी भीती वाटते.चारही बाजूला अथांग सागर पाणीच पाणी आणि आपण मध्ये ही कल्पनाच मला त्रासदायक वाटते.जमिनीचा आधार असला की बरे वाटते.पाण्यामध्ये विनाआधार वाटते.ज्याबद्दल आपल्याला भीती वाटते त्याबद्दल एक सूक्ष्म आकर्षण असते.खोल समुद्रात जहाजावर जावे.यांत्रिकी जहाज खोल समुद्रात जाऊन मासे कसे पकडते ते पाहावे.असे मला अनेकदा वाटते.परंतु अजूनपर्यंत कांही ना कांही कारणाने मी मनातील विचार प्रत्यक्षात आणलेला नाही.
हिवाळ्याचे दिवस होते.या काळात समुद्र बहुतांशी शांत असतो.वादळ येण्याची भीती कमी असते.अशा वेळी मला एकदा सारंग भेटला.दुसऱ्याच दिवशी तो समुद्रात मच्छीमारीसाठी जाणार होता.बोलता बोलता त्याने मला भित्री भागुबाई म्हणून डिवचले.तू नेहमी येणार येणार म्हणून सांगत असतोस.अजूनपर्यंत तुला एकदाही येण्याचा धीर झालेला नाही.तू माझ्याबरोबर समुद्रात कधीही येशील असे मला वाटत नाही.समुद्र बघितला कि तुझ्या पोटात ढवळायला लागते.तू पुढार्यांसारखी नुसती आश्वासने देत रहा.यापुढे तू मला भेटलास की मी कधीही समुद्रावर येण्याचा आग्रह करणार नाही.वगैरे वगैरे बरेच कांही मला लागेल असे बोलला.
शेवटी थोडे चिडूनच मी त्याला चल उद्या तुझ्याबरोबर येतो असे सांगितले.दुसऱ्या दिवशी तो संध्याकाळी निघणार होता.थोडे कपडे, समुद्र लागला, तर त्यासाठी कांही गोळया, नेहमीची औषधे,घेऊन मी त्याच्या जहाजावर दुसर्या दिवशी दुपारीच दाखल झालो.मला खरेच आलेला बघून त्याला अत्यानंद झाला.त्याने मला त्याला जोरदार चिमटा काढायला सांगितले.मी स्वप्नात तर नाही ना असे पुढे तो म्हणाला.मी खरेच त्याला एक जबरदस्त चिमटा काढला.त्यावर ओय ओय असे ओरडत तो किंचाळला.
काजळी नदी भाट्ये येथे समुद्राला मिळते.त्यामुळे त्याला भाट्याची खाडी असे म्हटले जाते.कोकणातील सर्व नद्या कमी लांबीच्या आहेत.त्यातील बहुतेक नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात.नद्यांना असले तर गोडे पाणी हिवाळ्यात कांही प्रमाणात उगमाजवळ कांही किलोमीटर असते.समुद्राचे भरतीचे पाणी खूप आतपर्यंत जाते.त्यामुळे बहुतेक नद्या जिथे त्या मिळतात त्या गावाच्या नावाने खाडय़ा म्हणून ओळखल्या जातात. उदाहरणार्थ भाट्याची खाडी, पूर्णगडची खाडी, जयगडची खाडी, इत्यादी. भाट्ये येथे खाडीत कितीतरी मच्छीमारी करणारी जहाजे नांगरलेली असतात.त्यातील कांही जहाजे लहान आहेत तर कांही मोठी आहेत.लहान जहाजे जवळपास जाऊन मच्छिमारी करतात.ती खोलवर समुद्रात जात नाहीत.मोठी जहाजे समुद्रात खोलवर आणि त्याप्रमाणेच किनारपट्टीने शेकडो किलोमीटरही जातात.रत्नागिरीचे जहाज गुजरात किनारपट्टीवर किंवा कर्नाटक किनारपट्टीवर जाऊन खोलवर समुद्रात मच्छीमारी करते.जहाज मोठे असल्यामुळे माशांसाठी साठवण करण्यासाठी खूप जागा असते.एकदा समुद्रात गेल्यावर दहा बारा बारा दिवसांनी सुद्धा ते पुन्हा खाडीमध्ये परत येते.
निघेपर्यंत संध्याकाळ झाली.मच्छीमारी जहाजावर कांही केबिन होत्या.त्यातील एक केबीन सारंगची होती.त्याच्या केबिनमध्येच माझीही व्यवस्था केलेली होती.मी खरेच येईन यावर त्याचा विश्वास नव्हता.आम्ही निघालो तेव्हा चांदणी रात्र होती.डेकवर उभे राहून पाहताना चमचमणारे समुद्राचे पाणी अतिशय लोभस रमणीय दिसत होते.थंडगार वारा वाहत होता.त्यामुळे अंगावर किंचित शिरशिरी उठत होती.डेकवर असेच उभे राहून आकाशातील चमचमणारे तारे,चंद्र आणि चमकणारे समुद्राचे पाणी पाहत राहावे असे वाटत होते.जहाज चांदीचा रस ओतत पुढे जात आहे असे वाटत होते.रात्र चढत होती तशी थंडी वाढत होती.हा गारठा मुख्यत्वे वाऱ्यामुळे होता. समुद्रावर अंग चिकचिकेल,उकडेल,घाम घाम होईल अशी कल्पना होती.जहाज खाली वर डाव्या उजव्या बाजूला हलत असेल, डेकवर तोल सांभाळणे कठीण होईल, अशीही कल्पना होती.
प्रत्यक्षात तसे कांहीही नव्हते.पोटातील पाणी हलणार नाही एवढे जहाज स्थिर होते.इंजिनचा एक गूंss असा आवाज सतत येत होता.डेकवर थंडी वाजू लागली होती.आम्ही आमच्या केबिनमध्ये येऊन झोपी गेलो.मी सारंगला तुम्ही खोल समुद्रात किती जाता असे विचारले.त्यावर त्याने पाच पन्नास किलोमीटरही जातो असे सांगितले.भारताच्या हद्दीत न राहता आंतरराष्ट्रीय समुद्रात जाऊन आम्ही मच्छीमारी करतो असे त्याने सांगितले.या वेळेला तुम्ही कुठे जाणार आहात असे विचारता तो म्हणाला,कर्नाटकच्या बाजूला खोल समुद्रात जाण्याचा विचार आहे.
केबिनमध्ये थंडी वाजत नव्हती.पंखा होता.त्याची केबिन वातानुकूलितही केलेली होती.आपण समुद्राला उगीचच घाबरत होतो.अगोदरच सारंगच्या जहाजातून समुद्रावर यायला हवे होते.आपण एका चांगल्या अनुभवाला आतापर्यंत मुकलो असा विचार माझ्या मनात येत होता. थोड्याच वेळात मी गाढ झोपी गेलो.
दुपारी डेकवर जरी भरपूर वारा असला तरी उष्ण वाऱ्याच्या झळा येत होत्या.चांदण्यात चमचमणारे लोभस दिसणारे पाणी सूर्यप्रकाशात अति तीव्रतेने चमचमत होते.चमचमणाऱ्या पाण्याकडे नुसत्या डोळ्यांनी पाहताना डोळे दिपत होते.गॉगल लावूनच पाहावे लागत होते.अर्थात खलाशी लोकांना या सर्वांची सवय होती.जो तो आपापल्या कामात गुंतलेला होता.दोन दिवसांत आम्ही कर्नाटकच्या समुद्रकिनार्याला परंतु खोलवर आंतरराष्ट्रीय समुद्रात पोचलो.जाळी टाकून मासे पकडण्याला सुरुवात झाली.जाळे समुद्रात सोडण्याचे काम नंतर ते जहाजावर ओढण्याचे काम इत्यादी गोष्टी यांत्रिकी पद्धतीने होत होत्या.पकडलेले मासे वर्गवारी करून शीतपेट्यांत ठेवले जात होते.
आता मला थोडा समुद्राचा त्रास व्हायला सुरुवात झाली होती.समुद्रावरील खारी हवा डोळ्यांना,नाकाला, त्वचेला, झोंबू लागली होती.ओठावरून जीभ फिरवली तरी खारट वाटत होते.त्वचाही थोडी काळसर होवू लागली होती.समुद्रावर आल्याला तीन दिवस झाले होते.आपण परत कधी फिरणार म्हणून मी सारंगला विचारले.मासे मिळण्यावर ते अवलंबून आहे.मासे साठवण्याची आमची मर्यादा संपली की आम्ही लगेच परत फिरतो.भरपूर मासे मिळाले तर कधी कधी दोन तीन दिवसांतही परत फिरतो.नाहीतर आठ दहा दिवसांनी परत फिरतोच.आमच्या जवळ असलेले डिझेल अन्नपाणी याला मर्यादा असते.ते संपण्याच्या आत आम्हाला परत घरी पोचावे लागते.
या वेळेला मासे भरपूर मिळत होते.साठवण मर्यादा संपली होती.आम्ही परतीची वाट धरली होती.दोन दिवसात आम्ही भाट्ये येथे पोहोचणार होतो.सर्व कांही छान चालले होते.मला कंटाळा येऊ लागला होता.गाणी तरी किती ऐकणार?उपग्रहावरून मोबाइल जगाशी जोडला गेला होता.त्यावरही वेळ घालवण्याला मर्यादा होती.जाळे टाकणे,जाळे ओढणे,मासे साठवणे, हे सर्व पाहताना प्रथम मजा वाटत होती.परंतु आता त्याचा कंटाळा येऊ लागला होता.माशांच्या तीव्र वासाने,जहाजाच्या इंजिनच्या एकसुरी आवाजाने,डेकवरील वार्याने डोके भणभणू लागले होते.केबिनमध्येही कोंडल्यासारखे वाटत होते. केव्हां एकदा घरी पोहोचतो असे झाले होते.परतीचा प्रवास चालू झाला होता.कांही तासांत आम्ही भाट्ये येथे पोहचू असे वाटत होते.
परंतु आमच्या नशिबात कांहीतरी वेगळेच लिहिलेले होते.एकाएकी हवा फिरली.कुठेतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता.त्याची परिणिती वादळात,कदाचित चक्रीवादळात होणार होती.हवामान खात्याने सर्व जहाजाना जवळच्या बंदरात आश्रय घ्या म्हणून सांगितले होते.आम्ही खोल समुद्रातून प्रवास करीत होतो.आम्ही जमिनीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होतो.वादळ आम्हाला दूर ढकलत होते.वाऱ्याचा प्रचंड जोर होता.घरात असल्यासारखे निश्चल असणारे जहाज एखाद्या खेळण्यासारखे खाली वर डाव्या उजव्या बाजूला होऊ लागले होते.कशालातरी धरल्याशिवाय उभे राहाणे चालणे अशक्य झाले होते.
सारंग मला घाबरू नकोस म्हणून धीर देत होता.परंतु त्याच्या चेहऱ्यावर कांहीच ठीक नाही,भविष्याचा भरवंसा नाही,असे स्पष्ट लिहिलेले दिसत होते.जसजसा वाऱ्याचा जोर वाढत होता तसतशा उंच उंच लाटा येऊ लागल्या होत्या.मधेच पाण्याचे चक्रीवादळामुळे उभे राहिलेले स्तंभ दिसत होते.शेवटी आता कांही खरे नाही अशी परिस्थिती दिसू लागली होती.जहाज वार्यावर भरकटले होते.जहाजावरील नियंत्रण संपूर्णपणे सुटले होते.जिकडे वारा नेईल तिकडे जहाज जाणे,त्याबरोबर आम्ही जाणे, क्रमप्राप्त होते.उगीच तुला आग्रह केला आणि या संकटात तुला टाकला असे सारंग म्हणत होता.मी तुझ्यावर रागावलेला नाही.परिस्थितीच अशी झाली त्याला तू काय करणार?सर्व कांही शांत असताना अकस्मात हे असे झाले.तू स्वत:ला दोष देऊ नकोस.जे कांही नशिबात असेल त्याप्रमाणे घडेल.
* क्षणोक्षणी परिस्थिती गंभीर होत चालली होती.*
*आम्ही लाइफ जॅकेट्स चढवली होती.*
*धीर तर सर्वांचाच सुटला होता.*
* इंजिन बंद करण्यात आले होते.किंवा बंद झाले होते.*
*एक जगड्व्याळ प्रचंड लाट आली.आमचे जहाज एका खडकावर जाऊन फुटले.*
*त्या अगोदरच आम्ही समुद्रात उड्या मारल्या होत्या.*
*थोड्याच वेळात फुटलेल्या जहाजाचा एक फळीचा तुकडा मला मिळाला.*
*त्याच्या आधाराने मी तरंगत होतो.कोण कुठे गेला, कोण कुठे गेला, त्याचा पत्ता लागत नव्हता.*
*शेवटी एका लाटेने मला किनार्यावर आणून टाकले.*
*मी इतका दमलो होतो कि वाळूमध्ये उताणा होत तिथेच बेशुद्ध झालो.*
(क्रमशः)
२५/३/२०२२©प्रभाकर पटवर्धन