( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

सर्व कांही शांत असताना अकस्मात हे असे झाले.तू स्वत:ला दोष देऊ नकोस.जे कांही नशिबात असेल त्याप्रमाणे घडेल.

क्षणोक्षणी परिस्थिती गंभीर होत चालली होती.

आम्ही  लाइफ जॅकेट्स चढवली होती.

धीर तर सर्वांचाच सुटला होता.

इंजिन बंद करण्यात आले होते.किंवा बंद झाले होते.

एक जगड्व्याळ प्रचंड लाट आली.आमचे जहाज एका खडकावर जाऊन फुटले.

त्या अगोदरच आम्ही समुद्रात उड्या मारल्या होत्या.

थोड्याच वेळात फुटलेल्या जहाजाच्या फळीचा एक तुकडा मला मिळाला.

त्याच्या आधाराने मी तरंगत होतो.कोण कुठे गेला,कोण कुठे गेला,कोण जिवंत आहे,कोण जिवंत नाही त्याचा पत्ता लागणे शक्य नव्हते.सागरात फळीच्या साहाय्याने तरंगताना फळीचा आधारच सुटेल की काय अशी भीती वाटत होती.तसे होते तर लाइफ जॅकेट्च्या सहाय्याने समुद्रात फारवेळ तरंगत मी जिवंत राहू शकलो नसतो.समुद्राचे खारे पाणी नाकातोंडात जाऊन माझा मृत्यू झाला असता.मला एखादा दोर हवा होता.म्हणजे त्याच्या सहाय्याने मी फळीला मला बांधून घेतले असते.जोरात लाट आली, कदाचित माझ्या हातातून फळी निसटली,तरी फळीपासून मी अलग झालो नसतो.एक विशिष्ट हात आलेला दोर मला सापडला.तो दोर येऊन माझ्या फळीलाच अडकला होता.जणू काही माझ्या सुखरूप सुटकेसाठी, परमेश्वराने तो दोर पाठविला होता.त्या दोराच्या साहाय्याने मी फळीला मला घट्ट बांधून घेतले.रात्रभर पाण्यात लाटांबरोबर हेलकावे खात होतो.वादळ हळूहळू शांत होत होते.

सूर्योदयाच्या सुमारास                 शेवटी एका लाटेने मला किनार्‍यावर आणून टाकले.

मी इतका दमलो होतो कि फळीपासून अलग होण्याची सुध्धा मला ताकद नव्हती

वाळूमध्ये उताणा होत तिथेच मी बेशुद्ध झालो.

मी जेव्हां शुद्धीवर आलो तेव्हा आकाशात सूर्य तळपत होता.सागराचा घनगंभीर आवाज मला ऐकू येत होता.समुद्राच्या लाटा येऊन माझ्या पावलावर अभिषेक करीत होत्या.रात्रीच्या सर्व घटना मला आठवल्या.भयानक वादळ, जहाजाचे फुटणे, लाटांबरोबर सर्व जण इतस्ततः पांगणे,मला एक फळी सापडून त्याच्या साहाय्याने मी लाटांवर तरंगत असणे,सुदैवाने दोर मिळणे, मी फळीला घट्ट बांधून घेणे  आणि शेवटी या किनाऱ्यावर येऊन शुद्ध हरपणे,या सर्व गोष्टी आठवल्या.

सुदैवाने मी भारताच्या किनाऱ्यावर येऊन पडलो होतो असे मला वाटत होते.अर्थात रात्री वादळाबरोबर कुठे गेलो असू ते सांगणे अशक्य होते.त्या कांही तासांमध्ये मी कदाचित दक्षिणेच्या बाजूला केरळकडे गेलो असण्याची शक्यता होती.त्याचप्रमाणे महाराष्ट्र किंवा वर गुजरात किनाऱ्यावर गेलो असण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती.

समुद्र किनार्‍याला माड पोफळी(नारळ सुपारी झाडे)  यांची झाडे एखाद्या तटबंदीप्रमाणे दिसत होती.बहुधा मी महाराष्ट्राच्या किनार्‍यावर होतो.उन्हाचा चटका जाणवत होता.उठावे समुद्र किनार्‍यावरून आत गेले की आपल्याला माणसे भेटतील.कोणत्या भागात आहे त्याचा लगेच उलगडा होईल.अन्न पाणी मिळेल.आधार मिळेल. कांहीतरी घरी जाण्याची व्यवस्था होईल.अशी आशा मनात निर्माण झाली.फळीपासून स्वतःला अलग करून घेतले.उठलो आणि समुद्र किनाऱ्यापासून दूर अंतर्भागाकडे चालू लागलो.माड व पोफळींची समुद्र किनार्‍याला असलेली तटबंदी ओलांडून आत गेलो.माड पोफळीच्या बनात घरे दिसत नव्हती.सामान्यतः समुद्रकिनाऱ्याला घरे व त्याच्यासभोवती माड पोफळी असे चित्र कुठेही दिसते.इथे माड पोफळीचे दाट बन होते परंतु कुठेही घरे नव्हती. कदाचित अंतर्भागात असतील म्हणून मी तिकडे चालू लागलो. कोणत्याही किनाऱ्यावर दिसते त्याप्रमाणे अंतर्भागात सपाट जागा दिसत होती.लांबवर लहानमोठे डोंगर दिसत होते.माणसाचा कुठेही वासवारा आढळत नव्हता.केवळ माड व पोफळी यांचीच झाडे होती असे नव्हे तर इतरही प्रकारची फळांची झाडे हाेती.पपनस,आंबा, काजू,फणस,पांढरा जांब,अशी कांही ओळखीची फळे होती.तर कांही फळे अनोळखी होती. फिरताना  कांही ठिकाणी वेल आढळले.त्यावर कलिंगड सदृश्य फळे लागलेली होती.

ज्याप्रमाणे कुठेही एकही माणूस मला दिसत नव्हता, त्याप्रमाणेच एकही पाळीव किंवा रानटी जनावर दिसत नव्हते.वनस्पतीच्या रूपात सजीव सृष्टी होती. परंतु आपण ज्याला सजीव सृष्टी म्हणतो तशी सृष्टी दिसत नव्हती.मला अजून पाण्याचा झरा,नदी,ओहोळ, तलाव, विहीर, कांहीही दिसले नव्हते.सूर्य डोक्यावर तळपत होता.अशा परिस्थितीत घामाच्या धारा सुरू व्हायला हव्या होत्या.परंतु एकही घर्मबिंदू आला नव्हता.ही गोष्ट एकाएकी माझ्या लक्षात आली.याबरोबरच आणखी एक गोष्ट माझ्या मनात आली.मी भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर नसावा.समुद्रात असंख्य लहानमोठी बेटे आहेत.त्यातील एखाद्या बेटावर मी असावा.ही कल्पना मनात आल्याबरोबर मी चमकलो.थोडाबहुत घाबरलो. सिंदबादच्या सफरी मला आठवल्या. तो जसा प्रत्येक सफरीमध्ये कुठल्या तरी अज्ञात प्रदेशात जात असे,तेथे त्याला विलक्षण अनुभव येत असत, तसा तर मी गेलेलो नाही ना?असे मला वाटू लागले.मला आता त्याच्याप्रमाणे कोणते अनुभव येतात तेच पाहायचे होते.

पक्षी दिसत नव्हते.वानर माकडे दिसत नव्हती. चतुष्पाद प्राणी,सरपटणारे प्राणी दिसत नव्हते.मनुष्यप्राणी दिसत नव्हता.कदाचित दूरवरच्या प्रदेशात हे सर्व मिळाले असतेही.कुणीतरी मला भेटेल म्हणून जेवढा भाग मी फिरलो तेवढ्या भागाततरी कोणत्याही प्रकारची चल जीवसृष्टी नव्हती. मला घाम येत नव्हता.हेही एक आश्चर्यच होते.तळपणारा सूर्य, खारी हवा, भर दुपारची वेळ,जरी थंडीचा मोसम असला तरी घामाच्या धारा येणे स्वाभाविक होते.तहान मात्र लागली होती.भूकही लागली होती.या बेटावर तहान भूक लागली नसती तर किती छान झाले असते असा एक विचार माझ्या मनात येऊन गेला.मी एका माडावर चढलो.(कोवळे नारळ) शहाळी काढली.ती फोडण्यासाठी माझ्याजवळ हत्यार नव्हते.सुदैवाने दगड सापडले.त्यांच्या सहाय्याने मी ती फोडली.शहाळ्यातील पाणी प्यायलो. तृष्णा भागली.मलई खाल्ल्यावर भूक थोडीबहुत भागल्यासारखे वाटले.अर्थात पाणी ते पाणीच, शहाळ्याच्या पाण्याला शुद्ध पाण्याची सर येणे कठीण आहे.

थोडीबहुत भूक भागली. तहान भागली. अजून मला गलितगात्र झाल्यासारखे वाटत होते.  मी एका नारळाच्या झाडाखाली ताणून दिली.दोन तीन तासांनी जागा झालो असावा.हातावरील घड्याळ बंद पडले होते.खरे म्हणजे ते वॉटरप्रूफ होते.पाण्यात दहा मीटरपर्यंत वॉटरप्रूफ होते.असे असूनही ते बंद पडले होते.वाजले किती कळत नव्हते.सूर्य पश्चिमेला बराच कलला होता.बहुधा संध्याकाळचे तीन चार वाजले असावेत.जेवढे जमेल तेवढे या जमिनीवर भटकावे.एखादा मनुष्य भेटला तर पाहावा.असा विचार मी केला.फिरता फिरता एखादा माणूस भेटेल.आपण कुठे आहोत ते कळेल अशी मला आशा होती.भारताच्या किनाऱ्यावरच कुठल्या तरी अज्ञात प्रदेशात मी असेन ही माझी आशा अजून पूर्णपणे मावळली नव्हती.

इथे एवढे एक बरे होते.ठेंगू जातीच्या नारळाची झाडे भरपूर प्रमाणात दिसत होती. दरवेळी उंच झाडावर चढणे व शहाळी पाडणे त्रासदायक होते.ठेंगू नारळाच्या झाडांमुळे मी जमिनीवरून शहाळी काढू शकत होतो.तहान भुकेचा प्रश्न कांही प्रमाणात सुटला होता.आंब्याची झाडेही होती. त्यावर आंबे लागलेले होते.पिके आंबे दिसले असते तर भुकेचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला असता.परंतु सर्व कैर्‍या दिसत होत्या.फणस दिसत होते परंतु तेही सर्व कच्चे होते.   

मी अंतर्भागात जेवढे जमेल तेवढा फिरलो.मला रस्ते कुठेही दिसले नाहीत.मळलेल्या पायवाटा सुध्धा नव्हत्या.याचाच अर्थ इथे मनुष्यप्राणी राहत नसावा.रस्ते नव्हते म्हणजे मोटारगाडय़ा किंवा मोटारसायकली नव्हत्या.म्हणजेच मी भारतात असण्याची शक्यता फारच कमी होती.कदाचित या भागात रस्ते नसतील,रेल्वेगाडी तरी असायला पाहिजे होती.कुठेही रेल्वे ट्रॅकही नव्हता.भारताच्या किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात अनेक लहान लहान बेटे आहेत असे ऐकून होतो.त्यातील कित्येक बेटे असामान्य आहेत असेही ऐकून होतो.असामान्यता तीन प्रकारे सांगता येतील.जिथे मानवाचे अस्तित्व नाही अशी बेटे किंवा जिथे मानवापेक्षा उच्च प्रतीचे अस्तित्व आहे अशी बेटे.आणखी एक प्रकार सांगता येईल.जिथे रानटी मनुष्य राहतो अशी बेटे.रानटी मनुष्य ,मनुष्य भक्षक मनुष्य, भेटण्यापेक्षा बेट निर्मनुष्य असलेले चांगले असा एक विचार माझ्या मनात येऊन गेला. 

मी बहुधा त्यातील एखाद्या बेटावर आलेला होतो.दोन चार दिवसांत परिस्थितीचा उलगडा होणार होता.मी तसाच पुढे चालत जात असताना मला समोरून एक साधू येताना दिसला.ती व्यक्ती  

ऋषीतुल्य होती.त्यांची दाढी वाढलेली होती.डोक्यावर केसांच्या जटा बांधलेल्या होत्या.चेहरा शांत व डोळे तेजस्वी होते.त्यांना पाहिल्याबरोबर साष्टांग प्रणिपात करावा असे वाटत होते.मी तिथेच त्यांना साष्टांग प्रणिपात केला.त्यांनी मला आशीर्वाद दिला.तुझ्या मनोकामना पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला.मी त्यांना हा प्रदेश कोणता? भारतच आहे ना? असे विचारले.

*त्यावर त्यांनी हा भारत नाही.हे एक बेट आहे.इथे माझ्यासारखी  हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच कांही मंडळी ध्यानधारणा योगसाधना यासाठी आली आहे.*

*जीवधारणेसाठी इथे फळफळावळ आहे.पाणी आहे.पूर्ण शांतता आहे.*

*आम्हा साधूंना आणखी काय पाहिजे असे ते म्हणाले.*

*तुम्ही इथे कसे आलात असे मी त्यांना विचारले.त्यावेळी त्यांनी आम्हा साधूंना अनेक विद्या माहीत असतात.आम्ही त्या विद्येचा वापर करून आकाशमार्गे इथे आलो.असे उत्तर दिले*

* तुमच्या त्या स्वार्थी माणसांनी गजबजलेल्या जगात राहण्यापेक्षा येथे रहाणे अतिउत्तम असे ते म्हणाले.*

*येथे अनेक नैसर्गिक गुहा आहेत.त्यामध्ये आम्ही आनंदाने राहतो.*

*प्रत्येकजण शक्यतो स्वतंत्र गुहेत राहतो.नैसर्गिक गुहा मिळाली नाही तर आम्ही अंतर्ज्ञानाने अशी गुहा कोणत्या बेटावर आहे ते जाणतो आणि तिथे जातो.*

*हे साधू या बेटावरून सुटका करण्यासाठी आपल्याला मदत करतील असे मला वाटू लागले.*  

(क्रमशः)

२७/३/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel