“ वज्रसेन, हा काय अनर्थ आहे? कि हे एखादे दु:स्वप्न आहे? मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. हे अशाप्रकारे एखाद्या पुरुषाचे स्त्री मध्ये रुपांतरीत होणे अतर्क्य आहे. परंतु तू असत्य वदत नाहीस हे मला लक्षात आले आहे. हि स्त्री आपला नंदीतेज आहे हे निश्चित! परंतु माझ्या नंदीतेजाने असा काय अधर्म केला कि ज्यामुळे देवाने त्याला असे शासन केले आहे?” सेतूपती.

सेतुपातीला ओक्साबोक्षी रडताना पाहून राजपुरोहित षण्मुखानंद त्याच्या जवळ येऊन धीर देत म्हणाले.

“महाराज शांत व्हा. देवावर विश्वास ठेवा. किमान तो ईतका कृपाळू आहे कि आपले युवराज नंदीतेज जीवित आहेत. त्यामुळे आपले दु:ख काहीच नाही?”

“ काहीच नाही. राजपुरोहित आपण काय बोलत आहात? माझा प्रिय पुत्र एक स्त्री बनला आहे आणि तुम्ही म्हणताय कि हे दु:ख काहीच नाही?”

आता सेतूपतीच्या आवाजात क्रोध स्पष्ट जाणवत होता परंतु बोलताना त्याच्या शब्दात घृणा कधी आली ते त्याला कळलेच नाही.

“जोपर्यंत राजकुमारांचा सुगावा लागत नव्हता तोपर्यंत आम्हाला वाटत होते कि ते एखाद्या शत्रूच्या तावडीत सापडले असावेत. परंतु आम्हाला याचीही खात्री होती कि कितीही बलाढय असला तरी राजकुमार त्याला निर्भीडपणे सामोरे गेले असते. परंतु आम्हाला याची साधी पुसटशी कल्पनाही नव्हती कि राजकुमार स्त्री बनून स्त्रियांच्या कारागृहात एखाद्या शेळपटासारखे लपून बसले असतील”

महाराज सेतूपती यांचे हे शब्द ऐकून राजकुमार जमिनीवर कोसळले. इतक्या दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एक कणही घेतला नव्हता. ते ज्या परिस्थितीचा सामना करत होते तिचा कोणालाही अनुभव नव्हता. त्यांना कल्पना होती कि त्यांची हि अवस्था पाहू महाराज लज्जित होणार होते आणि नेमके हेच त्यांना नको होते. नंदीतेज तर इतके व्यथित झाले होते कि त्यांना वाटत होते कि साक्षात संगमेश्वराला देखील त्यांच्या या अवस्थेची कल्पना नसेल. यामुळेच त्यांनी कोणालाही काही न सांगता कारागृहात स्वत:ला कोंडून घेऊन आपले पुढील जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला होता.

महाराज सेतूपती आपल्या पुत्राला वीरमरण आले असे मानून मला विसरून जातील अशी मनाची समजूत घालत राजकुमार नंदीतेज स्त्रीरुपात कारागृहात दिवस कंठत होते. परंतु अचानक जेव्हा वज्रसेन समोर आला तेव्हा राजकुमार त्याच्या चाणाक्ष दृष्टीक्षेपापासून स्वत:ला वाचवू शकले नाही. वज्रसेन त्यांना म्हणाला

“राजकुमार नंदीतेज, तुमची अशी अवस्था कोणी केली? गेले सात दिवस महाराज तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत.”

“ वज्रसेन, कृपया मला पिताश्रींकडे नेऊ नका. त्यांना माझी हि अवस्था बघवणार नाही. मला इथे या कारागृहातच राहू द्या. ”

परंतु वज्रसेन राजकुमाराचे काही एक ऐकून घेण्यास तयार नव्हता आणि त्यामुळेच नंदीतेजाला आपल्या पित्याच्या डोळ्यात त्याच्याबद्दल घृणा पहावी लागत होती. राजकुमाराचे आयुष्य उध्वस्त झाले होते आणि त्यांच्या या अवस्थेमुळे महाराज सेतूपती यांच्यावर तर दु:खाचा डोंगर कोसळला होता. या दु:खाचा आघात एखाद्या वज्रप्रहरापेक्षाही  अधिक वेदनादायक होता.

कक्षात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनाची व्यथित झालेली अवस्था लक्षात घेऊन मोरयाशास्त्री म्हणाले

“महाराज, आताच आपण काही क्षणापूर्वी स्वत: म्हणाला होतात कि आपण इतके अशक्त नाही कि सत्याचा सामना करू शकणार नाही. आणि आता आपणच आपल्या दुर्बलतेचे प्रदर्शन करीत आहात. एका भूपतीने केवळ शक्तिशाली असणे पर्याप्त नसते तर त्याने कोणत्याही परिस्थिती मध्ये धैर्यशील असणे आवश्यक आहे. त्याने आपल्या अगोदर प्रजेच्या दु:खाचा विचार केला पाहिजे. राजकुमार नंदीतेज हे केवळ आपले पुत्र नाहीत तर ते आपल्या प्रजेतील एक व्यक्ती आहेत. त्यामुळे सध्या आपण पित्याचे दु:ख बाजूला ठेवून आपल्या या प्रजाजनाच्या दु:खाकडे लक्ष द्या. आपल्यातील पित्याला केवळ इतकेच दिसते आहे कि आपला पुत्र स्त्री झाला आहे. परंतु एक राजा म्हणून आपण या गोष्टीचाही विचार करावा कि गेले सहा दिवस आपल्या प्रजेतील एक व्यक्ती अत्यंत विचित्र युद्धाला तोंड देत आहे. तेव्हा आपल्याला लक्षात येईल या युद्धातील त्यांचे शत्रू कोण्या बलाढ्य राजापेक्षा कमी नाहीत. आपणास यांचे शत्रू कोण आहेत हे माहित आहे का?”

मोरयाशास्त्री यांच्या या प्रश्नामुळे महाराज सेतूपती यांचे लक्ष पूर्णपणे मोरयाशास्त्री यांच्याकडे केंद्रित झाले. महाराजांशी बोलून झाल्यानंतर मोरयाशास्त्री यांनी राजपुत्राकडे एक सहानुभूती पूर्ण कटाक्ष टाकला. असे वाटत होते जणू राजपुत्राची झालेली अवस्था मोरायाशास्त्री यांनी स्वत: अनुभवली होती. पुढे ते बोलू लागले,

“ युवराज यांच्या शरीरात घडून आलेले बदल हे त्यांच्या इच्छेने नक्कीच झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचा आत्मा व्यथित दिसतो आहे. त्यामुळे त्यांच्या मनात स्वत:बद्दल एक घृणा उत्पन्न झालेली आहे. या त्यांच्या अवस्थेमुळे आपल्याला आणि प्रजेला होणारे दु:ख यामुळे युवराजांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली आहे. परंतु महाराज सर्वात दु:खाची बाब तर हि आहे कि आताच त्यांचा एक शत्रू विजयी झाला आहे.”

महाराज प्रश्नार्थक नजरेने मोरयाशास्त्रींकडे पाहू लागले.

“ तो शत्रू आहे यांचे भय ज्या कारणामुळे यांनी कारागृहात स्वत:ला कोंडून घेतले होते. भय असे कि स्वत:च्या पित्याच्या मनात स्वत:बद्दल घृणा उत्पन्न होणे. आपण तर यांना युद्धकौशल्यात पारंगत केले आहे आणि आपणच यांच्या मानसिक खच्चीकरणाचे कारण बनलात.”

मोरयाशास्त्री यांचे हे शब्द ऐकून महाराज सेतूपती यांना आपली चूक लक्षात आली. स्वत:च्या दु:खात ते राजपुत्र नंदीतेज यांच्या दु:खाचा त्यांना पार विसर पडला होता. ते राजपुत्रा जवळ आले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले,

“ राजकुमार, आम्हाला क्षमा करा. आपली हि अवस्था पाहण्याआधी आम्हाला व्यथा दुराभिमान होता कि आम्ही कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला सहज तोंड देऊ शकतो आणि तिच्यावर मात करू शकतो. कदाचित हा आमचा अहंकार मोडून काढण्यासाठी विघ्नहर्ता गणेशाने हि परिस्थिती निर्माण केली असावी. धैर्यशील राहा हि तुमची आणि माझी दोघांची परीक्षा आहे.

आपल्या पित्याच्या मुखातून हे प्रेमळ शब्द ऐकून दु:खात राजकुमाराच्या दु:खाचा बांध फुटला आणि तो महाराज सेतूपतीला बिलगून ढसाढसा रडू लागला. महाराजांनी राजकुमारचे सांत्वन केले आणि ते वज्रसेनाला उद्देशून म्हणाले,

“वज्रसेन, राजकुमारांसाठी पाणी मागव आणि त्यांच्यासाठी आसनाची व्यवस्था कर.”

अनेक दिवस तहानेने व्याकूळ झालेल्या राजकुमाराने शांतपणे बसून पाणी प्यायले. मग सेतूपती हात जोडून मोरयाशास्त्री यांना म्हणाला,

“ हे गुरु शिरोमणी , अशा परिस्थितीमध्ये पुढे काय करावे यांचे मला खरोखर ज्ञान नाही. कृपया मार्गदर्शन करावे.”

मोरयाशास्त्री  म्हणाले

“ महाराज, पुढे काय करावे हे ठरवण्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे कि युवराजांची हि अवस्था होण्याचे कारण काय?”

मग ते राजकुमाराला म्हणाले.

“ बोला युवराज, आपली अशी अवस्था होण्याचे जे काहीं कारण असेल ते विस्तारपूर्वक सांगा.”

आतापर्यंत राजकुमाराचे रडणे थांबले होते. त्याला एका आसनावर बसवले गेले आणि इतर सर्वजण देखील बसले. राजकुमार नंदीतेज आता गेल्या सात दिवसात काय काय घडले याची विस्तारपूर्वक माहिती सांगू लागला.

क्रमश:

लेखक :अक्षय मिलिंद दांडेकर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel