पुष्टीच्या शब्दात इतकी ताकद होती कि सर्वजण थरथर कापू लागले परन्तु राजकुमार मात्र स्थितप्रज्ञ होता.

पुष्टीने आपली नजर राजकुमारच्या मुखावरून देवालयाकडे वळवली आणि ती म्हणाली,

“ इतका वेळ सुरु असलेल्या आपल्या चर्चेवरून तुम्हाला हे समजायला हवे होते कि माझा पती कोणी साधारण व्यक्ती नाही तर या गावाचा क्षेत्रपाल आणि महापुरुष आहे. आपण वेदशास्त्र प्रवीण आहात आपल्याकडून असा मूर्खपणा मला अपेक्षित नाही. मी काय म्हणत्ये ते आता गांभीर्याने ऐका आणि माझ्या गौप्य वाणीचे तात्पर्य समजून घ्या. अन्यथा तुमचा एक चुकीचा निर्णय या गावाच्या आणि आपल्या राज्याच्या विनाशाचे कारण बनू शकतो.”

“क्षेत्रपाल आणि महापुरुष? तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि स्वत: उच्छिष्ट गणेश आपले पती आहेत?”

असं विचारून राजकुमार मोठमोठ्याने हसू लागला. त्यांच्या बोलण्यात उपहास स्पष्ट जाणवत होता. तो पुढे बोलू लागला.

“ क्षमा करा देवी पण आमचा असा कयास आहे कि आपले मानसिक संतुलन ढळले आहे. शिक्षेच्या भीतीने तुम्ही आतापर्यंत चिकार थापा मारल्यात. पण आम्ही इतकेही मूर्ख नाही कि तुमच्या थापांवर आम्ही विश्वास ठेवू.”

मग राजकुमार वज्रसेन याला म्हणाला,

"वज्रसेन, या स्त्रीला जेरबंद करा. आम्हीही पाहू इच्छितो कि या स्त्रीचा पती नक्की कोण आहे. जर खरोखर हिचा कोणी नवरा असेल तर तो राजप्रसादात येऊन हिने आमच्याशी केलेल्या उद्दामपणाची क्षमा मागेल आणि हिला सोडवून घेऊन जाईल.”

पुष्टीने तिच्याकडे चालत निघालेल्या वज्रसेनाकडे फक्त हात दाखवला मात्र आणि तो जागच्या जागी थिजला. मग ती राजकुमाराकडे पाहून स्मितहास्य करत म्हणाली,

“ राजपुत्र मला असं वाटत आहे कि आपली बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आता आपल्याशी तर्क करण्यात काहीएक प्रयोजन नाही. त्यामुळे मी स्वत: आता आपल्या सोबत आपल्या राज्यात येणार आहे. परंतु आमची एक विनंती आहे कि आपण मला बंदी बनवू नये. कारण जर आपण मला बंदी बनवले तर मला भीती आहे कि माझे पती क्रोधीत होऊन आपल्या कुलाचा नाश करून टाकतील. मी तुम्हाला आश्वस्त करते कि जोपर्यंत माझे पती तुम्हाला येऊन भेटत नाहीत तोपर्यंत मी आपल्या राजप्रासादात वास करेन.”

पुष्टीने उच्चारलेला शब्द न शब्द राजकुमाराची बुद्धी भ्रष्ट करीत होता. तो आपल्या अहंकारात एवढा माजला होता कि पुष्टीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तो आपल्या सर्व मर्यादा विसरून जोरजोरात हसत म्हणाला,

“ म्हणजे देवी, आपली काय इच्छा आहे? मी तुम्हाला माझ्या मांडीवर बसवून आमच्या रथातून राजप्रासादात घेऊन जावे? तसा विचार छानच आहे कारण अशाही मला तुम्ही खूप आवडल्या आहात. त्यापेक्षा माझं ऐका देवी, हे पती परमेश्वर वालं पुराण आता थांबवा आणि आपली हार स्वीकार करा. आमच्यापुढे शरणागती पत्करा. मी तुम्हाला वचन देतो यापुढे आपल्याला काल्पनिक पतीच्या दंतकथांची रचना करण्याची गरज पडणार नाही.”

राजकुमाराचे हे शब्द ऐकून पुष्टीने टाळ्या वाजवल्या आणि उपरोधिकपणाने ती म्हणाली,

“ वा, राजकुमार वा आपण बरेच धीट आहात. तर आपण मला आपली पट्टराणी बनवणार आहात तर?”

“पट्टराणी? छे...अजिबात नाही. तुझी तेवढी पात्रता नाही. तू जर माझा इतका अपमान केला नसतास ना तर कदाचित तुझी हि विनंती मी मान्य केली असती. पण घाबरू नकोस आमच्या राजप्रासादात अनेक गणिका आहेत त्यांची नायिका मी तुला नक्कीच बनवेन. तुझे शरीरसौष्ठव माझ्या मनात भरले आहे त्यामुळे मी नेहमी तुझी नियुक्ती माझ्या शयनकक्षात करेन.”

कामाग्निच्या विळख्यात सापडलेल्या नंदीतेजाच्या मुखावरील हावभाव महान राज्याच्या राजपुत्रासारखे नाही तर एखाद्या मदांध असुराप्रमाणे दिसत होते.

पुष्टीने त्याची भाषा आणि त्याच्या मुखावरील हावभाव पाहताक्षणीच अत्यंत विकट हास्य केले. तिचे हास्य इतके भयंकर होते कि ते ऐकू येताच नगरवासी इतस्तत: सैरावैरा धावत सुटले. नंदीतेज देखील आता मनातून काहीसा घाबरला होता. ज्या स्त्रीला तो क्षणाभारापुर्वी वासनांध दृष्टीने पाहत होता ती स्त्री त्याला आता कालिकामातेचा अवतार भासत होती. राजपुत्राची हि दशा पाहून पुष्टी शांत झाली आणि म्हणाली,

“घाबरू नकोस राजकुमारा, मी केवळ इतके सांगू इच्छिते कि तुझ्या अहंकाराचे दमन करणे हा माझ्या डाव्या हाताचा मळ साफ करण्याइतके सुलभ आहे. परंतु हे कार्य मी करणे अधिकृत नाही. तेव्हा मी निघते आणि तुही निघ. यातच तुझी भलाई आहे.”

पुष्टीचे हे शब्द ऐकून राजकुमार रागाने लालबुंद झाला आणि कडाडला,

“वज्रसेन, या मूर्ख स्त्रीला जेरबंद करा आणि फरफटत राजप्रासादात घेऊन चला. दोन तीन दिवस तिथल्या अंधार कोठडीत डांबून ठेवली कि हिची घमेंड क्षणात उतरेल.”

क्रमश:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel