त्या दिवशीच्या आपल्या वाक्यांचा पुनरुच्चार समोर बसलेले वडील, राजपुरोहित आणि ब्राम्हणदेव यांच्यासमोर करताना राजकुमार मेल्याहून मेल्यासारखे झाला होता. पुष्टीच्या त्या दिवशीच्या त्या विकट हास्याचा आवाज आजही राजपुत्राच्या कानात घुमत होता. तो लज्जित होऊन खिन्नपणे मान खाली घालून बसला होता. त्याला कळून चुकले होते कि त्याने त्याच्या आई वडिलांचे संस्कार, राजपुरोहित आणि इतर सर्व गुरुंनी दिलेली शिकवण सर्व काही मातीमोल केले होते.

हि सर्व उच्छीष्ट गणपती बाप्पाची लीला होती. या घटनेमुळे राजपुत्राच्या मनातील कुरूप, कलुषित कोपरा जगासमोर प्रकाशित झाला होता ज्याबद्दल स्वत: राजपुत्र देखील परिचित नव्हता.

एका धर्मनिष्ठ अशा क्षत्रिय कुळात जन्म घेऊन देखील इतक्या सहज तो कामवासनेच्या विळख्यात आला होता. हि गोष्ट युवराज नंदीतेजाला आजिबात शोभत नव्हती. वेद, वेदांग, शास्त्र, पुराणे यांचा कष्टपूर्वक अभ्यास करून केलेल्या ज्ञानार्जनाचा हा असा अपमान करून आपली पातळी सोडून वागण्याइतके त्याचे चारित्र्य दुर्बळ होते का?

गेले काही दिवस कारागृहात बसून ते याच गोष्टीचा विचार करीत होते कि तो खरोखर नृपती बनण्यास पात्र आहे कि नाही? जो पुरुष अहंकाराच्या आहारी जाऊन एखाद्या स्त्रीचा अपमान करू शकतो तो राज्याचा अधिकारी कसा बनू शकतो? त्या दिवशी पुष्टीने अनेक वेळा समजावून देखील त्याला समजले नाही कि त्याची परीक्षा घेतली जात आहे. यापेक्षा अधिक मूर्खपणा तो काय असू शकतो?

नंदीमोक्ष राज्यासारखे गौरवशाली राज्य एका मूर्ख आणि इंद्रियावर ताबा नसलेल्या व्यक्तीच्या अधिपत्याखाली आले तर या राज्याच्या उभारणीसाठी रक्त आणि घाम गाळलेल्या पूर्वजांचा तो अपमान होणार नाही का? हि गोष्ट नंदीमोक्ष राज्याची प्रजा आणि त्यांच्या भावी पिढ्यांसाठी विनाशकारी सिद्ध होणार नाही का? असा विचार करत राजपुत्र शून्यात लक्ष लावून बसला होता.

“ राजकुमार, कोणत्या विचारात गढून गेला आहात? कृपया आम्हाला सांगा कि पुढे काय घडले.” मोरयाशास्त्री यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा विषाद होता असं त्यांच्या हावभावावरून वाटत होते.

त्यांचा प्रश्न ऐकून राजकुमार पुढे बोलू लागला.

“ माझ्या आदेशानुसार वज्रसेन याने पुष्टीदेवी यांना राजप्रासादात आणण्यासाठी एका घोड्याची सोय केली आणि त्यांचे हात बांधून त्यांना घोड्याच्या मागे बांधले आणि एका सैनिकाला त्या घोड्यावर बसवून त्यांना घोड्यामागे पायी चालत यायला सांगितले. आणि आम्हीदेखील राजप्रासादात पुन्हा यायला निघालो.”
राजकुमाराचे बोलणे मध्येच अडवून महाराजांनी वज्रसेनास विचारले,

“मला कळत नाही वज्रसेन तु हा सर्व घटनाक्रम आमच्यापासून लपवून का ठेवलास? ुला विचारले देखील होते कि तू आमच्यापासून काही लपवून ठेवत तर नाहीस ना? परंतु तू आमच्याशी खोटे बोलत राहिलास.”

वज्रसेनच्या चेहऱ्यावर भीती आता स्पष्ट दिसत होती. तो इतका घाबरला होता कि त्याला नक्की काय विचारले जात आहे हेच लक्षात नाही आले. त्याने  गोंधळून जाऊन राजपुत्राकडे कटाक्ष टाकला आणि तो पुढे काही बोलणार इतक्यात राजपुत्राने खुणेने त्याला गप्प केले आणि तो स्वत: बोलू लागला.

“ क्षमा करा महाराज,परंतु वज्रसेन आणि माझ्या इतर अंगरक्षकांना यापैकी कोणत्याही घटनांचे स्मरण नाही.” राजकुमार

“ असे कसे शक्य आहे?” सेतूपती

“ हि सर्व उच्छिष्ट गणपती बाप्पांची लीला आहे. त्यांनीच या सर्व घटनांची स्मृती आमच्या अंगरक्षकांच्या डोक्यातून पुसून टाकली. ते खूपच दयाळू आहेत, पिताश्री एक खोडकर बालक समजून एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे त्यांनी मला माझी शिक्षा निवडण्याचा अधिकार देखील दिला होता. सत्य तर हे आहे कि मी स्वत: जीवनभर त्या कारागृहात माझ्या चुकांचा पश्चाताप करत पडून राहण्याची शिक्षा निवडली होती.”

हे ऐकून महाराज व्यथित झाले ते आपल्या दु:खावर नियंत्रण करत म्हणाले, “ पुढे काय घडले राजकुमार, मला नीट सांगा.”

“ पिताश्री, त्या दिवशी राजप्रासादात पोहोचेपर्यंत आम्हाला सर्वांना खूपच उशीर झाला होता. आम्ही वाट चुकलो आणि रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी आम्ही महालात पोहचलो. मी पुष्टीदेवी यांना राणीमहालातील कारागृहात पाठवले आणि स्वत: आपल्याला सर्व घटनेचे विवरण देण्यासाठी आपल्या महालाकडे येण्यास मी निघालो. वाटेत आम्हाला राजपुरोहित भेटले त्यांनी आम्हाला आपण अस्वस्थ असल्याची वार्ता सांगितली आणि आपल्याला रात्री उशिरा त्रास न देण्याची विनंती केली. प्रथम मी विचार केला कि घडलेला सर्व घटना क्रम त्यांच्या कानावर घालावा. परंतु मी इतका भ्रमित आणि उद्दाम झालो होतो कि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आम्ही निघून गेलो आणि त्यांनादेखील याबद्दल काहीच सांगितले नाही.”

“ मग तुम्हाला उच्छिष्ट गणपतीचे दर्शन झाले कि नाही?” राज्पुरोहीतांनी विचारले.

“ नाही, का कोण जाणे परंतु आम्हाला स्मरणच राहिले नाही कि आम्ही तेथे उच्छीष्ट गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळेस वज्रसेनाने आम्हाला एखाद्या मार्गदर्शकाप्रमाणे आठवण देखील करून दिली होती. परंतु त्या स्त्रीला या महालात बंदी बनवून आणण्याच्या नादात मी इतका उद्दाम झालो होतो कि काही वेळ गणपतीच्या दर्शनासाठी थांबण्याचा देखील धीर मी दाखवू शकलो नाही. आता मला माझी चूक लक्षात येत आहे. गुरुजन नेहमी म्हणतात कि व्यक्तीच्या मनावर जेव्हा दुराभिमानाचा प्रभाव असतो तेव्हा तो आपली सदसदविवेकबुद्धी हरवून बसतो. माझ्या बाबतीत नेमके हेच घडले. पुष्टीदेवी यांचे म्हणणे सत्य होते त्यांनी अनेकवेळा समजावून देखील बुद्धी भ्रष्ट झाल्याप्रमाणे मी वागत होतो आणि एका पाठोपाठ एक असे अनेक चुकीचे निर्णय घेत होतो.”

बोलता बोलता नंदीतेज काही क्षण शांत झाला यापुढे जे काही घडले याची कोणी सामान्य व्यक्ती कल्पना सुद्धा करू शकणार नाही इतके ते भयावह होते.

क्रमश:

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel