हस्तिनापुर नरेश शान्तनु आणि राणी सत्यवती यांना चित्रांगद आणि विचित्रवीर्य नावाचे दोन पुत्र झाले. चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्या बालपणीच शांतनुचा स्वर्गवास झाला होता. त्यामुळे त्यांचे सर्व पालन पोषण भीष्मांनी केले. चित्रांगद मोठा झाल्यावर भीष्मांनी त्याला राज सिंहासनावर बसवले, परंतु काही काळातच गंधर्वांशी युद्ध करताना चित्रांगद मारला गेला. त्यावर भीष्मांनी त्याचा भाऊ विचित्रवीर्य याच्याकडे राज्यकारभार सोपवला. आता भीष्मांना चिंता होती ती विचित्रवीर्य याच्या विवाहाची. त्याच सुमारास काशिराजाच्या तीन कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचे स्वयंवर होणार होते. त्या स्वयंवरात घुसून भीष्मांनी एकट्याने तिथल्या सर्व राजांचा पराभव केला आणि तीनही कन्यांचे अपहरण करून त्यांना हस्तिनापुरात घेऊन आले. त्यातील मोठी कन्या अंबा हिने भीष्मांना सांगितले की तिने आपले तन -मन राजा शाल्व याला अर्पण केलेले आहे. तिची गोष्ट ऐकून भीष्मांनी तिला राजा शाल्व याच्याकडे पाठवून दिले आणि अंबिका आणि अंबालिका यांचे विवाह विचित्रवीर्य याच्यासोबत लावून दिले.


परंतु राजा शाल्व याने अंबाला स्वीकारले नाही, म्हणून ती हस्तिनापुरात परत आली आणि तिने भीष्मांना सांगितले, "तुम्ही माझे अपहरण करून इथे आणलेत, म्हणून आता तुम्हीच माझ्याशी विवाह करा." परंतु भीष्मांनी ब्राम्हचर्याच्या प्रतिज्ञेमुळे तिची विनंती मान्य केली नाही. यामुळे रुष्ट होऊन अंबा पराशुरामांकडे गेली आणि त्यांना तिने आपली व्यथा सांगितली आणि त्यांच्याकडून मदत मागितली. परशुरामांनी तिला सांगितले, "तू चिंता करू नकोस. मी तुझा विवाह भीष्मांशी करून देईन." परशुरामांनी भीष्मांना बोलावणे पाठवले, परंतु भीष्म त्यांच्याकडे आले नाहीत. यामुळे अत्यंत क्रोधीत होऊन परशुराम भीष्मांकडे गेले आणि दोनही वीरांमध्ये भीषण युद्ध चालू झाले. दोघेही अभूतपूर्व योद्धे होते, त्यामुळे जय - पराजयाचा फैसला होऊ शकला नाही. शेवटी मग देवतांनी मध्ये हस्तक्षेप करून हे युद्ध थांबवले. अंबा निराश होऊन तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेली.


विचित्रवीर्य आपल्या दोन्ही राण्यांसोबत भोग विलासात रत झाला, परंतु दोन्ही राण्यांपासून त्याला कोणतेही अपत्य झाले नाही, आणि पुढे क्षयरोगाने ग्रस्त होऊन तो मरण पावला. आता कुलाविनाश होण्याच्या भीतीने एक दिवस माता सत्यवतीने भीष्मांना सांगितले, "वंशाचा नाश होऊ नये यासाठी माझी आज्ञा आहे की तू या दोन्ही राण्यांपासून पुत्र उत्पन्न कर." तिचे हे बोलणे ऐकून भीष्म म्हणाले, "माते, मी माझी प्रतिज्ञा कोणत्याही परिस्थितीत मोडू शकत नाही."


हे ऐकून माता सत्यवतीला अपार दुःख झाले. आणि तिने आपला ज्येष्ठ पुत्र वेदव्यास याचे स्मरण केले. स्मरण करताच वेदव्यास तिथे उपस्थित झाला. त्याला पाहून सत्यवती म्हणाली, "पुत्रा, तुझे सर्व भाऊ निःसंतानच स्वर्गवासी झाले. त्यामुळे माझ्या वंशाचा अंत होऊ नये यासाठी मी तुला आज्ञा देते की तू नियोग विधीने त्यांच्या पत्नींपासून संतान उत्पन्न कर." वेदाव्यासने तिची आज्ञा मान्य केली आणि तिला सांगितले, "माते, तू त्या दोन्ही राण्यांना विवस्त्र होऊन माझ्यासमोरून जायला संग, त्यामुळे त्या दोघींना गर्भधारणा होईल." सर्वात आधी मोठी राणी अंबिका आणि नंतर छोटी राणी अंबालिका गेली, परंतु अंबिकाने त्याच्या तेजामुळे घाबरून आपले डोळे बंद करून घेतले, तर अंबालिका वेदव्यासाला बघूनच भीतीने पिवळी पडली. परत येऊन वेदव्यास मातेला म्हणाला, "माते, अंबिकाला फार तेजस्वी पुत्र होईल, परंतु अंबिकाने डोळे मिटलेले होते, त्यामुळे तो पुत्र आंधळा असेल. तर अंबालिका हिच्या गर्भातून पंडुरोगाने ग्रस्त असलेला पुत्र जन्माला येईल.


हे समजल्यावर सत्यवतीने मोठी राणी अंबिका हिला पुन्हा विवस्त्र होऊन वेदव्यासाच्या समोरून जाण्यास सांगितले, परंतु अंबिका स्वतः गेली नाही तर तिने एका दासीला वेदव्यास याच्या समोरून जाण्यास सांगितले. ती दासी निःसंकोचपणे वेदव्यास याच्या समोरून गेली. या वेळी वेदव्यासाने माता सत्यवतीला येऊन सांगितले, "माते, याच दासीच्या पोटी वेद - वेदांत पारंगत असा अत्यंत नीतिवान पुत्र जन्माला येईल." एवढे बोलून वेदव्यास तपश्चर्या करण्यास निघून गेला.


वेळ भरल्यावर अंबिकाच्या गर्भातून जन्मांध धृतराष्ट्र, अंबालिका हिच्या गर्भातून पंडुरोगाने ग्रस्त पंडू, तर दासीच्या गर्भातून धर्मात्मा विदुर यांचा जन्म झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel