द्रोणाचार्य आणि द्रुपद बालपणीचे मित्र होते. राजा झाल्यानंतर द्रुपद गर्विष्ठ बनला. जेव्हा द्रोणाचार्य द्रुपदाला आपला मित्र समजून भेटायला गेले तेव्हा द्रुपदाने त्यांचा फार अपमान केला. पुढे द्रोणाचार्यांनी पाण्डवांकरवी द्रुपदाचा पराभव करून आपल्या अपमानाचा बदल घेतला. राजा द्रुपद याला आपल्या पराजयाचा सूड घ्यायचा होता, म्हणून त्याने असा यज्ञ करण्याचा निर्णय घेतला, ज्याच्यातून द्रोणाचार्यांचा वध करणारा वीर पुत्र उत्पन्न होईल. राजा द्रुपद हा यज्ञ करण्यासाठी अनेक ऋषींकडे गेले, परंतु कोणीही त्याची इच्छा पूर्ण केली नाही. शेवटी महात्मा याज यांनी द्रुपदाचा यज्ञ करण्याचे स्वीकारले. महात्मा याज यांनी जेव्हा राजा द्रुपदाचा यज्ञ केला तेव्हा अग्निकुंडातून एक दिव्य कुमार प्रकट झाला. त्यानंतर अग्निकुंडातून एक दिव्य कान्यादेखील प्रकट झाली. ती अत्यंत सुंदर होती. ब्राम्हणांनी त्या दोघांचे नामकरण केले. ते म्हणाले - हा युवक मोठा धृष्ट (धीट) आणि असहिष्णू आहे. याची उत्पत्ती अग्निकुंडातून झाली आहे. म्हणून त्याचे नाव धृष्टद्युम्न असेल. ही कुमारी कृष्ण वर्णाची आहे. म्हणून हिचे नाव कृष्णा असेल. द्रुपदाची कन्या असल्याने कृष्णाच द्रौपदी म्हणून ओळखली जाते.