आयुष्य जगत असताना कुणी एखादा असा वाटसरु येतो आणि तू असे कर, तसे कर सांगून जातो. मग आपणही त्यावर विश्वास ठेवून तसे करतो. कधी-कधी असे अचानक घेतलेले निर्णय आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात. आयुष्यातले ‘टर्निंग पॉईंट’ वगैरे.

खरंच आपण आपल्या जगण्यात किंवा अगदी आपल्य आयुष्यातील नित्य निर्णय प्रक्रियांमध्ये कित्येकांना सामावून घेत असतो ना? आई-वडिलांपासून ते अगदी मगाशीच एसटी स्टँडवर भेटलेल्या एखाद्या नवख्या व्यक्तीपर्यंत. खरं पाहता, जे लोक ओपन माईंडेड म्हणजे खुल्या दिलाची वैगरे असतात, त्यांच्या आयुष्यातील निर्णय प्रक्रियांमध्ये अनेकांचा सहभाग असतोच. हा सहभाग अनेकवेळा किंबहुना नेहमीच फायदेशीर ठरत असतो. याचं कारण म्हणजे अनेकांचे अनुभव त्यांच्या एखाद्या निर्णयामागे असतात. आपण आपलं आयुष्य कितीही निवांतपणे, एकांतपणे किंवा एकटेपणाने जगण्याचा प्रयत्न केला तरी कधीना कधी ‘वाटेत भेटणारी माणसां’ची गरज भासतेच.

तीन-एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मुंबईत नुकताच स्थायिक व्हायला आलो होतो. हातात पडेल ते काम करण्याची तयारी होती. जसा पोटाचा खळगा भरण्यावण्याचा प्रश्न डोळ्यासमोर होता, तसाच घरची जबाबदारीही आणि अगदी इव्हरेस्ट शिखराइतके स्वप्नंही. अशा साऱ्या परिस्थितीत मुंबईत आलेलो मी. काय करावं अशा मनस्थितीत. शिक्षण गावी घेतलेले. त्यामुळे दहावी झालो असतानाही या मुंबईतला पाचवीतला मुलगाही माझ्यासमोर सरस ठरत होता. अशातच एक दिवस पेपरची लाईन टाकताना एक माणूस भेटला. मी तेव्हा सकाळी पेपरची लाईन टाकून कॉलेज करत होतो. हा माणूस रोज वॉकिंगला जात असे. एक दिवस मला अडवून म्हणाला, ‘काय करतोस रे बाळा’.. मग आपले नेहमीचे कथा-पुराण त्या व्यक्तीला सुनावले. काही दिवस गेले. मीही या व्यक्तीला विसरुन गेलो. तसा तो नेहमी दिसायचा. मात्र पुन्हा भेटावसं कधी वाटले नाही. एक दिवस अचानक मला त्या व्यक्तीन पुन्हा थांबवले. ‘बाळा, तू मला भेट’ असे सांगून त्याने त्याचा पत्ता असलेला कागद हातावर टेकवला आणि निघून गेला. काम वगैरे असेल काही म्हणून घर शोधत शोधत त्या व्यक्तीच्या घरी पोहोचलो. त्या व्यक्तीने त्या दिवशी आयुष्य जगण्यापासून ते अगदी शिकताना कसं शिकशील, काय करशील वगैरे वगैरे खूप काही मार्गदर्शन केलं. आयुष्याला कलाटणी देणारा तो दिवस ठरला! काही दिवसांनंतर कळलं की मला भेटलेला तो व्यक्ती साधा-सुधा नव्हता, तर मराठी अभिनेते आणि मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर होते. सांगण्याचा हेतू हा की आपल्या आयुष्याच्या वाटेत असे अनेक माणसं आपल्याला भेटत असतात. ज्यांना ओळखून आपण आपल्या आयुष्यात स्थान द्यायचे असते.
अनेकदा तर आयुष्याचा जोडीदारच आपल्याला अशा वाटेत भेटणाऱ्या माणसांमधून गवसतो. मग हळूहळू ओळख होते. ओळखीचे रुपांतर नात्यांमध्ये होते आणि मग ते मित्रत्वाचे नाते अगदी आयुष्याचे नाते बनून जाते. किंबहुना अशीही अनेक लोक मला भेटलेत जी कुठे बाजारात भेटली किंवा कुठल्याशा प्रवासात एका सीटवर बसली होती, तेव्हा जी ओळख झाली ती अगदी कायमीचीच. म्हणजे एकमेकांच्या घरांमधील  सर्व सण-वारांसोबत लग्न सोहळा असो वा आणखीकाही, सर्वांनाच उपस्थित राहू लागतात. ओळख झालेली असते फक्त एखाद्या प्रवासात. मात्र त्यांचे नाते इतके घट्ट होते की ते त्यांची ओळख त्याच प्रवासातल्या वाटेत सोडून येत नाहीत, तर ते नाते जपतात.

जशी चांगली माणसं आपल्याला भेटतात, तशी वाईटही भेटतातच. किंबहुना आताच्या स्वार्थी आणि स्वकेंद्री जगण्यात वाईटांचा आणि स्वार्थी माणसांचाच सुळसुळाट मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अशा लोकांना ओळखून, त्यांना बाजूला ठेवून किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन आपली वाट चालायची असते.

माझ्याप्रमाणे तुमच्याही आयुष्याच्या वाटेत अशी अनेक माणसं भेटली असतील. जी तुमच्या आयुष्याचा भाग बनली असतील किंवा तुमच्या आयुष्यात असे काही तरी केले असणार ज्यामुळे त्यातून काहीतरी शिकला असाल. प्रत्येकाकडे अशा माणसांचा वेगवेगळा अनुभव असेल. कुणाला कुणी मदत केलेली असेल, तर कुणाला फसवलंही असेल. एखादा आपल्या आयुष्याचा भाग बनला असेल तर कुणी आला-काही बोलला आणि निघून गेला, असेही झाले असेल. मात्र अर्ध्या वाटेत सोडून गेलेल्यांचे चांगले वाईट अनुभव गाठीशी ठेवून आपल्या सोबत असणाऱ्यांशी योग्य ऋणानुबंध जपून आपण आपली वाट चालत राहायची असते, हा जगाचा नियमच आहे.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel