वयाच्या तुलनेने खूपच लवकर अंगावर आलेली घराची जबाबदारी.. कुणाच्या भावाचे शिक्षण, तर कुणाच्या बहिणीचे शिक्षण.. अजारी आई-वडिलांच्या औषध-पाण्याचा खर्च, तर कधी फुटक्या नशिबामुळे आलेल्या असंख्य अडचणी अशा नानाविध जाबाबदाऱ्या वयाच्या सतरा-अठराव्या वर्षीच खांद्यावर उचलून या जीवघेण्या स्पर्धेत तग धरून राहत काम करून शिक्षण घेणारे तरुण-तरुणी या मुंबईसारख्या शहरात काही कमी नाहीत. शिक्षणाला पर्याय नाही हे चांगले ठाऊक असते, पण हातात चार पैसे आल्याशिवाय शिक्षण घेऊ  शकत नाही व घरही चालू शकत नाही हे वास्तव स्वीकारून जगाच्या या जीवघेण्या स्पर्धेत पडेल ते काम करून पैसे कमावायचे व शिक्षणसुद्धा पूर्ण करायचे आणि घराची जाबाबदारी सांभाळायची असे ठरवून सकाळी घरातून बाहेर पडलेल्या व रात्री आकारा-बारा वाजेपर्यंत अखंड मेहनत...

जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात सध्या स्पर्धा सुरू झाली आहे. या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर या स्पर्धेत आपणही सहभागी होणे अपरिहार्य आहे. जो स्पर्धेत नाही त्याचे अस्तित्वच नाही किंवा त्याला या जगात नाव नाही असे काहीसे एक भयानक चित्र गेल्या काही वर्षापासून पुढे येताना दिसते आहे. ग्लोबल आणि लोकल या शब्दांमध्येसुद्धा विशेष काही फरक राहिले नाही.  हे जग म्हणजे एक खेडे झाले आहे. या ‘ग्लोबल’ जगात स्पर्धेसाठी काहीही करायला तयार होणारी माणसे पावलापवलावर दिसू लागली आहेत. आणि या ग्लोबल जगात तग धरून राहायचे असेल  तर आपल्यालाही या स्पर्धेचे नियम, अटी, कायदे-कानून माहीत असायला हवेत. पण या साऱ्या ससेमिऱ्यात माणसाच्या भावनांची पायमळणी होते आहे. मात्र इथे हाच नियम आहे व त्यानुसारच आपण जगले पाहिजे हे मान्य करून कित्येक तरुण-तरुणी या स्पर्धेत उतरत आहेत. शिक्षण क्षेत्रसुद्धा या स्पर्धेचा भाग झाला आहे. घरी बेताची परिस्थिती आहे. शिकलो नाही तर येणारा काळ आपल्या जगण्याचे जे हाल करेल ते आताच डोळ्यांसमोर दिसत असल्याने शिक्षणाचे महत्त्व आधिकच वाढले आहे किंबहुना ते दुपटीने वाढले आहे. हे जाणून काहीही झाले तरी शिकायचेच या ध्येयाने पछाडलेले अनेक जण मुंबई-पुण्यासारख्या तथाकथित मेट्रोपोलिटन शहरांमध्ये आपल्याला नेहमीच भेटतात.
गावाकडून मुंबई-पुण्यासारख्या शहरांत फक्त शिकण्यासाठी आलेल्या बहुतांशी तरुण-तरुणी अर्धवेळ काम करून शिकण्यालाच पसंती देतात असे दिसुन येते आहे. इथली महागाई न परवडण्यासारखी आहे, त्यामुळे स्वत:चा खर्च स्वत: करून शिकणारेही इथे आहेत आणि स्वखर्चाबरोबरच घराची आर्थिक जबाबदारी सांभाळून शिक्षण घेणारेही इथे आहेत. अकरावी व बारावी ही दोन वर्षे नाइट कॉलेजमधून पूर्ण करताना हल्ली अनेक जण दिसतात. जेणे करून दिवसा काम करता येईल व कामाबरोबर शिक्षणही पूर्ण करता येईल. बारावीनंतर पुढील शिक्षणाची वेळ साधारणत: बहुतांश कॉलेजमध्ये सकाळचीच असल्याने तशी फारशी अडचणसुद्धा येत नाही.  दिवसभर काम व रात्री कॉलेज किंवा सकाळी कॉलेज व नंतर रात्रीपर्यंत काम अशी शिकण्यासाठीची तडजोड अनेक जण करतात. ज्या दिवसांत आयुष्याची मौजमजा अनुभवायची, कॉलेजातील विविध स्पर्धा, महोत्सव, विविध डेज्, व्याख्यानं यांमध्ये सहभाग घ्यायचा त्या वेळेत काम करावे लागते. याबद्दल मनात कुठे तरी वाईट वाटतंच, मात्र हासुद्धा आपल्या नशिबाचाच एक भाग आहे हे त्यांच्या मनाने मान्यही केलेले असते. शिवाय शाळेमध्ये असताना हिंदी सिनेमांतील कॉलेज लाईफ पाहून कॉलेजचे जे काल्पनिक आयुष्य रंगवलेले असते त्या साऱ्यांचा चुराडा झालेला पाहून अनेक तरुणांची मने दुखावलेलीसुद्धा असतात. पण याला पर्याय नाही याची त्यांना जाणीव असते. आपण काही जन्मत:च सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेलो नाही याची त्यांना पूर्ण कल्पनाही असते. आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहायचे असेल तर याला पर्याय नाही हे या तरुणांना पूर्णपणे मान्य आहे. एवढंच नाही तर जे तरुण पूर्णवेळ कॉलेज करतात तेही कमवून शिकण्याचा प्रयत्न करतात. दररोज सकाळी चार-पाच वाजता उठून पेपरची लाइन टाकणे, दुधाची लाइन टाकणे इत्यादी अनेक छोटी छोटी कामे करून किमान स्वखर्च भागवण्याचा प्रयत्न करतात.
एकीकडे स्त्री शिक्षणासाठी सरकार विविध योजना आणून स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार-प्रचार करत आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे अनेक मुली अर्धवेळ काम करून मुलांच्या खांद्याला खांदा लावून शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. घरातील धुणी-भांडी करून कामाला जाणे, शिवाय कामावरून पुन्हा कॉलेजला जाणे असा विस्मयकारक दिनक्रम अनेक तरुणींचा असल्याचे निदर्शनास येते. स्त्रिशिक्षणाचे अदर्श खरेतर काम करून शिक्षण घेणाऱ्या मुली ठरत असतात. मात्र अर्धवेळ काम करून नव्या जगासाठी शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या या तरुणींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे अनेक तरुणींचे मत आहे.
अर्धवेळ काम करून शिक्षण घेणाऱ्यांच्या समस्याही तितक्याच गंभीर आहेत, जितके त्यांचे आयुष्य बिकट आहे. घरची आर्थिक बिकट परिस्थिती असलेले अनेक जण रात्र कॉलेजचा पर्याय निवडतात, मात्र मुंबई- पुणे- नागपूर अशी काही महत्त्वाची शहरे सोडली तर रात्र कॉलेज फारशी कुठे दिसत नाहीत, शिवाय या शहरांतील रात्र कॉलेजची अवस्थाही भयानक आहे. कुठे शिक्षक कमी, तर कुठे इमारत मोडकळीस आलेली. किमान उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी तरी व्यवस्थित सोयी-सुविधांची आवश्यकता आहे. संगणकासारख्या आधुनिक उपकरणांची गरज आहे. अखंड मेहनत करून शिक्षण घेणाऱ्यांच्या या तक्रारी ऐकल्यावर मन हेलावतं.
स्वावलंबन, जबाबदारपणा हे गुण प्रत्येकाच्या अंगात भिनलेला आढळून येतो. वयाच्या तुलनेने जरी लवकर नोकरी करावी लागली असली तरी ज्याला आपण प्रॅक्टिकल नॉलेज असे म्हणतो ते या तरुण-तरुणींमध्ये खूप असल्याचे दिसते. त्यामुळे आई-वडिलांच्या कमाईवर व नावावर शिक्षण घेऊन बक्कळ पैसा व नाव कमावणाऱ्यांसहित इतर सर्वासाठीच अर्धवेळ काम करून शिक्षण घेणारी तरुणाई आदर्श आहे. त्यांची शिक्षणाची ओढ, जिद्द, ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी, कोणतेही मानसिक दडपण न घेता आपल्या मेहनतीवर विश्वास यामुळे या साऱ्या तरुण-तरुणींचे कौतुक करावे तेवढे थोडेच. शिक्षण नावाच्या या माहितीच्या अथांग पसरलेल्या महासागराला गवसणी घालण्यासाठी जिवाचे रान करून शिकणाऱ्या सर्वच तरुण-तरुणींच्या प्रयत्नांना आणि जिद्दीला सलाम.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel