‘वय: वादळविजांचं’ हे प्रवीण दवणेंचं पुस्तक वाचलं तो महिना होता मार्च. मी मुंबईतील साठ्ये महाविद्यालयात बीएमएमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो. अतिशय महत्त्वाची परीक्षा होती. त्यात पार्ट टाईम जॉब करत होतो. मालाडच्या लिबर्टी गार्डनजवळ जयप्रकाश तिवारी नावाचे सीए आहेत, त्यांच्याकडे काम करत असे. एप्रिलमध्ये परीक्षा होत्या. त्यामुळे परीक्षा तोंडावर आणि त्यात सीएच्या येथे कामाला म्हणजे ऑडिट, रिटर्न फाईल वगैरे हजार कामं. कामा खूप होतं. त्यामुळे तिवारी सर सुट्टी द्यायला तयार नव्हते. परीक्षेच्याआधी दोन दिवसांपासून सुट्टी देण्याची मात्र त्यांची तयारी होती. आता दोन दिवसांत पूर्ण अभ्यास कसा करता येईल, याची चिंता. प्रचंड कन्फ्युज्ड होतो. जॉब सोडायचा, तर नवा जॉब मिळत नसे. प्लेसमेंटवाल्यांन १५०-२५० तर कधी कधी ५०० रुपये द्यावे लागत. अंधेरीच्या जम्बो दर्शनमधील गजानन प्लेसमेंटम, दादरच्या सुविधाच्या बाजूला असलेलं प्लेसमेंट ऑफिस, अंधेरीतील टाईम्स प्लेसमेंट या साऱ्यांना पैसे देऊन आणि नोकरी आलीय का, हे विचारण्यासाठी फेऱ्या घालून आधीच थकलो होतो. त्यामुळे नोकरी सोडायची नाही, हे निश्चित होतं. त्यात हा जॉब ओळखीने लागलेला. आता जॉब सोडायचा नव्हता आणि अभ्यासही बाकी होता, त्यात असाईनमेंट्स राहिलेल्या, आता करायचं काय, याची चिंता वाढली होती.
त्यात प्रॉब्लेम असा व्हायचा की, कुणाशी हा प्राब्लेम शेअर करता येत नसे. लेक्चर संपल्यावर पटापट पार्ल्याहून मलाडला जावं लागत असे. दुपारी 12 वाजता ऑफिसला पोहोचावं लागत असे किंवा ऑफिसमधूनच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वरळी, वागळे इस्टेट किंवा माझगाव या ठिकाणच्या सेल्स टॅक्स ऑफिसला काही-ना-काही कामानिमित्त जावं लागत असे. त्यामुळे मित्रांशीही फार काही बोलता येत नसे. परीक्षा जवळ येत होती... धाकधूक वाढत होती.
याचदरम्यान, प्रवीण दवणेंचं हे पुस्तक हाती लागलं. हा मस्त योगायोगच होता. अगदी प्रवीण दवणेंच्या शब्दात सांगायचं तर, पहिल्या पावसाच्या सुगंधात मोगऱ्याचा दरवळ जसा मिसळावा, तसं हे पुस्तक माझ्या आयुष्यात आलं. परफेक्ट टायमिंग घेऊनच!
मोजून १०१ पानी पुस्तक. पण या १०१ पानात आयुष्य जगण्याला उमेद देणारे ‘एक-से-एक’ शब्द आहेत. ‘क्षण : जगण्याचे अन् भरण्याचे’ या सुरुवातीच्याच लेखात प्रवीण दवणेंनी ‘जगण्याची’ व्याख्या सांगितलीय. दवणे लिहितात, “अनुकूलतेने श्वासांच्या पताका फडफडवीत तर अनेक जिवंत राहतात, पण प्रतिकूलतेचेही पंख करुन अस्मान शोधतात, ते खरं जगतात” कसलं वाक्य आहे यार... दवणे प्रतिकूलतेचेही पंख करायाल सांगतात. बरं या एकाच वाक्याने मी भारावून गेलो वगैरे आणि निकालाची पर्वा न करता अभ्यास करायला लागलो, अशातला भाग नाही. मात्र, या पुस्तकात आधी म्हटल्याप्रमाणे एक-से-एक प्रेरणादायी वाक्य सापडतात.
पुस्तकातील पहिला आणि दुसरा लेख वाचल्यावर पुस्तक बाजूला ठेवून परीक्षेच्या अभ्यासाला लागलो. पत्रकारितेची परीक्षा असली, तरी मला त्यात आणि इतर परीक्षांपेक्षा काहीही फरक जाणवला नाही. नुसती घोकंपट्टी करुन पास होणं, हेच उद्दिष्ट आहे की काय, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती. पण या लेखांनी आधाराचे शब्द दिले. आपण असं निराश होऊन चालणार नाही. वाचूया...अभ्यास करुया... जो हो जाएगा, देखा जाएगा, असं ठरवलं. परीक्षेचं टेन्शन आलेल्या या काळात या पुस्तकाने हे सकारात्मक बदल घडवला. म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं.
बरं परीक्षेच्या काळापुरतंच हे पुस्तक उपयुक्त आहे, असेही नाही. आपण पाहतो की, परीक्षेतील निकालाने अनेकजण निराश होतात. स्वत:ला कमी समजू लागतात. मग एकप्रकारचा निगेटिव्हनेस तयार होतो आणि अनेकदा तर टोकाचं पाऊलही उचलतात. तर ‘यश: परीक्षेतलं आणि जगण्यातलं’ या लेखात प्रवीण दवणे सांगतात, “अपेक्षित निकाल लागला नाही, तर निराश होऊ नका. हेच तर जगण्याचं वय आहे. तारुण्य उपभोगा.” मात्र, हे सांगताना दवणेंचं एक वाक्य मी इथे मुद्दामहून नमूद करतो. अतिशय मोजक्या शब्दांत दवणेंनी परीक्षेच्या निकालासह तारुण्याची व्याख्या केलीय. ते लिहितात- “क्षणभराचा हादरा पचवून पुढे जाण्याची जिद्द म्हणजेच तारुण्य! वास्तव स्वीकारायला शिकण्याची ही कुठे सुरुवात आहे.” दवणेंच्या म्हणण्याप्रमाणे खरंच वास्तव स्वीकारुन जगायला हवं, तरच परीक्षेतीलच काय आयुष्यातील अनेक हादरे आपण पचवू शकतो.
तारुण्याच्या विविध अंगांना स्पर्श करणारं असं हे पुस्तक आहे. स्पर्धात्मक जीवन, परीक्षा, शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा, पास-नापासांचा खेळ, त्यातून येणारी निराशा इथपासून ते तारुण्यातील फिरणं-बागडणं, कॉलेजचे स्वप्नवत वाटावे असे दिवस, ते अगदी प्रेम आणि प्रेमाच्या कविता, अशा तारुण्याशी संबंधित बहुतांश विषयांना प्रवीण दवणेंनी हात घातला आहे. तरुणांना सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे.
यातील प्रेम-कविता या विषयावरुन आठवलं... प्रेम कवितांवर ‘कवितेचं वय’ हा एक मस्त लेख दवणेंनी लिहिलाय. ऐन तारुण्यात कुणी कितीही गंभीर, कठोर मनाचा वगैरे असला, तरी प्रेम कविता करणारच. साला हे वयच असं असतं. या वयात कठोर मनातही प्रेमाचा एक राखीव कोपरा असतो. कविता आणि तरुण यांचा संबंध जोडताना दवणे लिहितात, “प्रत्येकानं आयुष्यात किमान एक तरी कविता केली असावीच... कुणाला तरी उद्देशून कविता लिहाविशी वाटली, की समजायचं आपण बहुधा तरुण झालो!” याच लेखात दवणेंनी प्रेमाचं जे वर्णन केलंय, ते अप्रतिमच. अतिशय सहजतेनं आणि सुरेख पद्धतीनं दवणेंनी प्रेम मांडलं आहे.
पावसाळ्यातील रिमझिम, तर कधी टपटप पडणाऱ्या पाऊसधारांमधून... काळ्याकुट्ट अंधारात उघड्या आकाशातील चंद्र-ताऱ्यांमधून... तर कवीच्या शब्दांतून व्यक्त होणारं प्रेम, अशा प्रेमाच्या व्यक्त-अव्यक्त माध्यमांना दवणेंनी आपल्या खास शैलीतल्या शब्दांमध्ये बंदिस्त केलंय. बरं यावेळ ते मराठी मनावर आपल्या काव्यपंक्तींतून अधिराज्य गाजवणाऱ्या बा. भ. बोरकरांच्या कवितांचा आधार घेतात. त्यामुळे प्रेमावरील हा लेख मनातील राखीव कोपऱ्यात अलगद जाऊन बसतं. वाचकाला भिडतं.
‘फुलों के शहर में घर हो अपना’ असे शब्द गुणगुण्याचं वय असणाऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपल्या लेखनीतला शब्द-नी-शब्द प्रवीण दवणे खर्ची घालतात. ते शब्दांना बजावतात, ‘हे पाहा शब्दांनो.. माझ्या तमाम तरुणांना मला आशावादी करायचंय.’
पुस्तकातील बहुतेक सर्व लेखांमध्ये प्रवीण दवणे तरुणांच्या बाजूने राहून, मित्र बनून त्यांना जगण्याची व्याख्या समजावत राहतात. ती व्याख्या वाचकांपर्यंत पोहोचतेही. जशी माझ्या चौदावीच्या परीक्षेच्या काळात दवणेंची प्रेमाची हाक पोहोचली. प्रेरणा मिळाली. मात्र, यातील एक लेखात दवणे तरुणांच्या मित्राच्या भूमिकेतून बाहेर पडून थोरल्या भावाच्या भूमिकेत जातात आणि जबाबदारीचीही जाणीव करुन देतात. आपल्याला मनमुराद जगण्याचं स्वातंत्र्य असलं, तरी हुरळून जाऊ नका. कारण तुमच्या यशामागे अनेक वाती जळत असतात, अनेक पाय झिजत असता, त्या जळणाऱ्या वातींची आणि झिजणाऱ्या पायांची जाणीव मनामध्ये असू द्या, हे प्रवीण दवणे अत्यंत तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करतात. यावेळी दवणे त्यांच्याच कवितेचा आधार घेतात. ते लिहिलात-
“जुनीच पत्र पुन्हा पुन्हा... वाचत असतं कुणीतरी
दिवे सगळे विझल्यावर... जळत असतं कुणीतरी
अशाच खिडकीत चंद्र होऊन... टपटपण्यात मजा आहे
कुणीतरी ऐकत असतं दिठीतून... म्हणून तर गाण्यात मजा आहे”
म्हणजेच आपल्यासाठी कुणीतरी मेहनत करत असतो, आपल्याकडे आशेनं पाहत असतो, याची जाणीव ठेवा, असे दवणे आपल्या काव्यपंक्तीतून सांगण्याचा प्रयत्न करतात.
खोलीतल्या काळ्याकुट्ट अंधारात खिडकीतून दिसणारा चंद्रही आधाराचा वाटतो, अगदी तसंच हे पुस्तक मला परीक्षेच्या काळात आधाराचं आणि नित्याच्या जगण्यात सकारात्मक ऊर्जा देणारं वाटतं. म्हणूनच या पुस्तकाला ‘खिडकीतला चंद्र’ म्हणावसं वाटतं.