'पी की मेल्या त्वांड लावून पाणी. टीबी झालाय काय तुला? माणसासारखा माणूस तू. रगात लालच हाय नव्हं? जातपात कुठं रायलीय का मेल्या आता?' असे म्हणत नयवाडीतील बाळाबाबाला माझ्या आजोबांनी चांगलंच झापलं. बाळाबाबा गावात आला की साकनं पाणी पिताना मी अनेकदा पाहिलंय. साकनं म्हणजे तांब्याला तोंड न लावता. तेव्हा मी लहान होतो. अगदी दहा-बारा वर्षांचा असेन. पण तरीही राहून राहून प्रश्न पडायचा, शेजारच्या वाडीतला बाळाबाबा आला की तो साकनं पाणी पितो आणि इतर वाडीतील कुणी आला की, तोंड लावून पाणी पितो. असं का? एकदा आजोबांना विचारलं तेव्हा कळलं की, बाळाबाबा बौद्ध होता.

-१-

रायगडच्या रोहा तालुक्यातील एक गाव म्हणजे नयवाडी. गाव कसलं, एक तीस-चाळीस घरांची वस्तीच ती. आमच्या गावापासून दोन-अडीच किलोमीटर असावी. नयवाडीला अनेकजण बौद्धवाडीही म्हणत. पण नयवाडी मूळ नाव. तिथे बौद्ध राहत म्हणून बौद्धवाडी बोलण्यास सुरुवात झाली असावी, असा माझा अंदाज आहे. नयवाडीत कधी क्रिकेट खेळायला गेल्यावर मी एक गोष्ट नेहमी पाहायचो, प्रत्येकाच्या घराच्या दारावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो असायचा. फोटो नसला तर किमान 'जय भीम' नावाची छोटीशी पाटी असायचीच. आताही असते. सणावाराला नयवाडीतील लोक आमच्या गावात येत नसत. काही काम असेल तर सणाच्या आधी उरकून घेत असत. तसे ते कुणावर अवलंबून नव्हते. त्यांची स्वत:ची जमीन होती-शेती होती-बैलगाड्या होत्या. काही जणांची तर स्वत:ची विहीरही होती. तरीही ते आपल्यापेक्षा लहान आहेत, असं त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जायचं. नयवाडीतील एखाद्या मित्राला घरी आणलं की, गावातून येताना कुणी-ना-कुणी विचारयचंच, हा बौधाचा पोरगा काय?

-२-

आमचं संपूर्ण गाव कुणब्यांचं. कुणबी समाज मूळचा शेतकरी समाज. मुळात कुणबी ही भाताचीच एक जात. त्यामुळं शेती नावातच. तर कुणबी समाज हा साधारणत: प्रथा-परंपरा काटेकोरपणे पाळणारा समाज आहे. भात कापणीआधी कोंबडीचा नैवद्य, कोणतंही शुभकार्य ब्राम्हणाशिवाय पूर्ण होत नाही वगैरे प्रथा मानणारा हा समाज.

-३-

पूर्वी नयवाडीतील लोकांना घरात घुसू दिलं जायचं नाही. आज बाळाबाबा किंवा त्याच्यासारखे नयवाडीतील इतर अनेकजण कुठल्याही कुणब्याच्या घरात चुलीपर्यंत जातो. हवं ते घेतो-पितो-खातो. आता भेद राहिला नाही. पूर्वी शेतीच्या कामासाठी किंवा गाई-बैलांना सांभाळायला (गवारी) बौद्ध लोक कुणब्यांकडे गडी म्हणून राहत असत. आज आमच्या गावातील कुणबीच बौद्धांच्या शेतात मजुरीवर राबायला जातात. पण भेदाची ही स्थिती अगदी २००२-२००३ पर्यंत होतीच. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत ती खूप बदललीय. एखाद्या क्रांतीसारखी.

-४-

नाही असे नाही, आजही काही कट्टर वगैरे म्हणवून घेणारे कुणबी बाळाबाबासारख्यांना भेदभावाची वागणूक देतातच. पण हे लोक क्षुल्लक आहेत. आता बऱ्यापैकी समाजाने बदल स्वीकारलाय. पण एक गोष्ट कायम आहे, ती म्हणजे बौद्धांच्या मुलीशी-मुलाशी लग्न. आजही कुणबी समाजात बौद्ध मुलीशी-मुलाशी लग्न करु दिले जात नाही. आजही बौद्ध मुलाने कुणबी मुलीशी लग्न केल्यास मुलाला बेदम मारहाण होते. काही दिवसांपूर्वीच कोलाडमधील एका प्रकरणावरुन दिसून आलं. भारत पाटणकरांनी ते प्रकरण मला सांगितलं, तेव्हा पोलिसांशी बोललो. तेव्हा कळलं की, त्या बौद्ध मुलाला ट्रकखाली टाकण्यापर्यंत मजल कुणब्यांची गेली होती. हे बदलायला हवं. काही लोक बदलण्याचे प्रयत्न करतही आहेत. पण ही भेदभावाची कीड त्यांच्याच अंगात वळवळते, ज्यांच्याकडे पैसा आहे, असं माझं ठाम मत आहे.

-५-

माझ्या आजोबांनी बाळाबाबाला ज्या दिवशी पाणी दिलं, त्या दिवशी मला माझे आजोबा बंडखोर वाटले. ते आपला समाज विरोधात असलेल्या गोष्टींविरोधात गेले होते. अर्थात तेव्हा या बदलाला सुरुवात झाली होती. बौद्धांना स्वीकारण्याची ती सुरुवात होती. त्यामुळे माझ्या आजोबांचं काम ऐतिहासिक वगैरे नव्हतं. पण माझ्या घरातही भेदांना थारा नाही, याचं खूप बरं वाटलेलं तेव्हा. आणि आजही वाटतं.

-६-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel