“काशीआक्का, रंग्या
पडला. धकाड्यावरुन खाली कोसालला. मुस्काट फुटला आणि ढोपरपण. ढोपरातना रगात येतंय.
तुला बोलवलायन बयनी.” धावत-पळत आलेला रामा सुताराचा पोरगा
धापा टाकत काशी आक्काला सांगत होता. पोरगा पडला आहे आणि त्याला मोठी जखम झाली आहे,
याची किंचितशीही चिंता चेहऱ्यावर नसलेली काशीआक्का म्हणाली, “थांब याडवडायईज यवदे. मंग यते. श्यामराव परांजपे पारसला काय बोलतोय ते बघते
आणि यते पटकन. तू हो पुढं.”
हे अस्सं फ्याड गावाकडं
मराठी मालिकांचं होतं. आज ते काही प्रमाणात कमी झालंय. कारण त्याच त्याच मालिका
नव्या कलाकारांना घेऊन येतात. पण ही परिस्थिती एकेकेळी आमच्या गावात होती. मालिका
आहेत की संसर्गजन्य रोग, असा विचार करायला लावणारे असे अनेक किस्से आमच्या गावात
घडले आहेत.
2007 पर्यंतचा तो काळ
असेल. तेव्हा गावातील एका दुकानदाराकडे गावातील एकमेव टीव्ही होता. संध्याकाळची
कामं करुन लोक ठीक 8 वाजता ‘चार
दिवस सासूचे’ आणि ‘या गोजिरवाण्या घरात’ पाहायला यायचे. रात्री 8 ते 9 ही वेळ जणून मालिकांसाठी राखिव होती, असं
वाटण्याची ती परिस्थिती. ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘या गोजिरवाण्या घरात’
पाहणं म्हणजे आपलं आद्य कर्तव्य असल्यासारखं हजेरी लावायचे. ‘चार दिवस सासूचे’मधील आशालता देशमुखची (रोहिणी
हट्टंगडी) चर्चा तर नळावरही निघे. काय बाय ती साड्या नेसते, यकदम कडक, सूनांना तिच्यासारखंच
वागवावं वगैरे वगैरे चर्चा मी अनेकदा नळाच्या बाजूने जाता-येता ऐकलेल्या आहेत. याच
मालिकेतील सुशांत सुभेदारावर शिव्यांची बरसात केली जायची, सून असावी तर
अनुराधासारखी (कविता लाड). अशा एक ना अनेक चर्चा केवळ मालिकांवर केल्या जायच्या.
मालिकेतील पात्र खोटी असतात, काल्पनिक असता, असं आपण सांगायला गेलो तर ‘गप रे गबाळ्या.. तू बारिक हायस. तुला काय कलतंय’ असं
म्हणत दरडावलं जायचं.
‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेचं तर विचारुच नका.
श्यामराव परांजपे, पारस, शेखर हे जणू आमच्याच गावातल राहत आहेत, अशी त्यांची चर्चा.
‘शेखर आरगट हाय, पण मनाने चांगला हाय पोरगा. थोडा मारामाऱ्या
करतो. पण कधी वायटासाठी करत नाय.’ अशी प्रतिक्रिया या
मालिकेतील शेखरला म्हणजेच आधीचा आविष्कार दारव्हेकरच्या भूमिकेला मिळत असत. अरे हो...
‘या गोजिरवाण्या घरात’मधील शेखरची
भूमिक आधी संतोष जुवेकर करायचा. मात्र, त्यानंतर आविष्कार दारव्हेकर करु लागला.
तेव्हा मालिका पाहताना सारखं, नवा शेखर काय बरोबर दिसत नाय. सूट व्हत नाय. पण काही
काळाने संतोष जुवेकरला विसरुन आविष्कार दारव्हेकरला शेखर म्हणून स्वीकारले गेले.
श्यामराव परांजपेंची तर
अफाट क्रेझ आमच्याकडे होती. आजही आहे. श्यामराव परांजपेंची भूमिका साकारणारे
अभिनेते प्रदीप वेलणकर आजही जर आमच्या गावी गेले तर त्यांची मिरवणूक काढली जाईल,
अशी परिस्थिती आहे. प्रदीप वेलणकरांनी साकारलेला श्यामराव परांजपे लोकांना प्रचंड
भावला. आवडला.
श्यामराव परांजपेंवरील
एक किस्सा आठवला. तीन वर्षांपूर्वी आमच्या गावातील मधूआक्का मुंबईला भाचीच्या
लग्नाला आली होती. पार्ल्यात लग्न होतं. मी तिला लग्नाच्या हॉलकडे घेऊन चाललो
होतो. सकाळची वेळ होती. पार्ल्यातील दुभाषी मैदानाजवळ एक माणूस मधूआक्काला दिसला
आणि ती मोठ्याने ओरडली, “तो बघ गोजिरवाण्या घरातला श्यामराव
परांजपे.. हा जिवंत हाय? मग त्या टीव्हीत कसा काय दिसतो.” मी सर्वप्रथम आजूबाजूला पाहिलं, कुणी मधूआक्काच्या या जगावेगळ्या
प्रतिक्रेयेला पाहिलं तर नाही. मग तिला सांगितलं, अगं ते पार्ल्यातच राहतात.
प्रदीप वेलणकर त्यांचं नाव. त्यांची बायको इथे शाळेत शिक्षिका आहे. ते कलाकार आहेत
वगैरे. अर्थात मधूआक्काला ते काही पटलं नाही. पण गावाला गेल्यावर तिने डायनासॉर
किंवा अॅनाकोंडा पाहिल्यासारखं सर्वांना सांगितलं. एखद्या कलाकाराला प्रत्यक्षात
पाहणं, हे दिन-रात शेतात राबणाऱ्या आमच्या गावाकडच्या माणसांना नवीन आणि अद्भूत
वगैरे होतं आणि आजही आहे. हीच परिस्थिती रोहिणी हट्टंगडी, सुशांत शेलार, संतोष
जुवेकर, आविष्कार दारव्हेकर, कविता लाड, अलका कुबल यांसारख्या कलाकारांबद्दल आहे.
प्रचंड म्हणजे प्रचंड आकर्षण लोकांना या टीव्ही कलाकारांचं आहे.
हल्ली गावाकडं मालिका
पाहण्याचं हे प्रमाण कमी झालंय. काही वर्षांपूर्वी गावात एकच टीव्ही होता. मात्र,
आता दर सात-आठ घरं सोडून एक टीव्ही आला आहे. सामूहिकरित्या टीव्ही पाहणं, मालिका
पाहणं आता तसं दुर्लभच झालं आहे. आणि तसंही मालिकांचे विषयही आता पहिल्यासारखे
वेगळे नसतात. आताच्या मालिकांमध्ये सुरुवातीला कथानक
चांगले वाटते नंतर त्यात जी काही घुसवाघुसवी केली जाते.
पूर्वी एक टीव्ही
असल्यानं सर्वजण एकत्र येऊन चार दिवस सासूचे किंवा या गोजिरवाण्या घरात आणि कुणाला
वेळ असेलच तर काटा रुते कुणाला सारख्या मालिका पाहायचे. आता बऱ्यापैकी बहुतेक
लोकांकडे टीव्ही आल्याने घरात एकटं बसून टीव्ही पाहिलं जातं. एकट्याने घरात बसून
टीव्ही पाहण्यात सर्वांनी मिळून टीव्ही पाहण्यातली मजा नाही. जाहिरात आल्यावर
पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल याचा डोक्याचा पुरेपूर वापर करुन तर्क लढवले जायचे,
ते आता होत नाही. जाहिरात आल्यावर घरात धावती नजर टाकून मालिका सुरु होण्याआधी
टीव्हीसमोर हजर राहणं, मालिका सुरु असताना कुणी काही बोललं का शिव्यांची लाखोली
वाहणं वगैरे आता घडत नाही. आता सारं दुरावल्यासारखं वाटू लागतं.
गावगाडा बदलतोय.. नवी
माध्यमं आली.. लोकांची खरेदी क्षमता काहीप्रमाणात वाढली आणि नव-नवी साधनं लोक घेऊ
लागली. पण या साऱ्या तथाकथित बदलात माणूसही एकमेकांपासून दूर होत चालला आहे, याची
जाणीव सारखी होत राहते.