वणवे विझवणारा श्रीकृष्ण
मुले सर्व एक झाली तर आईबापही परपस्परांची भांडणे विसरणार. दोन शेजा-यांचे परस्परांशी भांडण असेल. परंतु दोघांची मुले जर हे वडिलोपार्जित भांडण उडवून देऊन; एकत्र खाऊपिऊ लागली. बसूउठू लागली, खेळूखिदळू लागली, हिंडूफिरू लागली, तर आईबापांच्या शेजा-यांजवळ असणा-या वैराचे काय चिन्ह उरणार? आईबापही मग मुलांच्या पाठोपाठ जातात व वैरवन्ही विझतो. गोकुळाला लागलेले वणवे श्रीकृष्णाने गिळले असे वर्णन आहे. मला तर हेच वणवे वाटतात. आपण लहान खेडयात जावे तर तेथे दहा पक्ष आपणास दिसतील, शेकडो क्षुद्र व क्षुल्लक भांडणे दिसतील. तीच द्वेषबीजे मुलांच्या हृदयांतही लहानपणापासून पेरली जातात असे दिसेल. असे हे कलहाग्नी घरादारांची, गावांची कशी राखरांगोळी करतात, गावातील शांतीचा कसा भंग करतात, कशाचीही सुरक्षितता कशी वाटत नाही, ते आपण पाहतो. श्रीकृष्णाच्या खोल दृष्टीला दिसले की, गोकुळात-या आपल्या गावात-जर आनंद निर्माण करावयाचा असेल, हे गोकुळ सुखधाम जर करावयाचे असेल तर हे कलहाग्नी, हे द्वेषाचे वणवे विझवले पाहिजेत. आणि सर्व तरुणांना एकत्र करून, त्यांना आपल्या मधुर वाणीच्या वेणूने मोहून, त्यांच्यात मिळून मिसळून त्यांची हृदये काबीज करून, द्वेषाग्नी गिळून टाकण्याचे काम त्याने केले.
गोकुळात अशक्त अशी मुले असताना गोकुळातील गोपी मथुरेला जाऊन लोणी विकतात. मग त्या पैशातून मिरच्या, मसाले, सुंदर वस्त्रे व दागदागिने आणतात. हे श्रीकृष्णाला वेडेपणाचे वाटले. माझ्या घरचे लोणी विकून माझ्या मुलाला सोन्याने मढवण्यापेक्षा किंवा माझ्या अंगावर दागदागिने घालण्यापेक्षा हे लोणी त्या दुबळया मुलांना खायला देऊ दे, त्यांना धष्टपुष्ट आरोग्यवान करू दे, असे वाटले पाहिजे. श्रीकृष्णाच्या मनात हा विचार येई. कोणाच्या घरी खूप लोणी साठले आहे याची तो बातमी काढी. घरचा मुलगाच ती बातमी देई. मग हा सावळा श्रीकृष्ण आपल्या चलाख गडयांसह हे लोणी लुटून आणी व सर्वांना वाटून देई. मथुरेच्या रस्त्यावर उभा राहून लोणी विकायला जाणा-या गोपींना तो आडवी. त्यांच्याजवळ लोणी मागे. कधी लोणी पळवी व हसत हसत दूर जाऊन इतर मुलांबरोबर भक्षण करी ! आपल्या गावातील सर्व मुले निरोगी, धष्टपुष्ट, हृष्ट दिसावीत. तेच खरे गावाचे वैभव व धन. घरातील सोने, रुपे हे धन नाही, असे हा श्रीकृष्ण दाखवीत होता.