काल ऑफिसमधून बाहेर निघालो होतो. भास्कर  नावाचा मित्र  सोबत होताच. आम्ही दोघे जवळ असलेल्या बाजारातून चालत होतो. अचानक माझी नजर एका दुकानाकडे गेली  आणि माझे पाय नकळत त्या दिशेने वळले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेले किल्ले तेथे विकण्यासाठी ठेवण्यात आले होते. दिवाळी काही दिवसांवर आली होती, म्हणून ते किल्ले तेथे विकण्यासाठी ठेवण्यात आले होते. जवळ जाऊन मी निरिक्षण केलं. किल्ल्यांवर खुप   छान नक्षीकाम केलं होतं. रचना, आकार, आवश्यक घटकांमध्ये वैविध्य होतं, पण कसलीही  तक्रार नव्हती. ते किल्ले पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आठवणींमध्ये इतका गोडवा  होता की, नकळत चेहऱ्यावर हसू उमटले. मग मी भास्करला विचारलं, ''लहानपणी तू किल्ला बनवायचास का?''

त्याने होकारार्थी मान हलवली, मग मी माझ्या आठवणीच्या विश्वात हरवुन गेलो. मला माझे आठवीला असतानाचे दिवस आठवले. तेव्हा मी आतापर्यंतचा शेवटचा किल्ला बनवला होता.

शेवटची ओव्हर संपल्यानंतर आम्ही घरी जात होतो. त्या दिवशी मी ८६ धावा केल्या होत्या. आमच्या संघाचा कॅप्टन माझ्यावर भलताच खुश होता, तसं पहायला गेलं तर मी सुध्दा कॅप्टन होवू शकलो असतो. पण, मला कसलंही दडपण न घेता, संघाची जबाबदारी न घेता, माझ्या मनाप्रमाणे माझ्या शैलीत खेळायचं होतं. आमच्या बिल्डिंगमधील सगळे मला 'दादा' (सौरभ गांगुली) म्हणत. क्रिकेटमुळे गावामध्ये माझी एक वेगळीच  ओळख होती. तर त्या दिवशी देखील नेहमीप्रमाणे आम्ही मॅच जिंकून आईसक्रिम खात बसलो होतो. तेवढ्याात गितेश म्हणाला, ''दादा, दिवाळी आली. गावातली मुलं किल्ला बांधायला घेत आहेत. आपण सुरुवात पण नाही केली.''

''बरं झालं आठवण करुन दिलीस. किती दिवस बाकी आहेत?'' मी आईसक्रिम संपवत विचारलं.

''गावातल्या मुलांनी स्पर्धा पण ठेवली आहे.'' मध्येच चेतन म्हणाला.

''दिवाळीसाठी तीन दिवस बाकी आहेत.'' आकाश म्हणाला.

थोडं बोलून झाल्यावर आजच माती आणून ठेवायची असं ठरलं, इथे मात्र मी प्रमुख असायचो. कारण इथे काम करुन घ्यायचं होतं. काम करण्यापेक्षा करवून  घ्यायला मला व्यवस्थीत जमायचं. चेतनने कुठूनतरी तीन गोण्या आणल्या. सौरभ, आकाश, विनित आणि रषेश पाठीमागच्या शेतामधली माती गोण्यांमध्ये भरत होते.  त्या चौघांना फक्त गोण्या भरुन ठेवायला सांगितल्या. तिथून त्या बिल्डिंगपर्यंत  नेण्याची जबाबदारी गितेश, संदेश आणि गणेशची होती. मी आमच्या सोसायटीच्या  बाकावर बसलो होतो. गॅलरीमध्ये उभे असलेले मोरे काका, पवार काका, पाटील  काका, मालपुरे काका, मिर्लेकर आजोबा आणि पप्पा मला विचारत होते,   दिवाळीच्या किल्ल्याची तयारी कुठपर्यंत आली? म्हणून त्यांनी सुध्दा मला स्पर्धेबद्दल  सांगितलं. आमची चर्चा संपुर्ण सोसायटी ऐकत होती. कारण मी मैदानात बाकावर बसलो  होतो आणि बाकी सगळे मान्यवर तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीमधून माझ्याशी बोलत होते.

थोड्याा वेळाने सगळी मुलं माती, दगड, विटा घेऊन आले. मी ते सर्व सामान सोसायटी ऑफिसच्या गाळ्याात ठेवायला सांगितलं. सोसायटीचे सेक्रेटरी पप्पा, अध्यक्ष,  उपाध्यक्ष आणि कोअर कमिटीचा मी लाडका म्हणून मला कोणी नाही म्हणून नाही  म्हणत नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करायची होती. म्हणून मी रात्री जागून मॅप बनवत होतो. ते पुर्ण झाल्यावर मी झोपलो. सकाळी, दुपारी शाळेत जाताना सोसायटीच्या नोटीस बोर्डाच्या बाजूला असलेल्या आमच्या लहान मुलांच्या नोटीस  बोर्डवर मी सुचना लिहिली, 'रषेश आणि गितेश यांनी गावामध्ये जाऊन किल्ले  सजावट स्पर्धेमध्ये नाव नोंदवून यावं. गणेश आणि चेतन यांनी किल्ल्याच्या मॅपची  झेरॉक्स घेऊन ती पुन्हा माझ्या मम्मीकडे द्यायची. दिलेली कामं त्याच व्यक्तीने  करावीत. काम न केल्यास, दुसऱ्यावर लादल्यास, कारणे सांगितल्यास त्याचं नाव कट  केलं जाईल व त्याला क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग दिली जाणार नाही. फुटबॉल देखील खेळु दिला जाणार नाही.'

संध्याकाळी मी आलो तेव्हा दगडं रचून झालीदेखील होती. आम्ही सगळे आणि सोसायटीमधली सर्व मोठी मंडळी खुप खुश होती. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने  सकाळची शाळा होती. म्हणून थोडीफार कामं करुन आम्ही लवकर झोपी गेलो.सकाळी उठल्यावर आम्ही पाहिलं तर, रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गावातील काही वात्रट मुलांनी आम्ही बनवायला घेतलेला किल्ला तोडला होता. हे सर्व चेतनच्या  आज्जीने पाहिलं होतं. मनात राग होता. तरीही शाळेत कुणावरही आम्ही राग काढला नाही. शाळेत काही मुलांकडून मला किल्ला तोडणाऱ्या मुलांची नावं मिळाली. शाळेतच खुप मारामारी झाली, तो खर्च पप्पांवर आला. वातावरण गंभीर झालं होतं. तरीही काही जाणकार मला ओळखून होते. म्हणून माझा थोडा मार वाचला. शाळा सुटल्यानंतर आम्ही सर्वजन घरी आलो. थोडा विचार केला, एक कल्पना सुचली. आम्ही चार वेगवेगळ्या सोसायट्याांमधली मुलं एकत्र आलो आणि एक जबरदस्त मोठ्ठा किल्ला बनवण्याचं नियोजन केलं. आम्ही पुन्हा वर्गणी काढली. आम्ही जेवढी मुलं होतो त्यांच्याच घरुन वर्गणी काढत, काहीजन स्वखुशीने देत असत. चार वेगवेगळ्या सोसायट्याांमधली लहान-मोठी पकडून ६३ मुलंमुली, एक मोठ्ठं मैदान,  मी माझी रविवारची मिलिटरी स्कुलची ट्रेनिंग मिस केली आणि आम्ही सर्वजन मोठ्ठा किल्ला बनवण्यासाठी धावपळ करु लागलो.

आमच्यापैकी बरेचजन अभ्यासु होते. तरीही दिवाळीचा अभ्यास, भेटायला आलेले नातेवाईक, घरातलं जेवण, गर्लफ्रेंड आणि खुप काही गोष्टी बाजूला ठेवून आम्ही किल्ला बनवू लागलो. मोठ्यांनी आम्हाला खुप चांगले सल्ले दिले, कॉलेजला जाणारी काही मुलं ठाणे येथून मावळे आणि गरज  पडेल तशी इतर साहित्यं घेऊन येत. आम्ही ते संपुर्ण मैदान किल्ल्यांनी सजवायचं ठरवलं. कल्पना माझी होती आणि शेवटचा शब्द देखील माझाच असायचा. मी आणि  बिट्टू, आम्हा दोघांच्या देखरेखीखाली सर्वकाही चाललं होतं. आम्ही सात मुलांच्या वेगवेगळ्या तुकड्या केल्या, तीन तुकड्या किल्ले बनवित, दोन तुकड्या  साहित्य आणुन देत, एक तुकड स्नॅक्स पुरवित असे. आम्ही एकूण अकरा किल्ले  बनविले. त्यामध्ये चार किल्ल्यांच्या चारही बाजूंनी पाणी होतं, दोन किल्ल्यांवर धबधबे  होते (सलाईनची किमया) मग एका तुकडीने शेवटचा हात फिरवला आणि मग आम्ही सर्वांनी तिथे साफसफाई केली.

आमचं काम बघून मोठी माणसं इतकी खुश झाली होती की, आम्हा सर्वांना बिट्टूच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये आईसक्रिमची ट्रिट मिळाली होती. मम्मी-पप्पांचे डोळे  भरुन आले होते. आमच्या 'साईलिला सोसायटी'मधील प्रत्येकाची छाती अभिमानाने  फुललेली. सोसायटीने आम्हाला मैदान आणि पाणी उपलब्ध करुन दिलं म्हणून आम्ही त्यांचे आभार देखील मानले. मुली नक्की मदत करायला आल्या होत्या की माझ्याशी आणि बिट्टूशी गप्पा मारायला आल्या होत्या हा मला पडलेला एक  प्रश्नच होता. पण एकुणच काम चांगलं झालं होतं. मालपुरे काका आणि इतर सर्वांनी रात्री जागून मैदानात हॅलोजन लावले. नंतर शेजारच्या गावातील लोकसुध्दा ते किल्ले  पहायला येऊ लागले. आमचा पहिला क्रमांक आला हे वेगळं सांगायला नको.

आता तो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा किल्ला पाहून हवी तशी मजा आली नाही, जेवढी लहानपणी मातीचा किल्ला बनवण्यामध्ये मी अनुभवली होती. नेत्रसुख असलं तरी किल्ला बनवण्याचा आनंद त्यातून मुळातच येऊ शकत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel