प्रत्येकजण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो . परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का ? नाही . म्हणून , सांगायचे कारण असे की , जर आपण विषयांकरिता इतके झटतो , तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नको का ? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा . एकदा ठाम विचार करुन आपण ज्याला गुरु कल्पिला , तो सांगेल तेच साधन मानावे . गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे . गुरु हे देहात कधीच नसतात . गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे . अशी भावना ठेवून वागले , म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते . गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे . तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते . गुरु नामाशिवाय दुसरे काय सांगणार ? त्यातच आपण सदा राहावे . जो खरा साधनात राहतो , त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात . म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन , तोच सर्व करतो आहे हे मानून , जे होईल त्यात आनंद मानीत जावा . भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे . असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते . श्रीरामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला ; आणि ते साहजिकच आहे . संतांनी एकच देव , एकच साधन , आणि एकच गुरु मानला , त्याचप्रमाणे , आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा . मुलगा हसतखेळत असताना बाप त्याला घेतो , पण रडू लागला की खाली ठेवतो ; याच्या उलट , मुलगा रडत असला तर आई त्याला घेते . हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे .

बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही . त्याप्रमाणे , संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काही उरतच नाही . साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करुन घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय . आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो . नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते . संगत दोन प्रकारची आहे ; घातक आणि उत्तम . विषयी माणसाची संगत ही घातक होय , आणि सत्संगत ही उत्तम होय . सत्संगतीमध्ये असताना , आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल . आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला , तर त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे . संताची प्रचीती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे . ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते , त्या घटकेला संताची खरी प्रचीती आली असे समजावे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel