नमस्कार,
आरंभ... नव्या साहित्य युगाचा... नवे साहित्य युग म्हणजे नक्की काय? या मासिकाचे वैशिष्ट्य तरी काय आहे? किंवा मराठीमध्ये अनेक मासिक आधीपासूनच उपलब्ध असताना हे मासिक कोणत्या हेतूने काढले असावे असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरे देखील तशीच आहेत.
काही महिन्यांपूर्वी एका मराठी मेसेजवरून एका ग्रुपमध्ये सहज विषय निघाला, मराठी भाषा किती पुढे गेली आणि आणि किती प्रगत आहे. ती कोणत्याही स्तरावर मागे नाही, पण म्हणावी तशी पुढे गेली असे बहुतेकांना वाटत नाही. आताचे युग विज्ञानयुग आहे. इथे तंत्रज्ञानावर बऱ्याच गोष्टी चालतात. या तंत्रज्ञानाची कास धरून जे आहेत ते पुढे जात आहेत आणि जे विरोध करत आहेत ते मागे राहिले आहेत. मराठी साहित्यजगत देखील ही कास धरून पुढे गेले आहे. पण मराठी वाचकांमध्ये म्हणावी तशी जागरूकता दिसुन येत नाही. ज्या साहित्य क्षेत्राचे (ई-साहित्य क्षेत्र) जगभर कौतुक होत आहे अशा क्षेत्राला मराठीमध्ये आजदेखील कमी लेखले जात आहे. बऱ्याच वाचकांमध्ये पीडीएफ म्हणजेच ई-पुस्तक आहे असा मोठा गैरसमज आहे. ई-पुस्तक दूरच, बऱ्याच वाचकांना आणि साहित्यीकांना २०१७ मध्ये देखील युनिकोड म्हणजे काय हे माहित नाही. विशेष म्हणजे फेसबुक आणि whatsapp वर हे सगळे युनिकोडमध्येच लिहितात. म्हणजे युनिकोड वापरात असून देखील त्यांना युनिकोड माहित नसतं. असे बरेच विषय आहेत, त्या सर्व विषयांवर अनेक जाणकारांसोबत चर्चा झाली आणि ई-मासिकाची व्याख्या बदलण्याची कल्पना मनात आली. ती कल्पना म्हणजेच आरंभ ई-मासिक.
या मासिकामध्ये वेगळे असे काय आहे? तर हे मासिक इतर मासिकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. हे मासिक प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला android app स्वरुपात प्रकाशित होईल, जे दर महिन्याला auto update होईल. म्हणजे वाचकांना नवीन अंक सहज वाचता येईल. वाचकांना चालू मासिकासोबातच मागील अंक देखील वाचता येतील. एवढेच नाही, तर वाचक प्रत्येक लेखावर आपली त्वरित प्रतिक्रिया देऊ शकेल. हे झाले app बद्दल. App प्रकाशित झाल्याच्या ५ दिवसांनंतर मासिक गुगल बुक स्टोरवर उपलब्ध होईल. म्हणजे ज्या वाचकांना app स्वरुपात मासिक वाचायचे नसेल तर ते ई-बुक स्वरुपात मासिक वाचू शकता. हे मासिक पूर्णतः मोफत असून वाचकांना ते ऑफलाईन देखील वाचता येईल याची काळजी app वर घेण्यात आली आहे.
हे झाले ई-मासिकाच्या तांत्रिकदृष्ट्या वेगळेपणाबद्दल, पण वाचकाने हे का वाचावे? प्रत्येक अंक हा एक विशिष्ट विषय घेऊन येईल. ज्यामध्ये त्या विषयासंबंधित विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध होईल. सोबतच अब्दुल हकीम यांची 'बोलकी लेखणी' आहेच, ज्यामध्ये त्यांच्या चित्रांवरील प्रसिद्ध कविता आपणांस वाचावयास मिळतील. ज्येष्ठ पुस्तक समीक्षक मंगेश कोळी यांचे 'व्यक्तिमत्व विकास' हे विशेष सदर, निमिष सोनार यांचे 'अध्यात्म', 'सिनेमा', 'Nimithics' विषयीचे सदर, विक्रांत देशमुख यांचे 'रक्तदाना'वरील विशेष लेख, आशिष कर्ले यांचे 'आरोग्यम धनसंपदा', मंजुषा सोनार यांच्या 'चविष्ट पाककृती', सिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे, कवितासागर प्रकाशनातर्फे 'स्वागत नव्या पुस्तकांचे', 'भवानी तलवारीचे रहस्य' या प्रचंड लोकप्रिय कादंबरीच्या लेखकाची पुढील कादंबरी 'शालीमार' धारावाहिक स्वरुपात आणि मी लिहिलेली 'मंगळ ग्रहावर अतिक्रमण' कादंबरी देखील धारावाहिक स्वरुपात वाचकांना वाचता येईल.
अशी अनेक कारणे आहेत हे मासिक वाचण्यासाठी. तर मग आपण बदलत्या तंत्रज्ञानाचा भाग होण्यासाठी तयार आहात ना!
संपादकीय संपवण्याच्या आधी मी माझ्या संपूर्ण टीमचे आभार मानू इच्छितो. टीममधील प्रत्येकाने कोणतेही शुल्क न घेता आपली जबाबदारी १०० टक्के पार पाडली आहे. मग ते कंटेंट ऑर्गनायझर असो, प्रुफरीडर असो, वा स्वतः व्यवस्थापकीय संपादक असो, प्रत्येकाने आपापल्या व्यस्त कामांमधून वेळ काढून आपले काम पूर्ण केले आहे, आणि म्हणून आपण आज हे मासिक वाचत आहात.
लोभ असावा.
अभिषेक ज्ञा. ठमके
संपादक