लेखक - जोकर
गोलूची चहाची कळशी गावांतील सर्वांत प्रसिद्ध अड्डा. त्याच्या बाजूला हनुमान मंदिर आणि समोर सखारामच्या सुनेचे नवीन उघडलेले ब्यूटी पार्लर. ज्या दिवसापासून ते सुरु झाले तेंव्हा पासून गोलूच्या दुकानावरील गर्दी आणखीन वाढली. मी तिथे चहाचा कप घेत माझ्या ऍक्टिवावर बसलो होतो इतक्यांत देवळांतून दर्शन घेऊन येणाऱ्या नानांची स्वारी दिसली. "अरे, हल्ली व्हाट्सअँप वर काही आवाज नाही तुझा?" त्यांनी विचारले. "नाही, परीक्षा होती ना... म्हणून वेळ नाही मिळाला", मी उत्तर दिले.
"काय नाना, तुम्ही सुद्धा त्या व्हाट्सअँप च्या नादी लागलात ?" मागून आवाज आला पाहिलं तर समोर काका पाटील दिसले. काका पाटील म्हणजे गांवातील कवी मनाचा माणूस. अगदी गाय माणूस; पण माणूस भूतकाळांत रमणारा.
"अरे काका ,छान आहे व्हाट्सअँप. वापरून तर बघ" नानांनी काकाला म्हटले. पण सर्वांचे लक्ष अचानक वेगात रोडवर आलेल्या एका डियो बाईककडे गेले. दुचाकीवर यादरामचा मुलगा सर्वेश होता आणि मागे त्याला पकडून सदानंद हॉटेलवाल्याची दुसरी मुलगी होती. त्याने ब्यूटी पार्लर कडे काच करून ब्रेक मारला आणि ती मुलगी त्याला आदळली. नंतर लाजून ती उठली आणि बाय म्हणून आत गेली.
सर्वेशने आणखीन थाटात बाईक फिरवून पुन्हा भरधाव सोडली.
"हे पहा, ह्या फोन-बिन च्या नादी लागून असली प्रकरणं पहावी लागतात" काकांनी नानांना म्हटले. नाना ह्यावर गप्प बसतील असे मला वाटले होते. पण नानांनी मला नेहमी प्रमाणे चूक ठरवले.
"काय प्रकरण ,काका ? इतके मनाला लावून घ्यायसारखे घडले तरी काय?" नानांनी खिशांतून पैसे गोलूला देत शांतपणे प्रश्न केला.
"अहो नाना, आम्ही ह्यांच्या वयाचे होतो तेंव्हा वडीलधाऱ्यापुढे आदराने रहायचो. सकाळी उठून शेतात काम, नंतर दुपारी शाळा आणि संध्याकाळी गुरांना चरायला घेऊन जायचो. कधी कुठल्या पोरीला सायकलवरून पाहिले सुद्धा नाही आणि हे १६-१७ वर्षांचे मुलगे पहा कसे रोमान्स करतायत. संस्कार म्हणून काही असतात की नाही. "
"पण काका, वेळ बदलतो तसे संस्कार बदलतात. तुमचे लग्न झाले तेंव्हा तुमची बायको १६ वर्षाची होती आणि तुम्ही २४. आता मला सांगा १६ वर्षाची पोर लग्न होऊन २४ वर्षांच्या पुरुषाच्या घरी जाऊन त्याची उष्टी खरकटी काढते, ह्याला आपण संस्कार म्हणायचे काय ? " नानांचा तर्क मला मनापासून आवडला.
"आणि तो यादरामचा सर्वेश इंजिनीअरिंग ला आहे. हुशार सुद्धा आहे आणि त्याला चांगली नोकरी आणि पगारसुद्धा चांगला असेल. त्याने का सकाळी शेतात जाऊन वगैरे काम करावे ? शेती करून तुम्ही आम्ही बंगले बांधले आहेत का ? उलट तुम्हीच नाही का तुमची शेती साईराम बिल्डर्सना विकली, नाही का ? त्या काळी आमच्या सारखे बुद्धिमान लोक सुद्धा शेतांत कष्ट करायचे कारण आमच्या देशांत संधीच उपलब्ध नव्हत्या. आम्ही सुद्धा अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे एकाच भ्रष्ट पार्टीला दरवेळी निवडून आणले. गरिबी वाढवणाऱ्या सरकारी पॉलिसीचे समर्थन केले. ह्याउलट आजकालची ही पोरं कुठल्याही सरकारी प्रोपोगंडावर विश्वास ठेवत नाही. ह्यांना मूर्ख बनवणे मोठ्या मोठ्या राजकारण्यांना सुद्धा शक्य नाही."
"पण नाना, ह्या तरुण पोरांनी तंत्रज्ञानाचा वाईट उपयोग केलाय. ते फोन वर अश्लील गोष्टी पाहतात. ते बरोबर वाटते का तुम्हाला? " काकांनी हुकुमी एक्का काढला.
नानांनी डोके हलवले. "काका उगाच कशाला तोंड उघडायला लावता ? तुम्ही तुमच्या वयात गुरे चरवायला जात होता तेंव्हा हणमंत गवळ्याच्या पोरीबरोबर तुम्ही काय काय रंग उधळले होते, हे सर्व गावांत सर्वाना ठाऊक आहे. हणमंताने तुम्हाला पकडून मार घातला होता ते सुद्धा मला ठाऊक आहे. ही आज कालची पोरं फोन वर अश्लील गोष्टी पाहतात ते चांगले आहे. आमच्या काळी सधन लोक गरीब लोकांच्या आया-बायांवर कशी नजर ठेवायचे आणि कश्या प्रकारे त्यांचे शोषण करायचे हे सर्वांना ठाऊक आहे पण कुणी बोलत नाहीत. आज कालची कुठलीही पोरगी तसले शोषण सहन करणार नाही आणि ह्यांच्या सारखी पोरं तसली हिम्मत सुद्धा करणार नाहीत. आमच्या पिढीतील अनेक लोकांनी रखेल ठेवल्या होत्या. बंडू न्हाव्याने एकदा बायकोला कानफाटात मारली आणि ती तिथेच गतप्राण झाली. सर्वांनी प्रकरण मिटवले. आज मंत्र्यांना सुद्धा बायकोचा खून पचवणे अवघड जाते. आजकालची पोरे संस्कृती बिघडवतात म्हणून ओरड करताना लक्षांत घ्या की ह्या पिढीला रखेल ठेवणे शक्य होणार नाही, आणि एखादी शिकली-सवरलेली मुलगी मार खाऊन गप्प राहणार नाही. "
मी आ वासला! खरे तर विचार करायला गेलो तर नानाच्या बोलण्यात फार तथ्य होते. काकांच्या वडिलांची एक बायको होती आणि गावात एक ठेवलेली बाई होती.
आजकालच्या काळांत आम्हा पोरांना हे शक्य नव्हते.
नानाच्या बोलण्याने काकांचा प्रचंड अपमान झाला होता त्यामुळे त्यांचे तोंड काळेठिक्कर पडले होते. त्यामुळे चहाचे पैसे देऊन त्यांनी काढता पाय घेतला.
नानांनी मग आपला मोहरा माझ्या कडे वळवला. काळ आजचा असो वा कालचा; माणूस बदलत नाही. शेकडो वर्षांच्या मानवी इतिहासांत मानवी स्वभाव विशेष बदलला नाही ; पण तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगती मुळे आज माणसाला आणि विशेषतः स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बदल हा वाटणारच पण हा चांगला बदल आहे. आमची आई किती कष्टाळू होती, ह्याचे गुण गाताना आम्ही हे विसरतो कि तिने काय काय सहन केले होते. धुरापुढे दिवसभर राहून स्वयंपाक करणे, पती आणि सासूची बोलणी ऐकणे, काही आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली तर गुपचूप सहन करणे आणि इतके सर्व काही करून कोणी धन्यवाद सुद्धा देणारा नाही. आजची मुलगी कदाचित पोराला मॅगी खायला घालत असेल पण स्वतःचे आयुष्य सुद्धा ती उमेदीने जगत आहे. काहींना संस्कृती वगैरेचा ऱ्हास वाटला तरी मला तरी ती चांगलीच गोष्ट वाटते. "
"शहरांना काँक्रीटचे जंगल म्हणून हिणवणारे लोक थोडा पैसे हातात येताच शहरात फ्लॅट घेतात, मुला बाळांना शहरात शिकायला पाठवतात आणि व्हाट्सअँप वर गाव म्हणजे कसा निसर्गरम्य प्रदेश आहे ह्याचे फॉरवर्डस पाठवतात. गावात काय हार्ट ऍटेक आला तर माणूस सहज राम बोलून जातो. शहरांत किमान अंम्ब्युलन्स तरी येते. इकडे घाम गाळून शेतात काम करून मिळतात काय तर वर्षाला रुपये ५०,००० आणि शहरात बिल्डिंगच्या वॉचमनला त्या पेक्षा दुप्पट पगार झोपा काढायला मिळतो. भूतकाळांत रमणे वाईट नाही पण तिथे अडकून वर्तमानातील संधी सोडणे म्हणजे मूर्खपणा आहे"
असे म्हणून नाना आपल्या वाटेने निघून गेले. मीसुद्धा व्हाट्सअँप वरील चावट विनोद वाचण्यात लक्ष घातले. नानांचे म्हणणे मला आधीच पटले होते.