॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
श्रीसाई साक्षात् ब्रम्हामूर्ती । संतसम्राट चक्रवर्ती । समर्थसद्नुरुदिगंतकीर्ति । बुद्धिस्फूर्तिप्रदायक ॥१॥
अनन्यभावें त्यासी शरण । वंदूं त्याचे पुण्य चरण । संसृतिभयाचें करी हरण । जन्ममरण चुकवी जो ॥२॥
गताध्यायीं दिधलें वचन । ''प्रथम करूनि सिंहावलोकन । नंतर अवतरणिका देऊन । ग्रंथ करीन संपूर्ण'' ॥३॥
पंतहेमाड ऐसें वदले । परी तैसें नाहीं घडलें । अवतरणिकारूप सार काढिलें । कीं राहिलें विस्मृतीनें ॥४॥
ज्यानें आरंभावें ग्रंथलेखन । त्यानेंच करावें तें पूर्ण । शेखीं अवतरणिका देऊन । ऐसें नियमन सर्वत्र ॥५॥
परी नियमा अपवाद असे । त्याचेंच प्रत्यंतर येथें दिसे । कांहीं न होय स्वेच्छावशें । बलीयस मनोगत बाबांचें ॥६॥
हेमाड अवचित दिवंगत । दु:खित अवघियांचें चित्त । अवतरणिकेची न कळे मात । न सुचत कांहीं कोणाला ॥७॥
अण्णासाहेबांचें दप्तर गहन । सायासें करूनि तत्संशोधन । त्यांचे चिरंजीव श्रीगजानन । जरूर तितुकें मज देती ॥८॥
अण्णासाहेब काटकसरी । व्यर्थ  न जाऊं देती चिठोरीं । काम करिती कलाकुसरीं । स्वभाव यापरी तयांचा ॥९॥
लिहिती अध्याय चिठोर्‍यांवरी । तींच देती मुद्रकाकरीं । वाउगी खर्च खुपे अंतरीं । तयांची सरी न ये कवणा ॥१०॥
निर्जीव बापुडीं तीं चिठोरीं । करुणा उपजे तयांच्या अंतरीं । हीं उद्धरतील कवणेपरी । संतकेसरीसेवेविण ॥११॥
वाटे आलेंसें हेमाडजीवा । करिती चिठोर्‍यांचा मेळावा । तत्करवीं करविती सेवा । असावा उदात्त हेतु हा ॥१२॥
अंतिमाध्यायाची तीच परी । लिहिला असे चिठोर्‍यावरी । मनन केलें बहुतीं परी । अवतरणिका तदंतरीं मिळेना ॥१३॥
गजाननरावादिकां मात कथिली । बाबासाहेबांसही तीच निवेदिली  । त्या सर्वांची सल्ला पडली । पाहिजे घडली अवतरणिका ॥१४॥
बाबासाहेब मुदत घालिती । श्रीसाईलीलेंत प्रसिद्ध करिती । मुदतीचे दिवस संपूनि जाती । तरी अवतरणिका अवतरेना ॥१५॥
हेमाडा गोविंद सद्नुणखाणी । तन्मुखीं वेदान्त भरी पाणी । ग्रंथीं प्रकटे प्रसादवाणी । अद्भुत करणी गुरुकृपेची ॥१६॥
सद्रुरु साईभक्त अनंत । त्यांत कविरत्न हेमाडपंत । तत्सम असेल जो प्रज्ञावंत । तोचि महंत करणार ती ॥१७॥
कुठूनचि अवतरणिका अवतरेना । खिन्नत्व आलें माझिया मना । केली दत्तगुरूंची प्रार्थना । भाकिली करुणा तयांची ॥१८॥
मी पामर बुद्धिमंद । नसे विचार विद्यागंध । कैसा येईल मज ओवीप्रबंध । कवित्वअंध मी मूळचा ॥१९॥
परी यास असे एक आधारू । सानुकूल जैं श्रीदत्तगुरू । मशकाकरवीं उचलविती मेरू । अधिकार थोरू तयांचा ॥२०॥
पुनश्च प्रार्थीं उमारमणा । कृपा उपजे साईनारायणा । करीं मम मतीसी प्रेरणा । अवतरणिकालेखना सत्वरीं ॥२१॥
शक्ति नसे कवित्व कराया । माझें मतिमांद्य जाणे श्रीगुरुराया । घालूनि नती त्याचिया पायां । प्रवर्तें घडाया अवतरणिका ॥२२॥
अवतरणिका ग्रंथ - खंड । करणार साई वक्रतुंड । तयाचें वैभव अद्भुत प्रचंड । माझें तोंड निमित्तमात्र ॥२३॥
‘प्रथमाध्यायीं’ मंगलाचरण । विन्घहर्ता विश्वादिकारण । गौरीशंकर कंठमंडन । श्रीगजवदन नमियेला ॥२४॥
जी अभिनव वाग्विलासिनी । चातुर्यकलाकामिनी । ती श्रीशारदा विश्वमोहिनी । इष्टार्थदायिनी नमियेली ॥२५॥
कुलगुरु आप्तेष्ट गुरुजन । सगुणावतार संतसज्जन । शरण्य सद्नुरु कैवल्यनिधान । साईभगवान नमियेले ॥२६॥
गोधूमपेषण कथा सांगोन । महामारी - पूर्णोपशमन । कैसें केलें तें विशद करून । साईसामर्थ्य वर्णिलें ॥२७॥
प्रस्तुत ग्रंथप्रयोजन । हेमाडपंत नामकरण । गुर्वनवश्यकता - विवादखंडन । दर्शन हेमाडा ‘द्वितीयाध्यायीं’ ॥२८॥
ग्रंथलेखन । अनुज्ञापन । कैसें आलें साईमुखांतून । रोहिल्याचें वृत्तकथन । केलें संपूर्ण ‘तृतीयाध्यायीं’ ॥२९॥
जगच्चालक - कंठाभरण । साधुसंतांचें अवतरण । भूमंडळीं किंकारण । केलें विवरण विस्तारें ॥३०॥
दत्तावतार अत्रिनंदन । साई साक्षाद्धरिचंदन । शिरडी क्षेत्रीं प्रथमागमन । वर्णन समग्र ‘चतुर्थीं’ ॥३१॥
शिरडी क्षेत्रीं गुप्त होऊन । पुनश्च तेथें प्रकटन । सकलां केलें विस्मयापन्न । सधन पाटलासमवेत ॥३२॥
गंगागीरादि संतसंमेलन । स्वशिरीं वाहूनि दूरचें जीवन । कैसें निर्माण केलें उद्यान । निरूपण समस्त ‘पंचमीं’ ॥३३॥
रामनवमी उत्सव थोर । बाळा बोवा कीर्तनकार । मशीदमाईजीर्णोद्धार । कथन सविस्तर ‘षष्ठाध्यायीं’ ॥३४॥
बाबांचा समाधिखंडयोग । धोती पोती इत्यादि प्रयोग । बाबा हिंदु कीं यवन ढोंग । संतांतरंग अगाध ॥३५॥
बाबांचा पेहराव वर्तन दवा । चिलीम जाती धुनी दिवा । त्यांचा आजार त्यांची सेवा । अगम्य देखावा अवघाचि ॥३६॥
भागोजी शिंद्याची महाव्याधी । खापर्डेसुत ग्रंथिज्वरौषधी । नाना पंढरीदर्शनबुद्धि । कथिती सुधी ‘सप्तमीं’ ॥३७॥
नरजन्माचें अपूर्व महिमान । साईभैक्ष्यवृत्तिवर्णन । बायजाबाईंचें संतसेवन । भोजनविंदान बाबांचें ॥३८॥
बाबा तात्या म्हाळसापती । रात्रीं तिघे मशिदींत निजती । बाबांची आगळी प्रीती । दोघांवरती समसमान ॥३९॥
राहते ग्रामींचे खुशालचंद् । बाबा शांति - ज्ञान - कंद । परस्परांचा प्रेमसंबंध । निरूपणानंद ‘अष्टमाध्यायीं’ ॥४०॥
तात्यासाहेब नूलकर । तात्या पाटील भक्तवर । एकांग्लभौम गृहस्थ थोर । प्रायश्चित्त घोर आज्ञाभंगाचें ॥४१॥
पंचमहायज्ञ करवून । बाबा करीत भिक्षान्नसेवन । भिक्षाधिकारसंपन्न लक्षण । करिती वर्णन चातुर्यें ॥४२॥
बाबासाहेब  तर्खड श्रेष्ठ । कट्टे प्रार्थनासमाजिष्ट । बनले साईभक्तैकनिष्ठ । कथा उत्कृष्ट ‘नवमाध्यायीं’ ॥४३॥
लांब अवघी हात चार । रुंद तशीच वीतभर । आढयास टांगिलेल्या फळीवर । शयन योगेश्वर बाबांचें ॥४४॥
केव्हां शिरडींत पद पडलें । किती वर्षें वास्तव्य झालें । देहावसान कधीं घडलें । केलें निरूपण ह्रदयंगम ॥४५॥
अंतरीं शांत निरिच्छस्थिती । बाहेर दावीत पिशाचवृत्ती । लोकसंग्रह नित्य चित्तीं । अढळ प्रवृत्ती गुरुरायांची ॥४६॥
वेदशास्त्र - धर्मलक्षण । परमार्थ आणि व्यवहार शिक्षण । भक्ताभक्त - चित्तपरीक्षण । हतवटी विलक्षण सद्नुरूंची ॥४७॥
बाबांचें आसन बाबांचें ज्ञान । बाबांचें ध्यान बाबांचें स्थान । त्यांचें सामर्थ्य आणि महिमान । कथन संपूर्ण ‘दशमाध्यायीं’ ॥४८॥
सच्चिदानंदस्वरूपस्थिती । दिगंत बाबांची प्रख्याती । डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ति । सिदिकवृत्ती वर्णियेली ॥४९॥
कैसें केलें अभ्राकर्षण । कैसी अनिलीं सत्ता विलक्षण । अनलापासूनि संरक्षण । सुरस विवरण ‘एकादशीं’ ॥५०॥
काका धुमाळ, निमोणकर । एक मामलेदार एक डॉक्टर । प्रसंग भिन्न भिन्न प्रकार । वर्णिले मधुर वाणीनें ॥५१॥
नाशिक अग्निहोत्री मुळे संशयी । संत घोलप रामानुयायी । त्यांची साईदर्शननवलाई । ‘द्वादशाध्यायीं’ निरूपिली ॥५२॥
बाळाशिंपी - हिमज्वरनाशन । केलें कृष्णश्वाना दध्योदन देऊन । बापूसाहेब - महामारी - शमन । केलें चारून आक्रोड पिस्ते ॥५३॥
आळंदी स्वामी कर्णरोगी । आशीर्वचनेंचि केले निरोगी । जुलाब पीडा काका भोगी । नाशिली भुईमुगीदाण्यांनीं ॥५४॥
हर्द्याचे भक्त दत्तोपंत । पोटशूळव्याधिग्रस्त । आशीर्वादेंचि केले मुक्त । समस्त जनांदेखत ॥५५॥
एका मीमाजी पाटलाला । कफक्षयाचा व्याधी जडला । उदी लावूनि रोग दवडिला । वृत्तांत वर्णिला ‘त्रयोदशीं’ ॥५६॥
नांदेडचे शेट रतनजी पारसी । विख्यात व्यापारी खिन्न मानसीं । पुत्रसंतान देऊनि त्यांसी । हर्षाकाशीं बैसविलें ॥५७॥
मौलीसाहेब गुप्त संत । नांदेड शहरीं हमाली करीत । साईसंकेतवचें ज्ञात होत । कथा अद्भुत ‘चतुर्दशीं’ ॥५८॥
नारदीय कीर्तनपद्धती । कथिती बाबा दासगणूप्रती । चोळकरांचें फेडूनि घेती । व्रत चहा सिता त्यां पाजुनी ॥५९॥
औरंगबादेहूनि पल्ली आली । मशीदींतील पल्लीस भेटली । चुकचुकण्यावरूनि वार्ता कथिली । कथा निरूपिली ‘पंचदशीं’ ॥६०॥
संततिसंपत्तिसंपन्न । साईयशोदुंदुभि परिसोन । एक गृहस्थ शिरडीलागून । आले ब्रम्हाज्ञानप्राप्त्यर्थ ॥६१॥
जो इच्छी ब्रम्हाप्राप्ति । त्यासी होआवी संसारविरक्ति । सुटली पाहिजे धनासक्ति । प्रथम चित्तीं तयाच्या ॥६२॥
पांच रुपयांची उसनवारी । ज्या न देववे बाबां क्षणभरी । नोटा असूनि वस्त्रांतरीं । कवणेपरी त्या ब्रम्हा मिळे ॥६३॥
साईबोधशैली सुंदरा । हेमाडांची प्रसाद - गिरा । संयोग जैसा पय - शर्करा । कथा मनोहरा ‘षोडशीं’ ॥६४॥
पूर्वकर्थचेंच अनुसंधान । ब्रम्हाज्ञान - विस्तारकथन । धनलोभ याचें नि:संतान । वर्णन मधुर ‘सप्तदशीं’ ॥६५॥
साठयांची गुरुचरित्रकथा । राधाबाईंची उपदेशवार्ता । हेमाडांची अनुग्रहता । कथनकुशलता ‘अष्टादशीं’ ॥६६॥
अनुग्रहकथेचा विस्तार । साई - श्रीबोधानुसार । केला असे फार फार । विचार ‘एकोनविंशतीं ॥६७॥
‘ईशावास्य - भावार्थबोधिनी’ । प्रारंभिली दासगणूंनीं’ । त्यांत शंका उपजली मनीं । पुसिली त्यांनीं बाबांना ॥६८॥
बाबा म्हणती मोलकरीण । करील काकांची तन्निवारण । सद्नुरुमहिमा असाधारण । गोड निरूपण ‘विंशतीं’ ॥६९॥
एक प्रांताधिकारी सुलक्षण । दुसरे पाटणकर विचक्षण । तिसरे एक वकील विलक्षण । अनुग्रहण तिघांचें ‘एकविंशतीं’ ॥७०॥
मशीदमाई भवतारका । तीच द्वारावती द्वारका । बाबा कथिती सकल लोकां । भावार्थ एकाही नकळे ॥७१॥
मशीदमाईचे गुण वानिती । मिरीकर, बुट्टींचें अहिदंश टाळिती । अमीर सक्कराचा वात हरिती । वारिती अहिमय तयाचें ॥७२॥
हेमाड वृश्चिकदंश - संकट । इतरांवरचें उरगारिष्ट । निवारीत अपमृत्यु दुर्घट । प्रसंग प्रकट ‘द्वाविंशतीं’ ॥७३॥
योगाभ्यासियाचें शंकानिरसन । माधवरावांचें अहिदंशनिवारण । धुनीं, इंधन, अजाहनन । वर्णन केलें अतिरम्य ॥७४॥
बडेबाबाची बडेजाव । गुर्वाज्ञानिष्ठा - अभाव । किती दिलें तरी बहु हाव । अतृप्त स्वभाव मूळचा ॥७५॥
काकासाहेब भक्तश्रेष्ठा । गुर्वाज्ञीं परमैकनिष्ठ । सद्नुरुलीलाकथन विशिष्ट । केलें उत्कृष्ट ‘त्रयोविंशतीं’ ॥७६॥
फुटाण्याचें निमित्त करून । हेमाडपंतां देती शिकवण । सद्नुरुस्मरण केलियावीण । विषयसेवन न करावा ॥७७॥
अण्णा बाबरे व मावशीबाई । कलह दोघांत लाविती साई । त्या विनोदमस्करीची नवाई । गाई कविवर्य ‘चतुर्विंशतीं’ ॥७८॥
भक्त दामूअण्णा कासार । अहमदनगरचे राहाणार । करूं इच्छिती फार थोर । व्यापार कापूस - तांदुळांचा ॥७९॥
उद्यमीं होईल हानी सत्य । आम्रफलसेवनीं प्राप्त अपत्य । वदती साई ज्ञानादित्य । निरूपण कृत्य ‘पंचविंशतीं’ ॥८०॥
भक्त एक नामें ‘पंत’ । अन्य संतानुग्रहीत । पटवूनि दिली त्यां खूण त्वरित । पंत प्रमोदित जाहले ॥८१॥
हरिश्चंद्र पितळे भक्त । तदीय तनय अपस्मारग्रस्त । कृपावलोकनेंचि समस्त । रोग अस्त पावला ॥८२॥
दिले पितळ्यांस रुपये तीन । म्हणती पूर्वीं दिले दोन । बाबा वदती करीं पूजन । रुचिर कथन ‘षड्‌विंशतीं’ ॥८३॥
भागवत पोथी हातीं देऊन । आपण घ्यावी प्रसाद म्हणून । देती काका इच्छा धरून । भगवान देत ती माधवा ॥८४॥
विष्णुसहस्रनामाची पोथी । एका रामदाश्याचे पोथ्यांत होती । त्या न कळत बाबा घेती । तीही देती माधवरावा ॥८५॥
विष्णुसहस्रनामाची पोथी देऊन । शामरावावर अनुग्रहण । कैसे करिती साई दयाघन । कथानिरूपण ‘सप्तविंशतीं’ ॥८६॥
भक्त लखमीचंद् मुनशी । चिडीबाई बर्‍हाणपुरवासी । मेघा ब्राम्हाण पुण्यराशी । पातले चरणांसी बाबांच्या ॥८७॥
स्वप्नीं देऊनि सर्वां द्दष्टान्त । देत त्याची प्रचीत जागरांत । सद्नुरुमाउलीची अगम्य मात । प्रेमें कथित ‘अष्टाविंशतीं’ ॥८८॥
मद्रदेशींचा भजनी मेळा । शिरडी क्षेत्रीं झाला गोळा । बघाया दानौदार्य सोहळा । भोळा शंकर बाबांचा ॥८९॥
रघुनाथराव तेंडुलकर  । तत्तनय परीक्षा प्रकार । त्यांची पेनसनचिंता दूर । मनोहर लीला बबांची ॥९०॥
भक्त डॉक्टर कँप्टन हाते । साईचरणीं प्रेम मोठें । दिलें स्वप्नदर्शन पहांटे । कथानक गोमटें ‘एकोनत्रिंशतीं’ ॥९१॥
सप्तशृंगीदेवीउपासक । कोणी काकाजी वैद्यनामक । देवी देत त्या द्दष्टान्त एक । संतनायक साई पहावे ॥९२॥
शामरावानें त्याच देवीस । केला होता एक नवस । शामा नवस फेडाया वणीस । जाई तीस वर्षांनीं ॥९३॥
राहत्याचे शेठ चंदखुशाल । पंजाबी ब्राम्हाण रामलाल । स्वप्नीं दोघां ''शिरडीस चल'' । हे साईबोल कथन ‘त्रिंशतीं’ ॥९४॥
विजयानंद यति मद्रासी । निघे जावया सरस - मानसीं । ठेवूनि घेतला निजपदापाशीं । श्रीह्रषीकेशी बाबांनीं ॥९५॥
भक्तशार्दूल मानकर । साईपदांबुज - मधुकर । हिंस्रक्रूरव्याघ्रोद्धार । कथन सुंदर ‘एकत्रिंशतीं’ ॥९६॥
आम्ही चौघे सज्जन संत । देव शोधार्थ रानीं हिंडत । मी होतांच अभिमानगलित । दर्शन देत मज गुरुराय ॥९७॥
उपोषण करणार गोकलेबाई । अशीच दुजी कथा साई । सांगत स्वमुखें त्याची नवाई । हेमाड गाई ‘द्वात्रिंशतीं’ ॥९८॥
नारायण जानीचे मित्रास । जाहला एकाएकीं वृश्चिकदंश । एका भक्ताचे कन्यकेस । दिधला त्रास ज्वरानें ॥९९॥
चांदोरकरसुतेस भारी । प्रसूतिवेदना करी घाबरी । जानी स्वत: दु:खित अंतरीं । तिळभरी सुचेना कोणाला ॥१००॥
कुलकर्णीसाहेब भक्तवर । बाळाबुवा भजनकार । उदीप्रभाव बलवत्तर । कळला खरोखर सर्वांना ॥१०१॥
भक्त हरीभाऊ  कर्णीक । श्रद्धावंत आणि भाविक । त्यांच्या दक्षिणेची कथा मोहक । बोधप्रदायक ‘त्रयस्त्रिंशतीं’ ॥१०२॥
मालेगांबचे एक डॉक्टर । पुतण्या हाडयाव्रणें अति जर्जर । पिल्ले डॉक्टर भक्तप्रवर । पीडित दुर्धर नारूनें ॥१०३॥
बापाजी श्रीशिरडीकर । ग्रंथिज्वरें कुटुंब जर्जर । एक इराणी लहान पोर । व्यथित घोर आंकडीनें ॥१०४॥
ह्रर्द्याचे एक गृहस्थ । मूतखडयानें अत्यावस्थ । मुंबईचे एक प्रभु कायस्थ । कुटुंब ग्रस्त प्रसूतिरोगें ॥१०५॥
उपरिनिर्दिष्ट व्याध्युच्चाटन । केवळ उदीस्पर्शेंकरून । झालें न लागतां क्षण । निरूपण रसाळ ‘चतुस्त्रिंशतीं’ ॥१०६॥
महाजनींचे मित्र एक । निर्गुणाचे पूर्ण भजक । ते बनले मूर्तिपूजक । दर्शनैकमात्रेंकरूनि ॥१०७॥
दरमसी जेठाभाई ठक्कर । मुंबईचे एक सॉइसिटर । सबीज द्राक्षें निर्बीज सत्वर । करूनि गुरुवर त्या देती ॥१०८॥
वांद्याचे एक कायस्थ । त्यां नीद न ये स्वस्थ । बाळा पाटील नेवासस्थ । उदीप्रचीत ‘पंचत्रिंशतीं’ ॥१०९॥
गोमांतकस्थ गृहस्थ दोन । नवस करिती भिन्न भिन्न । एक सेवावृत्तीलागून । दुजा स्तेनशोधार्थ ॥११०॥
दोघांनाही नवसविस्मृती । साई समर्थ देती स्मृती । त्रिकालज्ञान ब्रम्हांडव्याप्ती । कीर्तिकोण वर्णील ॥१११॥
औरंगाबाद सखारामजाया । पुत्रार्थ धांवे साईंचे पायां । इच्छापूर्ति श्रीफळ देऊनियां । कथन कथाशया ‘षटत्रिंशतीं’ ॥११२॥
चावडी - समारंभ सोहळा । इतरत्र पाहण्या मिळे विरळा । हेमाड वर्णिती पाहूनि डोळां । कथा रसाळा ‘सप्तत्रिंशतीं’ ॥११३॥
हंडीमाजी पदार्थ भिन्न । शिजवूनि करिती नाना पव्कान्न । देती सर्वां प्रसादभोजन । वर्णन मनोहर ‘अष्टत्रिंशतीं’ ॥११४॥
''तद्विद्धि प्रणिपातेन'' । या गीताश्लोकाचें विवरण । सांगती चांदोरकरांलागून । संस्कृताभिमान हरावया ॥११५॥
द्दष्टान्त देऊनि संतनृपती । बापूसाहेब बुट्टींप्रती । मंदिर बांधण्या आज्ञापिती । ‘एकोनचत्वारिंशतीं’ वृत्तांत्त ॥११६॥
मातु:श्रीचें व्रतोद्यापन । देव घालिती ब्राम्हाणभोजन । बाबांस देती निमंत्रण । पत्रलेखन । करूनियां ॥११७॥
यतिवेष धारण करून । तद्दिनीं येती विभूती तीन । ब्राम्हाणांसमवेत जाती जेवून । न कळे विंदान गुरुरायाचें ॥११८॥
द्दष्टान्त देऊनि हेमाडास । बाबा येती भोजनास । छबीरूपीं धरूनि वेष । वर्णन सुरस ‘चत्वारिंशतीं’ ॥११९॥
छबीचीच कथा विस्तारून । सांगती कवी भक्तांलागून । सद्नुरूचें अतर्क्य महिमान । निरूपण रमणीय रसाळ ॥१२०॥
धारण करूनि रुद्रावतार । होती लाल खदिरांगार । करिती गाळींचा भडिमार । क्रोधें देवांवर श्रीसाई ॥१२१॥
''नित्य नेमें श्रीज्ञानेश्वरी । वाच'' म्हणती साई श्रीहरी । स्वप्नीं कथिती वाचनाची परी । हेमाड विवरी ‘एकचत्वारिंशतीं’ ॥१२२॥
भक्त दात्यांची त्रिपुंड्रलेपना । साईनिधन - पूर्वसूचना । चुकविलें रामचंद्रनिधना ।  तैसेंच मरणा तात्यांच्या ॥१२३॥
साईसद्नुरु - निर्याणवार्ता । उपजवी श्रोतयां उद्विग्नता । व्याकुल करी हेमाडचित्ता । कथा पुनीता ‘द्विचत्वारिंशतीं’ ॥१२४॥
बाबांचा निधनवृत्तांत । पूर्वाध्यायीं अपूर्ण निभ्रांत । तोचि संपूर्ण हेमाडपंत । करीत ‘त्रिचतुश्चत्वारिंशतीं’ ॥१२५॥
एकदां काकासाहेब दीक्षित । काका व माधवासमवेत । वाचीत असतां नाथ भागवत । शंकित मानसीं जाहले ॥१२६॥
माधवराव शंका निरसित । समाधान न पवे दीक्षितचित्त । आनंदराव पाखाडे स्वप्न कथीत । करीत निरसन शंकेचें ॥१२७॥
आढयास टांगिल्या फळीवरी । म्हाळसापती कां न निद्रा करी । साई समर्थ शंका निवारी । कथाकुसरी ‘पंचचत्वारिंशतीं’ ॥१२८॥
जागींच बैसूनि अटन सर्वत्र । दावीत जनां चमत्कृतिसत्र । काशी गया गमन विचित्र । अद्भुत चरित्र बाबांचें ॥१२९॥
चांदोरकरसूनु लग्न - पर्वणी । शामास जाण्या कथी संतमणी । शामा देखे बाबा ईक्षणीं । गयापट्टणीं छबिरूपें ॥१३०॥
अजद्वय - पूर्वजन्मकथन । करिती स्वमुखें साईत्रिनयन । रम्य मधुर पवित्र गहन । कथावर्णन । ‘षट्‌चत्वारिंशतीं’ ॥१३१॥
ऐसीच एक अहिमंडुकांची । किंवा लोभी धनको - रिणकोची । पूर्वपीठिका कथिती साची । साई विरिंची हरि - हर ॥१३२॥
वैर हत्या आणि ऋण । फेडण्याकारणें पुनर्जनन । करविती बाबा कथामृतपान । ह्रद्य कथन ‘सप्तचत्वारिंशतीं’ ॥१३३॥
एक शेवडे भक्तप्रवर । एक अभाविक सपटणेकर । एकाचा वकिली परीक्षाप्रकार । कृपा दुज्यावर ‘अष्टचत्वारिंशतीं’ ॥१३४॥
हरी कान्होबा मुंबईनिवासी । स्वामी सोमदेव कुटिल मानसीं । संतपरीक्षणार्थ श्रीशैलधीसी । आले अभिमानासी धरूनियां ॥१३५॥
दर्शनखेवों मनोगत कथिलें । दोघे तत्काळ लज्जित झाले । साईचरणीं चित्त वेधलें । पाप निमालें जन्मांतरींचें ॥१३६॥
बाबांसन्निध बैसले असतां । स्त्रीरूप देखूनि विकारवशता । उपजे चांदोरकरांचे चित्ता । वर्णिली वार्ता ‘एकोनपंचाशतीं’ ॥१३७॥
''तद्विद्धि प्रणिपातेन'' । याचाच अर्थ विस्तारून । करिती त्याचेंच समर्थन । रघुनाथनंदन ‘पंचाशतीं’ ॥१३८॥
दीक्षित हरी सीताराम । भक्त धुरंधर बाळाराम । नांदेड वकील पुंडलीक नाम । शिरडी प्रथम पातले कैसे ॥१३९॥
एकेकाची कथा अद्भुत । श्रवणीं श्रोते होत विस्मित । भक्तमनोदधि उचंबळत । वृत्त वर्णिती ‘एकपंचाशतीं’ ॥१४०॥
करूनि ग्रंथसिंहावलोकन । मागूनि घेत पसायदान । खलांचें खलत्व घालवून । सज्जनसंरक्षण करावें ॥१४१॥
सद्नुरुचरणीं लीन होऊन । मस्तक लेखणी अर्पण करून । सर्व ग्रंथ संपवून । कृतार्थ लेखन ‘द्विपंचाशतीं’ ॥१४२॥
एवं श्रीसाईसच्चरिताध्याय । पूर्ण करिती गोविंदराय । प्रेमें वंदूनि त्यांचे पाय । नमितों गुरुमाय विश्वाची ॥१४३॥
अध्यायाध्यायसार - कथिका । तिलाच वदती अवतरणिका । कैवल्यपुरीची सत्पथिका । मुमुक्षुरसिकां जी होय ॥१४४॥
शेल्यास रकटयाचा पदर । म्हणूनि करितील अव्हेर । परी दासविनती एकवार । चतुर श्रोतीं परिसावी ॥१४५॥
शेला ना शिशु गोंडस नीट । बांधावी ना वाईट दीठ । अवतरणिका ही काळी तीट । बाळ धीट त्या लावी ॥१४६॥
ग्रंथ सुंदर षड्रस अन्न । अध्यायार्थ पदार्थ भिन्न । अशेष - पचना तक्रपान । तद्वत लेखन अवतरणिका ॥१४७॥
ग्रंथ सुरभि सदाफला । अध्यायपद्धती । पंत हेमाड जी आचरिती । ती कथितों यथामती । सादर श्रोतीं परिसावी ॥१४९॥
प्रथमारंभीं सद्नुरुस्तवन । नंतर करिती वेदान्त - निरूपण । साई ब्रम्हास्वरूप वर्णन । अनुभवकथन तदनंतर ॥१५०॥
मूळचेच हेमाड व्युत्पन्न । त्यांत सद्नुरुसाई प्रसन्न । तत्क्षणीं केलें प्रतिभासंपन्न । ग्रंथ - पव्कान्न निर्मावया ॥१५१॥
जैं अनुभवितील याची गोडी । बंद तैंच जन्ममरणनाडी । निर्वाणपदाची वतनवाडी । अक्षय्य जोडी मिळेल ॥१५२॥
हेमाडांची रसाळ वाचा । साईप्रसादलाभ साचा । योग पय - इक्षु - रसाचा । ग्रंथाचा थाट काय वानावा ॥१५३॥
असतील बहुत ग्रंथकार । न ये प्रसादवाणीचा अधिकार । जैं लाधे सद्नुरु साचार । विश्वाधार रमापति ॥१५४॥
जरी केलें विद्याध्ययन । न निपजे ऐसें ग्रंथलेखन । सद्नुरुकृपेवांचून । सत्य वचन त्रिवार ॥१५५॥
कोण वानील श्रीसाईसच्चरिता । किती अनुपम ग्रंथयोग्यता । लाधला हेमाडपंतासम कर्ता । परम सौभाग्यता मुमुक्षूंची ॥१५६॥
यावत् ग्रंथ महीतळीं । तावत्  कीर्ति भूमंडळीं । गोविंदरायें केली दिवाळी । वेळींच मुमुक्षूंकारणें ॥१५७॥
ग्रंथ बाप धन्य धन्य । साईसद्नुरुप्रसादजन्य । मुमुक्षुजीवां होईल मान्य । विचारदैन्य फेडील ॥१५८॥
अनंतजन्मींचा सुकृतठेवा । म्हणूनि घडली साईसेवा । मिळाला मधुर गोविंदरावा । मेवा ग्रंथलेखनाचा ॥१५९॥
पंत हेमाड कट्टे भक्त । कवि वेदांतविद्यासक्त । साईसद्नुरुपदानुरक्त । दिवानक्त असती कीं ॥१६०॥
वेदान्तविषय अति गहन । विरक्ति - भक्तिज्ञान जोड देऊन । ऐसा ग्रंथ करणें निर्माण । गुरुकृपेवीण दुर्घट ॥१६१॥
अध्याय नव्हत हीं हेमकोंदणें । जडिलीं त्यांत कथा - अमोलरत्नें । त्यांतील अर्थप्रभाकिरणें । महाप्रयत्नें गोविंदरायें ॥१६२॥
नाना अध्याय सुगंध सुमनमाळा । अर्पीतसे श्रीसाईसद्नुरुगळां । गोविंद - मती प्रेमळ बाळा । निर्मळभावेंकरूनी ॥१६३॥
नाना अध्याय शुद्ध हेमकुंभ । त्यांत श्रीसाईसच्चरित गंगांस । भरूनि ठेविती रघुनाथडिंभ । मुमुक्षुदंभ दवडावया ॥१६४॥
नानाग्रंथरणांगण नभ । उभविती अध्याय यशस्तंभ । मर्दूनि असुर दर्पाभिमानंदभ । रघुनाथडिंभमतिखङ्गें ॥१६५॥
ग्रंथ रत्नजडित पंचारती । अध्यायकथार्थ स्नेहसूत्रज्योती । विरक्ति शांति घेऊनि येती । संतनृपती ओंवाळण्या ॥१६६॥
ग्रंथमाया विश्वमोहिनी । अध्याय बाहू उंच उभवुनी । कथार्थ - केय़ूर काय शृंगारुनी । सज्ज आलिंगनीं साई ब्रम्हा ॥१६७॥
साई सच्चरित ग्रंथसम्राट । अध्याय रम्य चतुर भाट । श्रद्धा ज्ञान वेदान्त थाट । वैभव अफाट वानिताती ॥१६८॥
साईसच्चरित परमार्थ - हाट । एकेक अध्याय त्यांतील पेठ । अनुभवकथा वस्तु दाट । रचिल्या नीट कविवर्यें ॥१६९॥
ग्रंथ गंगपात्र विराट । अध्यायरचना सुबक घाट । कथारसामृतप्रवाह अचाट । सामर्थ्य अफाट गुरुकृपेचें ॥१७०॥
ग्रंथ नव्हे हा कल्पवृक्ष । संसारजनां वाटे रुक्ष । मुमुक्षुभाविकां केवळ मोक्ष । अनुभव प्रत्यक्ष पहावा ॥१७१॥
यासचि म्हणावें खरें स्मारक । जें संसृतितमतापहारक । मोहमायानिरयतारक । शांतिदायक अक्षय्य ॥१७२॥
ग्रंथकार राव गोविंद । साईसद्नुरुपदारविंद । नित्य नवा मधु मकरंद । चाखीत मिलिंद होऊनी ॥१७३॥
उपनाम जयांचें ‘दाभोलकर’ । आंग्लप्रभुसेवातत्पर । विद्या विनय आचार - विचार । अधिकारसंपन्न जे असती ॥१७४॥
रखुमाबाई तयांची गृहिणी । सुशील भाविक सद्नुणखाणी । पतिपरायण विनतवाणी । साईचरणीं द्दढभाव ॥१७५॥
वेंगुर्ल्यासन्निध ‘दापोली’ । मूळवस्ती तेथ जाहली । ‘केळवें’ ग्रामीं नंतर केली । वस्ती वांडवडिलीं कवींच्या ॥१७६॥
शके सतराशें एक्यायशीं । शुक्ल पंचमी मृगशिर - मासीं । रघुनाथमार्या लक्ष्मीच्या कुशीं । जन्मती पुण्यराशी गोविंद ॥१७७॥
गौडसारस्वत ब्राम्हाण जाती । गोत्र भारद्वाज वय सप्तती । आषाढ शुक्ल नवमी तिथी । दिवंगति अठराशें एकावन्नीं ॥१७८॥
शके अठराशें चवेचाळिसीं । ग्रंथ आरंभिला चैत्रमासीं । वावन्नाध्याय । ज्येष्ठमासीं । शाके एकावन्नीं पूर्ण केले ॥१७९॥
गोविंदरावां एकचि सुत  । पांच दुहिता, चार विवाहित । सुत विवाहित वैद्यक शिकत । सुता अविवाहित शिके तेंचि ॥१८०॥
आतां कथितों पारायणपद्धती । तैसीच सप्ताहाची सुगम रीती । दिधली गुरुचरित्रीं वा अन्य ग्रंथीं । कृपावधान श्रोतीं द्यावें ॥१८१॥
चोखट करूनि अंत:करण । भक्तिभावें करावें पारायण । एक, द्वि, वा त्र्यहनीं करावें पूर्ण । साईनारायण तोषेल ॥१८२॥
अथवा करावा सप्ताह गोड । मिळेल पुण्यसंपत्तीची जोड । साई पुरवील मनींचें कोड । भवभय मोड होईल ॥१८३॥
प्रारंभ करावा गुरुवासरीं । उष:कालीं स्नानानंतरीं । बसावें आपुल्या आसनावरी । उरकुनी सत्वरी नित्यकर्म ॥१८४॥
मंडप घालवा रम्य विस्तीर्ण । रंभा, कर्दळी, वसनादि करून । उपरी सुंदर आच्छादन । घालून विभूषित करावा ॥१८५॥
त्यांत करावें उच्चासन । भोंवतीं काढाव्या भिन्न भिन्न । रंगवल्लया रंगपूर्ण । नयनसुभग असाव्या ॥१८६॥
साईसद्नुरु - प्रतिमा करून । अथवा सुंदर छबी घेऊन । उच्चासनीं ठेवावी जपून । करूनि वंदन प्रेमभावें ॥१८७॥
चीनांशुकीं ग्रंथ बांधोनी । सद्नुरुसन्निध त्या ठेवूनि । पंचोपचारें उभयतां पूजुनी । आरंभ वाचनीं करावा ॥१८८॥
व्रतस्थ राहावें अष्ट वासर । करावा गोरस वा फलाहार । अथवा भर्जित धान्य प्रकार । नक्त रुचिर वा एकभुक्त ॥१८९॥
प्राचीदिशीं मुख करून । सद्नुरुमूर्ती मनीं आठवून । करावें स्वस्थ मनेंकरून । ग्रंथवाचन मोदभरें ॥१९०॥
अष्ट, अष्ट, आणि सप्त । अष्ट, षट्, अष्ट, सप्त । एवं पाठ करावा दिन सप्त । अवतरणिका फक्त अष्टमाहनीं ॥१९१॥
अष्टमदिनीं व्रतपारणा । करूनि नैवेद्य साईनारायणा । सुग्रास भोजन आप्तेष्ट - ब्राम्हाणां । दक्षिणा यथाशक्ति त्यां द्यावी ॥१९२॥
अवंतूनि वैदिक ब्राम्हाणां । करावी निशीं वेदघोषणा । पयशर्करापान संभावना । देऊनि तन्मना निववावें ॥१९३॥
अंतीं वंदूनि सद्नुरुचरणां । अर्पावी त्या उचित दक्षिणा । धाडावी ती भांडारभुवना । संस्थाननिधिवर्धनाकारणें ॥१९४॥
येणें तोषेल साईभगवान । देईल भक्ता पसायदान । छेदील भवभय - लेलिहान । दावील निधान मोक्षाचें ॥१९५॥
श्रोते संत माहेरघर । पडो, पडेल अवतरणिका विसर । द्यावी ग्रंथार्थावर नजर । विनवी किंकर पायांतें ॥१९६॥
श्रोते सज्जन कृतांत काळ । असो दासावर दया अढळ । ठेवूनि तुमच्या चरणीं भाळ । प्रार्थी बाळ बाबांचा ॥१९७॥
उणें अधिक असेल जें जें । तें तें द्यावें मजला माझें । सार गेऊनि चित्त विराजे । ऐसें कीजे श्रोतीं तुम्हीं ॥१९८॥
नमो साई शिवनंदना । नमो साई कमलासना । नमो साई मधुसूदना । पंचवदना साई नमो ॥१९९॥
नमो साई अत्रिनंदना । नमो साई पाकशासना । नमो साई निशारमणा । वन्हिनारायणा साई नमो ॥२००॥
नमो साई रुक्मिणीवरा । नमो साई चिद्भास्करा । नमो साई ज्ञानसागरा । ज्ञानेश्वरा श्रीसाई नमो ॥२०१॥
अवतरणिका वाक्पुष्पांजली । तैसीच नमन - नामावली । प्रार्थी अर्पूनि गुरुपदकमलीं । साईमाउली संतोषो ॥२०२॥
इति श्रीसाईसद्नुरुप्रेरिते । दास बाबा बाळविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । अवतरणिका नाम त्रिपंचाशत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥


॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ समाप्तोऽयं ग्रंथ: ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel