‘जैसें शारदीचिये चंद्रकळे- । माजीं अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥५६॥
तियांपरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपण चित्ता । आणुनियां ॥५७॥

‘हें सलगी म्यां म्हणितलें । चरणांलागोनि विनविलें । प्रभु सखोल ह्रदय आपुलें । म्हणवूनियां ॥६३॥

जैसा स्वभाव मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिक तयाचा । संतोष आथी ॥६४॥
तैसा तुम्हीं मी अंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थू काई ॥६५॥

‘हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । येरव्हीं काय भानुतेजीं खद्योता । शोभा आथी ॥६७॥

कीं टिटिभू चांचूवरी । माप सूये सागरीं । मी नणतु त्यापरी । प्रवर्तें एथ ॥६८॥
आयका आकाश गिंवसावें । तरी आणिक त्याहूनि थोर होआवें । म्हणऊनि अपाड हें आघवें । निर्धारितां ॥६९॥

‘हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें । गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं ॥७४॥

परी एथ असे एक आधारु । तेणेंचि बोलें मी सधरु । जै सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेव म्हणे ॥७५॥
येरव्हीं तरी मी मूर्खु । जरी जाहला अविवेकु । तर्‍ही संतकृपादीपकु । सोज्ज्वळ असे ॥७६॥

लोहाचें कनक होये । हें सामर्थ्य परिसींच आहे । कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धी ॥७७॥

जरी प्रगटे सिद्धसरस्वती । तर्‍ही मुकया आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ती । नवल कायी ॥७८॥
कां जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे । म्हणऊनि मी प्रवर्तों लाहें । ग्रंथीं इये ॥७९॥
तरी न्यून तें पुरतें । अधिक तें सरतें । करोनि घ्यावें हें तुमतें । विनवितु असें ॥८०॥
आतां देइजे अवधान । तुम्हीं बोलविला मी बोलेन । जैसें चेष्ट सूत्राधीन । दारुयंत्र ॥८१॥
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु । ते आपला अलंकारितु । भलतयापरी ॥८२॥

ज्ञानेश्वरी अ० १

‘सेवंतीये अरसिकांहीं । आंग पाहतां विशेषु नाहीं । परी सौरभ्य नेलें तिंहीं । भ्रमरीं जाणिजे ॥५९५॥

तैसें घडतें प्रमेय घेइजे । उणें तें मज देइजे । जें नेणणें हेंचि सहजें । रूप कीं बाळा ॥५९६॥
परी नेणतें जर्‍ही होये । तर्‍ही देखोनि बाप कीं माये । हर्ष केंही न समाये । चोज करिती ॥५९७॥
तैसें संत माहेर माझें । तुम्हीं मिनलिया मी लाडेजें । तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजो जी ॥५९८॥
आतां विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तिराजा । तो अवधारू वाक्यपूजा । ज्ञानदेवो म्हणे ॥५९९॥

ज्ञानेश्वरी अ० १५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel