पुण्यांत बाजीराय बडोद्यांत फत्तेसिंग महाराज । उदार स्वामी सेवक त्यांना कर्णाची उपमा साज ॥ध्रु०॥

इकडे अमृतराय वडील । तिकडेही आनंदराय दादा । इकडे प्रभु बाजीराय । तिकडे फत्तेसिंग साहेब जादा ।

इकडे आप्पासाहेब तिकडे महाराज सयाजी उमदा । इकडे पांच चार वाडे । तिकडेही तसाच महाल जुदा ।

इळुडे स्वामी चाकरीस पलटणें । तिकडे सेवक इंग्रज । उदार स्वामी सेवक त्यांना ० ॥१॥

इकडे स्वार शिपाई । तिकडेहि तसेंच थोडे बहुत । इकडे श्रावणमासीं दक्षिणा । तिकडेही धर्म होत ।

इकडे आल्या गेल्याचा आदर करितात यथास्थित श्रीमंत । तिकडेही जो आला गुणिजन तो नाहीं गेला रिक्तहस्त ।

इकडे पेशवे । तिकडे गायकवाड उभयतां शिरताज । उदार स्वामी सेवक त्यांना ० ॥२॥

इकडे भरगच्ची पांघरुणें । तिकडेही याहुन चढी । इकडे अन्नशांतीचा तडाखा तिकडेही चालू खिचडी ।

इकडे आदितवार बुधवार । तिकडेही मांडवीत घडमोडी । इकडे मुळामुळा । तिकडे विश्वामित्र जोडी जोडी ।

इकडे तलात पर्वतीचा । तिकडे सुरसागर नांव गाज । उदार स्वामी सेवक त्यांना ० ॥३॥

इकडे भूमीवर अंथरुण । तिकडे रेतीमुळें घरोघर खाटा । इकडे पैका पुष्कळ । तिकडेही सुवर्णाच्या लाटा ।

इकडे जुना वाडा । तिकडे लहरीपुर्‍याचा बोभाटा । इकडे पुरण वरण । तिकडे चुरमा क्वचित्‌ वरंटा पाटा ।

इकडे पैठणी लफ्‍फे । तिकडे उशा जवळ अमदाबाज । उदार स्वामी० ॥४॥

इकडे हत्ती घोडे पालख्या । तिकडेही कमती नाहीं । इकडे रावबाजी तिकडे फत्तेसिंगाजी दाहीदुराई । इकडे जोगेश्वरी ।

तिकडेही दैवत बेचराई । इकडे देवस्थान । तिकडेही तशीच सांगूं काई । इकडे लोक दक्षणी ।

तिकडे गुजराथी न्यारी मिजाज । उदार स्वामी सेवक त्यांना० ॥५॥

इकडे उत्साह गणपतिचा । तिकडे तशीच चंपाषष्‍टी । इकडे हरदासाच्या बिदाग्या । तिकडे तशाच भरमुष्‍टी ।

इकडे मेघडंबरी । तिकडे तशीच पहा जा दृष्‍टी । इकडे ओंकारेश्वर । तिकडे मुक्तेश्वर नवीच सृष्‍टी ।

इकडे दिग्गज पहिलमान । तिकडे जेठी कुस्ती रोज । उदार स्वामी सेवक त्याना कर्णाची उपमा साज ॥६॥

इकडे नाना फडणीस । तिकडे शिताराम दिवाण गाजी । इकडे पंत सदाशिवा । तिकडे शास्त्री गंगाधर दाजी ।

इकडे बागमळे । तिकडे हर जिन्नस शाखभाजी । इकडे माती । तिकडे रेती हारफेर जमिनी माजी ।

इकडे हौद पाण्याचे तिकडे कुव्यावर मोठी मौज । उदार स्वामी सेवक त्यांना० ॥७॥

इकडे रावबाजी पंढरीस । आषाढी यात्रेस जातात । तिकडे विसा कोसांवर डाकुरजी पंढरीनाथ ।

इकडे गंगा जवळ, तिकडेही तसेंच, रेवातीर्थ । इकडे तसेच, तिकडे घटाव दोन्ही कडला यथार्थ ।

इकडे कडेतोडेवाले तिकडेही तशीच लहज । इकडे अनंदफंदी, तिवडेही जाऊनि आला सहज ।

उदारस्वामी सेवक त्यांना कर्णाची उपमा ॥साज॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to पोवाडा