१.
ऐसा वर देई हरी । गाईं नाम निरंतरीं ॥१॥
पुरवीं आस माझी देवा । जेणें घडे तुझी सेवा ॥२॥
हेंचि आहे माझे मनीं । कृपा करीं चक्रपाणी ॥३॥
रूप न्याहालूनियां डोळां । मुखीं नाम लागो चाळा ॥४॥
उदाराच्या राया । दासी जनी लागे पायां ॥५॥
२.
साधु आणि संत । जन्म द्यावा जी कलींत ॥१॥
मागणें तें हेंचि देवा । कृपा करीं हो केशवा ॥२॥
संत दयाळ परम । तया साक्षी नारायण ॥३॥
जनी म्हणे ऐसे साधु । तयापाशीं तूं गोविंदू ॥४॥
३.
विटेवरी ब्रम्हा दिस । साधु संतांचा रहिवास ॥१॥
देव भावाचा अंकित । जाणे दासाचें तें चित्त ॥२॥
भक्ति जनी मागे देवा । तिचा मनोरथ पुरवा ॥३॥
४.
देवा देईं गर्भंवास । तरीच पुरल माझी आस ॥१॥
परि हे देखारे पंडरीं । सेवा नामयाचे द्वारीं ॥२॥
करी पक्षि कां शुकर । श्वान श्वापद मार्जार ॥३॥
ऐसी आशा हे मानसीं । म्हणे नामयाची दासी ॥४॥
५.
ऐसा पुत्र देईं संतां । तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥
गाता नित्य नेमें । वाची ज्ञानेश्वरी प्रेमें ॥२॥
संतांच्या चरणा । करी मस्तक ठेंगणा ॥३॥
कन्या व्हावी भागीरथी । तुझे प्रेम जिचे चित्तीं ॥४॥
ऐसे करी संतजना । दासी जनीच्या निधाना ॥५॥
६.
माझें दु:ख नाशी देवा । मज सुख दे केशवा ॥१॥
आम्हां सुख ऐसें देई । तुझी कृपा विठाबाई ॥२॥
चरणीं अनन्य शरण । त्यासि नाहीं जन्म मरण ॥३॥
जनी म्हणे हेंचि मागें । धण्या यर्व तुज सांगें ॥४॥
७.
रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य । असावें आरोग्य चिरकाळ ॥१॥
सख्या पुंडलिका आवडतें स्थळ । असावें चिरकाळ स्वस्ति क्षेम ॥२॥
अहो संतजन घ्या आवडतें धन । असावें कल्याण चिरकाळ ॥३॥
जन्मोजन्मीं हेंचि मागें गोविंदासी । म्हणे जनी दासी नामयाची ॥४॥
८.
परधन कामिनी समूळ नाणीं मना । नाहीं हें वासना माया केली ॥१॥
तृष्णा हे अधम न व्हावी मजला । प्रेमाचा जिव्हाळा देईं तुझ्या ॥२॥
निरपेक्ष वासना देगा मज देवा । आणि तुझी सेवा आवदीची ॥४॥
असो तो अकुळी असो भलते याती । माथां बंदी प्रीती जनी त्यासी ॥५॥
९.
द्वारकेच्या राया । बुद्धि देगा नाम गाया ॥१॥
मतिमंद तुझी दासी । ठाव देईं चरणांपासीं ॥२॥
तुझे पदरीं पडलें खरी । आतां सांभाळ करीं हरी ॥३॥
न कळे हरीची करणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel