विश्वसुंदरी हे शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम नाव येते ते म्हणजे निळ्याशार डोळ्यांची आणि मुर्तीमंत सौंदर्याचा पुतळा असलेल्या ऐश्र्वर्या रायचे. मात्र केवळ ऐश्र्वर्याच नाही तर आणखी पाच भारतीय सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर विश्वसुंदरीचा बहुमान पटकावलेला आहे. तसेच सर्वात जास्त वेळा (म्हणजेच सहा वेळा) विश्वसुंदरी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम आपल्या देशाच्या नावे आहे. मात्र या दैदिप्यमान यशाची मुहुर्तमेढ खऱ्या अर्थाने ५४ वर्षांपूर्वी १९६६ ला लंडनला रोवली ती भारताची पहिली विश्वसुंदरी असलेल्या रिता फारिया या सौंदर्यवतीने.

"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" हे जरी खरे असले तरी बाळ पाळण्यातून उतरताच किती आई-वडील किंवा पालक बाळाच्या आशा आकांक्षा आणि स्वप्नांच्या पुर्ततेसाठी बाळाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात हे सांगणं कठीणच आहे. शिवाय आपल्याकडे डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या नादात किंवा निट, जेईईच्या अनावश्यक ओझ्याखाली किती बालकांचे बालपण, आयुष्य करपले गेले आहे हा विषयसुद्धा तेवढाच गंभीर आणि चिंतनीय आहे. या दोन क्षेत्राशिवाय इतरत्रही कर्तृत्व गाजवता येते हे कित्येकांच्या गावीही नसते‌. रिता फारिया मात्र हे दुष्टचक्र भेदण्यात कमालीची यशस्वी ठरली.

अत्यंत 'सामान्य' कुटुंबात जन्मलेल्या रिता फारियाने "असामान्य" कामगिरी करत सर्वांना आश्र्चर्याने "तोंडांत बोटे घालायला लावली." बालपणापासूनच काहीतरी विशेष करून दाखवायचे वेड असलेल्या रिता फारियाने आपल्या स्वप्नांना कोमेजू दिले नाही. मुंबईच्या ग्रॅंट मेडीकल कॉलेजमध्ये आपले वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच सहज गंमत म्हणून तिने "मिस मुंबई" स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकली सुद्धा. याप्रसंगी तिला बक्षिसादाखल पाच हजारांची कमाई झाली होती. लगेचच तिने आपले नशिब आजमावत "ईव्हज विकली मिस इंडिया" स्पर्धेत अवतरली होती आणि ही स्पर्धा आपल्या नावे करत तिने देशपातळीवर आपल्या सौंदर्याचा डंका वाजवला होता.

खरेतर मिस मुंबई आणि मिस इंडिया सारख्या स्पर्धा लिलया जिंकणाऱ्या रिता फारियाची खरी कसोटी यानंतरच होती. कारण तिला यानंतर टक्कर द्यायची होती ती जगभरातील सुंदरींशी. १९६६ विश्वसुंदरी स्पर्धेकरीता स्थान होते लंडन. इकडे तिला विश्वसुंदरीचा चकचकीत, लखलखणारा मुकुट खुणावत होता तर दुसरीकडे तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एक जळजळीत सत्याची आठवण करून देत होते. अखेर "आकांक्षापुढे गगण ठेंगणे" पडले. रिताच्या पालकांनी खंबिरपणे तिच्या पाठीशी उभे राहत तिच्या स्वप्नपूर्तीसाठी कंबर कसली होती.

१९६६ ला विश्वसुंदरी स्पर्धेसाठी जेव्हा रिता फारिया लंडनला निघाली तेव्हा तिच्या गाठीशी अवघे तिन पौंड इतकी रक्कम होती. ना तिच्याजवळ स्पर्धेकरीता योग्य कपडे होते, ना स्विमींग सुट, ना हाय हिल शुज. जे काही खरेदी करायचे होते ते अवघ्या तिन पौंडात करायचे होते. अखेर तिने कसेबसे स्पर्धेकरीता स्वत:ला तयार केले आणि १७ नोव्हेंबर १९६६ ची संध्याकाळ तिच्यासाठी सोनेरी पहाट घेऊन उगवली.

पाच फुट आठ इंच दिमाखदार उंचीची, कमालीची ड्रेस सेंस असलेली, पेशाने वैद्यकीय विद्यार्थीनी असलेली रिया फारिया स्टेजवर अवतरताच "ती आली, तिने पाहिले आणि तिने जिंकले" अशी स्थिती निर्माण झाली होती. आपल्या ५१ प्रतिस्पर्धी सुंदरींना मागे टाकत रिता फारियाने सौंदर्य इतिहास रचला. फॅशन डिझायनर, मॉडेल सारख्या प्रोफेशनल सुंदरींना मात देत वैद्यकिय विद्यार्थीनी असलेल्या रिता फारियाने विश्वसुंदरीच्या मुकुटावर कब्जा केला होता.

या स्पर्धेत रिताने "बेस्ट इन स्विम सुट" टायटल जिंकतांनाच "बेस्ट इन इव्हिनींग विअर" हा टायटल चक्क भारतीय साडी परिधान करुन जिंकला होता. पर्सनॅलीटी राऊंडमध्ये तिला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना साचेबद्ध उत्तर न देता मला स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचे आहे कारण भारतात स्त्रीरोग तज्ञांची कमतरता आहे असे तिने स्पष्टपणे नमूद केले होते.

रिता फारिया आपल्या शब्दाला जागली आणि बक्षिसादाखल मिळालेल्या २५०० पौंडाच्या साहय्याने तिने किंग्ज कॉलेज हॉस्पिटल लंडन इथे स्त्रीरोग तज्ञाचे शिक्षण पुर्ण केले. विश्वसुंदरी स्पर्धा जिंकूनही चित्रपटसृष्टी आणि मॉडेलींगच्या मोहपाशात न अडकता रिता फारियाने आपल्या कारकीर्दी साठी वैद्यकीय क्षेत्राला पसंती दिली होती. विश्वसुंदरी स्पर्धा जिंकणारी ती पहिली आशियाई युवती ठरली होती. सोबतच वैद्यकीय क्षेत्राच्या पार्श्र्वभूमीतून विश्वसुंदरी स्पर्धा गाजवणारी सुद्धा ती पहिलीच युवती ठरली होती.

*१९९४ ऐश्र्वर्य युग*

आपल्या प्रभावी उंचीने,स्मितहास्य, हळुवार चालीसोबत कमालीच्या बुद्धीचातुर्याने विश्वसुंदरी ठरलेल्या रिता फारिया नंतर मात्र तब्बल २८ वर्षे आपल्याला नव्या विश्वसुंदरीसाठी प्रतिक्षा करावी लागली होती. अखेर १९९४ साली हा दुष्काळ संपवत "ऐश्र्वर्यवती ऐश्र्वर्या रायने" तब्बल ८६ प्रतिस्पर्धी सुंदरींना मागे टाकत ही स्पर्धा जिंकली होती. ऐश्वर्याच्या नितळ सौंदर्याला उत्तम बुद्धीमत्तेची जोड लाभताच अवघ्या २१ वर्षांची ही सम्राज्ञी विश्र्व सुंदरीचा मुकुट धारण करणार हे निश्चित झाले होते.

*१९९७ 'वेल डन' "डायना हेडन"* ऐश्वर्याचे कोडकौतुक संपते न संपते तोच १९९७ ला हैदराबादच्या डायना हेडनने विश्वसुंदरी पदावर दावा ठोकला‌. मुळत: मॉडेल असलेल्या डायनाला ही स्पर्धा जिंकायला फारसे श्रम घ्यावे लागले नाही. आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत डायनाने या स्पर्धेत लिलया बाजी मारली. डायना हेडनच्या फिगरपुढे उर्वरीत सौंदर्यवती फिक्या पडल्या आणि "मिस बिचविअर, मिस फोटोजेनिक, मिस वर्ल्ड" असा ट्रिपल धमाका करत डायना हेडनने प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारली. डायनाच्या या अचाट कामगिरीची बरोबरी आजपर्यंत कोणतीही सौंदर्यवती करू शकलेली नाही.

*१९९९ सौंदर्य'युक्त' "युक्ता मुखी"*

ऐश्वर्या आणि डायना हेडन पाठोपाठ भारतीय सुंदरींनी या स्पर्धेत आपली घोडदौड सुरू ठेवली आणि १९९९ ला युक्ता मुखीने हा बहुमान पटकावला होता. कॉम्प्युटर सायन्सची पदवी प्राप्त ही सुंदरी खरेतर "ब्युटी विथ ब्रेन" म्हणून ओळखली जाते. आकर्षक सौंदर्याला रेखीव चेहऱ्याची साथ मिळताच या सुहास्यवदनी सुंदरीला विजेता घोषित करण्यास परिक्षकांना फारसे डोके खाजवावे लागले नाही.

*२००० सौंदर्य धमाका, प्रियंका चोप्रा*

युक्ता मुखीच्या पाऊलांवर पाऊल ठेवत २००० साली प्रियंका चोप्राने भारतीय सौंदर्याची जादू पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली. पर्सनॅलीटी राऊंडमध्ये आपल्या हजरजबाबीपणाने तिने परिक्षकांना मोहीत करून टाकले. मदर टेरेसांना आदर्श आणि प्रेरणास्थान मानणाऱ्या प्रियंकाने लोकांच्या विचारशक्तीला प्रेरित करण्याचा मानस बोलून दाखवला होता.

*२०१७ मनमोहक मानुषी छिल्लर*

"ती पाहताच बाला, कलिजा खल्लास झाला" अशी वदंती असलेल्या रोहतक, हरियाणाच्या मानुषी छिल्लरने प्रियंका चोप्रा नंतर १७ वर्षांनी म्हणजेच २०१७ ला विश्वसुंदरी स्पर्धा जिंकली. वैद्यकीय विद्यार्थीनी असलेल्या मनस्वी सुंदर मानुषी छिल्लरने आपल्या नाजूक, निखळ सौंदर्याने परिक्षकांना घायाळ करत विश्वसुंदरीचा मुकुट हस्तगत केला. सौंदर्य आणि वाक् चातुर्याचा सुंदर मिलाफ घडवून आणत मानुषी छिल्लर सर्वांच्या पसंतीस उतरली होती. विशेषतः याप्रसंगी तिने आईचे महत्त्व, योगदान याबाबत सुंदर निरुपण करत परिक्षकांची वाहवा मिळविली होती. मानुषीचे वर्णन एका वाक्यात करायचे झाले तर "तुझमे रब दिखता है, यारा मैं क्या करू" एवढे हमखास म्हणता येईल.

जागतिक पातळीवर होणाऱ्या या स्पर्धांकरीता सौंदर्याचे काही मापदंड निश्र्चितच असतात. मात्र यासोबतच स्पर्धकांचा आत्मविश्वास, बुद्धीमत्ता, वाक् चातुर्य, हजरजबाबीपणा, निटनिटकेपणा, स्टेजवरील एकंदरीत वावर आणि त्यांच्या विचारांचा स्पर्धा जिंकण्यात मोलाचा वाटा असतो. या स्पर्धेला सेलिब्रिटींचे वलय प्राप्त असल्याने यात कमालीची चुरस निर्माण होत असते. भारतीय सुंदरींनी हे आव्हान पेलत सहावेळा या सोनेरी मुकुटावर आपली मोहोर उमटवलेली आहे. १९६६, रिता फारिया पासून सुरू झालेली ही सौंदर्ययात्रा भारतीय सुंदरी आणखी जोमाने पुढे नेईल यात वाद नाही. मात्र याचे श्रेय या सोनेरी पाऊलवाटेवर पहिले पाऊल ठेवणाऱ्या रिता फारियाला नक्कीच जाते.

दि. १५ ऑगस्ट २०२०

डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel