१७ मार्च या तारखेला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण याच दिवशी हरियाणा राज्यात दोन बालिकांनी जन्म घेतलेला होता. या दोन्ही बालिकांनी आपल्या अफाट कामगिरीने केवळ आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मोहिनी घातलेली होती. या बालिका होत्या १७ मार्च १९६२ ला कर्नाल इथे जन्मलेली अंतराळवीर कल्पना चावला तर दुसरी होती १७ मार्च १९९० हिसार ला जन्मलेली बॅडमिंटनची फुलराणी साईना नेहवाल. खरेतर हरियाणा सारख्या राज्यात जिथे मुलींचा जन्मदर तुलनेत कमी असतो, तिथे या दोघींनी आपल्या भिमपराक्रमाने मुलीसुद्धा जग जिंकू शकतात हे सर्वांना दाखवून दिले होते. चला तर मग आज आपण ओळख करून घेऊया पंतप्रधान मोदींनी *डार्लिंग डॉटर ऑफ इंडिया* म्हणून गौरविलेल्या बॅडमिंटनपटू साईना नेहवालची.
खरेतर हरियाणाची ओळख कबड्डी, कुस्ती आणि पहेलवानकी सारख्या खेळांसाठी आहे. साईनाचे बालपण आणि शालेय शिक्षण हरियाणात झाले होते आणि सुरवातीला तिचा ओढा कराटेकडे होता ज्यात तिने ब्राऊन बेल्टसुद्धा मिळवलेला होता. साईनाचे वडिल कृषी विद्यापीठात नोकरी करत होते तर आई राज्यस्तरीय बॅटमिंटनपटू होती. सहाजिकच आईला साईनाने सुद्धा बॅडमिंटनपटू व्हावे असे वाटत होते आणि तिने त्याकाळची टेनिससम्राज्ञी स्टेफी ग्राफवरून तिचे नामकरण स्टेफी असे केले होते. आतासुद्धा घरी तिला स्टेफी याच नावाने बोलावले जाते. साईनाच्या वडिलांची हरियाणातून हैदराबादला बदली झाली आणि या घटनेने साईनाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती. सोबतच ४२९ वर्षे जुन्या चारमिनारमुळे प्रसिद्ध असलेल्या हैदराबादची ओळख आता *बॅडमिंटनचे पॉवर हाऊस* म्हणून व्हायला लागलेली होती.
१९९८ ला हैदराबाद गाठलेल्या साईनाने केवळ ८ वर्षांची असताना उन्हाळी शिबिरात बॅडमिंटनसाठी दाखल झालेली होती. इथे प्रशिक्षक नाईक प्रसाद राव यांची नजर साईनावर पडली आणि त्यांच्या चाणाक्ष नजरेने ही ८ वर्षीय मुलगी *लंबी रेसका घोडा है* हे लगेच ओळखले होते. इथेच मग साईनाच्या मॅराथान आणि अथक परिश्रमाला सुरुवात झाली ज्यामुळे बॅडमिंटन जगताला एक चॅम्पियन खेळाडू मिळाली. उन्हाळी शिबिर आटोपताच साईनाची शाळा सुरू झाली आणि तिच्या धावपळीला प्रचंड वेग आला होता. राहत्या घरापासून सरावाकरिता २५ किमी दुर असलेल्या स्टेडियमवर स्कुटरने जाण्यासाठी तिला सकाळी लवकर उठावे लागायचे कारण बरोबर सहाला तिचा सराव आणि प्रशिक्षण सुरू व्हायचा. प्रशिक्षण आटोपले की लगेच ती शाळेला रवाना व्हायची आणि अभ्यासात गुंग व्हायची. मात्र दुपारी ३ ला शाळा सुटली की परत प्रशिक्षणासाठी हजर व्हायची आणि रात्री ९ वाजता घरी परतायची.
अर्थातच इतक्या दगदगीने ती प्रचंड थकून जायची, पायांत गोळे यायचे परंतु तिच्या जिद्दीपुढे हे दुखणे खुजे ठरायचे. कारण याबाबतीत तिची आई उषाराणी खंबिरपणे पाठीशी उभी रहायची आणि तिला प्रेरीत करायची.
साईनाची आई खरेतर तिच्यासाठी एक गुरु आणि उत्तम प्रशिक्षकाची भुमिका निभवायची. वास्तविकत: साईनाच्या प्रशिक्षणाला जवळपास १२०००/- रुपये प्रती महिना खर्च यायचा आणि तिच्या वडिलांचा जवळपास अर्धा पगार यातच खर्च व्हायचा. मात्र त्यांनी यासाठी कधी भविष्य निर्वाह निधीला हात लावावा लागला तर कधी मित्र आणि नातेवाईकांकडून मदत घ्यावी लागली परंतु साईनाच्या प्रशिक्षणात कधी खंड पडू नये याची त्यांनी दक्षता घेतली होती. शिवाय त्याकाळी स्पर्धांमध्ये मिळणारी बक्षिसं आणि खेळाडूंना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती तुटपुंज्या असल्याने साईनाच्या वडिलांना चांगलीच आर्थिक कसरत करावी लागत असे. अखेर योनेक्स सनराईझ स्पोर्ट्सने साईनाच्या किटला प्रायोजित करणे सुरू केले तेव्हा कुठे तिच्या वडिलांचे आर्थिक ओझे कमी झाले होते.
पहिले नाईक प्रसादराव नंतर आरिफ,पुलेला गोपीचंद आणि विमलकुमार यांच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेल्या या २४ कॅरेट साईनाने आपल्या खेळाने जवळपास १५ वर्षांपासून बॅडमिंटन जगतावर राज्य केलेले आहे. यादरम्यान तिने अनेक विक्रमांना गवसणी घातलेली आहे. आतापर्यंत तिने लढलेल्या ६२९ सामन्यांपैकी ४३३ सामन्यात ती विजयी झालेली आहे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधले एकंदरीत २४ टायटल्स तिच्या नावे आहेत ज्यात ११ सुपरसिरिज टायटल्स आहेत. सोबतच ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्यपदक तिने कमावले आहेत.
या फुलराणीने २००५ पासून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आणि २००६ पर्यंत १९ वर्षांखालील एशियन सॅटेलाईट बॅडमिंटन स्पर्धा दोनदा जिंकली. ८६ व्या सिडेड असणाऱ्या साईनाने फिलीपाईन्स ओपन जिंकताच ती सर्वात कमी वयात चार तारांकीत स्पर्धा जिंकणारी पहिली महिला आणि आशियाई खेळाडू ठरली होती. २००८ ला ती पहिल्यांदा बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आणि उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. २००९ ला साईनाने इंडोनेशियन ओपन स्पर्धा जिंकली आणि बीडब्ल्यूएफ सुपर सिरीज टायटल जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.२०१० ला दिल्लीला झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले तर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.
२०१५ साली साईनाने आपल्या कारकीर्दीतले सर्वोच्च शिखर गाठले होते. पहिले तिने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपल्या नावे केली तर ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. यानंतर लगेच तिने इंडोनेशियन ओपन स्पर्धा जिंकली आणि जागतिक क्रमवारीत ती अव्वल ठरली होती. असा पराक्रम करणारी प्रकाश पदुकोण यानंतर ती दुसरी भारतीय खेळाडू तर पहिलीच महिला खेळाडू ठरली होती. बॅडमिंटनचे कोर्ट सतत १० वर्षे गाजवल्यावर मात्र तिला २०१६ मध्ये दुखापतीने ग्रासलेले होते. टोंगळ्याच्या जुन्या दुखापतीने डोके वर काढताच तिला खेळात सातत्य राखता आले नाही मात्र *आय अॅम बॅटमिंटन* या कॅम्पेनसाठी राजदूत म्हणून साईनाची निवड झालेली होती. २०१७ साल सुद्धा तिच्यासाठी दुखापतीने वेदनादायी ठरले मात्र २०१८ ला राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले आणि याच वर्षी आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावत आशियाई स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये देशाचा पदकांचा दुष्काळ संपवला.
अशाप्रकारे बीडब्ल्यूएफ ज्युनिअर चॅम्पियनशिप, बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.साईनाच्या या दमदार कारकिर्दीत २००८ ला बीडब्ल्यूएफ तर्फे मोस्ट प्राॅमिसिंग प्लेअर म्हणून गौरविण्यात आले होते तर २००९ ला तिला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. साईनाच्या दमदार कामगिरीने ती राजिव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराची मानकरी ठरलेली आहे. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकताच तिच्यावर बक्षिसांची बरसात झाली होती. जवळपास सव्वादोन करोड रुपये, रोख रक्कम बक्षिसादाखल मिळाली होती तर सचिनच्या हस्ते तिला बीएमडब्ल्यू कार भेट देण्यात आलेली होती. दोन विद्यापीठांनी तिला डॉक्टरेटची मानद पदवीसुद्धा प्रदान केलेली होती.
भारतात बॅटमिंटनची लोकप्रियता वाढविण्यात साईनाचा सिंहाचा वाटा आहे. एवढेच नव्हे तर बॅटमिंटन कारकिर्दीत प्रचंड व्यस्त असुनही तिने सामाजिक भान उत्तमप्रकारे जपलेले आहे. गोरगरिबांच्या उद्धारासाठी ती नेहमीच अग्रणी राहिलेली असून सर्वाधिक दान करणाऱ्या अॅथलेटीक्स खेळाडूंमध्ये ती १८ व्या क्रमांकावर आहे. २०१२ ला साईनचे आत्मचरित्र *प्लेईंग टू विन, माय लाईफ ऑन अॅंड ऑफ कोर्ट* प्रकाशित झाले होते तर तिच्या जिवनावर आधारित बायोपिकला २०१८ मध्ये सुरुवात झालेली आहे ज्यात परिणिती चोपडा तिची भुमिका साकारत आहे.
साईनाच्या स्वप्नाला तिच्या आई-वडिलांनी पंख दिले होते. साईनाच्या यशस्वी कारकिर्दीत तिच्या आईचा मोलाचा वाटा आहे तर तिच्या वडिलांनी ती अवघी ८ वर्षांची असताना आपला अर्धा पगार तिच्या सरावासाठी खर्च करत एका चॅम्पियन खेळाडूला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. साईनासुद्धा नेहमीच अभिमानाने सांगत असते की तिला आई-वडील, प्रशिक्षक आणि देशासाठी पदके जिंकायची आहेत. तिचा कराटे ते बॅटमिंटन आणि हरियाणा ते हैदराबादचा एकंदरीत जिवनप्रवास तिच्या जिद्दीची, प्रचंडमेहनतीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी आहे. नवोदितांसाठी आदर्श असलेली साईना आपल्या उत्तम वक्तशिरपणासाठी ओळखली जाते. अवघ्या ५ मिनिटांच्या वार्मअप नंतर जवळपास ९ तासांपर्यंत सराव तिच करु शकते. पार्टी, सिनेमा, हॉटेल आदी सुखसुविधांना गौण मानत बॅडमिंटन कोर्टवर सतत घाम गाळणाऱ्या साईनाने आपल्या कर्तृत्वाने आपल्या देशाचे नाव जगभरात गाजवलेले आहे.
दि. १६ मे २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com