फुटबॉल हा जगातील सर्वात जास्त लोकप्रिय खेळ असून जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास अर्धे जग म्हणजेच अंदाजे ३५० करोड लोक फुटबॉलप्रेमी आहेत. युरोप, लॅटीन अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय असलेल्या या खेळाचे जगभरात दिवाने असून डिएगो मॅराडोना हा तमाम फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशातही फुटबॉल चाहत्यांची कमी नसून फिफा विश्वचषक स्पर्धा असोत की दिग्गज युरोपीयन क्लबचे सामने असोत, रात्रभर डोळे चोळत  फुटबॉल सामने पाहणारे दर्दी आपल्याकडे कमी नाहीत. पेले, रॉबर्टो बॅजिओ, मायकेल प्लॅटीनी,  रोनाल्डो, झिनेदिन झिदान, डेव्हिड बेकहेम, ख्रिस्तियानो रोनाल्डो असो की सध्याचा सुपरडुपर स्टार लियोनेल मेस्सी असो,, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट म्हणून फुटबॉल प्रेमींची पसंती अर्जेंटीनाच्या डिएगो मॅराडोना यालाच जाते. निश्र्चितच पेले यांनी सर्वाधिक गोल केलेले आहेत तर मेस्सीने जास्त चषक जिंकलेली आहेत, मात्र आपल्या जादुई खेळीने फुटबॉल प्रेमींच्या ह्रदयावर राज्य केले ते केवळ आणि केवळ डिएगो मॅराडोनाने.

३० ऑक्टोबर १९६० ला अत्यंत गरिब कुटुंबात जन्मलेल्या डिएगो अर्मांडो मॅराडोना या वामनमुर्तीने आपल्या जिगरबाज खेळाच्या भरवश्यावर आपले आणि देशाचे नाव एका आगळ्यावेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. *मुर्ती छोटी पण किर्ती मोठी* असलेल्या मॅराडोनाचा जन्मच फुटबॉलसाठी झाला असावा एवढे फुटबॉल त्याच्या नसानसांत भिनलेले होते. खरेतर फुटबॉल मध्ये साडेपाच फुट उंची म्हणजे अगदीच साधारण मानली जाते मात्र उंचीचा बाऊ न करता या पठ्ठ्याने यशाची उंचच उंच शिखरे आपल्या अद्भुत खेळीने पादाक्रांत केलेली आहे. बाळपणापासूनच फुटबॉल साठी झपाटलेल्या या खेळाडूचे चेंडूवर उत्तम नियंत्रण, ड्रिबलींगमध्ये हाडखंडा आणि चेंडू इतक्या सफाईने पास करायचा की याला फुटबॉलचा *गोल्डन बॉय* म्हणून नावारूपास यायला वेळ लागला नाही.

अवघा आठ वर्षाचा असताना युवा प्रशिक्षक फ्रान्सिस्को यांची पारखी नजर मॅराडोनावर पडली आणि त्यांनी या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम केले. शरिरयष्टी लहान मुलासारखी असुनही मॅराडोनाचा परिपक्व खेळ पाहून ते अचंबित झाले होते. अखेर खडतर प्रशिक्षणानंतर हे *रॉ मटेरिअल फिनिश्ड प्राॅडक्ट* मध्ये रुपांतरीत झाले आणि आता वेळ होती ती मॅराडोनाच्या फुटबॉल करिअरचा श्रीगणेशा करण्याची. १९७६ ला वयाची १६ वर्षे पुर्ण व्हायच्या आतच मॅराडोनाने अर्जेंटीना ज्युनिअर संघात खेळणे सुरू केले. १९७७ ला त्याने १६ व्या वर्षी हंगेरीविरूद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले परंतु १९७८ च्या फिफा विश्वचषकात त्याच्या कमी वयाचे कारण देत प्रशिक्षकाने त्याला संघात स्थान दिले नव्हते. मात्र १९७९ च्या जपानच्या फिफा युवा स्पर्धेत मॅराडोनाने आपल्या खेळाने जगभराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेले होते. 

आक्रमक मिडफिल्डर आणि स्ट्राईकर म्हणून खेळताना त्याने १९८२ च्या फिफा विश्वचषकात संपूर्ण पाच सामने बदली खेळाडू शिवाय खेळले आणि हंगेरीविरूद्ध दोन गोल केले. मॅराडोनाची खरी जादू चालली ती मेक्सिकोला झालेल्या फिफा विश्वचषक १९८६ ला. यावेळी तो अर्जेंटीना फुटबॉल संघाचा कर्णधार होता. तो संपूर्ण सामने पुर्णवेळ खेळला. यात त्याने तब्बल ५ गोल केले तर ५ गोलमध्ये सहकार्य केले. मेक्सिको सिटीला झालेला उपांत्यपूर्व फेरीचा मॅराडोनाचा इंग्लंडविरुद्धचा सामना चांगलाच गाजला‌ होता‌. याच सामन्यात *हॅंड ऑफ गॉड* आणि *गोल ऑफ सेंच्युरी* असा मॅराडोनाचा डबल धमाका पहायला मिळाला होता. खरेतर या सामन्याला फॉकलंड युद्धाची पार्श्र्वभूमी होती. दक्षिण अटलांटिक मधल्या दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण सॅंडविच बेटावर ब्रिटीशांचा कब्जा होता. मात्र या बेटांवर अर्जेंटीनाने हल्ला करुन ते बेट आपल्या ताब्यात घेतल्याने २ एप्रिल ते १४ जुन असे १० आठवडे हे युद्ध लढले गेले ज्यात ब्रिटीशांचा विजय झाला होता. यामुळेच जेव्हा हे दोघेही संघ आमने-सामने आले तेंव्हा तुंबळ युद्ध होणे सहाजिकच होते. त्या सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला मॅराडोनाने जॉर्ज वॅल्डानोला पास दिला‌ मात्र इंग्लंडच्या डिफेंडर्सनी त्याला अडखळा आणला होता तर  इंग्लंडच्या स्टिव्ह हॉजने बॉल क्लिअर करण्यासाठी इंग्लंडच्या गोल पोस्टकडे उडवला आणि इथेच इंग्लंडच्या पानिपतला सुरुवात झाली.

इंग्लंडच्या खेळाडूने चेंडूचा ताबा सोडताच चेंडूवर टपलेल्या मॅराडोनाने चिताच्या चपळाईने चेंडूवर  झेपावला तर त्याच क्षणी इंग्लंडचा गोलरक्षक पिटर शिल्टननेसुद्धा चेंडूकडे धाव घेतली. मॅराडोनापेक्षा २० सेंमी उंच असलेल्या पिटर शिल्टनने उंचावत उजव्या हाताने तर मॅराडोनाने हनुमान उडी घेत चेंडूवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला आणि या भानगडीत मॅराडोनाच्या डाव्या हाताला स्पर्श करत चेंडू इंग्लंडच्या गोलपोस्टमध्ये विसावला. खरेतर मॅराडोनाच्या या चुकीसाठी त्याला यलो कार्ड मिळून तो गोल रद्दबातल करणे अपेक्षित होते. मात्र ट्युनेशियन पंच अली बिन नासेर यांनी गोल वैध ठरवताच अर्जेंटिनाने सामन्यात १/० अशी आघाडी मिळवली होती. इंग्लंडच्या खेळाडूंनी पंचांकडे हॅंडबॉलची तक्रार केली मात्र त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. मॅराडोना स्वत: या गोलबद्दल साशंक होता, मात्र त्याने याबाबत *लिटिल विथ दी हेड ऑफ मॅराडोना, लिटिल विथ दी हॅंड ऑफ गॉड* असे स्पष्टीकरण दिले होते. या विवादानंतर मैदानात मॅराडोनाच्या मंत्रमुग्ध खेळीने जगाला *गोल ऑफ सेंच्युरी* बघायला मिळाला होता.

पहिल्या वादग्रस्त गोलनंतर विस्कळीत झालेल्या इंग्लंड संघावर मॅराडोनाने दबाव आणून अवघ्या ४ मिनिटाने पुन्हा आक्रमणाला सुरूवात केली. आपल्याच हाफमध्ये चेंडूवर ताबा मिळवताच इंग्लंडच्या ५ खेळाडूंसोबत गोलरक्षकाला अक्षरशः स्तिमित करणारा गोल नोंदवला. जवळपास ६६ यार्ड म्हणजेच फुटबॉल मैदानाचे अर्धे अंतर वेगाने कापत, सहा खेळाडूंना चुकवत अप्रतिम गोल केला. एकतर मॅराडोनाची उंची कमी असल्याने त्याला धावतांना, खेळताना लो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा फायदा व्हायचा, शरीराचे संतुलन राखण्यासाठी मदत व्हायची. त्यातच त्याला ड्रिबलींगची मिळालेली दैवी देणगी, भक्कम भरदार परंतु चपळ शरीर, चेंडूवर कमालीचा ताबा असल्याने कमी जागेतूनही विरोधी खेळाडूंना चकमा देण्यात मॅराडोना तज्ञ होता. गोलरक्षकासहित सहा खेळाडूंना चकवत मॅराडोनाने एका आश्र्चर्यचकित करणारा गोल नोंदवत फॉकलंड युद्धाचा बदला घेतला होता. 

खरेतर मॅराडोना जरी मैदानात उजव्या बाजूला आक्रमणाला असला तरी तो प्रामुख्याने डाव्या पायाने खेळायचा. एवढेच काय तर इंग्लंडविरुद्ध गोल ऑफ सेंच्युरी करताना क्वचितच तो उजव्या पायाने खेळताना दिसला. मॅराडोनाच्या तुफानी खेळीने अर्जेंटीना उपांत्य फेरीत पोहोचला आणि तिथे बेल्जिअम विरूद्ध आणखी दोन गोल नोंदवत त्याने संघाला अंतिम फेरीत पोहचवले. अंतिम फेरीत जर्मनीने मॅराडोनासाठी डबल मार्कींगची तयारी केली होती मात्र मॅराडोनाच्या झंझावातापुढे जर्मनीचा टिकाव लागला नाही आणि अर्जेंटीनाने जर्मनिचा ३/२ असा धुव्वा उडवत विश्र्वचषक पटकावला होता.

१९८६ फिफा विश्वचषकात आपल्या दमदार खेळाने अर्जेंटिनाला जेतेपत मिळवून देणाऱ्या मॅराडोनाला गोल्डन बॉलने सम्मानित करण्यात आले. आतापर्यंत फक्त मॅराडोना (१९७९/१९८६) आणि मेस्सी (२००५/२०१४)  या दोघांनाच फिफा अंडर २० आणि फिफा विश्वचषक यांत गोल्डन बॉल सम्मान मिळवता आलेला आहे. फिफा १९८६ विश्र्वचषकात मॅराडोनाच्या अर्जेंटिना संघाने विरोधी संघावर जेवढे आक्रमण केले त्यात अर्धे शॉट्स मॅराडोनाने लगावले होते. त्याने जवळपास ९० ड्रिबल्सने विरोधी खेळाडूंना हैराण केले होते तर त्याच्याविरुद्ध ५३ फाऊल्स नोंदवले गेले होते. अर्जेंटिनाने विरोधी संघावर केलेल्या १४ गोलपैकी १० गोलमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग आणि सहकार्य होते.

१९९० (इटली) फिफा विश्वचषकात त्याने पुन्हा एकदा अर्जेंटिनाचे नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीत पोहचवले मात्र तोपर्यंत मॅराडोनाची जादू ओसरायला लागली होती. अंतिम सामन्यात जर्मनीने अर्जेंटिनाला १/० असे पराभूत करत मागील विश्र्वचषकातल्या आपल्या पराभवाचे उट्टे काढलेले होते. १९९४ (अमेरिका) फिफा विश्वचषकात तर अवघ्या दोन सामन्यानंतर फिफाने इफेड्रीन डोपींगमध्ये अडकल्याने मॅराडोनाची स्पर्धेतून हकालपट्टी केली होती. एका चॅम्पियन खेळाडूची अशाप्रकारे कारकिर्दीची अखेर होणे त्याच्या चाहत्यांना फार मोठा धक्का होता. मात्र याकरिता स्वत: मॅराडोना दोषी होता. तसेही तो क्लब स्तरावर खेळत असताना त्याच्यावर कोकेन आणि मादक द्रव्य सेवनाचे आरोप नेहमीच होत असत. मात्र त्याच्या सर्वांगसुंदर खेळीने ते झाकोळले जायचे. बार्सिलोना क्लबसोबत वादविवाद होताच त्याने नॅपोली क्लबकडून खेळणे सुरू केले होते आणि आपल्या आक्रमक खेळीने त्याने नॅपोली क्लबला सोनियाचे दिवस आणून दिले होते. अर्थातच मॅराडोना ही दुभती गाय असल्याने नॅपोली क्लबने त्याचे भरपूर लाडसुद्धा केले होते.

अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करताना मॅराडोनाने देशाला १९८६ ला फिफा विश्वचषकात सुवर्ण, तर १९९० ला रजतपदक मिळवून दिले. कोपा अमेरिका स्पर्धेत १९८९ ला कांस्यपदक तर १९७९ फिफा विश्वचषक अंडर २० मध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने ३४ गोल नोंदवले तर ९१ कॅपचा तो मानकरी ठरला होता. मॅराडोना १९८२, १९८६,१९९० आणि १९९४ अशा चार फिफा विश्वचषकात खेळला आणि २००० मध्ये त्याला फिफा *प्लेअर ऑफ दी सेंच्युरी* चा पुरस्कार मिळाला होता.

मॅराडोनाच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या वेगवान खेळात ड्रिबलींगची किमया. सोबतच रिबोना अर्थात रिव्हर्स क्राॅसपास. फ्री किक, कॉर्नर किक आणि पेनल्टी किकमध्ये त्याचा कुणीही हात पकडू शकत नसे. शिवाय तो डेडबॉल तज्ञ म्हणूनही ओळखला जायचा. फ्री किकमध्ये त्याचे तंत्र जगावेगळे होते. गोल पोस्ट पासून केवळ २२/१७ यार्डावरून अथवा पेनल्टी क्षेत्राच्या बाहेरुनही फ्री किकवर  गोल करण्यात तो वस्ताद होता. 

मात्र एवढा गुणवंत खेळाडू डोपींगच्या आहारी गेला आणि कारकिर्दीची विल्हेवाट लाऊन बसला. डोपींगमुळे त्याचे वजन १३० किलो पर्यंत जाताच त्याच्यावर २००५ ला गॅस्ट्रीक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. डोपींगच्या विळख्यातून बाहेर येण्यासाठी त्याला खुप मेहनत करावी लागली मात्र शरीरावर त्याचे दुष्परिणामही त्याला भोगावे लागले होते. कधी हार्ट अटॅक तर कधी हिपॅटायटीसने मॅराडोना जिवनमृत्यूचा खेळ खेळत होता.

एवढ्या चढ उतारातही त्याची लोकप्रियता अजिबात कमी झाली नव्हती. तसेच फुटबॉलमधून निवृत्तीनंतरही त्याचे सामाजिक सेवाकार्य अबाधित होते. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनासआयर्स इथे त्याच्या चाहत्यांनी त्याचा ३ मिटर उंचीचा कांस्य, सिमेंटचा पुतळा उभारला तर काही चाहत्यांनी त्याच्या ३८ व्या जन्मदिनी *चर्च ऑफ मॅराडोना* स्थापन केले, ज्याचे ६० देशात एक लाखांहून अधिक अनुयायी आहेत. फुटबॉल वर अतोनात प्रेम करणारा मॅराडोना त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या देवासारखा आहे. फुटबॉल मध्ये यानंतरही अनेक खेळाडू येतील, अनेक पराक्रम, विक्रम नोंदवले जातील परंतु मॅराडोनाची जादू कधी संपेल असे वाटत नाही. पृथ्वी ग्रहावरचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला गेलेला हा खेळाडू अनेक वादविवादानंतरही अत्यंत लोकप्रिय आहे. त्याचे कट्टर प्रतिस्पर्धीही त्याच्या जादुई खेळाचे कौतुक करत असत. इंग्लंडच्या विरूद्ध हॅंड ऑफ गॉडचा विवाद होऊनही त्याच सामन्यात गोल ऑफ सेंच्युरी लगावणाऱ्या मॅराडोनाचे तत्कालीन इंग्लंडचा खेळाडू गॅरी लिनेकरने तोंडभरून कौतुक केले होते. कित्येकदा त्याच्या तब्येतीची अफवा पसरताच तहानभुक विसरून जगभरातले चाहते त्याच्याकडे धाव घेतात, यातच त्याची लोकप्रियता, चाहत्यांवर असलेला त्याचा घट्ट पगडा, त्याच्या महानतेची साक्ष देतात.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel