१९८५ च्या काळात महिला टेनिसचे नाव घेतले की मार्टीना नव्रातिलोव्हा आणि ख्रिस एव्हर्ट लॉईड यांचे नाव हमखास पुढे यायचे. मार्टीनाचा जन्म तर जणुकाही ग्रॅंड स्लॅम जिंकण्यासाठीच झाला आहे असे एकंदरीत तिच्या खेळावरून वाटत असे. मात्र असे असले तरी वेळ काढून मार्टीनाचा खेळ बघावा असे कधीच वाटत नव्हते. दरम्यान दुरदर्शनने जनमानसात आपले जाळे चांगले पसरवले होते आणि याचदरम्यान मार्टीना व ख्रिस एव्हर्टच्या साम्राज्याला धक्का द्यायला जर्मनीची एक नवोदित टेनिस सुंदरी अवतरण घेत होती. या टेनिस सुंदरीने जर्मनीत टेनिसची लोकप्रियता वाढवली असे म्हणतात परंतू हे अर्धसत्य असून या सम्राज्ञीने न केवळ जगात टेनिस ची लोकप्रियता वाढवली तर आपल्या सुंदर खेळाने जगभरातील प्रेक्षकांना टिव्हीसमोर खिळवून ठेवले होते.
या टेनिस सम्राज्ञीचे नाव होते स्टेफनी मरिया ग्राफ, परंतू ही स्टेफी नावानेच प्रसिद्ध होती. १४ जुन १९६९ ला मॅनहेम, पश्चिम जर्मनीत जन्मलेल्या या टेनिस ललनेने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना तर टेनिस कलेने विरोधकांना पुरते घायाळ केलेले होते. ५ फुट ९ इंच उंची, गौरवर्ण, हलके निळे डोळे, सोनेरी केसांची ही सोनपरी टेनिस कोर्टवर अवतरली की *तुम हुस्नपरी, तुम जाने जहाँ, तुम सबसे हसी, तुम सबसे जवाॅं* ह्या ओळी आपोआप ओठांवर यायच्या. मुख्य म्हणजे स्टेफीचा कोर्टवर सहजसुंदर सभ्य वावर, त्यातच तिच्या पांढराशुभ्र पोषाखात ती एकदम डिसेंट दिसायची, क्वचित प्रसंगी रंगीत कपड्यात तर आणखीनच मोहक दिसायची आणि तिचे भारतीय साडी मधले रुप कित्ती कित्ती विलोभनीय असणार याची तर कल्पनाच करवत नसे. बस आपल्या हातात *बेचैन नजर बेताब जिगर, ये दिल है किसी का दिवाणा* एवढेच म्हणायचे बाकी असायचे.
अर्थातच *काबिले तारिफ होने के लिये, वाकिफ ऐ तकलीफ होना पडता है* हे विसरून कसे चालणार. स्टेफीचा जन्मच टेनिस प्रशिक्षकाच्या घरी झाल्याने आणि मातापिता दोघांच्याही नसानसांत टेनिस खळखळून वाहत असल्याने स्टेफीने टेनिसचे बाळकडू चिमुरड्या वयातच घेतलेले होते. अवघ्या तिनं वर्षांची असतांना तिने घरबसल्या टेनिसची रॅकेट कशी फिरवायची याचे धडे घेतले तर चौथ्या वर्षी तिची चिमुकली पाऊले टेनिस कोर्टवर अवतरली. पाचव्या वर्षापासून तिने टेनिस स्पर्धेचा श्रीगणेशा केला तर सहाव्या वर्षी तिने आयुष्यातील पहिलीवहिली टेनिस स्पर्धा जिंकली. *बाळाचे पाय पाळण्यात दिसतात* असे म्हणतात मात्र स्टेफीचे पाय थेट टेनिस कोर्टवरच दिसू लागल्याने तिला आपले घर आणि प्रशिक्षक मातापित्यासोबत उज्वल भविष्यासाठी आपले घरदार सोडणे अपरिहार्य झाले होते.
अखेर मजल दरमजल स्टेफी एक्स्प्रेस १९८७ च्या फ्रेंच ओपनच्या फायनलला पोहोचली आणि तिने मार्टीना नव्रातिलोव्हाला धुळ चारत आपले पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले. इथून तिच्या टेनिस करिअरची गाडी सुसाट सुटली ती थेट १९९९ च्या फ्रेंच ओपनचे विजेतेपद सहाव्यांदा जिंकेपर्यंत. आपल्या स्वर्णीम कारकिर्दीत तिने ऑस्ट्रेलियन ओपन ४ वेळा, अमेरिकन ओपन ५ वेळा, फ्रेंच ओपन ६ वेळा, विम्बल्डन ७ वेळा जिंकली. १९८८ ला स्टेफीने ४ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासोबतच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकत *गोल्डन स्लॅमची* कामगिरी करून दाखवली आणि अशी कामगिरी करणारी ती एकमेव खेळाडू ठरली. तसेच प्रत्येक ग्रॅंड स्लॅम स्पर्धा कमीतकमी ४ वेळा जि़कण्याचा मान तिलाच जातो. डब्ल्युटीए च्या मानांकनात सर्वोच्च स्थानी सर्वात जास्त वेळ आरूढ राहण्याचा भिमपराक्रम (तब्बल ३७७ आठवडे) स्टेफीच्याच नावावर आहे. महिला टेनिसमध्ये पदकतालिकेत ती मार्टीना (१६७), ख्रिस एव्हर्ट (१५७) नंतर १०७ टायटलसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
स्टेफीच्या या भव्यदिव्य यशामागे तिची अथक मेहनत, खेळाप्रती समर्पन आणि प्रचंड आत्मविश्वास दडलेला आहे. ग्रास कोर्ट हे तिचे आवडते मैदान असले तरी क्ले कोर्ट, हार्ड,फास्ट कोर्ट यावरही तिचा झंझावात बघायला मिळायचा. तिचे जबरदस्त फुटवर्क आणि ताकदवर फोरहॅंड फटके तिच्या विरोधकांना खेळताना चांगलेच घाम फोडायचे. इनसाईड आऊट फोरहॅंड पॉवरफुल ड्राईव्ह हे तिचे रामबाण अस्त्र होते. तिच्या रॅकेट ची स्पिड आणि स्विंग कमालीचा होता. तिची १७४ कि.मी. प्रती तासाची अचूक आणि ताकदवर सर्व्हिस महिला टेनिसमध्ये वेगवान सर्व्हिस मानली जायची.
एवढे सर्व यश पदरात पडल्यावरही तिला अहंकार कधी शिवला नाही. काहीशी लाजाळू आणि विनम्र असलेली स्टेफी *विद्या विनयेन शोभते* ची जिवंत उदाहरण होती. कोर्टवर कधीच आदळआपट नाही की पंचाचे निर्णय विरोधात गेले तर उगाचाच त्रागा नाही. अनावश्यक वादविवाद नाही की एवढी मोठी स्टार खेळाडू असून कुठलाच बडेजाव नाही. असे असले तरी तिच्या आयुष्यात काही अप्रिय आणि कटू प्रसंग आलेले होते. १९९३ ला स्टेफीची कट्टर प्रतिस्पर्धी असलेली मोनिका सेलेस कोर्टवर खेळत असतांना स्टेफीच्या एका जर्मन चाहत्याने मोनिका सेलेसच्या खांद्यावर चाकुने सपासप वार केले होते. स्टेफीला नंबर वन होता यावे म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले होते. मात्र झालेल्या या हिंसक घटनेने मोनिका सेलेस दोन वर्षांच्या वर काळासाठी टेनिस पासून दुर राहिली होती. १९९५ ला काल्फ मसल दुखापतीने ती चांगली हैराण झाली होती तर तिचे प्रशिक्षक आणि वडिलांना कर विवाद प्रकरणात ४५ महिन्यांची कैदेची शिक्षा झाली होती, जी नंतर २५ महिने करण्यात आली होती. १९९७ ते १९९९ दरम्यान टोंगळे आणि कंबरेच्या दुखापतीने तिला ग्रासले होते आणि हळूहळू तिला *हेल्थ इज वेल्थ* चे महत्व पटायला लागले होते. शिवाय आयुष्याच्या या टप्प्यावर कोणत्याही ग्रॅंड स्लॅम विजेतेपदापेक्षा *आरोग्यं धनसंपदा* किती महत्त्वाची आहे हे कळून चुकले होते. तसेच अमांडा कोईत्झर, याना नोवोत्ना, लिंड्से डेव्हनपोर्ट, मार्टीना हिंगिस आणि विलियम्स भगिनींद्वारे तिला कडवट झुंज देण्यात येऊ लागली होती. यामुळे *स्टेफी ग्राफच्या यशाचा ग्राफ* खाली डोकावूं लागला होता. अखेर या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून तिने १९९९ चे फ्रेंच ओपन जिंकूनही निवृत्तीचा निर्णय घेतला.
स्टेफीच्या निवृत्तीने तिच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली. ज्यांना टेनिसची एबीसीडी कळत नव्हती त्यांना फोरहॅंड, बॅकहॅन्ड, टेनिस कोर्ट, ग्रॅंड स्लॅम सारख्या शब्दांना स्टेफीने मुखोदगत करून दिले होते. स्टेफी जिंकली की चाहत्यांना स्वत: बाजी मारल्याची फिलींग येत होती तर स्टेफीला हरवणारी खेळाडू चाहत्यांसाठी व्हिलन ठरत असायची. *टेनिस करिता स्टेफी आणि स्टेफी करिता चाहते* असा अलिखित नियमच तयार झाला होता. एक मात्र खरे स्टेफीला जे चाहत्यांचे प्रेम, पसंती मिळाली, त्याची बरोबरी आणखी कोणत्या टेनिस खेळाडूला मिळाली असेल असे वाटत नाही.
स्टेफीने जरी १९९९ ला अधिकृतपणे टेनिस मधून निवृत्ती स्विकारली असली तरी टेनिस रसिकांच्या हृदयातून ती कधीच निवृत्त होऊ शकणार नाही. तिचे टेनिस कोर्टवरचे आकर्षक पददालित्य, प्वाईंट जिंकली अथवा हरल्यावर निमुटपणे मान खाली घालत आपल्या जागी परतणे, सर्व्हिसची वाट बघतांना तिचे धारदार नाक आणि तिक्ष्ण नजर, सतत हलणारी केसा़च्या वेणीची शेपटी,,,,सर्वकाही लोभस आणि निव्वळ मन वेडावून टाकणारे होते. मात्र २००१ ला या टेनिस सम्राज्ञीने अमेरिकेचा नंबर एक खेळाडू आंद्रे अगासी याच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या जगभरातील चाहत्यांची *इक दिले टुकडे हजार हुऐ, कोई यहाँ गिरा कोई वहा गिरा* अशी स्थिती झाली. लवकरच तिच्या संसारवेलीवर जेडेन आणि जाझ अशी दोन गोंडस फुले अवतरली. आपल्या टेनिस कारकिर्दीत प्रचंड व्यस्त असुनही तिला चांगले सामाजिक भान होते. १९९८ ला तिने युद्ध अथवा इतर कारणांनी जखमी, विकलांग बालकांसाठी *चिल्ड्रेन फॉर टुमारो* या सेवाभावी संस्थेची स्थापना केली होती.